नवीन लेखन...

कोविड 19 नंतर – लेखमालिका संकल्पना

अनघाच्या 2021 च्या दिवाळी अंकात कोविड – 19 नंतर या लेखमालेत कोविडने ज्या अनेक जीवनक्षेत्रांवर परिणाम केला त्यापैकी काहींचा परामर्ष घेतलेला आहे. पत्रकारिता, साहित्य, शिक्षण, नाटक, सिनेमा, टी.व्ही मालिका, ग्रंथालये आणि राजकारण या क्षेत्रांवर लिहिणारे हे लेखक. लेखिका, आपल्याला विषयाचा अभ्यास करणारे आणि दिर्घकाळ अनुभव असलेले आहेत. कृषी आणि अन्न सुरक्षा, विमा क्षेत्र, व्यापार उद्योग, पर्यटन, विमान चालन, स्थावर मालमत्त, गुंतवणूक आपत्ती व्यवस्थापन आणि आणखी काही क्षेत्रे की ज्यांच्या कोविड-19 नंतरच्या भविष्याबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत, त्यांच्याही परामर्ष घेऊन हे एका लेखसंग्रहातून वाचकांसमोर ठेवावे, असा अनघा प्रकाशनाचा विचार आहे. त्यादृष्टीने ही लेखमाला महत्त्वाची ठरेल, असे वाटते.


भारतात केरळमधल्या तीन शहरात 30 जानेवारी 2020 रोजी कोविड – 19 चे पहिले रूग्ण सापडले; ज्यांच्यामधे वुहान येथून परतलेले वैद्यकीय शिक्षण घेणारे तीन भारतीय विद्यार्थी होते. 23 मार्च 2020 रोजी केरळ सरकारने लॉकडाऊन जाहीर केला. नंतर संपूर्ण देशात 25 मार्च 2020 रोजी केंद्र सरकारने लॉकडाऊन लागू केला. चीनमधल्या वुहान शहरातील एका मच्छी मार्केटमधे, डिसेंबर 2019 च्या मध्यावर पहिल्यांदा कोविडचे विषाणू सापडले होते. पण चीनच्या शासकांनी याबाबत कमालीची गुप्तता बाळगली. कोविड बाबतच्या बातम्या आणि चर्चा प्रसृत होऊ नये म्हणून प्रसारमाध्यमांवर निर्बंध लादले.

पण बघता-बघता सुरूवातीला 114 देशांमध्ये आणि नंतर संपूर्ण जगभर ‘कोविड’चा हाहाकार सुरू झाला. याची दखल घेऊन शेवटी जागतिक आरोग्य संघटनेला (WHO) 11 मार्च 2020 रोजी कोविड ही जागतिक महामारी (Pandemic) आहे, असं अधिकृतपणे जाहीर करावं लागलं. जीवाची भीती, जिवलगांचे मृत्यू, आर्थिक अस्थिरता सुरू झाली. लाखो लोकांचे रोजगार बुडू लागले. मानसिक तणाव वाढला. कौटुंबिक हिंसाचाराच्या बातम्या येऊ लागल्या. दुनिया सैरभैर झाली. जागतिक राजकरणातील संघर्ष वाढले. पत्रकारिता, शिक्षण, नाटक-सिनेमे, सांस्कृतिक कार्यक्रम, ग्रंथालये, संग्रहालये, व्यापार- उद्योग, पर्यटन, हवाई उड्डाणे, दळण-वळण आदी क्षेत्रात भयावह परिस्थिती निर्माण झाली. दुनियेची जीवनशैली बदलू लागली.

काही देशांत ‘कोविड’च्या दोन तर काही देशांत तीन लाटा येऊन गेल्यात. पण गेल्या दोन वर्षातली हताशा आणि सामूहिक वैफल्य आता हळुहळू निरस्त होऊ लागलीय. जगातील 48 टक्के लोकसंख्येचं आतापर्यंत लसीकरण झालं आहे आणि पुढेही वेगाने सुरु आहे. भारतात 87 टक्क्यांहून अधिक लोकांचं लसीकरण पूर्ण झालंय. महाराष्ट्रात शाळा आणि कनिष्ट महाविद्यालयं 4 ऑक्टोबर 2021 पासून सुरु झालीत. सिनेमा थिएटर्स आणि नाट्यगृहे 22 ऑक्टोबर 21 पासून काही मार्गदर्शक सूचनांचं पालन करून सुरु होत आहेत. पण तरीही गेल्या दोन वर्षात कोविडमुळे आपल्या जगण्याला जे फटके बसलेत त्याचे वळ आणि मानसिक धक्के लोक अजून विसरायला तयार नाहीत. ‘कोविड-19’ नंतर पुढे काय? हा प्रश्न आहेच. या अनुभवांमधून लोक शहाणे होणार आहेत की पुन्हा बिनधास्त होऊन ‘ये रे माझ्या मागल्या-’चालूच राहणार आहे? जीवनाच्या विविध क्षेत्रात झालेले बदल स्वीकारून जगण्याच्या आणि आपत्तीशी लढण्याच्या कोणत्या नव्या पध्दती स्वीकाराव्या लागणार आहेत? कोविड काळात काय काय घडलं, आज काय परिस्थिती आहे आणि पुढे काय होणार आहे याचा एक गोषवारा मांडण्यात प्रयत्न ‘कोविड नंतर’ या लेखमालेतून येथे करण्यात आला आहे.

डॉ.विजय चोरमारे यांनी कोविड-19 नंतरच्या पत्रकारितेला, प्रसारमाध्यमे की प्रचारमाध्यमे? असा गंभीर प्रश्न विचारला आहे. करोना काळात माध्यमांच्या मालकांनी संधीचा फायदा घेत केलेली पत्रकारांची वेतनकपात आणि कर्मचारी कपात याचे वास्तव मांडले आहे. मारामारीच्या आपत्तीबाबत जनतेला वस्तुनिष्ठ माहिती न देणाऱया पत्रकारांवर परखड भाष्य केले आहे.

संतोष शेणई यांनी साहित्य जगताचा आढावा घेऊन, एका चांगल्या उद्याची कल्पना जिवंत ठेवणे हा साहित्यिकाचा धर्म असल्याचे म्हटले आहे. सावधगिरी आणि सुरक्षिततेच्या दरम्यान आपल्याला एक सकारात्मक संगीत, उर्जा भरलेली कविता आणि आशेने भरलेली कथा तयार करावी लागेल, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

डॉ. बसंती रॉय यांनी आपल्या लेखात शाळेबाहेरची शाळा, आकाशवाणीवरचे शैक्षणिक कार्यक्रम भोंग्यावरून खेड्यापाड्यात कसे ऐकवले गेले, सिंधुदुर्गातले विद्यार्थी इंटरनेट रेंजसाठी डोंगरावर तात्पुरत्या झोपड्या उभारून कसे शिकले इ. उदाहरणे देऊन आता शाळा सुरू होत असताना विद्यार्थ्यांच्या आरोग्याला प्राधान्य देण्याची गरज स्पष्ट केली आहे.

नाटककार अभिराम भडकमकर यांनी कोरोनोत्तर नाटक हे कोरोनावरची तात्कालिक प्रतिक्रिया स्वरूपाचे असणाऱया धोक्याकडे लक्ष वेधलं आहे. पण सर्जनशील नाटककारांकडून बाळबोध अपेक्षा बाळगून प्रेक्षकांनी व समीक्षकांनी चौपटीतल्या मोजपट्ट्या लावू नयेत, असं आवाहन केलं आहे. कोरोना काळात ओटीटी प्लॅटफॉर्मवर नवा जागतिक आशयाचे सिनेमा पाहण्याची मराठी प्रेक्षकांची लागलेली सवय अधोरेखित करून

चित्रपट समीक्षक आणि लेखक गणेश मतकरी यांनी कोविड नंतरचा मराठी चित्रपट जागतिक विचाराचा हवा, असं प्रतिपादन केलं आहे.

रोहिणी निनावे यांनी करोना काळात मालिका लेखनावर मर्यादा आल्याचं स्पष्ट करून कमीत कमी पत्रांमधेही मालिकेत ड्रामा आणण्याचं शिक्षण लेखकांना मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त केलं आहे.

डॉ. प्रदिप कर्णिक यांनी आपल्या लेखात वाचन साहित्याचं वास्तव मांडून ग्रंथालये जगवण्यासाठी ऑनलाईनचा पर्याय यापुढे का वापरावा लागे, याची कारणमीमांसा केली आहे.

ज्येष्ठ पत्रकार डॉ. भारतकुमार राऊत यांनी आपल्या लेखात, कोविड नंतरच्या महाराष्ट्रातल्या राजकारणावर प्रकाश टाकत आहे.

या लेखमालिकेतून वाचकांच्या विचारांना चालना मिळेल आणि आपला प्रतिसाद, अपेक्षा ते आम्हाला कळवतील अशी आशा वाटते.

या लेखमालिकेतील विषयांची ओळख करुन घेऊया पुढच्या भागात !

— डॉ. महेश केळुसकर.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..