नवीन लेखन...

आणि अचानक त्या वळणावर (रोमांचक भयकथा) – भाग ६

भाग सहा

ते दोघं एकमेकांशी गप्पा मारत थोडावेळ चालत राहिले… खरोखरच रोहनची साथ मिळाल्यामुळं हा अवघड रस्ता पार करणं सोपं होवून गेलंय असं नीशाच्या मनात आलं. मघासची आंधाराची आणि एकटेपणाची भीती नीशाच्या मनातून पार हद्दपार झाली होती… आणि क्षणात तिचं मन एका अनोख्या सुगंधानं भारलं गेलं. ती तिथंच थांबली, मनभरून तीनं खोल श्वास घेतला…. तो सुगंध तिनं अगदी आतपर्यंत ओढून घेतला…. तिचं मन एकदम मोहरून गेलं. अरेऽऽऽ, हा आपला आवडता सुगंध…येतोय तरी कुठून?…. ती चालता चालता थबकली….


हा लेख मराठीसृष्टी (www.marathisrushti.com) या वेबसाईटवर प्रकाशित झाला आहे. लेख शेअर करायचा असल्यास लेखकाच्या नावासह शेवटपर्यंत संपूर्णपणे शेअर करावा...

त्या सुगंधाच्या नादात आपल्याला लवकरात लवकर घरी पोहोचायचं आहे….. आपण जंगलातल्या रत्यातून चाललोय…. आपल्यासोबत चालता चालता रोहन नावाचा एक मुलगा गप्पा मारत होता….. हे सगळं ती क्षणांत विसरून गेली. तिचं मन, हृदय, डोळे आणि नाक तो सुगंध कुठून येतोय याचा शोध घेवू लागले….

आता चंद्र बर्‍यापैकी वर आला होता. उंच उंच झाडांच्या फांद्यातून त्याची किरणे रस्त्यावर पसरली होती त्यामुळे समोरचा रस्ता अगदी लख्ख दिसत होता. अजूबाजूच्या झाडांची पानं चंद्रकिरणांमुळे चमकत होती. तिच्या समोरचा रस्ता डोंगरातून थोडासा उंच चढाचा होता…. त्या चढानंतर अजून एक मोठ्ठं वळण लागत होतं. आजूबाजूच्या दाट झाडीमुळं समोर रस्ता आहे की नाही असा प्रश्न पडावा इतकी झाडांची दाटी झाली होती. त्यामुळे त्या दाटीत जणू तो रस्ता संपला आहे की काय असे वाटत होते.

ती हळूहळू मंतरल्यासारखी पावलं टाकत त्या सुगंधाच्या दिशेने चालू लागली….. तिच्यापासून थोड्या अंतरावर तिला रस्त्यावर कसलातरी पांढरा थर पसरलेला दिसू लागला. ती जसजशी पुढं जावू लागली तसा तो धुंद सुवास अधिकच तीव्र येवू लागला. निशाने पटकन आनंदाने चुटकी वाजवली…. अरे, हा तर बुचाच्या फुलांचा सुगंध. ती पटकन त्या पांढर्‍या गालीच्याच्या दिशेने धावत सुटली….

रस्त्याच्या कडेला ओळीनं तीन चार बुचाची झाडं होती. ती पानोपानी फुलांनी पूर्ण बहरली होती. झाडावर उमललेली फुलं वार्‍याबरोबर टप् टप् करत रस्त्यावर पडत होती. त्या फुलांचा पांढराशुभ्र गालीच्या, त्या काळ्याभोर रस्त्यावर परसला होता.

दिवसा…..निशा आणि उर्मी, गाडीवरून या रस्त्याने कॉलेजला जात असत, तेव्हा आधीच्याच वळणावर त्यांना या बुचाच्या फुलांचा सुगंध येत असे. त्यांना ती फुलं वेचण्याचा नेहमी मोह होत असे. पण गाड्यांची येता जाता वर्दळ असे आणि अनेक गाड्या त्या फुलांवरून गेल्यामुळे ती नाजूक फुले गाड्यांखाली चिरडली गेलेली असत. त्या दोघींनाही फुलांची ती अवस्था पाहून खूप वाईट वाटे, पण थोडावेळ गाडी सावकाश चालवत त्या शक्य तितका सुगंध त्यांच्या श्वासात भरून घेवून मग पुढे निघून जात असत.

आज मात्र निशासाठी पर्वणीच होती. खूप कमी गाड्या या रस्त्यावरून गेल्या होत्या… त्यामुळे रस्त्यावर पडलेली फुले बर्‍यापैकी सुरक्षित होती…… आणि वार्‍यामुळे रस्त्यावर पडणार्‍या नवीन फुलांची त्यात भरच पडत होती. याच फुलांचा सुगंध सगळीकडे दरवळत होता. त्या रात्रीच्या भीतीदायक वातावरणातदेखील निशाला ती फुलं पाहून मनापासून आनंद झाला. निशानं पटकन् तिचा लेमन कलरचा मोठ्ठा स्टोल तिच्या खांद्यावरून घेवून कमरेला गुंडाळला आणि एका बाजूला त्याची थोडीशी खोळ केली आणि ती, रस्त्यावरची ती सुंदर फुलं वेचून भराभर त्यात जमा करू लागली. रस्ता मोकळा असल्यामुळं तिला गाड्यांची काळजी नव्हती. निशा तिच्या नादातच रस्त्याच्या मध्यभागी, खाली वाकून पटापट फुलं वेचत होती. निशाची फुलं वेचण्यात 7-8 मिनीटं तरी गेली असतील.

…..तेवढ्यात तिच्या मागच्या बाजूच्या वळणावरून एक कार वेगात पुढे आली…. ते वळण इतकं तीव्र होतं की… समोर गाडीचे लाईटस् दिसेपर्यंत समोरून गाडी येत असल्याचा कोणताही अंदाज येत नसे. फुलांच्या नादात तिचे कारच्या उजेडाकडे लक्षच गेले नाही…. किंवा आपली गाडी बंद पडली आहे…. आपल्याला दुसर्‍या गाडीची मदत हवी आहे…. गाडी दिसली तरी तिला हात करून आपल्याला थांबवायची आहे…..हे सगळं ती साफ विसरून गेली होती. ओंजळीत फुलं गोळा करून त्याचा दीर्घ श्वास घेवून सुगंध मनात साठवून, ती फुलं स्टोलच्या खोळीत टाकणं हे काम ती अगदी एकाग्रतेनं करत होती. कार वेगात तिच्या जवळ येवू लागली …..

अगदी काही पावलांवर कार आली असताना एकदम रोहन रस्त्याच्या मध्यभागी धावत आला आणि त्याने निशाचा हात धरून तिला रत्याच्या दुसर्‍या बाजूला जोरात खेचले …. दुसर्‍याच क्षणी ती कार समोरून वेगात निघून गेली….. निशा एकदम रोहनसकट रस्त्याच्या दुसर्‍या बाजूला असलेल्या गवतावर पडली. एक हलकी किंकाळी तिच्या तोंडून बाहेर पडली…. ती कार जाताना बघून तिच्या छातीत एकदम् धऽऽऽस्स झालं आणि आपण खाली पडलोय हे तिच्या लक्षात आलं… तिनं साठवलेली बरीचशी फुलं परत रस्त्यावर विखुरली गेली….आपण पडलोय तरी अपल्याला लागलं नाही …. कारण …. आपण कुणाच्यातरी अंगावर पडलोय याची अचानक तिला जाणीव झाली आणि ती पटकन उठायचा प्रयत्न करू लागली…. तेवढ्यात समोरून रागीट आवाज आला…..

“इतका कसला नादिष्टपणा….. तुझा जीव गेला असता ना त्या कारखाली….” असं म्हणत निशाला आपल्या अंगावरून बाजूला सारून रोहन उठून उभा राहिला. त्यानं हात देवून निशालाही उठायला मदत केली. तो रागाने तिला ओरडला.

“मूर्ख मुलगी, इतक्या जोरात ती कार येत होती समोरून…. तुला तिचा लाईट दिसला नाही की आवाज आला नाही….. एवढी कसली गुंतली होतीस फुलं गोळा करण्यात? आत्ता मी नसतो इथं तर…..???? जरातरी स्वतःच्या जीवाची काळजी आहे की नाही तुला? तुला काही झालं असतं तर तुझ्या आई बाबांना काय वाटलं असतं? शेखरचं काय झालं असतं? आणि ……. माझं काय झालं असतं??? याचा जरासुद्धा विचार आला नाही तुझ्या मनात…..? इडियट……”

निशानं समोर पाहिलं….. रोहन रागाने संतापून अक्षरशः थरथरत बोलत होता. त्याच्यावर बोट रोखून निशा जर रागातच त्याला म्हणाली…..

“ओsss मि. रोहन….. थँक्स…. तुम्ही माझा जीव वाचवलात म्हणून….. पण मी तुमची इतकीही जवळची मैत्रिण नाहीये की तुम्ही मला मूर्ख वगैरे संबोधून वाट्टेल तसं बोलावं…..”

“सॉरी निशा…… तुला वाईट वाटलं असेल तर…..मी ही असं कुणाला कधीच बोलत नाही….. तू म्हणतेस ते बरोबरच आहे म्हणा….. मी तुझा इतका जवळचा मित्र अजून तरी झालो नाहीये की तुला इतक्या हक्काने रागावेन….. पण अ‍ॅक्च्युअली, मी स्वतःच तू फुलं वेचताना, त्याचा सुगंध घेताना…. ज्या पद्धतीनं तल्लीन झाली होतीस… आणि तुझ्या चेहेर्‍यावर जे आनंदाचे भाव ओसंडून वहात होते… ते पाहण्यात इतका गुंग होवून गेलो होतो……. आणि अचानक मला त्या गाडीचे दिवे दिसले….. तुला रस्त्यावर गुंग झालेली बघून आणि गाडीचा वेग बघून माझ्या हृदयात अक्षरशः कळ उठली… मी तुला हाक मारण्याचा प्रयत्न केला पण तुझं लक्षच नव्हतं माझ्याकडे…..त्या क्षणी तुला गाडीसमोरून बाजुला करणं गरजेचं आहे एवढंच मला समजलं आणि मी मागचा पुढचा विचार न करता तुला गाडीसमोरून खेचलं….. सॉरी… तुला लागलं नाही ना? …… तुझ्या काळजीपोटी मी असं ओरडलो तुझ्यावर…. खरंच… एक क्षणभर मला वाटलं की मी तुला कायमचा गमावून बसेन की काय? ……”

रोहनचं हे बोलणं ऐकून निशा मनातून वरमली….. आपण उगीचच त्याला ओरडलो…. एक तर चूक आपलीच होती…. आपलंच लक्ष नव्हतं गाडीकडे…… त्यानं आपला जीव वाचवायचा प्रयत्न केला ते राहिलं बाजूला….. आणि वर आपण त्यालाच ओरडलो…. त्याच्या आवाजातून तिला, त्याला तिच्याबद्दल वाटणारी काळजी एकदम जाणवली……आपण उगीचच ओरडलो त्याला ….. या विचारांनी निशाच्या डोळ्यांत पाणी आलं…. ती रोहनला काही बोलणार एवढ्यात त्याचं लक्ष तिच्या डोळ्यांकडे गेलं. तो पटकन् तिला म्हणाला….

“निशा….. प्लिऽऽज तू रडू नकोस… सॉरी म्हटलं ना मी तुला…. मी परत कधीही ओरडणार नाही तुझ्यावर…… आता किती वेळा सॉरी म्हणू मी??? मला माहिती आहे…. मला तसा कोणताही हक्क नाहीये तुझ्यावर ओरडण्याचा ….. पण खरंच मला तुझी काळजी वाटली….. म्हणून ओरडलो मी तुझ्यावर”…असं म्हणून तो निशाचे डोळे पुसू लागला…

दुसर्‍याच क्षणी निशा रोहनच्या जवळ गेली आणि तिनं त्याच्या छातीवर डोकं ठेवलं… “आय एम सॉरी रोहन…..” असं म्हणून ती रडायला लागली…

निशाच्या अचानक अशा करण्यानं रोहन गोंधळून गेला….. आता हिला कसं समजवावं हे त्याला कळेना… चार पाच मिनिटं तो हळूवारपणे तिच्या खांद्यावर थोपटत राहिला ….. त्याने तिला रडू दिले आणि तिचा रडण्याचा आवेग कमी होताच, त्याने तिचा चेहेरा उचलून तिचे डोळे पुसले….. रस्त्याच्या कडेला जवळच एक बाक होता…. निशाला हाताला धरून तो तिला बाकाजवळ घेवून गेला….. त्याने तिला तिथं बसवलं….. आपल्या सॅकमधून पाण्याची बाटली काढून त्यानं तिला पाणी प्यायला दिलं…. पाणी पिऊन निशा थोडी शांत झाली… रोहननं तिच्या स्टोलच्या खोळीत साठवलेल्या फुलातून काही फुलं आपल्या ओंजळीत घेवून ती निशाच्या चेहेर्‍याजवळ नेली….. परत त्या फुलांचा सुगंध आल्यावर निशा पूर्ण शांत झाली. तिनं ती फुलं आपल्या ओंजळीत घेतली…. आता ती रडायची थांबली होती….

रोहन तिच्या शेजारी बाकावर बसला आणि नाटकीपणाने म्हणाला….. “अरे बापरेऽऽऽ …… माझ्या ओरडण्याला इतकी घाबरलीस की काय तू? ….. इतका वेळ मला आपलं उगाचच वाटत होतं ….. की मी एका ब्रेव्ह मुलीच्या सोबतीनं चाललो आहे….. तुला माहिती आहे का निशा? …. इतक्या रात्री …. ह्या घनदाट जंगलातून…. काळोखातून…. एक शूर मुलगी…… केवढं मोठ्ठं अंतर….. एकटी पार करून आली…… त्यामुळे आम्हाला त्या शूर मुलीचं खूप कौतुक वाटलं बरं का…. म्हटलं चला… आपण एकटं घाबरत घाबरत जाण्यापेक्षा या शूर मुलीच्या सोबतीनं जावं…. म्हणजे आपण घाबरलोय हे कोणाला कळायचं नाही…. पण…..आता बघतो तर काय?…. आम्ही एका मुलीला एवढंसं रागावलो ते काय….. तर इतकं हमसून हमसून रडू यायला लागलं… कमाऽऽल आहे नाही?………..”

रोहनचं नाटकी बोलणं आणि हावभाव पाहून निशाला मनापासून हसू आलं. ती लटक्या रागानं त्याला म्हणाली…. “आम्ही तुमच्या रागवण्याला घाबरून रडलोच नाही मुळी….. पण जाऊदे ….. तुला नाही कळणार ते….. हे बघ….. मी पुसले माझे डोळे….. आणि आता मी काहीही झालं तरी अज्जिबात रडणार नाही…. चला, आपण चालायला लागूया…. आपल्याला घरी पोहोचायचंय ना लवकर???….. असं म्हणून निशा चौकीच्या दिशेने पुन्हा चालायला लागली…… रोहननं बाटली पुन्हा सॅकमध्ये ठेवली आणि भराभर चालत तो पुढे आला आणि निशाच्या बरोबर चालू लागला…..

“रोहन…. मघाशी तू मला वाचवायच्या नादात खाली पडलास… तर तुला लागलं नाही ना रे…. आणि त्यावर तुझ्या अंगावर माझं वजन पडलं…..”

रोहन हसत म्हणाला…. “नाही…. मला लागलं नाही… ही सॅक होती ना पाठीवर …… त्यामुळे जोरात लागलं नाही…. थोडा मुका मार बसलाय…. पण होईल बरं……”

ती दोघं आता त्या चढाच्या वळणावर पोहोचली होती…. तेवढ्यात त्यांना परत एका चारचाकी गाडीचा उजेड दिसला….. आता मात्र दोघंही त्यांचे हात हलवत मोठमोठ्यांदा “हेल्प, हेल्प, प्लिज गाडी थांबवा, आमची मदत करा” असं म्हणत रस्त्याच्या थोडे पुढे आले….. गाडी वेगातच येत होती……. पण तिचा वेग जराही कमी झाला नाही…… त्यांच्या तोंडासमोरून गाडी जशी वेगात आली तशीच भुऽऽर्रकन निघूनही गेली…. मदतीची आणखी एक आशा मावळली होती….. दोघांनीही निराश होवून एकमेकांकडे पाहिलं……

(क्रमशः)

©संध्या प्रकाश बापट

 

सौ. संध्या प्रकाश बापट
About सौ. संध्या प्रकाश बापट 50 Articles
नमस्कार वाचकहो, मी, सौ. संध्या प्रकाश बापट (माहेरची पद्मश्री विष्णू फाटक), सातारा. मी, सातार्‍यातील विविध कंपन्यांमध्ये/ऑफिसमध्ये अनेक वर्षे विविध पदांवर काम केले. तसेच काही वर्षे स्वतःचा व्यवसायही केला. 2018 मध्ये मी, नोकरी आणि व्यवसायातून स्वेच्छा निवृत्ती घेतली. या सगळ्या वर्षांत, इच्छा असूनही मनासारखे लिहिण्यास वेळ उपलब्ध होत नव्हता. मला लहानपणापासून संगीत, नाटक, सिनेमा, अभिनय आाणि वाचन या सगळ्याची प्रचंड आवड आहे. मी हौशी नाटकांत, एकांकिका, पथनाट्य यांत अभिनय करत होते. युट्यूब वरील वेब सिरीजमध्ये अभिनय करत आहे. नुकतेच मी झी टीव्ही वरील 'लागीर झालं जी' आणि 'मिसेस मुख्यमंत्री' या मालिकेत मी भूमिका केल्या आहेत. मी लघुकथा, कविता, प्रासंगिक लेख, वेब सिरीजसाठी मराठी आणि हिंदीतून कथा-पटकथा लिहीत आहे. काही लघुकथा ई-दिवाळीअंकात प्रसिद्ध झाल्या आहेत. माझ्यातील सुप्तगुणांना प्रेरणा आणि वाव देण्यामध्ये फेसबुक आणि व्हाटस्अ‍ॅप या सोशल मिडीयाचा आणि मला कायम प्रोत्साहन देण्यार्‍या तुम्हा सर्व वाचकांचा फार मोठा वाटा आहे.
Contact: Facebook

2 Comments on आणि अचानक त्या वळणावर (रोमांचक भयकथा) – भाग ६

  1. Hello mam!
    I liked your writing skill.
    The story is cool. I’ve read upto 6th part. But where is next part? I’m eager to read next parts.

    • Jayashri ji thanks for your comment, I am daily posting one part of this story. Please continue reading.

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..