प्रिय मित्र हेमंत करकरे

Dear Friend Hemant Karkare

२६ नोव्हेंबर, २००८ रोजी अतिरेक्यांच्या हल्ल्यात माझा जिवलग मित्र हेमंत करकरे शहीद झाला. दरवर्षी आजच्या दिवशी माझ्या जखमेवरची खपली निघून भावना भळाभळा वाहू लागतात.

प्रिय हेमंत

p-29676-Hemant-Karkareमी वर्गात शिरलो तेव्हा एका बेंचाच्या कोपऱ्यात स्वत:च्या अत्यंत कृश शरीराचं मुटकुळं करून खाली मान घालून तो बसला होता. कुपोषित बालक हा शब्द तेव्हा अस्तित्वात नसला तरी आज जाणवतं की मेळघाटातल्या एखाद्या कुपोषित बालकात आणि त्याच्या शरीरयष्टीत ‘काडी’चाही फरक नव्हता. अगदी आवर्जून त्याच्याशी बोलावं, त्याची मुद्दाम ओळख करून घ्यावी आणि मैत्री करावी असं त्याच्या व्यक्तिमत्त्वात काहीही नसल्यामुळे बहुसंख्य विद्यार्थ्यांच्या दृष्टीने तो अदखलपात्रच होता. माझ्या आक्रमक व बऱ्यापैकी भांडखोर स्वभावाला त्याच्या शांत स्वभावाचं प्रचंड आश्चर्य वाटत असे. माणसात कितीही वैगुण्ये असली तरी निसर्गाने त्यांची कोणत्या ना कोणत्या स्वरूपात भरपाई केलेली असते. त्याच्या बाबतीत ती भरपाई त्याच्या पाणीदार डोळ्यांच्या रूपाने झाली होती.

मी त्याला कितीही डिवचण्याचा प्रयत्न केला तरी त्याचे समोरच्या व्यक्तीवर जरब बसवणारे तेजस्वी डोळे मला क्षणात नामोहरम करीत असत. माझ्यासकट सर्व मित्र मैदानावर खेळत असताना तो वर्गात एकटाच बसून काय करतो हे बघण्यासाठी मी एक दिवस हळूच वर्गात शिरलो तेव्हा चांदोबा नावाचं मासिक वाचण्यात तो एवढा तल्लीन झाला होता की मी त्याच्या शेजारी येऊन बसलो आहे हे त्याला कळलंही नाही. पण त्या क्षणी मला एक अत्यंत महत्त्वाची जाणीव झाली की आम्ही दोघेही समानधर्मी व अत्यंत व्यसनी आहोत. आम्हा दोघांनाही वाचनाचं जबरदस्त व्यसन होतं व त्या व्यसनामुळेच आम्ही खऱ्या अर्थाने मित्र झालो. त्या मैत्रीतून वयाच्या अकराव्या वर्षी आमच्या दोघांच्याही घरात छोट्याशा ग्रंथालयांचा जन्म झाला. चांदोबाचे जुने अंक व चोरबाजारातून आणलेली कॉमिक्स ही आमच्या ग्रंथालयांची ग्रंथसंपदा होती व त्यांचा फडशा पाडण्यासाठी ती एक्सचेंज करणं हे आमचे नित्यकर्म झाले होते.

दहावीच्या परीक्षेनंतर भेटी दुर्मिळ झाल्या. तो आयपीएस झाल्याची बातमी माझ्यासाठी केवळ धक्कादायकच नाही तर अविश्वसनीय होती. शिव्याच काय, पण साधे अबे-काबे हे शब्दही ज्याच्या तोंडातून कधी बाहेर पडले नाहीत असा खाली मान घालून सर्वत्र वावरणारा माझा एक सरळमार्गी मित्र चक्क पोलिस दलात काम करणार? मध्य प्रदेशात मी एका जर्मन कंपनीचा अधिकारी म्हणून कार्यरत असताना पोलिस दलातील त्याच्या प्रगतीच्या बातम्या माझ्यापर्यंत पोहोचत होत्या. अनेक वर्षांच्या भटकंतीनंतर मी महाराष्ट्रात परत आलो व आमच्या बॅचच्या रौप्यमहोत्सवाच्या निमित्ताने खूप वर्षांनंतर आमची भेट झाली. त्या कार्यक्रमात त्याचं आगमन झालं आणि त्याच्या व्यक्तिमत्त्वात झालेला आमूलाग्र बदल बघून पुलंच्या ‘व्यक्ती आणि वल्ली’मधील ‘नंदा प्रधान’ साक्षात माझ्यासमोर अवतरल्याचा मला भास झाला. दीर्घ कालावधीनंतर आमची भेट झाल्यावर त्याचा पहिला प्रश्न होता – ‘काय म्हणते तुझी लायब्ररी?’ इतक्या वर्षांनंतर भेट झाल्यावरही त्याला उत्सुकता होती ती चांदोबा मासिकाच्या एका अंकापासून सुरू झालेल्या लायब्ररीच्या प्रगतीची ! त्याच्याजवळ असलेल्या सर्व पुस्तकांची विषयानुसार कशी मांडणी केली आहे याची माहिती एखाद्या शाळकरी मुलाच्या उत्साहाने मला पुरवून त्याच्या त्या कौतुकाच्या लायब्ररीचं दर्शन घेण्यासाठी येण्याचं आमंत्रण त्याने मला दिलं, पण आम्हा दोघांच्याही व्यग्रतेमुळे आमची प्रत्यक्ष भेट पुन्हा कधी झालीच नाही.

पोलिस खात्यात एका मोठ्या व अत्यंत महत्त्वाच्या पदावर त्याची नियुक्ती झाल्यानंतर मला आनंद होण्याऐवजी माझ्या काळजाचा ठोका चुकला. केवळ दहशतवादाचेच नव्हे, तर शक्य तितक्या सर्व गोष्टींचे अत्यंत निर्लज्जपणे राजकारण करणाऱ्यांच्या या देशात राजकारण्यांच्या इशाऱ्यांवर नाचण्याची वेळ जर त्याच्यावर आली तर त्याच्यासारख्या प्रामाणिक व सरळमार्गी माणसाचा कसा काय निभाव लागणार या विचाराने माझी अस्वस्थता वाढू लागली. बॉम्बस्फोटांच्या चौकशीला सुरुवात झाल्यानंतर टीव्हीवर जवळपास रोज होणाऱ्या त्याच्या दर्शनाने माझ्या मनात धोक्याची घंटा वाजू लागली आणि मी त्याला काही अत्यंत महत्त्वाच्या गोष्टींबद्दल सावध करण्यासाठी धडपड करत असतानाच २६ नोव्हेंबरच्या मध्यरात्री एका मित्राने मला फोन करून एक हादरवून टाकणारी बातमी दिली -‘आपला मित्र हेमंत करकरे या जगात नाही. त्याला थोड्या वेळापूर्वी अतिरेक्यांनी ठार केलं.’ तो ज्या खुर्चीवर बसला होता तिचा प्रत्येक क्षणी मृत्यूशी अगदी जवळून संबंध येणार आहे याची पूर्ण जाणीव असूनही त्या बातमीचा अर्थ समजून घेण्याचा मी आजही निष्फळ प्रयत्न करतो आहे.

कोणासाठी तू स्वत:ला मृत्यूच्या दाढेत झोकून दिलंस मित्रा? लोकल्सच्या डब्यांना लटकून रात्रंदिवस प्रवास करणाऱ्या मुंबईच्या असहाय्य नागरिकांचा जीव वाचवण्यासाठी की निवडून आल्यानंतर कधीही पूर्ण न होणाऱ्या खोट्या आश्वासनांचा मतदारांवर पाऊस पाडून स्वत:च्या तुंबड्या भरण्यात धन्यता मानणाऱ्या पराकोटीच्या स्वार्थी लोकप्रतिनिधींसाठी? संसद भवनातील अतिरेकी हल्ल्याला सात वर्षे पूर्ण झाल्याबद्दल शहिदांना श्रद्धांजली वाहण्यासाठी बहुसंख्येने अनुपस्थित राहिलेल्या कृतघ्न नेत्यांसाठी की दहशतवाद्यांचा पूर्ण बीमोड होण्याआधीच जाळपोळीच्या धगीने व गोळीबाराने तापलेल्या तव्यांवर अत्यंत गलिच्छ राजकारणाच्या पोळ्या शेकण्यासाठी गिधाडालाही लाजवणाऱ्या वेगाने तुटून पडलेल्या निर्लज्ज राजकारण्यांसाठी? तू या जगात असताना तुझ्या प्रामाणिकपणावर शंका घेऊन ज्या माकडांनी स्वत:च्या वैचारिक दिवाळखोरीचं जाहीर प्रदर्शन केलं त्याच माकडांच्या हाती तू या जगाचा निरोप घेताना कोलीत दिलं याची तुला कल्पना आहे?

समवयस्क असूनही प्रत्येक भेटीत वडीलकीच्या नात्याने प्रत्येक मित्राची अत्यंत आस्थेने चौकशी करणारा तुझ्यासारखा मित्र आम्हा सर्व मित्रांना पोरकं करून गेला. दगड-विटांनी तयार होतात त्या साध्या इमारती, घरं नव्हेत. त्या निर्जीव इमारतींमध्ये राहणारी आपल्या सर्वांसारखी हाडामांसाची जिवंत माणसं खरी घरं जन्माला घालत असतात ! अशाच एका जिवंत घरात राहणाऱ्या सर्वांचा तू कर्तृत्वाच्या शिखरावर असताना अचानक कायमचा निरोप घेतलास. २६ नोव्हेंबरच्या मध्यरात्री तुझ्या हत्येची बातमी ऐकल्यानंतर डबडबलेल्या डोळ्यांमधून मी अश्रूंना अजूनही बाहेर पडू दिलेलं नाही. तुझ्यासारख्या धीरोदात्त मित्राच्या मृत्यूवर अश्रू ढाळणं हा तुझ्या उत्तुंग कर्तृत्वाचा सर्वात मोठा अपमान ठरेल. भ्रष्टाचाराने अंतर्बाह्य पोखरलेल्या व स्वार्थी राजकारणाने पूर्णत: सडवून टाकलेल्या आपल्या देशाने तुझ्या अत्यंत दुर्दैवी मृत्यूच्या निमित्ताने जर कात टाकली तर तू खऱ्या अर्थाने अजरामर होशील, अन्यथा दहशतवाद्यांपासून असंख्यांचे प्राण वाचवण्यासाठी स्वत:ला मृत्यूच्या खाईत झोकून देणारा तू केवळ आमचाच नव्हे, तर आपल्या देशाचा शेवटचा मित्र ठरशील!

— श्रीकांत पोहनकर
98226 98100
shrikantpohankar@gmail.comश्रीकांत पोहनकर
About श्रीकांत पोहनकर 40 लेख
श्रीकांत पोहनकर हे १९९८ पासून सतत सोळा वर्षे समाजातील विविध घटकांसाठी काम करणार्‍या टर्निंग पॉईंट, पोहनकर फाऊंडेशन, टर्निंग पॉईंट पब्लिकेशन्स व दिलासा या संस्थांचे नेतृत्त्व करत आहेत.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

p-2078-IT-policy-300

महाराष्ट्राची आयटी अनुकूल शहरे

भारतीय माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील व्यावसायिक संघटना नेस्कॉमच्या (नॅशनल असोसिएशन ऑफ ...
p-2104-muktagiri-300

श्रध्दास्थान मुक्तागिरी

विदर्भातील अमरावती जिल्हयात मुक्तागिरी हे निसर्गरम्य तसेच जैनधर्मीयांचे महत्त्वाचे धार्मिक ...
p-2060-mahalaxmin-temple-01-300

करवीरनगरी अर्थात कोल्हापूर

करवीरनगरी अर्थात कोल्हापूर जिल्ह्यास ऐतिहासिक, सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक वारसा लाभलेला ...
p-2090-ambejogai-city-300

अंबेजोगाई

अंबेजोगाई बीड जिल्ह्यातील एक शहर आहे. १३व्या शतकात स्वामी मुकुंदराज ...

Loading…