विडा घ्या हो नारायणा – भाग बारा

जगण्याची साधी सोप्पी तत्वे – भाग ९३; आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे – क्रमांक ११ 
जे जे देवासाठी ते ते देहासाठी – भाग ४९

सहा वेळा पान खाल्ल्यानंतर तोंडात जी लाळ तयार होते, ती गिळावी. पहिल्या आणि दुसऱ्या वेळी केवळ चावून थुंकायचे आहे. आणि नंतरची लाळ येईल तेवढी सावकाश निर्माण करून गिळायची आहे.

प्रश्न असा पडतो, की पहिली दोन वेळा ती पिंक का थुंकावी ? जसं आताचं बाटलीबंद पेय पिताना गटागटा प्यायले तर मस्तकात एक कडक झिनझिनी जाते, ती डोळ्याला, नाकाला, कानाला, मेंदूला त्रासदायक असते, (हे आपण कधीतरी अनुभवले असालच. ) म्हणून सुरवात करताना गटागटा न करता, घोट घोटने करावी. तसंच पान खाताना त्याचा वास, तिखटपणा, कडकपणे जाणवू नये, म्हणून चावून थुंकुन टाकायला सांगितले गेले असावे. पहिली दुसरी पिंक म्हणजे अगदीच काही विष नव्हे पण सावध व्हावे, म्हणून केलेला नियम असेल.

दर्दी पान खाणारे सुद्धा पानाचा देठ आणि टोक एकवेळ चावून टाकून देतात. यात पान चघळून लाळ बाहेर टाकणे अपेक्षित नाही. तर पान दातानी दाबल्यानंतर पहिल्यांदा येणारा वास हा मदकारी असतो, तो बाहेर जावा, आणि नंतर चावल्याने येणारा पहिला रस झिनझिनी आणणारा असतो, तो ही थुंकावा, म्हणजे नंतर पान “लागत” नाही.

याचे प्रात्यक्षिक आमच्या सौ.ने करून पाहिले. पानाचा तोबरा तोंडात भरावा, चावावा, एका गालात ठेवून द्यावा. आत्ता तोंडात आलेले पाणी टाकून द्यावे. पुनः पान मधे आणावे. पुनः चावावे. दुसऱ्या बाजूला न्यावे. येईल ते पाणी थुंकावे आणि नंतर फुल टु धमाल, रवंथ करीत बसावे.

वीस बावीस वर्षापूर्वी मी एक अभ्यास केला होता. सतत म्हणजे दिवसातून किमान दहा बारा वेळा पान खाणाऱ्या व्यक्ती अभ्यासाकरीता घेतल्या होत्या. अर्थात हा रॅन्डम स्टडी होता. पण त्यात बहुसंख्य जण पानाबरोबर तंबाखू खाणारेदेखील होते. या सर्वांच्या मनात भीती होतीच, की तंबाखू विषारी आहे, आणि पोटात गेला तर कॅन्सरसारखा जीवघेणा आजार होतो, म्हणून ही सर्व मंडळी पान खाल्ल्यानंतर ते प्रत्येक वेळी बाहेर थुंकुन टाकीत.

अभ्यासात असे लक्षात आले की, एक वेळा पान खाल्ले की किमान तीन ते चार वेळा बाहेर थुंकले जाते. असे दिवसातून कमीतकमी दहा ते बारा वेळा ! एकदा पान खाऊन बाहेर थुंकले की जी रेड पिंक बाहेर पडते, ती साधारणपणे एक ते दीड चमचा तरी असतेच. म्हणजे पाच मिलीचा चमचा या हिशोबाने सात ते आठ मिली रसमिश्रित लाळ तोंडातून बाहेर पडते. त्यातील लाळ पाच मिली असे जरी धरले तरी एकदा पान खाल्लेतर आणि तीन वेळा बाहेर थुंकले तर जी लाळ बाहेर पडेल ती किमान पंधरा ते वीस मिली असते. असं दिवसातून किमान दहा बारा वेळा. म्हणजे दिवसभरात कमीतकमी दीडशे मिली लाळ तोंडातून बाहेर पडते. जी अल्कलाईन नेचरची आहे. जी पोटात जाणे अपेक्षित आहे. जी लाळ एक फुकट मिळणारे बहुमुल्य औषध आहे, जी केवळ चघळल्याने तयार होते आहे. ती लाळ बाहेर थुंकल्याने आपणच आपले नुकसान करून घेत आहोत. असो. सर्वेक्षणात पुढे असं आढळून आलं की, एवढे करून देखील या गटातील नव्वद मंडळींना तोंडाचे, दाताचे, हिरडीचे, गळ्याचे, टाळूचे, गालाचे, आजार नाहीत. पानाचा राप लागून यांचे दात लाल, काळे होतात पण मुळातून मजबूत असतात. किडलेले तर अजिबात नाहीत. प्रमेह नाही, पोटाचे आजार नाहीत, सांधेदुखी नाही, ह्रदयरोग तर जवळपास सुद्धा नाही, थायराॅईड, कानाचे आजार, नाकाचे आजार, डोळ्यांचे आजार नाहीत, पीसीओडी पण नाही. आणि हे एवढे फक्त पानाने केले. !!!

कोणत्याही शास्त्राची विश्वासार्हता त्याच्या तत्वांमधे असते. पान खावे हे ज्या शास्त्रात सांगितले जातेय, त्याच शास्त्रात पान कोणी खाऊ नये, हे सुद्धा सांगितलेले आहे.

वाग्भट सूत्रस्थान अध्याय दोन मधे एक श्लोक आहे.
ताम्बूलं क्षतपित्तास्ररूक्षोतकुपितचक्षुषाम् ।
विषमूर्च्छामदार्तानाम् अपथ्यं शोषिणामपि ।।
म्हणजे फुफ्फुसाला रोगामुळे क्षत किंवा जखम, इजा झालेल्यांनी, रक्तपित्त नावाचा आजार झालेल्यांनी, ( रक्तपित्त म्हणजे शरीरातून कोणत्याही अवयवातून पित्तामुळे दूषित झालेले रक्त बाहेर येणे, अर्थातच याचे निदान वैद्यच करू शकतील. ) विष, मूर्च्छा, आणि मद यांनी पीडीत, घशाला कोरड पडलेल्यांनी, ज्यांच्या अंगात स्नेह कमी आहे, अशा रूक्ष प्रकृतीच्या स्त्री पुरुषांनी आणि डोळे आलेल्यांनी तांबूल म्हणजे विडा सेवन करू नये.

हे असे करावे, हे असे करू नये, असे जिथे वर्णन केले जाते ते शास्त्र.

कितीही प्रिय असेल तरीदेखील केवळ कौतुक कौतुकच केले पाहिजे असे काही नाही. जे दोष आहेत तेही तसेच स्पष्ट सांगायलाच हवेत नाहीत का ?

वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
02362-223423.
13.07.2017About (वैद्य) सुविनय दामले 453 लेख
वैद्य सुविनय दामले हे कुडाळ, सिंधूदुर्ग येथील सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य आहेत. ते आयुर्वेद या विषयावर विपुल लेखन करतात तसेच व्याख्यानेही देतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

p-2078-IT-policy-300

महाराष्ट्राची आयटी अनुकूल शहरे

भारतीय माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील व्यावसायिक संघटना नेस्कॉमच्या (नॅशनल असोसिएशन ऑफ ...
p-2104-muktagiri-300

श्रध्दास्थान मुक्तागिरी

विदर्भातील अमरावती जिल्हयात मुक्तागिरी हे निसर्गरम्य तसेच जैनधर्मीयांचे महत्त्वाचे धार्मिक ...
p-2060-mahalaxmin-temple-01-300

करवीरनगरी अर्थात कोल्हापूर

करवीरनगरी अर्थात कोल्हापूर जिल्ह्यास ऐतिहासिक, सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक वारसा लाभलेला ...
p-2090-ambejogai-city-300

अंबेजोगाई

अंबेजोगाई बीड जिल्ह्यातील एक शहर आहे. १३व्या शतकात स्वामी मुकुंदराज ...

Loading…