नवीन लेखन...

चयनम

साहित्य अकादमी नवी दिल्ली यांनी “चयनम” नावाचे पुस्तक प्रकाशित केले आहे. या संग्रहात भारतातील विविध भाषेतील उत्कृष्ट लेख, कविता, कथा, संस्मरण आदी साहित्य सामील केले आहे. विभिन्न राज्यातील भारतीय भाषेतील उत्कृष्ट साहित्य हिंदी व इंग्रजी भाषेत अनुवादाच्या रूपाने साहित्य अकादमी गेल्या 50 वर्षापासून प्रकाशित करीत आहे. “ इंडियन लिटरेचर “ ही इंग्रजी पत्रिका 1957 तर हिंदी भाषेतील “समकालीन भारतीय साहित्य “ पत्रिका 1980 पासून नियमितपणे प्रकाशित होत आहे.

समकालीन भारतीय साहित्य पत्रिकेला पंचवीस वर्ष पूर्ण झाल्याबद्दल साहित्य अकादमीने विभिन्न भारतीय भाषेतील निवडक साहित्य “चयनम “ नावाने नुकतेच प्रकाशित केले आहे. समकालीन भारतीय साहित्य पत्रिकेचे संपादक व हिंदी साहित्यिक श्री अरुण प्रकाश यांनी “चयनम “ चे संपादन केले आहे. साहित्य अकादमीच्या सुवर्ण जयंती वर्षा निमित्त ही योजना अस्तित्वात आली आहे. या संग्रहात सर्वच भारतीय भाषेतील लेख, कविता, कथा, संस्मरण प्रकाशित केले आहे. तसेच तेलगू लेखक श्री केशव रेड्डी यांची “आखरी झोपडी” ही संपूर्ण कादंबरी प्रकाशित केली आहे. एकूण 148 लेखकांच्या रचनेला या संग्रहात स्थान मिळाले आहे.

यात मराठीचे कवी चंद्रकांत पाटील,श्रीधर नांदेडकर, निरंजन उजागरे,शरण कुमार लिंबाळे,मलिका अमर शेख तसेच विजय तेंडुलकर यांच्या “मेरी नाट्य शिक्षा” हा लेख, अरुणा लोखंडे यांचा “दलित महिलाओं के आत्मकथन” दया पवार यांची कथा “ साहिब दीदी और गुलाम” समाविष्ट आहे.

कोकणी भाषेतील कवी अरुण साखरदांडे यांची “ एक पेड को घर चाहिये” लक्ष्‍मणराव सरदेसाई यांची “ रिती रिवाजों का किला तोडकर” मनोहरराव सरदेसाई यांची “मेज आई “या कवितांचा समावेश आहे.

साहित्य अकादमीचे सचिव के सच्चिदानंदन यांनी “दो शब्द “ प्रस्तावनेत साहित्यातील चळवळी,आंदोलने, चढ उतार यांचा ओझरता उल्लेख केला आहे. देशाच्या स्वातंत्र्यानंतर अस्तित्वात आलेल्या साहित्य अकादमीने भारतीय भाषेतील साहित्यातील सुखदुःख,एकटेपणा, परकेपणा व मोह भंगाच्या घटनांचा आढावा घेतला आहे. सामाजिक व्यवस्थेत गरीब,अल्पसंख्यक, दलित,आदिवासी महिला हा घटक नेहमीच दुर्लक्षित राहिला आहे. राष्ट्रीय नेतृत्वाने सामान्य माणसाला निराश केले आहे. जीवनाच्या सर्वच क्षेत्रात अवमूल्यन, शोषण भ्रष्टाचार बोकाळला आहे.परंतु सामाजिक आंदोलनाला सुरुवात झाली आहे. पितृसत्ताक पद्धती विरोधात महिला उभ्या राहिल्या आहेत. दलितांच्या आंदोलनाला डॉक्टर भीमराव आंबेडकर यांनी नवी दिशा दिली. आदिवासी आपल्या जंगलाबद्दल जागरूक होत गेले. आणीबाणीच्या काळात स्वातंत्र्याची मुस्कटदाबी व त्यातून मूलभूत अधिकाराच्या रक्षणाकरिता आंदोलने उभी राहिली. ग्राहक चळवळ, प्रदूषण विरोध, जागतिकीकरण, पर्यावरण संकट,बाजार वाद, श्रमिक पुनरुत्थान,भाषिक अहंकार, देशीकरण,संस्कृती, राष्ट्रवाद या सर्वच घटनांचा आढावा साहित्याने घेतला आहे.

अरुण प्रकाश आपल्या संपादकीय भूमिकेत म्हणतात की साहित्य अकादमीच्या स्थापनेआधी भारतीय भाषेच्या जाणकारांना शेक्सपियर अधिक जवळचा वाटत होता.परंतु बंगाली भाषेतील रवींद्रनाथ ठाकूर यांचा मात्र त्यांना परिचय नव्हता. मराठीतील संत कवी तुकाराम तमिळ लोकांना अपरिचित होते. राजस्थानातील मीराचा असामी भाषकांना परिचय नव्हता. भारतीय साहित्यातील समृद्ध अक्षर धनाचा खजिना साहित्य अकादमीने इंग्रजी व हिंदी भाषेच्या द्वारे सर्वांना खुला केला आहे.

हा संग्रह या साहित्याचा प्राथमिक स्वरूपातील दस्तावेज आहे. त्यामुळे अनेक रचनांचा समावेश या संग्रहात होऊ शकलेला नाही. मराठीतील मागील पन्नास वर्षातील नामवंत साहित्यकार पु ल देशपांडे वि वा शिरवाडकर, वि स खांडेकर,अनंत काणेकर वि द घाटे, जी ए कुलकर्णी वसंत कानेटकर,गंगाधर गाडगीळ, यांच्यासह अन्य सर्वश्रेष्ठ रचनांना स्थान मिळालेले नाही. यामध्ये बऱ्याच वेळा अयोग्य साहित्याची निवड, निकृष्ट अनुवाद, मूळ लेखकांची परवानगी न मिळणे ,दुर्बोध हस्ताक्षर, स्वच्छ टाईप केलेली प्रत मिळणे अशा अनेक अडचणींचा येथे पाढा समोर ठेवलेला आहे.

अधिकृत सरकारमान्य 22 भारतीय भाषेतील निवडक रचना या संग्रहित केलेले आहेत. समकालीन भारतीय साहित्य पत्रिकेत पूर्वप्रकाशित साहित्यातून ही निवड करण्यात आली आहे. भारतीय साहित्यातील दिग्गज लेखक भैरप्पा, विजय तेंडुलकर , अज्ञेय, फणीश्वरनाथ रेणु, त्रिलोचन शास्त्री, नागार्जुन ,राजेंद्र यादव, कमलेश्वर आणि उर्दुतील अहमद सुसर ,गोपीचंद नारंग आणि सरदार जाफरी,बशीर बद्र ,प्रतिभा राय, सुनील गंगोपाध्याय , सुभाष मुखोपाध्याय, अमृता प्रीतम, केशव रेड्डी, थोसेफ मेकवान, शरण कुमार लिंबाळे , निर्मल वर्मा, शंभू मित्र ओ एन व्ही कुरूप, मित्रा फुकन यांना या संग्रहात स्थान मिळाले आहे.

विजय तेंडुलकर यांचा लेख “मेरी नाट्य शिक्षा” हा लेख मुळातच वाचून काढण्यासारखा आहे. यात त्यांनी अनेक अनुभव लिहिले आहेत. ते एका ठिकाणी म्हणतात की त्यांचे वडील नाट्यप्रेमी होते व त्यांनी काही नाटके लिहिली होती. वडिलांच्या या नाट्य प्रेमामुळे ते नाटक या साहित्यरचनाकडे वळले. त्यांचा भाऊ साहित्य रंगभूमी विषयातील रसिक पाठक होता व त्याच्या संग्रहात अनेक मूल्यवान ग्रंथ सामील होते. व्ही शांताराम यांच्या माणूस चित्रपटातील संवादाने ते भारावले व त्यांनी आपल्या नाटकात पात्रांची भाषा जिवंत व सहज ठेवली.
2006 साली प्रकाशित संदर्भ ग्रंथात अनेक दर्जेदार मराठी साहित्यिकांना स्थान मिळाले नाही. हिंदी व इंग्रजी अनुवाद होणे अत्यंत आवश्यक आहे. दुर्दैवाने 1980 पासून प्रकाशित “समकालीन भारतीय साहित्य” या पत्रिकेत अनेक ज्येष्ठ मराठी लेखक कवी यांच्या रचना हिंदी अनुवादित झालेल्या नाहीत. हे मराठी साहित्याचे दुर्दैव समजावे लागेल. कदाचित अनेक मराठी लेखक हिंदी अनुवादाबद्दल सजग जागरूक नाहीत. इंग्रजी अनुवाद झाला तरच आपल्या साहित्याची दखल घेतली जाईल असा एक गोड गैरसमज लेखकांमध्ये पसरलेला आहे. राष्ट्रीय स्तरावर आपले साहित्य पोहोचावे याकरिता हिंदी अनुवाद हा मार्ग अत्यंत महत्त्वाचा दुवा आहे. भारतीय भाषेतील अनुवाद पूल भक्कम होणे गरजेचे आहे. याकडे लक्ष देण्याची अत्यंत आवश्यकता आहे.

सरकारी प्रकाशनाला मर्यादा असतात. रेकॉर्डवर उपलब्ध अनुवादित साहित्य निवडले जाते. संपादकाचे काम सोपे होते. प्रत्येक प्रांतातील साहित्य चळवळीमध्ये अनुवाद या गोष्टीकडे गांभीर्याने पाहण्याची नितांत आवश्यकता आहे.दरवर्षी अनेक भाषेत साहित्य निर्मिती होत असते. या साहित्याची समीक्षा सुद्धा प्रकाशित होते. परंतु या साहित्याचा अनुवाद होण्यासाठी कार्यक्षम यंत्रणा अद्याप निर्माण झालेली नाही. अनुवादकाला मानवीय मर्यादा असतात. अनुवादकाची आवड,विचारसरणी व अन्य मित्रमंडळी यातून अनुवाद केला जातो. साहित्यामध्ये अनेक गट तट आहेत. अनेक विचारसरणीचे लेखक आहेत. उजव्या डाव्या ,दलित ,श्रमिक , स्री वादी असे अनेक पक्ष साहित्यात आहेत.साहित्याचा समग्र अभ्यास करून जे उचित आहे ते समोर आले पाहिजे. साहित्य चळवळीमध्ये केवळ एक विचारसरणी एक दृष्टिकोन ठेवून एकांगी धावपळ व्यर्थ आहे.

~ विजय नगरकर
अहमदनगर
vpnagarkar@gmail.com
9422726400

विजय प्रभाकर नगरकर
About विजय प्रभाकर नगरकर 27 Articles
मी बीएसएनएल मधील सेवानिवृत्त राजभाषा अधिकारी आहे. राजभाषा विभागामध्ये कार्यरत होतो. अनुवादित कवितांची पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

2 Comments on चयनम

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..