अमेरिकेतील कंट्री म्युझिक – भाग ४

Country Music in America - Part 4

आपल्याकडे संगीत म्हटलं की गीतकार, संगीतकार आणि गायक अशी त्रिमूर्ती असावी लागते. हिंदीमधे गीतकार शैलेंद्र किंवा हसरत जयपुरी, संगीतकार

शंकर जयकिशन आणि गायक मुकेश किंवा गीतकार शकील बदायुनी, संगीतकार नौशाद आणि गायक महमद रफी किंवा गीतकार राजा मेहेंदी अली

खां, संगीतकार मदन मोहन आणि गायिका लता मंगेशकर असे त्रिवेणी संगम असले की डोळे मिटावेत आणि शब्द आणि स्वरगंगेत बुडून जावं. क्वचित्‌

कधी सी.रामचंद्र, हेमंतकुमार किंवा सचिन दा आपल्याच आवाजात गायले तर तेवढ्यापुरतं संगीतकार आणि गायक एक होणार. अर्थात मराठीमधे गोष्ट

थोडी वेगळी आहे. ग.दी.मांनी लिहावं आणि बाबुजींनी (सुधीर फडके) चाल देऊन गावं हा अलिखित नियम !

पण कंट्री म्युझिकमधे सहसा गीतकार आणि गायक एकच असतो. त्यात बहुतेक सगळे (निदान पुरुष कलाकार) गिटार वाजवणारे. त्यामुळे पठ्ठ्या

स्वत:च गाणे लिहिणार, त्याला चाल लावणार आणि गिटार वाजवत स्वत:च गाणार. काही वेळां त्यांच्या जोड्या किंवा ग्रूप्स असतात. त्यामुळे दोघांनी

मिळून गाणी लिहायची, त्याला संगीत द्यायचं आणि गायचं असं चालतं. तीन चार जणांचा ग्रूप असला तर सहसा एक दोन जण गाणं लिहितात, एखादा

मुख्य गायक आणि बाकी साथ देणारे, आणि बहुतेक जण एखादं वेगवेगळं वाद्य वाजवणारे.

कंट्री म्युझिक आणि मराठी संगीताची तुलना करायची झाली तर काही साधर्म्य जाणवतं. कवितेचा ढंग, गाण्याची शैली, त्यातला आशय, त्याचे

चित्रांकन (Video) वगैरे सगळ्याचा विचार केला तर आपले वसंत बापट, शाहीर साबळे आणि दादा कोंडके यांच्या गाण्याचं आणि शैलीचं अजब

मिश्रण डोळ्यांसमोर तरळून जातं.

कंट्री म्युझिकमधे काही काही विषय ठळकपणे पुन: पुन्हा येतांना दिसतात. यातला महत्वाचा विषय म्हणजे “माझा गाव”. यात आपल्या कुठल्यातरी

कोपर्‍यातल्या छोट्याश्या गावाचं मोठं कौतुक केलेलं असतं. गदिमांच्या “खेड्यामधले घर कौलारू”ची आठवण यावी असं! मग आपल्या गावातली छोटी

शाळा, गावाबाहेरचा ओढा, गावाच्या वेशीवरची पाण्याची टाकी, गावातलं जुनं छोटं चर्च, झोपाळू रस्ते, पिढ्यान पिढ्यांचे शेजारी, कोपर्‍यावरचं तुटपुंज्या

वस्तू मिळणारं छोटसं किराणा दुकान, यांच्या आठवणी काढलेल्या असतात. त्यात आपण काऊबॉय किंवा काऊगर्ल आहोत हे मोठ्या अहमहमिकेने

सांगण्याची धडपड असते. “आम्ही आपले गावंढळ आहोत आणि आम्हाला त्याचा अभिमान आहे” हे “गर्वसे कहो हम हिंदू है” या चालीवरचं पालूपद!

अमेरिकेत गावाकडच्या लोकांना ‘रेड नेक’ म्हणतात. (उन्हा तान्हात काम करणार्‍या लोकांच्या माना, उन्हात रापून तांबड्या लाल होतात. त्यामुळे शहरी

लोकांनी शेतकरी – गावंढळ लोकांना ठेवलेलं हे शेलकी विशेषण) त्यामुळे आपल्या ‘रेड नेक’ पणाचं कौतुक कंट्री म्युझिकमधे होणं हे ओघाने आलंच.

— डॉ. संजीव चौबळ

डॉ. संजीव चौबळ
About डॉ. संजीव चौबळ 84 Articles
मुंबई पशुवैद्यक महाविद्यालयातून पशुप्रजनन विषयात पदव्युत्तर शिक्षण (१९८६) घेतल्यावर भारतातील विविध संस्थांमधे सुमारे १४ वर्षे काम. २००१ साली युनिवर्सिटी ऑफ कनेक्टीकटमधे डॉक्टर जेरी यॅंग या “क्लोनिंग”च्या क्षेत्रातील नावाजलेल्या संशोधकाच्या मार्गदर्शनाखाली पीएच.डी. करण्यासाठी अमेरिकेत दाखल. गेली पंधरा वर्षे अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी व त्यानंतर नोकरीनिमित्ताने वास्तव्य. अमेरिकेतील उत्तम दर्जाच्या गायींमधे भृणप्रत्यारोपण (EmEmbryo Transfer Technology) तसेच टेस्ट टयुब बेबीज (In Vitro Fertilization) या क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांमधे संशोधन तसेच उत्पादनात जबाबदारीच्या पदांवर काम. आपल्या क्षेत्रातील नावाजलेल्या शास्त्रीय जर्नल्समधे व विविध राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय परिषदांमधे सुमारे २५ शोधनिबंध सादर. अमेरिकेतले वास्तव्य तसेच कामानिमित्ताने प्रवास मुख्यत्वे ग्रामीण/निमग्रामीण भागात झाल्यामुळे, अमेरिकेच्या एका सर्वस्वी वेगळ्या व अनोळखी अंगाचे जवळून दर्शन. सर्वसाधारण भारतीयांच्या अमेरिकेबद्दलच्या अतिप्रगत, अत्याधुनिक, चंगळवादी कल्पनाचित्राला छेद देणारे, अमेरिकेच्या ग्रामीण अंतरंगाचे हे चित्रण, “गावाकडची अमेरिका” या पुस्तकाद्वारे केले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…

error: कॉपी कशाला करता? लेखकाला लिहायलासुद्धा कष्ट पडतात.. चोरी कशाला करायची ? स्वत:च लिहा की....