नवीन लेखन...

आणि अचानक त्या वळणावर (रोमांचक भयकथा) – भाग ३

भाग तीन

ते आवाज आता वजनदार आणि जास्त जोरात येवू लागले…. पालापाचोळ्यावरील त्या आवाजांचा वेग तिला जाणवू लागला…. सगळं बळ एकवटून, मनाचा हिय्या करून ती येणार्‍या प्रसंगाला तोंड देण्यासाठी, येणार्‍या आवाजांचा कानोसा घेत सावधपणे त्या दिशेने पाहू लागली आणि …..

काही क्षणातच रानडुकरांचा एक मोठ्ठा कळप तिच्यापासून 10-15 पावलांच्या अंतरावरून वेगाने रत्याच्या डाव्या बाजूने येवून, रस्त्याच्या उजवीकडील बाजूच्या जंगलात दिसेनासा झाला.

ते पाहुन निशाने कपाळावर हात मारून घेतला आणि सुटकेचा निःश्वास टाकला.हुश्शऽऽऽ, आपण काsssय काsssय विचार करत होतो…. नशीब…. जिवावरचं संकट टळलं.

निशा रस्त्यावरच मटकन् खाली बसली. आता मात्र तिला, तिचा एकटेपणा जास्त तीव्रपणे जाणवायला लागला आणि तिला खरोखरच रडू यायला लागले. गुडघ्यात डोके खुपसून ती रडू लागली. तिला तिच्या घरच्या सगळ्यांची आठवण यायला लागली. आपल्याला इतका उशीर झालाय म्हटल्यावर सगळे काळजी करत असतील. त्यांना आपला फोनही लागत नसेल. आईनं तर सगळं घर डोक्यावर घेतलं असेल. नेमकं शेखरच्या वाढदिवसाला असं व्हावं याचं तिला खूप वाईट वाटत होतं. काळजीनं घरच्यांची काय अवस्था झाली असेल या जाणिवेनं तिला जास्तीच रडू कोसळत होतं.

पाच मिनीटं रडून मोकळी झाल्यावर तिला एकदम जाणीव झाली की जंगलातल्या या सुनसान रस्त्यावर आपण एकट्याच रडत बसलोय. नाही…. आपण असं घाबरून चालणार नाही….. आपण एकट्या असूनही निम्म्यापेक्षा जास्त अंतर चालत आलोय….. आता थोडंच अंतर शि”ल्लक राहिलंय…..

तिनं डोळे पुसले, रडणं आवरलं.”चला निशाजी…. तुम्हाला चालावंच लागेल….. बस्स…. थोडंसं अंतर अजून….. आपल्याला निश्चितच कोणाची ना कोणाची मदत मिळेल….. बी पॉझिटीव्ह……आपण चालत रहायलाच पाहिजे…….” अशी स्वतःच्या मनाची समजूत घालत निशा रस्त्यावरून उठली आणि परत झपाझप चालायला लागली.

आतापर्यंत एक पूल आणि तीन वळणं पार झाली होती. आता आणखी एक पूल, दोन छोटीं वळणं आणि एक मोठ्ठं वळण…. बस्स…… लगेच पाच मिनिटांवर फॉरेस्टची चौकी….. येऽऽऽस…. चौकीवर निश्चितच काही ना काही मदत मिळाली असती, ऍटलिस्ट कुणाचा मोबाइल उपलब्ध झाला असता तर घरी फोन करून मी सुखरूप आहे, एवढं जरी कळवता आलं असतं तरी बास होतं….

नीशाला एकदम परत उत्साह आला. तीनं चालायला सुरूवात केली. आता चांदणं अजून स्वच्छ पडलं होतं. रस्ताही बर्‍यापैकी दिसत होता. चला, मोबाईलचा उजेड नाही तर देवानं चंद्राचा उजेड आपल्यासाठी उपलब्ध करून दिलाय, जणू देवच वरून आपल्यासाठी बॅटरी मारतोय…. त्या उदास आणि भीतीदायक वातावरणातही निशाला आपल्या या कल्पनेनं हसू आलं.

निशा थोडंस अंतर चालून गेली आणि तिला परत एका गाडीचा उजेड दिसला. यावेळी तिनं गाडी थांबवण्यासाठी दोन्ही हात हालवत मोठमोठ्यांनं”हेल्प, हेल्प” असं ओरडायला सुरूवात केली. गाडी तिच्या जवळ आली…. थोडी स्लो झाली….. अगदी तिच्या समोर थांबणार असं वाटत असताना…. गाडीच्या ड्रायव्हरच्या चेहेर्‍यावर तिला आश्चर्याचे आणि भीतीचे भाव दिसले आणि त्यानं अचानक गाडीचा वेग वाढवला आणि क्षणात गाडी तिच्यासमोरून निघून गेली.

xxxxxx एक सणसणीत शिवी निशाच्या तोंडून बाहेर पडली. किती नालायक माणसं आहेत ही…. माणुसकी नावाची चीजच या दुनियेत शिल्लक राहिलेली नाही…. अशा सुनसान रस्त्यावर एक मुलगी मदत मागते आणि या लोकांना तिची मदत करावी असं वाटत नाही? कमाल आहे !
“चला निशाबाई….. तुमची दोन पायांची गाडीच चांगली आहे…. वन टू, वन टू….”

तिला आठवलं……..ती घरात काही कारणानं रुसून बसली, बाहेरून कुणाशी भांडून आली, एखादी गोष्ट करणार नाही म्हणाली किंवा तिला अभ्यासाचा कंटाळा आला, की तिचे बाबा तिला, त्यांच्या लहानपणीची, त्यांच्या शाळेतल्या अभ्यासक्रमातली, त्यांची एक आवडती कविता ऐकवायचे, ती आठवली….

 

सदैव सैनिका पुढेच जायचे….

मागुती तुवा कधी फिरायचे

सदा तुझ्यापुढे उभी असे निशा….

सदैव काजळी दिसायच्या दिशा….”

तिचे बाबा अगदी तालात, चाल लावून, ही कविता म्हणून दाखवत असत. ही कविता ऐकली की तिला स्फुरण चढायचे.

तिला वाटलं… अच्छा… या गाण्यात आपलं नाव आहे म्हणून बाबा आपल्याला हे गाणं ऐकवत होते वाटतं,…… की आपल्या आयुष्यात कधीतरी असा प्रसंग आलाच तर, आपल्याला सैनिकासारखं त्या प्रसंगाला तोंड देता यावं, म्हणून आपल्याला ही कविता शिकवत होते, कोण जाणे…… असा विचार करत स्वताःशीच ते गाणं गुणगुणत निशा पुढं चालू लागली. आपण खरंच एक शूर सैनिक आहोत असं तिला वाटू लागलं.

आपल्याच नादात ती काही वेळ चालत राहिली आणि तिच्यापासून काही फर्लांगभर अंतरावर, ओढ्यावर जो पुल होता, त्या पुलाच्या टोकाशी काहीतरी हालचाल होत असल्याचं तिला जाणवलं….. परत निशाच्या मनात चऽऽऽऽर्र झालं. बापरे… आता हे काय नवीन संकट??…..

(क्रमशः)

© संध्या प्रकाश बापट

सौ. संध्या प्रकाश बापट
About सौ. संध्या प्रकाश बापट 50 Articles
नमस्कार वाचकहो, मी, सौ. संध्या प्रकाश बापट (माहेरची पद्मश्री विष्णू फाटक), सातारा. मी, सातार्‍यातील विविध कंपन्यांमध्ये/ऑफिसमध्ये अनेक वर्षे विविध पदांवर काम केले. तसेच काही वर्षे स्वतःचा व्यवसायही केला. 2018 मध्ये मी, नोकरी आणि व्यवसायातून स्वेच्छा निवृत्ती घेतली. या सगळ्या वर्षांत, इच्छा असूनही मनासारखे लिहिण्यास वेळ उपलब्ध होत नव्हता. मला लहानपणापासून संगीत, नाटक, सिनेमा, अभिनय आाणि वाचन या सगळ्याची प्रचंड आवड आहे. मी हौशी नाटकांत, एकांकिका, पथनाट्य यांत अभिनय करत होते. युट्यूब वरील वेब सिरीजमध्ये अभिनय करत आहे. नुकतेच झी टीव्ही वरील 'लागीर झालं जी' आणि 'मिसेस मुख्यमंत्री' या मालिकेत मी भूमिका केल्या आहेत. मी लघुकथा, कविता, प्रासंगिक लेख, वेब सिरीजसाठी मराठी आणि हिंदीतून कथा-पटकथा लिहीत आहे. काही लघुकथा ई-दिवाळीअंकात प्रसिद्ध झाल्या आहेत. माझ्यातील सुप्तगुणांना प्रेरणा आणि वाव देण्यामध्ये फेसबुक आणि व्हाटस्अ‍ॅप या सोशल मिडीयाचा आणि मला कायम प्रोत्साहन देण्यार्‍या तुम्हा सर्व वाचकांचा फार मोठा वाटा आहे.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..