नवीन लेखन...

विचारांचा घोळ झालायं सगळा

मला अंग चेपून घ्यायला फार आवडते. माझे काही जुने मित्र कुठे भेटले, म्हणजे जर का त्यांनी मला कुठे पहिले, अगदी सभा, समारंभात सुद्धा, तर हळूच मागून येऊन खांदे दाबायला लागतात. जेंव्हा केंव्हा असे होते, मी जे काही करत असीन, ते सर्व थांबवून दोन मिनिटे का होईना, माझी पूर्ण समाधी लागते. अर्थात, दोन मिनिटांनी हि लोक थांबली कि मी स्वर्गातून खाली येतो. आज सकाळी साधारणपणे साडेचार वाजता, माझी पाठ खूप दुखायला लागली तेंव्हा मी आमच्या हिला हाक मारली. तिनेही पटकन उठून एक कॉम्बीफ्लाम दिली, आणि पाठ थोडीशी दाबून बाईसाहेब परत निद्रादेवीच्या कुशीत शिरल्या. मात्र झोपायच्या आधी तिने एक छान काम केले. अर्बनच्या अँपवर जाऊन तिने सकाळी आठचा ६० मिनिटांचा आयुर्वेदिक मसाज माझ्यासाठी बुक केला. आणि मी मात्र झोप येत नसल्यामुळे मनाच्या हिंदोळ्यावर, येऊ घातलेल्या मसाजच्या कल्पनाविश्वात गुंग होऊन गेलो. पाठ दुखणे थांबले पण दुखण्यावरती उपाय गोळीचा झाला कि मसाज मिळणार ह्या सुखावणाऱ्या विचाराचा झाला ते कळले नाही. पाठ दुखायची थांबली हे मात्र खरे.
विचारांच्या पगड्याखाली, मला छोटा संजय दिसायला लागला. पाचवी का सहावीत असेन मी. आम्ही सर्व कुटुंबीय, म्हणजे आम्ही चौघे, दोन्ही काका व काकी, आणि आजोबा, आमच्या कुलदेवतेच्या दर्शनाला, म्हणजे गुजराथ स्थित अंबाजी देवीच्या यात्रेला गेलो होतो. तिसऱ्या दिवशी सकाळी, माझ्या बाबांनी एका मसाजवाल्याला बोलावले. साधारणतः सकाळी ९च्या सुमाराला तो आला, व बाबांचा मसाज सुरु झाला. मी तिथेच कॉमिक वाचत पडलो होतो. पण काही वेळातच मी मॅन्ड्रेक व लोथारच्या जादुई दुनियेतून बाहेर पडलो. माझी नजर त्या मसाजवाल्यावरून हटत नव्हती. अनिमिष नेत्रांनी मी तो मसाजचा सोहळा पाहत होता. आणि काय सांगू, त्यांचा मसाज चालू असल्यामुळे बाबांनी डोळे मिटून घेतले होते, तर इथे माझीही ब्रम्हानंदी टाळी लागली. जणू तो मसाज माझाच होतोय असा मला आभास होऊ लागला, आणि बसल्या जागी मी गाढ झोपून गेलो. पुढे आयुष्यात खूप वेळा अंग रगडून घेतलंय मी. पण त्या न होताहि अनुभवलेल्या मसाजची गोडी अवर्णनीय होती, जिची तुलना आजवर कधीही कुठल्याही करून घेतलेल्या मसाजशी नाही होऊ शकत.
एक गम्मत बघा. मला मसाज करून घ्यायला खूप आवडतो, पण मसाज करायला मुळीच आवडत नाही. कधी कधी काय होते कि हिची पाठ भरून आलेली असते, किंवा कन्यारत्नाचे पाय थोडे दुखत असतात. अश्या वेळी, काही करायला लागले तर माझे हात दोन ते तीन मिनिटात दुखायला लागत, अहो, खरंच दुखतात, नाटक नाही करत मी आणि तेंव्हा मला प्रश्न पडतो कि ह्या मसाजवाल्यांचे हात दिवसभर सतत चालवून दुखत कसे नाहीत? तेंव्हा गुजरातीतील एक म्हण आठवली जी माझ्या प्रश्नाचे पटकन उत्तर देऊन गेली. जेनु काम तेनु थाय, अने बिजू करे तो गोता खाय.

जेनु काम तेनु थाय, अने बिजू करे तो गोता खाय. खरंच, किती चपखल बसलीय न हि म्हण. पण तसे कशाला, प्रत्येक भाषेत काय सुरेख म्हणी कोण्या महाभागांनी लिहून ठेवल्यात. एका वाक्यात अर्थाचे पूर्ण सार साध्या साध्या म्हणीं मधून चपखलपणे आपल्यापर्यंत पोचवणाऱ्या ह्या म्हणीं ज्यांना स्फुरल्या, तेचि पुरुष भाग्याचे वा डोक्याचे J असेच म्हणावे लागेल. इंग्रजी मधील ‘अ स्टिच इन टाइम सेव्ह्स नाईन’ मेनी हॅन्ड्स मेक लाईट वर्क, ऑनेस्टी इज द बेस्ट पॅालिसी, ग्रास इज ग्रीनर ऑन द अदर साईड, नेव्हर जज अ बुक बाय इट्स कव्हर, बेटर लेट दॅन नेव्हर, अॅन अॅपल अ डे किप्स द डॅाक्टर अवे, अथवा हिंदी मधील ‘आ बैल मुझे मार ‘ वा ‘दिल्ली अभि दूर है’ सारख्या म्हणी थोडया शब्दात भरपूर काही सांगून जातात.

आपल्या मराठीमध्ये तर अश्या असंख्य म्हणी आहेत. मराठी म्हणी या त्या बोलणाऱ्याच्या मनातील एक वेगळा अनुभव व्यक्त करतात ते सुद्धा वेगळ्या धाटणीत.’चोराच्या मनात चांदणे’, ‘ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी’, ‘झाकली मुठ सव्वालाखाची’, ‘टाकीचे घाव सोसल्यावाचून देवपण येत नाही’, ‘प्रयत्ने वाळूचे कणही रगडीता तेलही गळे’,’थेंबे थेंबे तळे साचे’, ‘दाम करी काम’, ‘दिव्याखाली अंधार’, ‘दुरून डोंगर साजरे’ , ‘प्रयत्नांती परमेश्वर’,’नाचता येईना अंगण वाकडे’, ताकाला जाऊन भांड लपवणे, तुला नाय द्यायचं मला नाय घ्यायचं मग कशाला उगाच रात्रीला कंदील घेऊन यायचं.

प्रत्येक म्हण इवल्याश्या शब्दात केव्हढ्या मोठ्याल्या गोष्टी सांगून जातात. इंग्रजी मधील ‘द हॅन्ड दॅट रॉक्स द क्रेडल रूल्स द वर्ल्ड’ सारखी मराठीमध्ये सुद्धा तेव्हढीच नितांत सुंदर म्हण आहे, ‘जिच्या हाती पाळण्याची दोरी, तो ती जगाते उध्दारी’ अर्थात मदर, माता, आई. शेवटी काय, देवाचीच करणी आणि नारळात पाणी! बघा, पाठदुखीवरून मसाजकडे, आणि मसाजकडून, माझ्या नाकर्तेपणापासून म्हणीं पर्यंत, असा प्रवास झाला. आपल्या आयुष्याच्या प्रवासात सुद्धा, अनेक वळणे येतात, अडचणींचे डोंगर उभे ठाकतात, आईच्या कुशीतून सुरु झालेली जीवनसरिता मृत्यूच्या सागराकडे वेडीपिशी होऊन धावते. सुसाट पिसाट रानवारा मनात घोंगावत जातो, तेंव्हा मोहरलेली रानवेल सगळी, निमूट भुईसपाट होत जाते. स्वतःला राजहंस समजण्याऱ्या कावळ्यांना लाथेसरशी ठोकून टाकायची रक्तातली उर्मी, पण जागायला तिला शब्दच असे नाकारत राहतात. म्हणूनच मनातल्या तळाशी एका विराटपुरुषाला सदैव जागे ठेवावे लागते. नाहीतर ‘कुञ्याचं जिणं आणि फजितीला काय उणं’ ह्या म्हणीप्रमाणे जीवनातल्या गणितात फक्त भागाकारच करावा लागेल, आणि हातचा न राखता आल्यामुळे, ‘तेलही गेले, तूपही गेले, आणि हाती राहिले धुपाटणे, ह्या म्हणीसारखी स्थिती होऊन जाईल.

-संजय शरद दळवी

(९८२०५४८२१८ / ७५०६४०५५३८)

Avatar
About `आम्ही साहित्यिक' फेसबुक ग्रुप 346 Articles
आम्ही साहित्यिक या फेसग्रुप ग्रुपवरुन आलेले लिखाण. हा ग्रुप मराठीसृष्टीने बनवला आहे व त्यावरील निवडक साहित्य मराठीसृष्टीवर प्रकाशित केले जाते. मराठीतील हा एक लोकप्रिय आणि दर्जेदार साहित्यविषयक ग्रुप आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..