नवीन लेखन...

कोविड नंतरची ग्रंथालये

कोवीड – 19 विषाणू आला आणि एक दिवस अचानक देशच बंद. शाळा सर्व ठप्प. या सर्वांमध्ये एक घटक होता ग्रंथालय! ती बंद झाली काय, उघडी राहिली काय कोणाला पर्वा! पर्वा करावी, चिंता वाटावी अशी इथे भूमीत कधीच संस्कृती रूळलीच नव्हती, त्यामुळे ग्रंथालये, ग्रंथ, ग्रंथवाचन संस्कृती, ग्रंथ-वाचन साहित्य निर्मिती यांचे काय झाले आहे याचा विचार करायला घरात मोकळे असूनही कुणाला सवड होती? नाही म्हणायला रेटून वर्तमान पत्रे काही काळाने सुरू झाली,   केली गेली, पण इतर घटकांचे काय झाले? कुणाला पडली होती चिंता!

देशच इतका अचानकपणे, कोणतीही वेळ मुदत न देता बंद करण्यात आलं की कुणाला विचार करायलाही सवड मिळू नये. बस, रेल्वे, विमान, रिक्षा सर्व बंद. प्रवास बंदी, साधी पायी फिरण्याचीही बंदी, हॉटेल्स, खानावळी बंद, कंपन्या-कचेऱया बंद, दुकाने – मॉल्स बंद. सर्वच बंद! इतकेच काय शक्य असले तर माणसांचे श्वासही बंद केले असते. अर्थात तेही, मुखपट्टात बंदीस्तच करण्यात आले. हात धुवून साफसफाई मागे लागली. रोजगार बुडाले, नोकऱया गेल्या, छोटे-मोठे व्यवसाय बंद पडले, मजूर – शेतकरी देशोधडीला लागले. अन्नपाणी मिळणे कठीण होऊन बसले.

किती माणसे मेली याची आकडेवारी नाही. बेरोजगारांची संख्या किती? अधिकृत आकडेवारी सरकारपाशी नाही. संस्था, व्यवसाय किती बुडाले, तोट्यात गेले, कर्जबाजारी झाले, जप्तीत गेले, सरकारपाशी आकडेवारी नाही. असली तरी ती अधिकृतपणे जाहीर झालेली नाही.

माणसे तुटली, संवाद थांबला, भेटी-गाठी बंद झाल्या, सभा – समारंभादी कार्यक्रमांवर बंधने आली, गप्पा टप्पा निघून गेल्या, आदान – प्रदान गेले, एक नवी ‘अस्पृश्यता’ जन्माला आली. घरातही जोपासली गेली. पोलिस यंत्रणा एकवटली, जीवनावश्यक वस्तूंसाठी यातायात सुरू झाली.

हळू हळू विषाणू पसरत गेला. माणसे मरू लागली. हॉस्पीटल्स तुडुंब भरून गेली. वैद्यकीय व्यवसाय हा खऱया नैतिक अनैतिक अवस्थेत येऊन ठेपला. प्राणवायूसाठी माणसे तडफडू लागली, राजकीय विरोधकांना ‘सुवर्ण’ संधी प्राप्त झाली. हा आपला, तो आपला नाही, तर आणा अडचणीत. गंगेत प्रेते तरंगू लागली, स्मशाने अपुरी पडू लागली. लाकडे मिळेनात, अंत्यसंस्कारच लोकं टाळू लागली, एक- दोन – चार माणसे आली तरी नशिब समजले जाऊ लागले.

खोट्या घोषणा जन्माला आल्या. खोटीच आकडेवारी, खोटेच दावे – प्रतिदावे माथी मारण्यात आले. आक्रमक प्रचार हीच प्रणाली, हीच नीती, हाच व्यवहार झाला. ‘गोदी मिडीया’ ने नैतिकता पोखरुन काढली. कधी नव्हे इतके आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, वाङ्मयीन नैतिक अध:पतन झाले. ते भरून येणे कठीण आहे.

वस्तुत: ‘कोविडचा परिणाम’ हा देशव्यापी संशोधनाचा विषय आहे. पाहाणी (सर्व्हे) करण्याची नितांत गरज आहे. माणसे, संस्था, कुटुंब, व्यवसाय, नोकऱया, सरकार, राजकारण, वित्तीय संस्था, शैक्षणिक संस्था, मुले – अध्यापक – अध्ययन, वैद्यकीय यंत्रणा, पोलीस यंत्रणा, न्यायव्यवस्था सर्वांवर इतका विपरीत आणि कधीही भरून न येणारा परिणाम झालाय की तो केवळ अंदाजे कुणालाच मांडता येणार नाही. काही वित्तीय संस्थांनी पाहणी केलीही आहे, परंतु देशव्यापी स्वरूप त्याला प्राप्त झालेले नाही.

या सर्व पसाऱयात कुणाच्याही खिसगणीतही नसणारा घटक म्हणजे ग्रंथालये! देशातील शैक्षणिक, सार्वजनिक, संशोधनपर ग्रंथालयांवर कोविडचा काय परिणाम झाला? या ग्रंथालयांची आज काय स्थिती आहे? वाचक पांगला का? संगणकीय डेटा उडाला का? किती पुस्तकांची खरेदी झाली? अनुदाने/ वर्गण्या किती आल्या वा बुडाल्या? नियतकालिके सुरू राहिली? बंद झाली? वाचकांकडे वाचायला गेलेली पुस्तके परत आली का? उशीरा येणाऱया पुस्तकांवर आकारला जाणारा दंड, त्याचे काय झाले? तो माफ झाला की संगणकातच वाढत गेला? साफ सफाईचे काय झाले? निगा न राखली गेल्याने किती पुस्तके खराब झाली? असे किती नुकसान झाले? छोटी ग्रंथालये (सर्क्युलेटिंग लायबऱया) बंद झाली का? सेवकांच्या नोकऱया गेल्या का? किती ग्रंथालयांच्या ‘ठेवी’ पगारासाठी, खर्च भागवण्यासाठी संपून गेल्या? ग्रंथालये सुरू झाल्यावर वाचक फिरून आले का? वाचकच नसतील तर त्या ग्रंथालयांनी कोणत्या सेवा दिल्या? असे असंख्य प्रश्न घेऊन ग्रंथालयांची पहाणी करायला हवी आहे. ‘संघटीत ग्रंथपाल’ ग्रंथालये यांनी पुढाकार घ्यायला हवा आहे, पण निक्रियतेचा रोग जडलेल्या समाजात ते होईल का? कोणास ठाऊक!

अशी पहाणी हाती नसली तरी काही बाबींचे आपण विचारमंथन इथे करू या. कोणी सांगावे, याहून एखादी प्रेरणाशक्ती निर्माणही होईल!

ग्रंथालयांचे केंद्रवाचक

शिक्षण व्यवस्थेत जसा विद्यार्थी केंद्रवर्ती असतो. वा तसा ग्रंथालय क्षेत्रात वाचक केंद्रवर्ती असतो. शाळा – महाविद्यालये – विद्यापीठे यांनी  लवकरात लवकर आपली शिक्षण पध्दतीची यंत्रणा ‘ऑन लाईन’ पध्दतीत जोडून घेतली आणि विद्यार्थी, अध्यापन, अध्ययन, परीक्षा यंत्रणा ‘वादात’ सापडूनही अडखळत का होईना उभी राहिली. या ‘ऑन लाईन’ पध्दतीचा एक परिणाम असा झाला की विद्यार्थी शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठांकडे फिरकलेच नाहीत. त्यांना शिक्षण देण्याचे काम करणारे शिक्षक, प्राध्यापकही घरूनच शिकवत राहिले, परीक्षा घेत गेले आणि विद्यार्थीही घरूनच शिकत राहिला. परीक्षा देत गेला. पासही होत गेला, परंतु शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे यांच्या अंतर्गत असणारी ग्रंथालये त्यांचे काय झाले? वाचकांच्या विना ही ग्रंथालये कशी चालली? त्यांनी कोणत्या वाचकांना कोणत्या सेवा दिल्या? काही ठिकाणी तर ग्रंथालये बंदच होती. बंदच ठेवली गेली. बंदच पाडण्यात आली का? त्या ग्रंथालयांना कोण ‘वाली’ उरले होते? तिथला सेवक वर्ग या काळात काय काम करीत होता? त्यांचा वापर नि विनियोग कसा करण्यात आला? यावर प्रकाश पडायला हवा. ‘ऑन लाईन’ यंत्रणा फोफावत गेली तर शैक्षणिक ग्रंथालये, ग्रंथालय सेवक त्या नव्या यंत्रणेत उपयुक्त ठरतील का? टिकतील का? टिकायचे असेल तर ग्रंथालये ऑनलाईन पध्दतीत कशी आणता येतील? यावर तज्ञांनी मंथन करायला हवे.

सार्वजनिक ग्रंथालयांची स्थितीही काही वेगळी नाही. शैक्षणिक संस्थांमध्ये जसे यात विद्यार्थी येत नाहीत, येऊ दिले जात नाहीत, तसेच सार्वजनिक ग्रंथालये प्रवासबंदी, संचारबंदी, इत्यादीमुळे वाचक येत नाहीत. येऊ शकत नाहीत. शिवाय समाजमाध्यमांवर पुस्तके/ नियतकालिके/ वर्तमानपत्रे वाऱयाच्या वेगाने ‘फिरत’ असल्याने ग्रंथालयात येऊन हे वाचनसाहित्य देण्या-घेण्याची आवश्यकताच जात चालली आहे. अशा परिस्थितीत सार्वजनिक ग्रंथालये आपले ‘अस्तित्त्व’ कसे टिकवून धरतील हा मोठा प्रश्न आहे.

शैक्षणिक संस्था, ग्रंथालये उघडली आहेत, पण तिथे काय काय चालते? प्रशासकीय! मुलांचे प्रवेश आणि परीक्षांचे निकाल लावणे, परीक्षा घेणे ही प्रमुख कार्ये! सार्वजनिक ग्रंथालयांना तर असेही काम नाही. शैक्षणिक ग्रंथालयांचा सेवक वर्ग संस्थेच्या कामात सामावला तरी गेलाय पण सार्वजनिक ग्रंथालयांना ती ही सोय नाही. वाचकच नामशेष होणे ही कुणालाच कशी गंभीर समस्या वाटत नाही, याचे आश्चर्य वाटते. उद्या वाचक/ विद्यार्थी संस्थेत प्रत्यक्ष न येऊन चालू शकते याचा अनुभव आला की ही ग्रंथालये संपायला/ बंद पडायला काहीच अवधी राहणार नाही. प्रथम कर्मचारी कमी होतील पुढे ग्रंथालये हवीतच कशाला? असा व्यक्तीवाद ग्रंथालयांना ‘मारू’ टाकेल.

ग्रंथालयांचे दुसरे केंद्रवाचन साहित्य

शैक्षणिक असो वा सार्वजनिक ग्रंथालये, कोणतेही ग्रंथालय उभे राहते, चालते नि विस्तारते ते ग्रंथालयाकडे असणाऱया वाचनसाहित्यावरच! कोविडकाळात ग्रंथालयांच्या वाचनसाहित्याच्या खरेदीची आकडेवारी गोळा केली तर फार मोठा चिंताजनक निष्कर्ष हाती येऊ शकेल. सरकारी अनुदाने किती आली? आणि त्यात किती प्रमाणात ग्रंथखरेदी झाली? नियतकालिकांच्या वर्गण्या किती प्रमाणात भरल्या? यांचे उत्तर बहुसंख्य ग्रंथालयात निचतम पातळीवर असेल. ‘वाचकच नाहीत किंवा ग्रंथालयेच बंद असतील तर वाचन साहित्य खरेदी करायचेच कशाला?’ अशा फसव्या युक्तीवादाने ग्रंथपालाला/ सेवकाला गप्प ठेवण्यात आले असेल असा अंदाज आहे. याचे भविष्यातले नुकसान भरून न येणारे तर असेलच पण खरेदी विना ‘वाचन कक्ष’ उघडून दिला की काम भागते या दृष्ट विचारात ग्रंथालये संपून केव्हा जातील ते कळणारही नाही.

शैक्षणिक ग्रंथालये शैक्षणिक संस्थेच्या व्यापक पसाऱयातील एक घटक असल्याने ‘गाड्याबरोबर नळ्याची’ यात्रा सुरू तरी राहील, पण सार्वजनिक ग्रंथालये तर ‘केवळ ग्रंथालये’ असल्याने त्यांच्या संपण्याला लवकरच प्रारंभ होईल. वाचक/ सभासद संख्येवरच ज्यांचे आयुष्य अवलंबून आहे, त्या वाचकांना ई-बुक, ई-नियतकालिके/ वर्तमानपत्रे (जी PDF रूपात कोविड काळात मिळतच होती) घर बसल्या फुकट (स्वामीत्वहक्काचा भंग करूनही) मिळत होती वा मिळतील ते वाचक कोणते वाचन साहित्य घ्यायला आपल्या ग्रंथालयात येतील, याचा विचार ग्रंथालयांनीच करायला हवा.

वाचन साहित्याचा थेट संबंध त्या निर्मितीशी आहे. वाचन साहित्याचा निर्माता, प्रकाशक व लेखक यांची आज कोविड मध्ये आणि कोविडनंतर काय मानसिकता आहे? याचा शोध घेतला तर काय दिसते?

कोविड काळात मुद्रणालये, अक्षर जुळणी केंद्रे बंद होती. छोटा व्यावसायिक यात भरडला गेला. मुद्रणालयाकडची कामे कमी झाली. जी यापूर्वीच कमी झाली होती, त्यात कोविडची भर पडली. DTP ऑपरेटर्स, बाईंडर इत्यादी क्षेत्रातले कामगार कमी करण्यात आले. काहींनी भाडी परवडत नाहीत म्हणून आपल्या कचेऱया सोडल्या. कर्जाचे हप्ते, कागद, मुद्रकाची बीले चुकती करणे अशक्य होऊन बसले. यात मुद्रक, प्रकाशक, बांधणीकार, अक्षरजुळणीकार, चित्रकार, मुद्रितशोधक अनेकजण संकटात आले. ग्रंथ निर्मितीचा व्यवसायच गोत्यात आला. ग्रंथनिर्मितीच रोडावली. काही अपवाद असतील पण सर्वसाधारण हेच चित्र दिसते.

नियतकालिकांची स्थिती काही निराळी नाही. अंक बंद पडले, ठेवण्यात आले, जोड अंक निघाले तर काहींनी काही अंक काढलेच नाहीत. अनेकांनी छपाईची प्रक्रियाच बंद करून ऑन लाईन (PDF) अंक देणे पसंत केले. आणि खर्च वाचवला.

छपाईच्या नवीन तंत्रज्ञानाने कोविडच्या आधीच Print on Order च्या माध्यमातून प्रवेश केला असल्याने आणि ई-बुक तयार करणे खर्चाच्या दृष्टीने कमी खर्चिक असल्याने प्रकाशकांनी आधीच आपल्या प्रतींची संख्या 50-100 वर आणली आहे. वितरकांना बिनव्याजी 40ज्ञ् कमिशन देऊन त्यांचा बिनभांडवली धंदा तेजीत ठेवण्यापेक्षा आणि वसुली नामक लाचारी स्वीकारण्यापेक्षा ई-बुक निर्मिती व त्यांची विक्री (अॅमेझॉन आहेच की पाठीशी) आणि त्याची बँकेत जमा होणारी ‘किंमत’ पहाता कोण प्रकाशक सरकारी एक गठ्ठा खरेदी सोडून कशासाठी छापील पुस्तके विकत बसेल? ग्रंथालयांनी हे वाचनसाहित्याचे वास्तव नीट लक्षात घ्यायला हवे. कोविड काळात ई-ग्रंथ निर्मिती, त्याचे वितरण आणि डिजीटल छपाई या क्रियेस कमालीचे व्यावसायिक रूप आले आहे. अशी पुस्तके स्वस्त दरात, घरात आपल्या मोबाईल/ किंडल वर येत  असताना कोण कशाला ग्रंथालयात येईल?

तिसरा महत्त्वाचा घटक सेवक

कोविड – 19 नंतर देशात पहिली लाट आली. दुसऱया लाटेने तर कहरच केला. आता तिसरी लाट येण्याची दाट शक्यता आहे. या विषाणूचा व नवनव्या विषाणुंचा धोका जसा वाचकांना आहे तसाच तो ग्रंथालयसेवक आणि ग्रंथालय चळवळीतील कार्यकर्ते, पदाधिकारी या सर्वांनाच आहे. त्यापासून संरक्षण मिळवणे हे ग्रंथालयांसमोरचे मोठे आव्हान आहे. मुखपट्टी, सामाजिक अंतर राखणे, स्वच्छता ठेवणे आणि लसीकरण हेच काय ते उपाय हाती आहेत. तज्ञांच्या मते आता काही काळ करोनासारख्या विषाणूसोबतच आपल्याला जगावे लागेल. तरून रहावे लागेल. प्रवासयंत्रणांची सुविधा नसणे व त्यातून मार्ग काढत नोकरी स्थानापर्यंत रोज येणे व जाणे ही अत्यंत धोकादायक बाब आहे. शिवाय, विशेषत: सार्वजनिक ग्रंथालयातील कर्मचाऱयांचे वेतन पहाता, त्यांच्यावर पडणारा हा आर्थिक बोजा, मानसिक संतुलन बिघडवणारा ठरू शकतो.

कौटुंबिक जबाबदाऱया, कर्ज पाणी, कोणी आजारी पडलेच तर त्याचा उपचार खर्च आकाशाला भिडलेली महागाई आणि अत्यंत अल्प वेतन यामुळे ग्रंथालय कर्मचारी त्रासलेला वैतागलेला चिडलेला असू शकतो. त्याला समजून घेणारे पदाधिकारी असायला हवेत. नाहीतर वाद- भांडणे वाढून वातावरण निकोप न राहता ते सर्वांनाच (वाचकांच्यासह) मारक ठरू शकते. मृत्यूची भीती, अनाकलनीय भविष्यकाळ, आर्थिक चणचण सेवक- वाचक, सेवक- अधिकारी, सेवक विक्रेते यांच्यात भांडणे वाढू शकतात. वाचकांना ग्रंथालयात न येण्याचा पर्याय असू शकतो पण सेवकांना तोही पर्याय नाही. समुपदेशकांचा सल्ला घेणे, ग्रंथोपचार पध्दती अंमलात आणणे, उपक्रमात मन गुंतवून ठेवणे असे काही उपाय ग्रंथालयांनी अंमलात आणणे गरजेचे आहे. पैसा, मान, सन्मान, प्रतिष्ठा, सत्ता, नावलौकिक, आयुष्य-जीवन, किती क्षणभंगूर आहे, याची फार मोठी शिकवण कोविडने माणसाला करू दिली आहे. मैत्री, सहकार्य, परोपकार, नैतिक वागणे, सचोटी, प्रामाणिकपणा, प्रेम, जिव्हाळा, आपुलकी या भावनांना आयुष्यात किती मोठे स्थान आहे आणि वैर, राग, संताप, चीड, हेवा, दुष्मनी, दु:स्वास या भावनांनी माणूस किंवा समुह अलग विलग होऊ शकतो. विलगीकरणाने जर ही बुध्दी माणसाला दिली नसेल, माणूस एकाकीपणाचे दु:ख काय असते ते जर शिकला नसेल तर उपयोग काय? जात, धर्म, वर्ग, वंश, देश, राज्य यात भेद करून तर निर्माण करून काही उपयोग नाही. विषाणू श्रीमंत-गरीब, शहरी ग्रामीण असा कोणताही भेद जाणत नाही. तो हल्ला करतो नि माणसे मारायला बसतो. कर्मचारी हा शेवटी मानवप्राणी आहे. समाजप्रिय आहे. हेच सत्य उरते. त्यामुळे देणग्या, ग्रंथदेणगी, मदतीची हाक देणे-मारणे याचे मूल्य अनन्य आहे.

आर्थिक धोरण नीती

कर्मचाऱयांचे पगार, संस्थांची अनुदाने, शिक्षण – आरोग्यावरील खर्च, पायाभूत सुविधा- सोयी – सवलती निर्माण करणे हे सरकारचे कर्तव्य जरी असले तरी कोविडमुळे सरकारी यंत्रणाही मोडून पडताना आपण पहातो आहोत. यात ग्रंथ, ग्रंथालये, ग्रंथवाचन संस्कृती ही अगदी शेवटच्या पायरीवर उभी आहे. त्यामुळे धोरणात्मक बदल संभवतात. अर्थकारण बदलू शकते. कमी अत्यावश्यक घटकांना याचा फटका लवकर बसू शकतो.

उदाहरणार्थ एकाच शहरातील ग्रंथालयांचे एकत्रिकरण करणे, केवळ वाचन कक्ष उपलब्ध ठेवणे, कमी वाचक असणारी ग्रंथालये दुसऱया ग्रंथालयात वर्ग करणे, ग्रंथखरेदीची विषयवार वाटणी करणे, कर्मचारी गरजेनुसार फिरवणे, नवीन भरतीवर बंदी येणे, बँकांचे व्याजदर आणखी कमी होणे, खाजगीकरणाला प्राधान्य मिळणे, असे अनेकानेक बदल घडू शकतात. ग्रंथालयांनी त्यास तयार असले पाहिजे.

ग्रंथालयांनी काटकसरीची सवय ठेवून आपले स्वत:चे उत्पन्न स्त्राsत तयार केले पाहिजेत, तरच नव्या जगात ग्रंथालयांचा टिकाव लागू शकतो.

वाचनसाहित्याच्या नव प्रवाहात ग्रंथालये कोणत्या आणि कशा वेगळ्या सेवा उपलब्ध करून देऊ शकतात. यांच्या नवनव्या कल्पना निर्माण कराव्या लागतील. वाचक नसलेल्या ग्रंथालयांची आवश्यकता निर्माण करावी लागेल. जशी प्रेक्षकांविना क्रिकेट, ऑलम्पिकचे खेळ यासाठीचे आव्हान स्वीकारावेच लागेल. तंत्रज्ञानाची कास धरावी लागेल. सामाजिक मिडिया, इतर माध्यमे यांच्या सहकार्याने पुढे सरकावे लागेल. शिकवणे जसे ‘ऑनलाईन’वर गेले तशी ग्रंथालयांना ऑनलाईन होण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. ग्रंथालयांचे जुन्या स्वरूपाचे मरण अटळ आहे. त्याला जन्मावेच लागेल. त्याला नव्याने कोणाचाच इलाज नाही.

—  डॉ. प्रदीप कर्णिक.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..