नवीन लेखन...

तुमची माझी सर्वांची

लग्नाच्या सिझनमध्ये नवरानवरीच्या कपड्यांचे डिझाईन, नटलेल्या बायका पुरूषांचे कपडे,झालंच तर लग्नाच्या चालीरिती, इतर पद्धती यातही वैविध्य असेल पण लग्नाच्या मेनूत एक पदार्थ हमखास वर्णी लावतो. तो म्हणजे ………

बरोबर ओळखलत.

पाणीपुरी!!

आजकाल लग्नाच्या जेवणात पाणीपुरी नसेल तर तो फाऊल म्हणतात.जेवण कितीही चविष्ट असेल तरी वह्राडी मंडळी नाखूष असतात.”जेवण तसं बरं होतं पण पाणीपुरी नव्हती.”असे संवाद हमखास ऐकायला मिळतात!!

थोडक्यात काय ,तर पाणीपुरी आपल्या खाद्यजीवनाचा अविभाज्य अंग झाली आहे.

या पाणीपुरीचा इतिहास एकदम रंजक आहे. पांडव वनवासात असताना कुंतीने द्रौपदीला थोडे गव्हाचे पीठ , व इतर साहित्य दिले आणि त्यातून पांडवांचे पोट भरेलआणि मनही तृप्त होईल असा पदार्थ बनवायला सांगितले.

( सुनेची अशी परीक्षा घेणे बरे का?)

द्रौपदी पण हुशार होती.तिने पिठाच्या छोट्या पुऱ्या केल्या आणि इतर पदार्थांचा खुबीने वापर करून ते या फुगलेल्या पुऱ्यांमध्ये भरले आणि सगळ्यांना खायला दिले.पांडव आणि कुंती हा नवा पदार्थ खाऊन आनंदीत झाले. हा पदार्थ म्हणजेच पाणीपुरी!

अशी आख्यायिका आहे. खरेखोटे ते पांडव ,कुंती आणि द्रौपदीच जाणे ..

या पांडवांमुळे महाभारत घडले असेल. इतरही अनेक मूलभूत बदल झाले असतील पण द्रौपदीने पाणीपुरीचा आणि भीमाने श्रीखंडाचा‌ शोध लावून समस्त खाद्यप्रेमींवर उपकार केले आहेत!!

भारतात पाणीपुरी कोणतेही जातीभेद ,प्रांतभेद ,सीमातंटा न करता सर्वत्र बनते आणि मोठ्या आवडीने खाल्ली जाते. फक्त प्रांताप्रमाणे ती आपले नाव बदलते.(उगाच कोणाच्या अस्मितेला धक्का नको)

महाराष्ट्रातील पाणीपुरी ओडिशा बिहार कडील भागात गुपचूप(पाणीपुरी तोंडांत असताना काही वेळ गप चूप बसावे लागते म्हणून असेल बहुतेक ),गुजरात मध्ये पकौडी,झारखंड पश्चिम बंगालमध्ये फुचकी ,दिल्ली पंजाब जम्मू काश्मीर मध्ये गोलगप्पे, उत्तरप्रदेशातील काही भागात पानी के बताशे तर काही भागात फुलकी आणि मध्यप्रदेशातील होशंगाबादमध्ये चक्क टिक्की या नावाने ओळखली जाते.

हे सांगण्याचा हेतू हाच की भारतात कुठेही गेलात आणि पाणीपुरी खायची इच्छा झाली तर काय नावाने मागवायची असा प्रश्न पडायला नको.
तसे म्हणायचे तर एकदम साधासाच पदार्थ.मी लहान असताना पाणीपुरी करायची म्हणजे मोठ्ठा समारंभ असायचा.एकतर ,”काय ते पाण्यात पुऱ्या बुडवून खायच्या .धड पोट पण भरत नाही. म्हणजे पुन्हा काहीतरी वेगळे बनवायलाच लागते आणि मधल्या वेळचे खाणे बनवायला इतका वेळ कोण वाया घालवणार?” म्हणून आई पाणीपुरी बनवायलाच तयार नसायची. बाहेर जाऊन गाडीवरची पाणीपुरी खायची म्हणजे केवढे ते पाप!आणखी वट्ट तीन रुपये देऊन फक्त सहा पुऱ्या मिळायच्या.वडापाव दीड रुपयांत मिळायचा आणि दोन वडापाव खाल्ले तर संध्याकाळपर्यंत भूक लागायची नाही.

म्हणजे काय तर मनाची तृप्ती होईपर्यंत पाणीपुरी खायची असेल तर आईदेवीला प्रसन्न करण्याला पर्याय नव्हता.मग आईला बराच मस्का लावायचा,शहाण्या सारखे वागायचे(तशी मी शहाणी मुलगीच होते!असो!)बरीच फिल्डींग लावायची मग कधीतरी सटीसहामासी पाणीपुरी खायला मिळायची.त्यातही आईला पुऱ्या लाटायला मदत करणे, कोथिंबीर,पुदिना निवडून देणे अशी कामे करायला लागायचीच.

आता खूपच बरे आहे.लाटलेल्या कच्च्या पुऱ्यांपासून,ते अगदी एअरफ्रायर मधल्या बीन तेलाच्या पुऱ्यापर्यंत अनेक पर्याय आपल्याकडे उपलब्ध आहेत.बाकी गोड आणि तिखट पाणी बनवणे फारसे कठीण नाही.त्यामुळे घरी पाणीपुरी बनवणे डाव्या हाताचा मळ झालाय.

पण खरी मजा आहे ती पाणीपुरीच्या गाडीवर जाऊन भैया समोर छोटी प्लेट धरून नाकाडोळ्यातून आलेले पाणी सावरत पाणीपुरी खाण्यातच!आणि त्यापेक्षाही जास्त मजा आहे ती दोन तीन प्लेट पाणीपुरी खाऊन झाल्यावर भैयाकडून मागून मसाला पुरी खाण्यात.याय लहानथोर , गरीब श्रीमंत असा भेदभाव मानायचा नसतो. पाणीपुरी खाणाऱ्यांचे पण दोन पंथ असतात.एक असतो तो गरम पाणीपुरीवाल्यांचा. यांना पाणीपुरीत गरम रगडा घातलेलाआवडतो.तर काहीजणांना थंड बुंदी किंवा उकडलेले मूग घातलेली पाणीपुरी आवडते.थंड असो वा गरम ,पाणीपुरीत गोड,तिखट,आंबट या तिन्ही चवींचे अगदी योग्य प्रमाण ज्यांना जमते त्यांची पाणीपुरी फेमस होते.

आपापल्या गावात ,भागात एकतरी जगात भारी पाणीपुरीवाला असतोच.जसा आमच्या पनवेलचा मिश्रा पाणीपुरीवाला आहे. त्यांच्याकडे नित्यनेमाने जाणारे गिर्हाईक आहे.जसे पानवाल्याला रोजच्या कस्टंबरची आवड बरोबर माहित असते तशीच त्याला तिखा जादा,मीठा जादा,रगडा पुरी,सुखा पुरी किंवा कोण किती प्लेट खाणार याची बरोबर माहिती असते.ज्याच्यात्याच्या आवडीप्रमाणे बरोबर पाणीपुरी बनवली जाते.एकावेळी चारसहा जणं जरी समोर असली तरी पुऱ्यांचा काउंट कधीच चुकत नाही.सहा म्हणजे सहा..कोणालाही ना जास्तीची पुरी मिळणार ना कमीची.तरीही प्रत्येकाला त्याच्या आवडीचीच मिळणार. हे करणे फक्त त्या भैयालाच जमू शकते. येऱ्या गबाळ्यांचे काम नाही.

पाणीपुरीची भ्रष्ट भावंडे आजकाल खूप बघायला मिळतात.एके ठिकाणी रबडी आणि सुका मेवा घातलेली पुरी पाहिली,कुठे चॉकलेट सॉस आणि चोकोचिप्सवाली पुरी होती. एका पार्टीत तर चकणा आणि कोणतेसे हार्ड ड्रिंक घातलेली पाणीपुरी पण नजरेस पडली…पहावे ते नवलच..
मला तर असावा सुंदर चॉकलेटचा बंगला या धर्तीवर

असावा सुंदर पुऱ्यांचा बंगला
कुरकुरीत चटपटीत चटकदार चांगला
पुऱ्यांच्या बंगल्याला रगड्याचे दार
शेवेच्या अंगणात कोथिंबीर छानदार

असा काहीसा बंगला आणि त्या बंगल्यासमोर तिखट आणि गोड पाण्याचे कारंजे असायला हवे असे फार वाटायचे.
काल आमच्या वाचककट्ट्यावर तिखट गोड पाण्याचे कारंजे आणि कारंज्याच्या धारेखाली पुरी धरणारी माणसे असा व्हिडिओ पाहिला आणि मला स्वप्नपूर्तीचा आनंद झाला…

आता इतके पाणीपुरी पुराण लिहिल्यानंतर साधारण चारपाच प्लेट पाणीपुरी तरी चापायलाच पाहिजे..

(आजपर्यंत मी पाणीपुरी न आवडणाऱ्या कोणालाही कधीच भेटले नाही.आहे का कोणी पाणीपुरी न आवडणारे??)

— समिधा गांधी

Avatar
About `आम्ही साहित्यिक' फेसबुक ग्रुप 247 Articles
आम्ही साहित्यिक या फेसग्रुप ग्रुपवरुन आलेले लिखाण. हा ग्रुप मराठीसृष्टीने बनवला आहे व त्यावरील निवडक साहित्य मराठीसृष्टीवर प्रकाशित केले जाते. मराठीतील हा एक लोकप्रिय आणि दर्जेदार साहित्यविषयक ग्रुप आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..