नवीन लेखन...

अमेरिकेतील वन्यप्राणी जीवन – भाग ५

The Wild-Life in America - Part 5

शिकारीचा सीझन आला की शिकार्‍यांच्या अंगात संचारतं. जवळ जवळ प्रत्येक घरी बंदुक ही असायचीच. मग तिची घासून पुसून साफसफाई करणं, काडतुसांची जमवाजमव करणं, शिकारीचं लायसन्स नव्याने करून घेणं, वगैरे गोष्टींची नुसती धांदल उडते. इथे बंदुका तर काय वॉलमार्टमधे देखील मिळतात. त्यामुळे कोणत्या प्रकारची बंदुक, कोणती काडतुसं, त्यांचा पल्ला, वगैरे गोष्टींची चर्चा कानावर यायला लागते. काही ठिकाणी तर हरणांच्या शिकारीच्या सीझनच्या पहिल्या दिवशी सुट्टी असते. लोक आपल्या मित्र मंडळींबरोबर एखादी मॅच खेळायला जावं, तशा उत्साहाने आपापल्या पिक-अप ट्रकमधे बसून शिकारीला निघतात. जंगलाच्या रंगसंगतीशी मिळत्या जुळत्या (camouflage) कपड्यांबरोबरच, शेंदरी रंगाची टोपी, गळ्यातला रुमाल किंवा जॅकेट घालणे बंधनकारक असते. कारण हा रंग चटकन नजरेत भरणारा. त्यामुळे करड्या, मातकट रंगाच्या रानाच्या पार्श्वभूमीवर, त्याच रंगाचे कपडे घालून शिकार करणारे ५०-१०० शिकारी आसमंतात फिरत असले, तर इतर शिकारी चटकन नजरेत भरावेत म्हणून ही काळजी. तरी देखील काही लोकं शिकारीच्या अपघातात जखमी होणं किंवा मृत्युमुखी पडणं ही दर वर्षी घडणारी गोष्ट. हरणांच्या शिकारीचा सीझन ऐन हिवाळ्यातला. गरम कपड्यात स्वत:ला लपेटून घेऊन, हाडं गोठवणार्‍या थंडीमधे, सुकलेल्या वाळलेल्या गवतातून आणि निष्पर्ण झाडांच्या जंगलातून हरणांचा माग काढत फिरण्याचा या लोकांचा उत्साह बघण्यासारखा असतो. त्यातून बर्फ पडलेलं असलं तर अधिक चांगलं, कारण बर्फावर उमटलेल्या हरणांच्या पाऊल खुणांवरून त्यांचा माग काढणं सोपं जातं.

आमच्या ऑफिसमधले बरेचजणं वेगवेगळ्या प्राण्यांच्या शिकारीचे शौकीन. त्यातही डॉक्टर पॉल म्हणजे खाण्यातलादेखिल दर्दी माणूस. दर सीझनमधे हरणांची शिकार करून, मारलेल्या हरणांना घरी घेऊन यायचं, गराजच्या दारामध्ये मोठा लोखंडी हुक लावून, त्याला एकेक हरिणाचं धूड टांगून ते सोलायचं, मांसाचे तुकडे करुन ते वाळवायचे वगैरे कामं तो मोठया आवडीने करतो. हरणांच्या वाळवलेल्या व खारवलेल्या मांसाच्या छोट्या छोट्या तुकड्यांनी भरलेल्या प्लॅस्टीकच्या बॅगा तो आपल्या घरच्या फ्रीझर मध्ये ठेवून देतो. इथे मिळणार्‍या beef jerkey सारखी ही deer jerkey. त्यामुळे, त्याच्याबरोबर, ऑफिसच्या कामानिमीत्ताने field wokला जायचे झाले की तो ही deer jerkey घेऊन येणारच आणि गाडीतल्या सगळ्यांना खायला घालणार.

एल्क म्हणजे हरणांची एक मोठी जात. नर खांद्यापाशी दीड मिटर उंच तर लांबीला अडीच मिटर लांब व साधारणपणे ३०० किलो वजनाचे असतात. माद्या आकाराने थोड्या लहान आणि वजनाला साधारण २२५ किलो भरतात. फक्त नरांनाच शिंग असतात आणि ती चांगली ४ फूट लांब आणि वजनाला १८ किलो एवढी जड असतात. दर वर्षी स्प्रिंग सीझनमधे नरांना नवीन शिंग फुटायला लागतात. फॉल सीझन संपता संपता यांची माजावर येण्याची वेळ येते. त्यावेळेस या मोठ्या ऐटदार शिंगांचा उपयोग इतर नरांना आव्हान देण्यासाठी तसेच झुंजीसाठी होतो. ब्रीडींग सीझन संपला की नरांची शिंगे गळून पडतात आणि ते पुनश्च एकेकटे फिरू लागतात तर माद्या कळप करून रहातात. माद्यांच्या या कळपात साधारणपणे ५० पर्यंत माद्या असतात. लांडगे आणि कायोटीचे कळप किंवा एकांडा माउंटन लायन हे यांचे प्रमुख शत्रू. कधी कधी काळी अस्वलं देखील एल्कच्या पिल्लांना मारून टाकतात. माद्यांचे कळप आपल्या कळपातल्या वासरांचं संरक्षण करण्यासाठी जिवाचा आटापिटा करतात. एल्क हे सर्वसाधारणपणे जंगलात किंवा जंगलाच्या कडेवर गवत झाडपाला, झाडांच्या बुंध्यांच्या साली वगैरे खाऊन रहातात. आज एल्कची संख्या १० लाखांच्या आसपास आहे.

हरणाच्या जातीचा आणखी एक मोठा प्राणी म्हणजे मूस. हे कॅनडा, अलास्का, न्यू इंग्लंड, अपस्टेट न्यूयॉर्क, मिनेसोटा, मिशीगनच्या उत्तरेकडचा भाग, रॉकी पर्वतराजीच्या उत्तरेकडच्या राज्यांमधला भाग, अशा उत्तरेकडच्या थंड प्रदेशात आढळतात. नर जवळ जवळ ६ फूट उंच आणि ४०० ते ५०० किलो वजनाचे असतात. तर माद्या साधारणपणे ३००-३५० किलो वजनाच्या असतात. मूसची शिंगं पंजासारखी पसरट असतात. सप्टेंबर ऑक्टोबरमधे यांचा माजावर येण्याचा काळ असतो. या काळात मुस आक्रमक बनतात आणि माणसांवर देखील हल्ले चढवतात. ब्रीडींग सीझन संपल्यावर नरांची शिंग गळून पडतात आणि स्प्रिंग सीझन सुरू झाला की पुन्हा उगवायला लागतात. शिंगांची वाढ फार झपाट्याने होते आणि तीन चार महिन्यातच शिंगे चांगली ४-५ फूट येवढी पसरतात. मूस सहसा एकटेच असतात. बछड्याचा जन्म झाला की ते मादी समवेत असते. पुढच्या बछड्याच्या जन्मापर्यंत मादी आपल्या आधीच्या बछड्याची काळजी घेत असते. उत्तरेकडच्या या राज्यांमधे, आपलं मोठ्ठं बेंगरुळ शरीर, लांबोडक्या काटकुळ्या पायांवर सांभाळत, रस्ते ओलांडण्याचा प्रयत्न करणार्‍या मूस मुळे गाड्यांचे होणारे अपघात, ही एक मोठीच डोकेदुखी आहे.

क्रमशः …. 

— डॉ. संजीव चौबळ 

डॉ. संजीव चौबळ
About डॉ. संजीव चौबळ 84 Articles
मुंबई पशुवैद्यक महाविद्यालयातून पशुप्रजनन विषयात पदव्युत्तर शिक्षण (१९८६) घेतल्यावर भारतातील विविध संस्थांमधे सुमारे १४ वर्षे काम. २००१ साली युनिवर्सिटी ऑफ कनेक्टीकटमधे डॉक्टर जेरी यॅंग या “क्लोनिंग”च्या क्षेत्रातील नावाजलेल्या संशोधकाच्या मार्गदर्शनाखाली पीएच.डी. करण्यासाठी अमेरिकेत दाखल. गेली पंधरा वर्षे अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी व त्यानंतर नोकरीनिमित्ताने वास्तव्य. अमेरिकेतील उत्तम दर्जाच्या गायींमधे भृणप्रत्यारोपण (EmEmbryo Transfer Technology) तसेच टेस्ट टयुब बेबीज (In Vitro Fertilization) या क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांमधे संशोधन तसेच उत्पादनात जबाबदारीच्या पदांवर काम. आपल्या क्षेत्रातील नावाजलेल्या शास्त्रीय जर्नल्समधे व विविध राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय परिषदांमधे सुमारे २५ शोधनिबंध सादर. अमेरिकेतले वास्तव्य तसेच कामानिमित्ताने प्रवास मुख्यत्वे ग्रामीण/निमग्रामीण भागात झाल्यामुळे, अमेरिकेच्या एका सर्वस्वी वेगळ्या व अनोळखी अंगाचे जवळून दर्शन. सर्वसाधारण भारतीयांच्या अमेरिकेबद्दलच्या अतिप्रगत, अत्याधुनिक, चंगळवादी कल्पनाचित्राला छेद देणारे, अमेरिकेच्या ग्रामीण अंतरंगाचे हे चित्रण, “गावाकडची अमेरिका” या पुस्तकाद्वारे केले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..