नवीन लेखन...

एकविसाव्‍या शतकातील मातृभाषेचे स्‍थान : भाग ३

भाग-३

 नव्‍या प्रक्रिया, नवे प्रवाह –

एकविसाव्‍या शतकाच्‍या उंबरठ्यावर उभे असतांना, जगांतील नव्‍या प्रवाहांचा विचार, व त्‍या अनुषंगानें भाषेचा विचार, आवश्‍यक ठरतो.

आज जागतिकीकरणाच्‍या (globalization) प्रक्रियेला वेग आला आहे. इलेक्‍ट्रॉनिक्‍समुळे दळणवळण व संदेशवहन अतिशय सोपं झालं आहे. संगणक आदेशावली (computer software)च्‍या आश्चर्यकारक प्रगतीमुळे इंग्रजी भाषेचा प्रसार वाढला आहे.

त्‍यामुळे, एक वैश्विक संस्‍कृती निर्माण होईल, इंग्रजी ही वैश्विक भाषा होईल, अशी भीती आमचे विचारवंत व्‍यक्‍त करत असतात.

आमची गोष्‍ट एकवेळ बाजूला ठेवूं. पण फ्रेंच, रशियन, जर्मन, जपानी वगैरे लोक इंग्रजीला वैश्विक भाषेचं स्‍थान द्यायला व स्‍वतःच्‍या मातृभाषेला विसरायला तयार होतील कां? तर मग आम्‍ही असा विचार – अशी शक्‍यताही – मनांत आणायचं काय कारण?

एक गोष्‍ट आम्‍ही ध्‍यानात घेत नाहीं, अन् ती ही की भारताचा एकएक प्रांत युरोपातल्‍या एकएक देशाएवढा आहे. युरोपात एखादी भाषा जेवढ्या लोकांची मातृभाषा आहे, तेवढ्याच, किंवा संख्‍येने त्‍याहून अधिक लोकांची कुठलीही एक भारतीय भाषा ही मातृभाषा आहे.

तेव्‍हां एक गोष्‍ट स्‍पष्‍ट आहे, की हा संख्‍येचा प्रश्न नाहींच. हा प्रश्न आहे विश्वासाचा. आम्‍हाला इंग्रजीची भीती वाटते कारण आमचा स्‍वतःवर विश्वास नाहीं, आपल्‍या संस्‍कृतीच्‍या दीर्घायुष्‍यावर विश्वास नाहीं, आपल्‍या भाषेच्‍या लवचिकपणावर विश्वास नाहीं.

वैश्विक भाषा ही फक्‍त एक हवीहवीशी वाटणारी मनोरम कल्‍पना आहे , ‘युटोपिया’ आहे, एक स्‍वप्‍न आहे. निकट भविष्‍यात तरी कुठलीही एक भाषा वैश्विक मातृभाषा बनेल असा संभव दिसत नाहीं. आणि तेंच चांगलं आहे. जगात एकच भाषा असली तर सगळं एकसुरी, कंटाळवाणं, monotonous होईल. वैविध्‍य आहे, त्‍यामुळे वेगळेपणा आहे, आणि त्‍यामुळेच विकासाला विविध दिशांना संधी आहे.

नव्‍या प्रवाहांचा विचार करतांना आणखी एका प्रक्रियेचा विचार करायला हवा. जगात जशी एका बाजूला व्‍यापारउद्योगांमध्‍ये जागतिकीरणाची प्रक्रिया सुरुं आहे, तशीच राजकीय क्षेत्रात, मोठ्या देशांच्‍या विघटनाची व लहान लहान नवीन देश निर्माण होण्‍याची प्रक्रिया सुरुं आहे. यू.एस्.एस्.आर., झेकोस्‍लोव्‍हाकिया, युगोस्‍लाव्हिया ही त्‍याची कांहीं उदाहरणं. या विघटनाची कारणं केवळ राजकीय नाहींत, तर ती सांस्‍कृतिक, भाषिक, आणि धार्मिक आहेत, ती भिन्नभिन्न जनसमुदायांच्‍या अस्मितांशी संबंधित आहेत.

ह्या एकमेकांविरुद्ध दिशेला जाणार्‍या प्रक्रियांचा अर्थ एकच. जागतिकीकरणाचा अर्थ, वैश्विक साम्राज्‍य, वैश्विक संस्‍कृती, वैश्विक भाषा असा नसेल. स्‍वतःची संस्‍कृती, भाषा, वेगळेपण, अस्मिता व अस्तित्‍व टिकवून इतर जगाशी संबंध राखणारं, युती साधणारं असं हें नवं युग असेल.

पूर्वी जें घडत आलेलं आहे, तसच पुढेही घडणार आहे. आपण दोन पातळ्यांवर जगतो – बौद्धिक व भावनिक. आपण दोन भूमिका निभावतो – एक आपल्‍या उद्योगधंद्यातील व दुसरी त्‍याव्‍यतिरिक्‍त इतर व्‍यवहारातली. आणि हें जसं द्वैत राहणार आहे, तसंच द्वैत भाषांच्‍याही बाबतीत राहणार आहे – एक असेल इंग्रजी किंवा अन्‍य एखादी दुवा-भाषा (संपर्क भाषा) व दुसरी आपली स्‍वतःची मातृभाषा.
**

(पुढे चालू)

— सुभाष स. नाईक

सुभाष नाईक
About सुभाष नाईक 283 Articles
४४ वर्षांहून अधिक अनुभव असलेले सीनियर-कॉर्पोरेट-मॅनेजर (आतां रिटायर्ड). गेली बरीच वर्षें हिंदी/हिंदुस्थानी, मराठी व इंग्रजी या भाषांमध्ये गद्य-पद्य लिखाण करत आहेत. त्यांची ९ पुस्तकें प्रसिद्ध झाली आहेत. पैकी ६ ‘पर्यावरण व प्रदूषण’ या विषयावरील इंग्रजी न हिंदी कवितांची पुस्तकें आहेत. दोन पुस्तकें , ‘रामरक्षा’ व ‘गणपति-अथर्वशीर्ष’ या संस्कृत स्तोत्रांची मराठी पद्यभाषांतरें आहेत. अन्य एक पुस्तक ‘मृत्यू आणि गत-सुहृद ’ हा विषयाशी संल्लग्न बहुभाषिक काव्याचें आहे. गदिमा यांच्या ‘गीत रामायणा’चें हिंदीत भाषांतर. बच्चन यांच्या ‘मधुशालचें मराठीत भाषांतर केलेलें आहे व तें नियतकालिकात सीरियलाइझ झालेलं आहे. टीव्ही वर एका हिंदी सिट-कॉम चें स्क्रिप्ट व अन्य एका हिंदी सीरियलमधील गीतें व काव्य लिहिलेलें आहे. कत्थक च्या एका कार्यक्रमासाठी निवेदनाचें हिंदी स्किप्ट लिहिलें आहे. अनेक मराठी व हिंदी पब्लिकेशब्समध्ये गद्य-पद्य लेखन प्रसिद्ध झालें आहे, जसें की, महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, सत्यकथा, स्वराज्य, केसरी, नवल, धर्मभास्कर, धर्मयुग, धर्मभास्कर, साहित्य अकादेमी चें हिंदी जर्नल ‘समकालीन भारतीत साहित्य’ , मराठी अकादेमी बडोदा चॅप्टर चें मराठी जर्नल ‘संवाद’, तसेंच प्रोफेशनल सोसायटीचें इंग्रजी जर्नल यांत लेखन प्रसिद्ध झालेलें आहे.मराठी , हिंदी व इंग्लिश वेबसाईटस् वर नियमित गद्य-पद्य लेखन. कांहीं ई-बुक सुद्धा प्रसिद्ध.
Contact: Website

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..