नवीन लेखन...

गोमुची उधारी (गोमुच्या गोष्टी – भाग ६)

धंदा करण्याची जिद्द बाळगून असणाऱ्या गोमुला धंद्यासाठी आवश्यक भांडवल देणारा अजून कोणी भेटला नव्हताच पण तरीही त्याला बारीकसारीक उधारी करावी लागे.
ती गरज भागवायला त्याने अनेकांकडे साखर पेरणी करून ठेवली होती.
त्यांच्यापैकी कांहीजणांकडून त्याला सामान उधार मिळे तर कांहीजणांकडून हजार-दोन हजार रूपयेही मिळत.
सर्वांची उधार देण्याची मर्यादा संपली की गोमु एखादी तात्पुरती नोकरी शोधी.
पैसे हातात आले की बरीचशी उधारी फेडून टाकी आणि परत उधार घ्यायला मोकळा होई.
उधारी करणे हे आपण मराठी माणसे कमीपणाच कां मानतो कुणास ठाऊक!
तसं तर म्हणतात की मानव अथवा त्याचा आत्मा हे शरीर निसर्गाकडून उधारच घेतो आणि जातांना परत निसर्गांतच सोडून जातो.
एवढ्या मोठ्या उधारीपुढे पैशांची मामुली उधारी ही कांही बाऊ करायची गोष्ट आहे कां ?

गोमुने केलेली उधारी फेडत असे, ह्या नियमाला फक्त आम्ही दोघे, मी आणि अन्वय पाटील, अपवाद होतो.
माझ्या बाबतीत उधारी फेडण्याचा प्रश्नच नव्हता.
लंगोटीयार ह्या नात्याने तो माझं, तुझं असा फरक आमच्यात करत नसे.
त्यामुळे माझे पैसे ते त्याचे पैसे, माझे कपडे ते त्याचे कपडे, माझी स्कूटर ती त्याची स्कूटर आणि त्याचे प्रश्न ते माझे प्रश्न, इ. सगळं ठरलेलंच होतं, म्हणजे त्याने गृहीत धरलेलं होतं.
दुसरा आमच्या वर्गांतला धनिक आणि हुशार मित्र अन्वय पाटील.
आमच्या शाळेंत हातांत सोन्याच्या अंगठ्या आणि गळ्यांत सोनसांखळी घालून येणारा एकमेव मुलगा म्हणजे अन्वय.
आता तो स्वतःही एका खाजगी कंपनीत मोठ्या जागेवर काम करत होता.
त्याच्या मनांत गोमुबद्दल कळवळा होता.
तो गोमुला नेहमी मदत करत असे.
पैसे देतानाच “हे परत करायची गरज नाही” म्हणून सांगत असे.

इस्टेट एजंट गुप्ताकडली नोकरी गेली तेव्हां गोमु खरंच अडचणींत होता.
तो जिथे रहायचा, म्हणजे ज्यांच्या घराच्या वऱ्हांड्यात झोपायचा, तेही त्याच्याकडून महिन्याला पांचशे रूपये भाडे घेत.
सहा सात महिन्यांच भाडं न दिल्याने त्यांनी त्याला “दुसरी सोय बघा” म्हणून सांगितलं होतं.
दुपारचं जेवण तो कुठेतरी बाहेर, शक्यतो, कुणा तरी दुसऱ्याच्या पैशाने घेत असे.
पण संध्याकाळी त्याचा डब्बा मालवणी खानावळीतून येत असे.
त्यांचे तीन महिन्यांचे पैसे द्यायचे राह्यल्यामुळे त्यांनीही नोटीस दिली होती की ह्या महिन्याच्या शेवटी जर पैसे नाही मिळाले तर पुढल्या एक तारखेपासून डबा बंद.
गोमुला उसने पैसे देणारी आणखी कांही ज्येष्ठ मंडळी होती.
त्यातील बहुतेकांनी आता गोमुच्या मागे परतफेडीसाठी तगादा लावला होता.
म्हणजे कोणी अगदी शायलॉकसारखा ‘पौंड आॕफ फ्लेश” साठी अडून बसला नव्हता पण सर्वांची त्याच्यामागे भुणभुण चालू होती.

सगळ्या मित्रांकडून शक्य तितके पैसे घेऊन झाले होते.
अन्वयशिवाय आम्ही बाकीचे मित्र स्वतःच महिन्याच्या वीस तारखेनंतर पुढल्या महिन्याच्या एक तारखेकडे लक्ष लावून असायचो.
अन्वय खात्रीचा.
पण नेमका अन्वय चांगला सहा महिन्यांसाठी परदेशी गेला होता.
अशाप्रकारे गोमुचे उधारीचे सर्व रस्ते बंद झालेले असतांनाच त्याने गुप्ता ब्रोकरकडे नोकरी स्वीकारली होती.
अर्थात जमलाच तर स्वतःही पुढे ब्रोकरचा धंदा करायचा विचारही त्याच्या मनांत होताच.
आता तीही नोकरी गेली होती आणि दुष्काळांत तेरावा महिना म्हणावा तसा गुप्ताच्या ग्राहकांना घरे दाखवतांना केलेला सर्व खर्चही त्याच्या गळ्यांत पडला होता.
परिस्थिती कठीण होती.
पण गोमु नाटकांतल्या चारूदत्तासारखा आपल्या हतबलतेला/गरीबीला दोष देत नव्हता.
अर्थात चारूदत्त आधी श्रीमंत होता आणि मग दानशूरतेने गरीब झाला होता.
तर गोमु अद्याप श्रीमंत व्हायचा होता.
पुढल्या महिन्याची एक तारीख अजून दहा दिवसांवर होती आणि ह्या दहा दिवसांत कांहीतरी मार्ग निघेल अशी गोमुला आशा होती.

पण मला मात्र ते अकराव्या नंबरला खेळायला येणाऱ्या बॕटस्मनला शतक काढणे जितकं कठीण असतं तेवढं कठीण वाटत होतं.
मी तर गोमुला कांहीच मदत करू शकत नव्हतो.
मी स्वतःच दुसऱ्याच्या घरी राहात होतो.
माझी खोली ही एका फ्लॕटचा भाग होती.
प्रवेशद्वार वेगळं देऊन ती फ्लॕटपासून वेगळी केली होती.
खोली छोटी होती तरीही मी गोमुला बोलावून घेतले असते.
तो खोलीच्या छोट्या बालकनींतही झोपला असता.
पण माझ्या मालकांना ते चालले नसते.
एखादा दिवस कोणी पाहुणा आला तर मालक चालवून घेत होते पण बाडबिस्तरा घेऊन आलेला गोमु त्यांना अजिबात चालला नसता.
त्यांनी जसं जनमेजय राजाच्या सर्पसत्रांत तक्षक सर्पाला आश्रय देणाऱ्या इंद्राचीच आहुती “इंद्राय स्वाः, तक्षकाय स्वाः” म्हणून टाकली होती तसं गोमुबरोबर त्याला आश्रय देणाऱ्या मलाच खोली खाली करायला लावली असती.
म्हणून मला गोमुची काळजी वाटत होती.
गोमु मात्र अजूनही धंदा करण्याची आणि त्यासाठी मोठं भांडवलं उभं करण्याची स्वप्न पहात होता.
मी गोमुला म्हणालो, “अरे, तू त्या गुप्ताची माफी माग. त्याने तुला परत नोकरीवर नाही घेतले तरी त्याच्याकडून निदान ह्या महिन्याचा पगार आणि तुझा वरखर्च एवढं जरी मिळालं तरी तुला ह्या घेणेकऱ्यांपासून खूप उसंत मिळेल.”
गोमुने “छ्या” असं म्हणत हातानेच माझं म्हणणं उडवून लावलं.

गोमुने आणिक कोणाकडून उधारी घेता येईल त्याचा शोध चालवला होता.
असा एक सावकार म्हणजे गिडवानी नांवाचा एक सिंधी होता.
तो शायलाॅकचा बाप नाही तरी नातेवाईक असावा.
तो गोमुला कोणत्याही तारणाशिवाय पांच ते दहा हजार उधार द्यायला तयार होता.
पण असे कर्ज देणे हा त्याचा धंदा होता.
त्यामुळे त्या पांच हजारावर दर महिन्याला पांचशे रूपये व्याज चढलं असतं.
म्हणजे महिन्याला दहा टक्के म्हणजेच वर्षाला १२०टक्के व्याजाचा दर होता.
शिवाय जर पांचशे रूपयेही देतां आले नाहीत तर ते पांच हजारांत मुद्द्ल म्हणून वाढणार होते.
म्हणजे पुढच्या महिन्याला पांचशे पन्नास रूपये व्याज द्यावं लागणार होतं.
अशा अटींवर त्याने पैसे घ्यावे हे मला मान्य नव्हतं.
परंतु गोमुला पुढची काळजी करण्याची संवय नव्हती.
उधारी घेणाऱ्या गोमुच्या लेखी पैशाला वर्तमानात महत्त्व होतं, भविष्यांत तो बक्कळ पैसा कमावणारच होता.

एके दिवशी माझ्या घरून जात असतांना माझे मालक खंडागळे हे गोमुला भेटले.
ते गोमुला माझा मित्र म्हणून ओळखत होते.
गोमु त्यांच्याबरोबर चालतां चालतां सहज खडा टाकून पहावा म्हणून त्यांना म्हणाला, “मालक, एक पांचशे रूपये आहेत कां हो आता तुमच्या खिशांत ?”
मालक खिसा चांचपत म्हणाले, “आहेत. पण कां हो ?”
“कांही नाही. इथे आलोच होतो तर कांही वस्तु मार्केटमधून नेणार होतो पण नेमका पाकीट आणायला विसरलो. मला आतापुरते दिलेत तर उद्या मी येईन तेव्हां परत करून टाकीन तुमचे पैसे.”
गोमुने शक्य तितका साळसूद चेहरा ठेवून सांगितले.
माझे मालक बहुदा त्या दिवशी खुशीत असावेत.
ते म्हणाले, “बरं ! हे घ्या. पण उद्या नक्की परत करा.”
सहज चेंडूला जरा बॕट लावावी आणि चेंडू सीमापार व्हावा तसंच हे झालं.

गोमुने त्यांच्या हातांतली पांचशेची नोट घेतली आणि खिशांतलं पाकीट काढून त्यांत ती ठेवू लागला.
त्याच्या मनांत विचार आला “अरेरे! आपण निदान हजार रूपये तरी मागायला हवे होते.”
तो खंडागळेना “धन्यवाद” म्हणणार होता, पण तेवढ्यात त्याला खंडागळेंचा चेहरा अचानक वेडावांकडा झालेला दिसला.
रागाने क्षणभर खंडागळे कांही बोलू शकत नव्हते फक्त गोमुकडे पहात डोळ्यांतून आग ओकायचा प्रयत्न करत होते.
दुसऱ्याच क्षणी गोमुचे पाकीट त्याच्या हातातून त्यानी खस्सकन खेंचून घेतले.
त्यांतली आपली पांचशेची नोट परत घेत ते म्हणाले, “काय हो, लाज नाही वाटत तुम्हाला ? खोटं बोलून उधारीने पैसे घेता. पाकीट घरी विसरला होतात ना ? सभ्य समजत होतो मी तुम्हाला.”
बोलता बोलता त्यानी रिकामे पाकीट गोमुच्या हातांत आपटले आणि ते निघून गेले.
आता मात्र बोलरने बॕटस्मनचा चक्क त्रिफळा उडवावा पण अंपायरने तो “नो बॉल” द्यावा अशी गोमुची गत झाली.

त्यानंतर चार पांच दिवसांनी गोमु आणि मी “सावली” बंगल्याच्या जवळून जात होतो.
अचानक कोणी तरी हांक मारली.
“शुक्, शुक्. अहो, गोमाजी शेठ.”
गोमु चपापून इकडे तिकडे पाहू लागला.
मला तर खात्रीच झाली की गोमुच्या कुणातरी सावकाराची ही हांक आहे आणि तो कुत्सितपणे गोमुला “गोमाजी शेठ” म्हणतो आहे.
गोमुलाही तसेंच वाटले असावे.
म्हणून तिथून सटकायचा आम्ही विचार करत होतो.
तोंवर बंगल्याच्या कुंपणावरून एक चेहरा दिसायला लागला.
गोमुने तो पाहिला आणि त्याच्या लक्षांत आले की हेच ते देशमुख, ज्यांना त्याने तो बंगला दाखवला होता.
गोमुने त्यांना हात केला.
त्यांनी आम्हाला बंगल्यातच बोलावले.
आमचं स्वागत करत ते म्हणाले, “तुमच्या या मित्रामुळे मला हा छान बंगला मिळाला. अजून सर्व व्यवहार पूर्ण व्हायचा आहे. पण गद्रेंनी माझ्याकडे चाव्याही दिल्या. पण आपली ओळख ?”
“हा प्रकाश कलबाडकर माझा लंगोटीयार.”
गोमुने त्यांना सांगितले.
देशमुखांनी तेवढ्यांत माणूस पाठवून चहापाणी आणि भरपूर खाण्याचाही बंदोबस्त केला होता.
पैशाच्या अभावी आम्ही सध्या माझाच डबा दोघे वांटून खात होतो.
त्यामुळे आम्ही, मराठ्यांची सेना ज्या त्वेषाने शत्रूवर तुटून पडत असे, तसे त्या खाण्यावर तुटून पडलो.

देशमुख गोमुला म्हणाले, “त्यादिवशी कांही गैरसमज झाला कां ? तुम्ही मला देशपांडे समजला होतात.”
गोमु म्हणाला, “थोडा घोटाळा झाला. माझ्या ब्रोकर मालकाने मला बंगला देशपांडेना दाखवायला सांगितला होता.
तुम्ही त्याच वेळी आलांत.
मी तुम्हाला देशपांडे समजून बंगला दाखवला आणि तुम्ही तो घेतलाही.
पण माझा मालक मी देशपांडेना बंगला दाखवायला हजर नव्हतो म्हणून रागावले.
तुमचा ब्रोकर कोण होता?” देशमुख म्हणाले, “अहो, मी कोणत्याही एजंटच्या सांगण्यावरून आलोच नव्हतो.
गद्रे माझे बालमित्र.
त्यांच्याच सांगण्यावरून बंगला पहायला आलो होतो.
ते कुणाला तरी पाठवणार होते.
तुम्ही भेटलात, मला वाटले की गद्रेनीच तुम्हाला पाठवले.”
“परंतु ब्रोकरने ह्याला नोकरीवरून काढूनच टाकले.
ह्याचे त्यामुळे खूप आर्थिक नुकसान झाले.”
मी त्यांना खरं ते सांगितलं.
“आय सी.” अस्सं म्हणून देशमुख विचारांत गढले.
मग गोमुला म्हणाले,
“मला माफ करा. माझ्यामुळे तुमची नोकरी गेली. पण मी तुम्हाला एक अॉफर देतो.
आता पुढचे चार-पांच महिने या बंगल्यात कांही सुधारणा करायच्यात, फर्निचर करायचयं.
मी कांही त्यावर लक्ष ठेवायला वेळ देऊ शकणार नाही.
गोमाजी शेठ तुम्ही कराल कां हे काम ?
महिना वीस हजार पगार देईन. चालेल ?”
देशमुखांच म्हणणं ऐकून गोमुने अक्षरशः आ वासला होता.
देशमुख पुढे म्हणाले, “तुम्ही माझं काम चुकीने केलंत पण प्रामाणिकपणे काम केलंत.
हे दहा हजार रूपये तुमच्या पहिल्या पगारांतला अॕडव्हान्स.”
दहा हजार रूपये घेतांना गोमु मनातल्या मनात कुणाकुणाची उधारी तात्काळ फेडायची आणि कुणाची पुढे ढकलायची याचे प्लॕनिंग करत होता.

— अरविंद खानोलकर.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..