नवीन लेखन...

आणि अचानक त्या वळणावर (रोमांचक भयकथा) – भाग ५

भाग पाच

“डोन्ट वरी बेबी. सगळं ठीक होईल. आता मी आहे ना तुझ्या सोबत? चल आपण पटपट जाऊया चौकीपर्यंत. मीनव्हाईल जर माझ्या मोबाईलला रेंज आलीच तर आपण यावरून कॉल करू… ओके?”

दोघंही गप्पा मारत चौकीच्या दिशेनं चालू लागले….

“रोहन, तुम्ही आता कुठं जायला निघाला होतात? म्हणजे तुम्ही कुठे राहता?”

“निशा मला वाटतंय आपली आता ओळख झालीय… आणि वयानेही आपण लहान आहोत ….मग हे फॉर्मल अहो जाहो कशाला? कॉल मी रोहन ओन्ली. मी ही तुला निशा म्हटलं तर तुला चालेल ना?”

“हो… चालेल ना.”

“निशा, तू काय करतेस? इतक्या रात्रीची एकटीच कुठे चालली होतीस? रात्रीची वेळ असून तुझ्या सोबत कसं कोणी आलं नाही आणि तु इथलीच रहिवासी आहेस की……….”

“हो… हो…. रोहन…..किती प्रश्न पडलेत तुला? सांगते…. तुझ्या एकेका प्रश्नाची उत्तरं सांगते.”

“मी एमबीए करतेय. लास्ट इयर. उद्या आमचा एक प्रोजेक्ट सबमीट करायचाय. म्हणून मी माझ्या मैत्रीणीकडे आले होते. इतर वेळी माझी अजून एक मैत्रीण असते माझ्या बरोबर रोजच…. पण ती कालपासून आजारी आहे… म्हणून मी एकटीच इकडे दुसर्‍या मैत्रिणीकडे प्रोजेक्टचं काम पूर्ण करायला आले होते…. ते काम झालं… पण मला निघायला थोडा उशीर झाला. त्यातच हायवेला अ‍ॅक्सीडेंट झालाय असं कळलं… म्हणून मी या रस्त्याने घरी जायला निघाले होते…… या रस्त्याने आपण बाहेर पडलो की, आधी हायवे लागतो… हायवे क्रॉस करून, तिथून पुढे 10 मिनिटांच्या अंतरावर माझं घर आहे…… आम्ही इथले कायमचे रहिवासी आहोत. माझ्या घरात मी, माझा भाऊ शेखर आणि आई बाबा असे चौघं राहातो.”

“अच्छा असं झालं होय….. तरी मी विचार करत होतो की ही मुलगी, ह्या सुनसान रस्त्यावर… अंधारात एकटी कशी काय चालली असेल? मी तर मुलगा असून मला भीती वाटत होती….. तुझ्या हिम्मतीचे मात्र मला कौतुक वाटतंय बरंका… ”

“थॅक्स रोहन….पण कौतुक काय त्यात? आताच्या परिस्थितीमध्ये मला जर कुठल्याही परिस्थितीत माझ्या घराकडे पोहोचायचेच असेल, तर चालत हा रस्ता पार करण्याशिवाय माझ्याकडे दुसरा कुठला पर्यायच शिल्लक राहिला नव्हता. म्हणजे गाडी बंद पडली तेव्हा मी लिफ्ट मिळते का पाहण्याचा प्रयत्न केला. पण कोणतीच गाडी थांबेना म्हणून मी नाईलाजाने चालत येण्याचा निर्णय घेतला. खरं तर आज हे प्रोजेक्ट पूर्ण करायचं टेन्शन नसतं ना तर मी आज घराबाहेरच पडले नसते.”

“का बरं?”

“अरे आज माझा लहान भाऊ, शेखर, याचा वाढदिवस आहे. कॉलनीतली मित्रमंडळी आणि त्याचे काही खास मित्र घरी बोलवलेत. त्यामुळे घरात आज खूप काम होतं. मी, आई, बाबा आणि शेखर असे सगळे मिळून आम्ही खूप छान प्लॅनिंग करून वाढदिवस साजरा करतो आणि घर डेकोरेट करणं, वेगवेगळे पदार्थ बनवणं हे सगळं आम्ही खूप एन्जॉय करतो. पण आज नेमकं माझं काम निघाल्यामुळे माझी घरात काहीच मदत झाली नाही. आईला एकटीलाच सगळी तयारी करायला लागली असेल. दरवर्षी मी स्वतः घरीच खूप छान केक बनवते. पण यावेळी आम्ही बाहेर ऑर्डर दिली. जाताना मला तो केक कलेक्ट करायचा होता. आता साडेनऊ वाजलेत आणि माझा फोनही लागत नाही म्हटल्यावर बाबा आणि शेखर कदाचित मला शोधायला बाहेरही पडले असतील.”

“चीssssल यार निशा…… मला कळतंय…. तुला काळजी वाटतीय त्या सगळ्यांची… पण आपण आता निघालोय ना घराकडे? कदाचित ते तुला शोधायला बाहेर पडले असतील तर वाटेतच भेटतील आपल्याला… हो की नाही….? मग आपण चालत राहूया…..”

“थॅक्स रोहन… आता तू सोबत आहेस म्हणून मला जरा धीर आलाय. नाहीतर एकटीनं रस्ता चालताना तो कधी एकदा संपतोय असं झालं होतं माझं…. बाय द वे तू इथलाच आहेस की………..”

“नाही मी इथला नाहीये… माझे आई बाबा नागपूरला असतात. तिथं आमचं घर आहे. मला इथं जॉब मिळाला म्हणून मी इकडं आलो. इथं उपनगरात रेंटवर एक फ्लॅट घेतलाय मी.. तिथं राहतो….. तशी मला घरी जायची काहीच गडबड नव्हती…. तिथं कोण वाट बघतंय म्हणा माझी?……. पण दिवसभर कंटाळलो होतो… म्हटलं जाता जाता बाहेर काहीतरी खाऊन घरी जावं आणि झोपावं. रात्री रोज झोपण्यापूर्वी एक कॉल करतो आईला… दोनतीन महिन्यातून एकदा, दोनचार दिवस घरी भेटायला जातो आईबाबांना… बस्स…”

“तुझं लग्न नाही झालंका अजून?”

“चाललंय स्थळं पहाणं….. पण अजून नाही ठरवलं काही………..तुझं काय?…. म्हणजे एमबीए झाल्यावर काय करणार आहेस?”

“नोकरी… तसे कॅम्पस् इंटरव्ह्यू झालेत आमचे…. अजून फायनल काही कळलं नाहीये… त्यातून जॉब मिळाला तर उत्तमच…. नाहीतर बाहेर ट्राय करायचा….. मला दोन तीन वर्ष तरी नोकरी करायचीय….. खूप सारे पैसे साठवायचेत आणि लग्न करायाच्या आधी युरोप टूर करून यायचीय……”

“अरे व्वा….. छान स्वप्नं आहेत तुझी….. पण इतक्या वर्षात कोणी आवडलं नाही का तुला?”

“मित्र म्हणशील तर खूप आहेत. अगदी शाळेत असल्यापासून ते आत्तापर्यंतचे….. कॉलनीतले….. त्या मित्र मैत्रिणींची बहिण भावंडं…. क्लासमधले मित्र मैत्रिणी….मी डान्स शिकायला जाते गेले सात आठ वर्ष….त्या अ‍ॅकॅडमीतले… कॉलेजमधले असे खूपसारे जण माझ्या मित्र यादीत आहेत. पण कुणाला पाहून प्रेमात बिमात पडावं असं काही वाटलं नाही आजपर्यंत…. म्हणजे काहींचं दिसणं आवडतं… काहींचा स्वभाव आवडतो…. काहींची हुषारी आवडते… कुणाचे गुण आवडतात…. पण असं एखाद्याच्या बाबतीत मनात क्लीऽऽऽक होतंना तसं काही झालं नाही आजपर्यंत…. बघू… भविष्यात तसं कुणी भेटलं तर काय सांगावं?……………..”

“रोहन…. तू नाही का पडलास कुणाच्या प्रेमात?………”

“नाही गं…… मला भरपूर वाटंतय प्रेमात पडावं म्हणून……. पण मला पसंत करेल अशी किंवा तू म्हणतेस ना तशी…. ‘पाहताक्षणी मनात क्लीऽऽऽक व्हावं’ अशी मुलगी अजूनतरी भेटली नाही मला……. तसे माझ्या भरपूर मैत्रिणी आहेत….. भरपूर गप्पा मारतो आम्ही…. एकमेकांचे स्वभावही माहिती आहेत आम्हाला पण आत्ता तुझ्याशी बोलतोय ना इतकं मोकळेपणानं मला मुलींशी नाही येत बोलायला…….”

“असे व्वा….. म्हणजे आम्ही भाग्यवानच म्हणायचं…. पण तू काहीही म्हण रोहन…. आज आपण आपल्या गाड्यांचे मनःपूर्वक आभार मानायला हवेत. आज जर आपल्याला गाड्या बंद पडल्या नसत्या तर आपण दोघंही या रस्त्याने चालत आलो नसतो…. कदाचित कधीच भेटलोही नसतो… नाही का?”

“होना….. म्हणजे ‘होतं ते बर्‍याकरताच होतं’ अशी जी म्हण आहे ना ती आपल्या बाबतीत तंतोतंत लागू झालीय आज. तू तर खूप अंतर चालत आलीस…..पण मी एवढंच अंतर चालत आलो तरी मला मी युगानुयुगे चालतोच आहे आणि हा रस्ता कदाचित कधीच संपणार नाही…वगैरे वगैरे… असं वाटायला लागलं होतं….. पण आता तू भेटलीस आणि मला चक्क गाणं म्हणावं वाटायला लागलंय..”

यूँही कट जायेगा सफर साथ चलनेसे

के मंझील आयेगी नजर साथ चलनेसे ….

रोहन खरोखरच तालासुरात गाणं म्हणूला लागला आणि मग निशाही त्याच्या सोबत गायला लागली…

यूँही कट जायेगा सफर साथ चलनेसे

के मंझील आयेगी नजर साथ चलनेसे ….

दोघंही रिलॅक्स होवून हसायला लागली.

“बघ निशा, आपल्या दोघांचं ट्युनिंग कसं छान जमलंय.”

इतकावेळ त्यांच्या मनावर असलेलं काळजीचं मळभ थोड्या वेळासाठी तरी दूर झालं……

ते दोघं एकमेकांशी गप्पा मारत थोडावेळ चालत राहिले… मघासची भीती नीशाच्या मनातून पार हद्दपार झाली होती…

….आणि क्षणात तिचं मन एका अनोख्या सुगंधानं भारलं गेलं. ती तिथंच थांबली, मनभरून तीनं खोल श्वास घेतला…. तो सुगंध तीनं अगदी आतपर्यंत ओढून घेतला…. तिचं मन एकदम मोहरून गेलं. अरे …… हा आपला आवडता सुगंध कुठून येतोय?…. ती चालता चालता थबकली….

(क्रमशः)

© संध्या प्रकाश बापट

सौ. संध्या प्रकाश बापट
About सौ. संध्या प्रकाश बापट 50 Articles
नमस्कार वाचकहो, मी, सौ. संध्या प्रकाश बापट (माहेरची पद्मश्री विष्णू फाटक), सातारा. मी, सातार्‍यातील विविध कंपन्यांमध्ये/ऑफिसमध्ये अनेक वर्षे विविध पदांवर काम केले. तसेच काही वर्षे स्वतःचा व्यवसायही केला. 2018 मध्ये मी, नोकरी आणि व्यवसायातून स्वेच्छा निवृत्ती घेतली. या सगळ्या वर्षांत, इच्छा असूनही मनासारखे लिहिण्यास वेळ उपलब्ध होत नव्हता. मला लहानपणापासून संगीत, नाटक, सिनेमा, अभिनय आाणि वाचन या सगळ्याची प्रचंड आवड आहे. मी हौशी नाटकांत, एकांकिका, पथनाट्य यांत अभिनय करत होते. युट्यूब वरील वेब सिरीजमध्ये अभिनय करत आहे. नुकतेच मी झी टीव्ही वरील 'लागीर झालं जी' आणि 'मिसेस मुख्यमंत्री' या मालिकेत मी भूमिका केल्या आहेत. मी लघुकथा, कविता, प्रासंगिक लेख, वेब सिरीजसाठी मराठी आणि हिंदीतून कथा-पटकथा लिहीत आहे. काही लघुकथा ई-दिवाळीअंकात प्रसिद्ध झाल्या आहेत. माझ्यातील सुप्तगुणांना प्रेरणा आणि वाव देण्यामध्ये फेसबुक आणि व्हाटस्अ‍ॅप या सोशल मिडीयाचा आणि मला कायम प्रोत्साहन देण्यार्‍या तुम्हा सर्व वाचकांचा फार मोठा वाटा आहे.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..