नवीन लेखन...

आणि अचानक त्या वळणावर (रोमांचक भयकथा) – भाग १०

भाग दहा

ती दोन बाकडी पार केली आणि तिची नजर रस्त्याच्या कडेला गेली…… चंद्राच्या प्रकाशात काहीतरी चकाकत होतं….. ती आणखी थोडी पुढे गेली आणि तिला तिथं एक मोटार सायकल पडलेली दिसली…. रोहन अजून मागेच रेंगाळत चालत होता. तिने मागे वळून रोहनला आवाज दिला …

“रोहन, अरे इकडे ये पट्कन …. इथे बघ काय आहे??”

निशानं त्या पडलेल्या गाडीचं निरीक्षण करायला सुरुवात केली. गाडीचं पुढचं चाक, हेड लाईट, हॅण्डल, मिरर, सगळ्याचा पार चेंदामेंदा झाला होता. बहुतेक गाडी बाकड्याला जोरात धडकली असावी त्यामुळे तिची इतकी वाईट अवस्था झाली होती.

गाडीपासून थोड्याच अंतरावर, रस्त्यापासून थोड्या आतल्या बाजूला, उताराचा भाग होता, तिथं गवत आणि झुडुपांची दाटी होती, पण गाडीपासून ते खालपर्यंतचा एक संपूर्ण पट्टा गवत आणि झुडुपाचा बराचसा भाग दबला गेलेला दिसत होता. जसं कि एखादी वजनदार वस्तू त्यावरून घसरत खाली गेली असावी. चांदण्याचा उजेडात निरीक्षण करत ती खाली जाऊ लागली. तिथंच एक फुटलेलं हेल्मेट पडलेलं होतं. त्याच्या खालच्या बाजूला एक मोठा दगड पडलेला होता आणि त्या दगडापासून पाच सहा फुटाच्या अंतरावर तिला एक माणूस वेड्यावाकड्या अवस्थेत पालथा पडलेला दिसला. ते पाहून निशा घाबरली. तिनं पुन्हा एकदा रोहनला आवाज दिला. रोहन हळूहळू बाकाच्या जवळ येऊन उभा राहिला.

निशा एकदम घाबरल्या आवाजात रोहनला सांगू लागली, “अरे रोहन, इथे गाडीला अपघात झालेला दिसतोय. गाडीची किती वाईट अवस्था झालीय बघ, आणि हा इथे एक माणूस जखमी होऊन पडलाय……मला वाटतंय त्याला आपल्या मदतीची गरज आहे. त्याला आधी आपण या झाडीतून बाहेर काढायला पाहिजे. चल ये इकडे पट्कन, मला मदत कर …….” असं म्हणून निशा त्या माणसाजवळ गेली.

तो माणूस पालथा पडलेला होता. अंगावर बऱ्याच खरचटल्याच्या खुणा दिसत होत्या. ती सावधपणे त्याच्या जवळ गेली. त्याचा चेहेरा तिला दिसत नव्हता. पण त्याचा डोक्याला जबर मार लागला असावा. कारण त्याच्या डोक्याखाली बरंच रक्त वाहून साकळलेले दिसत होते. वाहिलेलं रक्त पाहून निशाला जराशी घेरी आल्यासारखं झालं.

एक दोन क्षण बाजूला असलेल्या त्या दगडाचा आधार घेऊन ती खाली बसली. यापूर्वी इतक्या जवळुन असा अपघात किंवा रक्तपात तिनं कधीच पहिला नव्हता. त्यामुळं ती थोडावेळ हबकून गेली. अपघात होऊन किती वेळ झाला असेल कोण जाणे. पण अशावेळी आपण याला मदत केली पाहिजे ह्याची जाणीव होऊन तिनं स्वतःला सावरलं.

तिनं परत एकदा रोहनला आवाज दिला. “अरे रोहन ये ना इकडे लवकर. याला खूप लागलंय, आणि रक्तपण खूप वहिलंय. याला आपल्या मदतीची गरज आहे. आपण काहीतरी केलं पाहिजे याच्यासाठी.”

हिम्मत करून निशा त्या माणसाजवळ गेली आणि तिनं त्याच्या एका खांद्याला धरून त्याला सरळ करण्याचा प्रयत्न केला. थोड्या प्रयत्नाने त्या माणसाला, तिला पूर्ण सरळ वळवता आलं. त्याच्या निम्म्या चेहेऱ्यावर रक्त पसरलेलं होतं, तरीपण तिला एकदम तो चेहेरा ओळखीचा वाटला. तिचं त्याच्या कपड्यांकडे लक्ष गेलं आणि तिला प्रचंड शॉक बसला आणि तिच्या तोंडून जोरात किंकाळी निघाली……..

तिला बसलेल्या जबरदस्त धक्क्याने तिला जोराची चक्कर आली. तेवढ्यात तिची किंचाळी ऐकून रस्त्यावर उभा असलेला रोहन तिच्या दिशेने धावतच खाली आला आणि त्याने निशाला पडता पडता सावरले. ती काय पाहून किंचाळली हे त्याला कळेना. तो निशाला हलवून जागं करण्याचा प्रयत्न करू लागला.

पाचेक मिनिटांनी निशा शुद्धीवर आली. तिने परत त्या खाली पडलेल्या माणसाकडे पहिले आणि रोहनकडे पहिले. दुसऱ्याच क्षणी तिने रोहनला आपल्यापासून दूर ढकलले, ती अविश्वासाने आणि आश्चर्याने एकदा रोहनकडे आणि एकदा त्या माणसाकडे पाहू लागली आणि तिने जोरात ओरडून विचारले, “रोहन हे काय आहे?”

आता रोहनचे त्या खाली पडलेल्या माणसाकडे लक्ष गेले आणि तो हि चपापला. खाली पडलेला माणूस म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून ते रोहनचे मृत शरीर होते. त्याच्याही अंगावर तोच ड्रेस होता जो रोहनने घातला होता, फक्त तो अनेक ठिकाणी फाटला होता व ठिकठिकाणी रक्ताचे डाग पडलेले दिसत होते. ते पाहून रोहन मटकन खाली बसला. ओंजळीत आपले तोंड झाकून तो ढसाढसा रडू लागला.

निशासाठी हा फार मोठा धक्का होता. आपण इतकावेळ ज्या माणसासोबत बोलत होतो तो माणूस इथे रक्ताचा थारोळ्यात मरून पडलाय….. आणि तरीही तो आपल्या समोर उभा आहे. तिचा कशावरच विश्वास बसत नव्हता. समोर आलेली वस्तुस्थिती स्वीकारायला तिचं मन अजिबातच तयार नव्हतं. ज्या मुलावर आपलं प्रेम बसलंय……. ज्याचा सहवास आपल्याला हवाहवासा वाटू लागलाय……. ज्याच्या बरोबर संसार करण्याची स्वप्नं आपलं मन रंगवु लागलोय……… तो माणूस, आपला रोहन, आपल्या समोर मरून पडलाय?????
मुळात त्यानं आपला विश्वासघात का केला ????
मी त्याचं काय बिघडवलं होतं???
मी त्याच्या बोलण्यावर कसा काय विश्वास ठेवला????
तो माणूस नसेल अशी आपल्याला एकदाही शंका कशी आली नाही???
या विचाराने निशाला प्रचंड भिती वाटू लागली….. इथून आता आपण बाहेर कसं पडणार??? या माणसानं आता आपलं काही बरवाईट केलं तर आपल्या घरच्यांना आपलं काय झालंय हे कसं समजणार??? मुळात आपण या ठिकाणाबद्दल इतकं सगळं माहित असताना इथून येण्याचा मूर्खपणा का केला???? …. या सगळ्या प्रश्नांनी निशाचा मनात प्रचंड गोंधळ उडाला.

याच्या तावडीतून सुटायचे असेल तर आधी इथून मला बाहेर पडायला पाहिजे. आता तिला कुणाच्यातरी मदतीची खूप निकड वाटू लागली. कुठल्याही परिस्थितीत आपल्याला लवकरात लवकर चौकीपर्यंत पोहोचलंच पाहिजे, या विचाराने तिने एकदम रस्त्याकडे धाव घेतली.

रोहनसाठीही स्वतःचे मृत शरीर समोर पाहणे हे धक्कादायक होते. आपण मेलो आहोत यावर त्याचा विश्वास बसत नव्हता. आपली अशी अवस्था आहे तर निशाला किती मोठा धक्का बसला असेल या विचाराने त्याने आपले रडू आवरले. निशाला काहीतरी समजवावे म्हणून डोळे पुसून तो निशा कडे पाहू लागला, तेव्हड्यात त्याला निशा रस्त्याच्या बाजूने धावत सुटलेली दिसली. रोहनहि तिच्या मागे धावत गेला. तोपर्यंत निशा रस्त्यावर पोहोचली होती आणि चौकीच्या दिशेने तिने धावण्यास सुरुवात केली होती. रोहनने निशाला हाक मारली, “निशा please इथून जाऊ नकोस. निशा थांब ना जरा. माझं ऐकून तर घे.” पण निशा त्याचे काहीच ऐकायच्या मनःस्थितीत नव्हती. ती धावतच होती. रोहनही तिच्यामागे जोरात धावत सुटला आणि त्याने निशाचा हात धरून तिला थांबवले.

निशाने त्याच्या हाताला जोरात हिसडा दिला, “Please रोहन, तू माझ्या अंगाला हात लावू नकोस. आणि माझ्या मागेही येऊ नकोस. मला तुझं काहीच ऐकायचे नाही. जाऊदे मला. Don’t touch me, Don’t touch me”

(क्रमशः)

© संध्या प्रकाश बापट

सौ. संध्या प्रकाश बापट
About सौ. संध्या प्रकाश बापट 50 Articles
नमस्कार वाचकहो, मी, सौ. संध्या प्रकाश बापट (माहेरची पद्मश्री विष्णू फाटक), सातारा. मी, सातार्‍यातील विविध कंपन्यांमध्ये/ऑफिसमध्ये अनेक वर्षे विविध पदांवर काम केले. तसेच काही वर्षे स्वतःचा व्यवसायही केला. 2018 मध्ये मी, नोकरी आणि व्यवसायातून स्वेच्छा निवृत्ती घेतली. या सगळ्या वर्षांत, इच्छा असूनही मनासारखे लिहिण्यास वेळ उपलब्ध होत नव्हता. मला लहानपणापासून संगीत, नाटक, सिनेमा, अभिनय आाणि वाचन या सगळ्याची प्रचंड आवड आहे. मी हौशी नाटकांत, एकांकिका, पथनाट्य यांत अभिनय करत होते. युट्यूब वरील वेब सिरीजमध्ये अभिनय करत आहे. नुकतेच झी टीव्ही वरील 'लागीर झालं जी' आणि 'मिसेस मुख्यमंत्री' या मालिकेत मी भूमिका केल्या आहेत. मी लघुकथा, कविता, प्रासंगिक लेख, वेब सिरीजसाठी मराठी आणि हिंदीतून कथा-पटकथा लिहीत आहे. काही लघुकथा ई-दिवाळीअंकात प्रसिद्ध झाल्या आहेत. माझ्यातील सुप्तगुणांना प्रेरणा आणि वाव देण्यामध्ये फेसबुक आणि व्हाटस्अ‍ॅप या सोशल मिडीयाचा आणि मला कायम प्रोत्साहन देण्यार्‍या तुम्हा सर्व वाचकांचा फार मोठा वाटा आहे.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..