नवीन लेखन...

डभईची लढाई (भाग एक)

प्रस्तावना :

बडोद्याच्या इतिहासात डभोईच्या युद्धाला एक खास महत्व आहे. हें युद्ध इ.स. १ एप्रिल १७३१ ला, म्हणजे २८० वर्षांपूर्वी लढलें गेलें. बडोद्याच्या ५०० वर्षांच्या कालखंडाच्या साधारण मध्यावरील हें युद्ध आहे.

या युद्धाविषयीचे संदर्भ व घटनाक्रम यांसाठी मी ज्या संदर्भग्रंथांचा आधार घेतला आहे, त्यांतील मुख्य आहे रियासतकार गो.स.सरदेसाई यांचा ग्रंथ ‘मराठी रियासत’. रियासतकार १८८९ ते १९२५ या काळात सयाजीराव महाराजांच्या सेवेत होते. त्यांनी त्यांच्या रियासतीचे सुरुवातीचे खंड बडोद्याला असतांनाच लिहिले. याचा अर्थ असा की, केवळ या युद्धाचाच नव्हे, तर या लेखासाठी वापरलेल्या प्रमुख संदर्भग्रंथाचाही बडोद्याशी घनिष्ठ संबंध आहे.


भाग एक

डभई युद्धाची प्राथमिक माहिती :

साधारणत, शत्रू असलेल्या दोन राजांमध्ये किंवा अशा राजांच्या सरदारांमध्ये लढाया होत असत. पण डभईच्या या लढाईबद्दलची आश्चर्याची गोष्ट अशी आहे की, ही लढाई छत्रपती शाहूच्या दोन सरदारांमध्येच, म्हणजे, पहिला बाजीराव पेशवा व सेनापति त्रिंबकराव दाभाडे यांच्यात झाली, आणि तिच्यात त्रिंबकराव दाभाडे याचा मृत्यु झाला. (सर्व व्यक्तींचा केलेला एकेरी उल्लेख हा केवळ लेखनाच्या सोयीसाठीच आहे, कोणांहीविषयी अनादरानें नाहीं, हें ध्यानीं घ्यावे). शाहूचे दोन मुख्य सरदार असे प्रतिस्पर्धी कां झाले, त्यांच्यात अशी अटीतटीची लढाई कां झाली, हें जाणून घेणें महत्वाचें ठरेल.

कुठल्याही युद्धाला कांहीं तात्कालिक कारणें असतात, तर कांहीं पूर्वपीठिकाही असते, दूरगामी परिणाम करणारी ऐतिहासिक कारणें असतात. म्हणून, डभईच्या १७३१ च्या युद्धाचा विचार करतांना, आपल्याला १६८९ पर्यंत, म्हणजेंच ४२ वषें, मागे जावें लागतें.

पूर्वपीठिका :

शिवाजी महाराजांचा मृत्यू १६८० मध्ये झाला व संभाजी छत्रपती झाला. १६८१-१६८२ मध्ये औरंगजेब स्वत दक्षिणेत उतरला. संभाजीनें मुघलांशी कसून लढा दिला. परंतु औरंगजेबाचा सरदार शेख निजाम यानें कमांडो पद्धतीचा छापा घातला, आणि फितुरीमुळे संभाजी संगमेश्वरजवळ १ फेब्रुवारी १६८९ ला पकडला गेला. पुढे ११ मार्च १६८९ ला औरंगजेबाने त्याचा वध केला. त्या वेळी संभाजी ३२ वर्षांचा होता.

संभाजीला पकडलें तेव्हां १९ वषें वयाचा राजाराम रायगडावर कैदेत होता. त्याला सोडण्यांत आलें. त्यानें ९ फेब्रुवारी १६८९ ला राज्यारोहण केलें, मुघलांना चुकवत तो रायगडावरून उतरला व सप्टेंबर (१६८९) मध्यें त्यानें जिंजीला प्रयाण केलें. इकडे मार्च १६८९ मध्ये मुघलांनी रायगड घेतला आणि २५ वर्षांची येसूबाई व ७ वर्षांचा बालक शाहू यांना कैद केलें.

औरंगजेबानें १६८६ मध्ये आदिलशाही तर १६८७ मध्यें कुतुबशाही संपुष्टात आणली. संभाजीच्या वधानंतर आपण मराठ्यांचें राज्यही असेंच संपवूं असें औरंगजेबाला वाटलें होतें. पण शिवाजीनें जागवलेली स्वातंत्र्यज्योत मराठ्यांच्या हृदयात तेवत होती, व ते मुघलांशी वर्षानुवर्षे लढत राहिले. यश न मिळतांच औरंगजेब २० फेब्रुवारी १७०७ मध्ये अहमदनगर येथें मरण पावला.

मरणोपरान्त औरंगजेबी धोरण फळाला आलें, शिवनीति हरली?

शिवाजी महाराजांची महती अशी की, त्यांच्या मृत्यूनंतर २७ वर्षे औरंगजेब मराठ्यांना नमवूं शकला नाहीं . पण जें त्याला जिवंत असतांना जमलें नाहीं, ते त्यांच्या मृत्यूनंतर फळाला आलें.

१६८९ मध्यें येसूबाई व शाहूला कैद केल्यावर औरंगजेबानें त्यांना मारलें नाहीं, तर कैदेतच ठेवलें. शत्रूच्या पोराला त्यानें कां बरें ठार केलें नाहीं ? याचें कारण म्हणजें, औरंगजेबानें शाहूला एक मोहरा म्हणून बाळगलें. खरें तर, मराठ्यांच्या बाबतीत तो औरंगजेबाचा हुकुमाचा एक्का होता. योग्य वेळीं त्याला सोडून द्यावें आणि मराठ्यांमध्यें फूट पाडावी ; असा औरंगजेबाचा डाव होता. मराठ्यांच्या मूल्यमापनाचें औरंगजेबाचें वाक्य असें आहे – ‘. . येथें दुहीचें बीज खडकावर टाकलें तरी त्याला अंकुर धरतो’.

शाहू मराठ्यांचा राजा बनला तरी मुघलांचा ताबेदार बनून राहील, असा औरंगजेबाचा होरा होता. (आणि, तसें वचनही शाहूनें औरंगजेबाला दिलेले होतें. त्याचा उल्लेख पुढे आलेला आहे.) औरंगजेबाच्या मृत्यूच्या आधी तीनचार वर्षे मुघलांनी मराठ्यांशी दीर्घकाळ रेंगाळलेलें युद्ध मिटवण्यांची शिकस्त चालवली होती. १७०३ मध्ये औरंगजेबाचा मुलगा कामरान यानें मराठ्यांशी तडजोड करायचा प्रयत्न केला व औरंगजेबाने त्या प्रयत्नांकडे काणाडोळा केला, तो थांबवला नाहीं. १७०३ मध्येच, शिवाजी महाराजांचे बंधू तंजावरचे व्यंकोजी राजे यांचा मुलगा रायभान भोसले याचा मुघलांनी मध्यस्थीसाठी उपयोग केला. ( मराठ्यांनाही समेट झाला तर हवा होता ). परंतु हे प्रयत्न यशस्वी झाले नाहींत.

१७०५ पासून, झुल्फिकारखान मराठ्यांचे किल्ले धेत असतांना, शाहू त्याच्या बरोबरच होता. या काळात औरंगजेबानें, शाहूला मोकळा करून झुल्फिकारखान व धनाजी जाधवाच्या मार्फत परत पाठवून युद्ध मिटवण्याचे व मराठ्यांच्या एकीला छेद द्यायचे जोराचे प्रयत्न चालवले होते. ती गोष्ट अखेरीस त्याच्या मृत्यूनंतर साध्य झाली.

औरंगजेब मेल्यावर, ५ मार्च १७०७ ला त्याचा द्वितीय पुत्र आजमशहा यानें स्वतला बादशहा म्हणून घोषित केलें, व तो दक्षिणेतून दिल्लीकडे निघाला. शाहू त्याच्या ताब्यात होता. १३ मार्च (१७०७) ला झुल्फिकारखानानें बुऱहाणपुर येथें आजमशहाशी शाहूची मुलाजमत करविली. शाहूशी आजमशहाचा तोंडी करार होऊन नंतर शाहू कैदेतून सुटून महाराष्टा^त परत निघाला. हा करार तोंडी असल्याकारणानें, शाहूनें नक्कीच बेलभंडारा उचलून शपथ घेतली असावी.

बादशहाबरोबर झालेला शाहूचा तो करार असा – ‘शाहूनें बादशाही ताबेदारीत राहून दक्षिणचें राज्य करावें, प्रसंग पडेल तेव्हां बादशहाची कुमक व सेवा करावी. मातुश्री (येसूबाई) व मदनसिंह (संभाजीचा दासीपुत्र) वगैरे कबिले ओलीस दाखल बादशहाजवळ ठेवावे. चौथाई सरदेशमुखीचे हक्क दक्षिणच्या सहा सुभ्यांतून वसूल करावे; त्यांच्या सनदा मागाहून तयार करून पाठविण्यांत येतील.’ (पुढे या सनदा बाळाजी विश्वनाथानें १७१९ मध्ये दिल्लीहून आणल्या, आणि त्यावेळी येसूबाई वगैरेंचीही सुटका झाली).

शाहूनें केलेल्या करारानंतर दोन-तीन महिन्यांतच आजमशहा मारला गेला. पुढील दशकांमध्ये दिल्लीत वेगवेगळे बादशहा आले-गेले. पण शाहूनें आपली शपथ आजन्म पाळली व (डिसेंबर १७४९ मध्ये) त्याचा मृत्यु होईतों त्यानें दिल्ली पातशाहीशी आपली निष्ठा कायम ठेवली. (औरंगजेबाच्या म्त्यूच्या अगदी २२ वर्षांनंतर सुद्धा, १३३९ मधील नादिरशहाच्या दिल्लीवरील स्वारीच्या वेळी, शाहू आपल्या पत्रात बाजीरावास असें म्हणतो – ‘तुम्ही ताबडतोब मजल दरमजल बादशहाचे कुमकेस जावे. आमचें वचन औरंगजेब पातशहापाशी गुंतलें आहे की परचक्र आलें तर आम्ही कुमक करावी’. यावरून शाहूची दिल्लीशी कायम असलेली निष्ठा अगदी स्पष्ट होते.) ‘फ्राण जाहिं पर वचन न जाहिं ’ हा सद्गुण खरा, पण अशा प्रकारें आपलें वचन शाहूनें जन्मभर पाळत राहणें म्हणजे अगदी अतिरेकच झाला! ).

मार्च १७०७ मध्ये बादशहाच्या कैदेतून सुटल्यावर दक्षिणेत आल्यावर शाहूनें प्रथम खुल्ताबादला जाऊन औरंगजेबाच्या कबरीला वंदन केलें. नंतर अहमदनगर येथें आल्यावर शाहूनें आपली काकू ताराबाई हिला कळवलें – ‘आम्ही स्वदेशीं परत येत आहो, आतां आम्ही राज्य करूं, बादशाही आज्ञाही तशीच आहे.’ ताराबाईचें म्हणणें होतें की, शिवाजी महाराजांनी कमावलेलें राज्य संभाजीनें घालवलें ; तें फिरून राजारामानें निर्माण केलें, म्हणून त्यावर आतां शाहूचा हक्क नसून आपल्या पुत्राचा आहे. (त्या वेळीं शाहूचें वय २५ वर्षांचें होते, तर ताराबाईचें ३२ होतें. शिवाजी नांवाचा तिचा पुत्र त्या वेळीं ११ वर्षांचा होता, म्हणून कारभार ताराबाईच करत होती.)

१६८९ ते १७०० अशी ११ वर्षें राजारामाला साथ देत ताराबाई मुघलाशी झुंजत होती. राजारामाच्या मृत्यूच्या वेळी ती अवघी २५ वर्षांची होती. त्यानंतरही ७ वर्षें, अशी १८ वर्षें ताराबाई सतत मुघलांशी झुंजत होती. तेव्हां तिचें म्हणणें एका अर्थीं बरोबरच होतें. शाहूला अर्थातच तें मान्य नव्हतें. त्यामुळें शाहू व ताराबाई यांच्यात ऑक्टोबर १७०७ मध्ये भीमा नदीच्या तीरावर खेड येथें युद्ध झालें. बरेचसे जुने सरदार मागील काळापासून ताराबाईच्या बाजूनें होते, तर काहींना थोरली पाती म्हणून शाहूची बाजू न्याय्य वाटत होती. त्यामुळे सरदार मंडळी विभागली गेलेली होती.

खेडच्या युद्धात शाहूचा विजय झाला. ताराबाई स्वत युद्धात हजर नव्हती, तिचा आपल्या सेनानींवर भरंवसा होता. सेनापति धनाजी जाधव आणि परशुराम त्रिंबक प्रतिनिधी हे ताराबाईच्या वतीनें लढत होते. शाहूचा विजय हा धनाजी, खंडो बल्लाळ चिटणीस, बाळाजी विश्वनाथ भट, नारो राम व पुरंदरे , यांच्या कारस्थानाद्वारें झाला होता. (कदाचित् त्यांना शाहूचा गादीवरील अधिकार अधिक योग्य वाटला असेल, किंवा शाहूची बाजू घेतल्यामुळे आपले अधिक भलें होईल असें त्याना वाटलें असेल). लढाईपूर्वीं खंडो बल्लाळानें शाहूची गुफ्त भेट घेतली व धनाजी शाहूच्या पक्षात येण्यांस तयार असल्याचें कळवलें. कपट-युद्ध झालें, परशुरामपंत प्रतिनिधी हरले व पळून गेले. (याच मदतीची जाण ठेवून शाहूनें खंडो बल्लाळाला चिटणीस नेमलें, धनाजीला आपला सेनापति नेमलें व १७०८ मधील धनाजीच्या मृत्यूनंतर त्याचा पुत्र चंद्रसेन याला सेनापति नेमलें. शाहूनें आयुष्यभर खंडो बल्लाळ ब बाळाजी विश्वनाथाच्या घराण्यांवर आपली कृपादृष्टी ठेवली. पुढे बाळाजी विश्वनाथाला त्यानें आपला पेशवा केलें. त्यावेळींच, आपण तुझ्या घराण्याला पेशवेपद वंशपरंपरेनें देऊं असें शाहूनें त्याला कबूल केलें असावें. कालावधीनंतर, स्वतच्या मृत्यूच्या काहीं काळ आधी, नानासाहेब पेशवा असतांना, भट घराण्यात पेशवाई वंशपरंपरेनें राहील असें शाहूनें स्वहस्ते लेखी जाहीरच केलें ).

खेडची लढाई जिंकल्यावर अल्प काळातच शाहूनें साताऱयावर कब्जा केला. तेथें १७०८ मध्यें शाहूचा छत्रपती म्हणून राज्याभिषेक झाला. कोल्हापूर गादीची उभारणी १७१४ मध्यें झाली. (परंतु लवकरच, १७१४ मध्येंच, ताराबाईला कैदेत पडावें लागलें . ती व तिचा पुत्र शिवाजी यांना बंदीवास मिळून, राजारामाची दुसरी पत्नी राजसबाई व तिचा पुत्र संभाजी यांच्या हातीं मुखत्यारी गेली. पण तिच्या कैदेमुळे, साताऱयाबरोबरचें त्या पक्षाचें राजकारण मात्र थांबलें नाहीं . ताराबाई १७३० पर्यंत संभाजीच्या, तर पुढे १७४९ पर्यंत शाहूच्या कैदेत होती. ‘हेंचि फळ काय मम तपाला’ असें म्हणून तिनें कपाळावर हात मारून घेतला असेल !). १७०७ पासून शाहू आणि ताराबाई /कोल्हापुर गादी असे दोन तट पडले होते व सरदार मंडळींनी या दुहीचा भरपूर फायदा धेतला. कांही पुरुष ताराबाईच्या पक्षात राहिले, तर त्यांचेच भाऊबंद शाहूनें हाताशी धरले.

सरदारांच्या संदर्भात सरंजामशाही किंवा वतनदारी हा महत्वाचा घटकसुद्धा समजून घ्यायला हवा. शिवाजी महाराजांनी विचारपूर्वक असा निर्णय गेतला होता की राज्याच्या नोकऱया लायकी बघून ठरवाव्यात, वतनें व नोकऱया वंशपरंपरेनें असूं नयेत. पण नंतरच्या परिस्थितीमुळे हा दंडक बदलणें राजारामाला भाग पडलें. महाराष्ट्रावर मुघलांचें आक्रमण झालेलें होतें, व स्वत राजारामाला जिंजीला स्थलांतर करावें लागलें होते. महाराष्ट्र व कर्नाटकात मराठे मुघलांशी लढत होते. त्यांना देण्यासाठी राजारामाकडे होतेंच काय? म्हणून त्यानें वतनांच्या प्रथेचें पुनरुज्जीवन केलें. त्यानें दिलेल्या वतनांचा मुलुख होता मुघलांच्या ताब्यात. मुघलांना हुसकावून तो भाग स्वतच्या ताब्यात ठेवला, तरच वतनदाराला त्याचा उपयोग! (राजारामानें १६९१ च्या हणमंतराव घोरपडे यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलेलें आहे की सहा लक्ष होन सरंजाम करून द्यावयाचा निश्चय केलेला आहे ; तसेंच, कुठलें ठिकाण घेतल्यास किती होन देऊं याची सविस्तर नोंद त्या पत्रात आहे, व अगदी रायगडापासून ते विजापुर, औरंगाबाद, दिल्लीचाही तेथें उल्लेख केलेला आहे. यांतील कुठलेंही ठिकाण त्या वेळीं मराठ्यांच्या ताब्यात नव्हतें!). ही गोष्ट स्पष्ट आहे की, त्या परिस्थितीत राजारामाचा मार्ग योग्यच होता ; त्याबद्दल त्याला दोष देतां येत नाहीं. परंतु, त्या धोरणामुळें सत्तेचे विकेंद्रीकरण झालें, व त्यामुळे पुढील काळात मराठेशाहीचें नुकसान झालें, हें सुद्धां ध्यानात ठेवणें आवश्यक आहें.

राजारामाच्या म्त्यूनंतर ताराबाईलाही सरंजामशाहीची प्रथा चालू ठेवावी लागली. ताराबाई करारी व तडफदार होती. राजारामाच्या वेळी सरदारांना बरेचसें कृतिस्वातंत्र्य होतें. ताराबाईनें सरंजाम चालू ठेवले होते, तरी राज्यकारभारात तिनें सत्तेचे केंद्रीकरण करणें सुरूं केलें होतें. पण शाहूच्या आगमनामुळे चित्रच पालटलें. सरदारांनाही, शाहू आपलें वतन पुढे चालू ठेवेल, असा भरंवसा वाटत होता. ताराबाई व शाहू यांच्यांमधील वितुष्टामुळे, शाहूलाही वतनांची प्रथा चालू ठेवण्यावाचून गत्यंतर नव्हतें. नाहींतर वतनदार सरदार त्याव्या बाजूला आलेच नसते. त्यानें भराभर सरदारांना तशी वचनें दिली. सरदारही आपल्या स्वार्थावर नजर ठेवून आपापली वतनें दोन्ही बाजूंकडून बळकट करून घेत.

मुघलांकडील जहागिरी दोन तऱहेच्या असत. एक म्हणजे ‘मन्सब’ (ज्याला मराठे-रजपूतादि ‘वतन’ असें म्हणत). मन्सब म्हणजे, आपल्या पूर्वजांकडून आपल्याकडे चालत आलेली आणि जी पुढे आपल्या वंशजांकडे चालू राहील, (अथवा, आपल्याला स्वतला नवीन प्राफ्त झालेली असल्यास जी पुढे आपल्या वंशजांकडे चालू राहील), अशी जहागीर. तथापि, मुघलांकडील मन्सब पुढे चालू रहाण्यासाठी बादशहाची मान्यता घ्यावी लागे. दुसऱया तऱहेची जहागीर म्हणजे,

‘तनखा-जहागीर’, जी केवळ एखाद्या विशिष्ट पदाचा खर्च भागवण्यासाठी त्या विशिष्ट काळापुरती दिलेली असे, (आणि तें पद गेल्यावर ती तनखा-जहागीरही परत घेतली जाई ). जहागिरी/वतनें आणि पदें वंशपरंपरागत देण्याकडे शाहूचा कल होता. पहिली गोष्ट म्हणजे, जहागीर किंवा पद टिकते किवा नाहीं अशी अनिश्चितता असल्यास सरदार आपले यत्न झटून करणार नाहीत, म्हणून त्यांना वंशपरंपरेचें आमिष देणें भाग पडलें. दुसरी, आणि महत्वाची, गोष्ट म्हणजे, वंशपरंपरेचा दंडकच स्वतला लावून शाहूनें मराठ्यांच्या राज्यावर आपला अधिकार सांगितला होता, आणि छत्रपतीपद मिळवलेंही होतें. त्यामुळें, इतरांच्याही बाबतीत तोच दंडक स्वीकारणें शाहूला भाग पडलें.

सरदार आपली बाजू सोडून जातील अशी शाहूला सतत भीती वाटत असे आणि म्हणून त्याला, आगळीक करणाऱया सरदारांना चुचकारत रहावें लागलें. स्वार्थापोटी सरदार पक्षही बदलत. धनाजीचा मुलगा सेनापति चंद्रसेन जाधव (ज्यानें कोल्हापुर गादी व निजामाशी हातमिळवणी केली), चिमणाजी दामोदर (जो नंतर शाहूचा पक्ष सोडून कोल्हापुर गादीचा पेशवा झाला), ही अशा मातबरांची कांहीं उदाहरणें. (निजामानेंसुद्धा याचा फायदा घेऊन, वेळोवेळी शाहूच्या विरुद्ध कोल्हापुरच्या संभाजीची बाजू उचलून धरली होती व सरदारांना फोडलें होतें).

वेगवेगळे सरदार पुन्हांपुन्हां पक्ष कां बदलत राहिले, याला केवळ स्वार्थ एवढेंच कारण नाहीं. आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे, त्यांचा संभ्रम. एकीकडे, शाहू हा शिवाजीच्या मोठ्या पुत्राचा पुत्र, म्हणून त्याचा गादीवर अधिकार आहे, असें कांहींना वाटत होतें ; तसेंच संभाजीचें हौतात्म्य च शाहूच्या वाट्याला आलेली दीर्घकालीन कैद, यामुळे त्यांना शाहूबद्दल सहानुभूती होती. कांहींना राजाराम-ताराबाईनें चालविलेलें स्वातंत्र्ययुद्ध म्हणजे शिवाजीचा वारसा वाटत होता ; आणि शाहू मुघलांचा मन्सबदार म्हणून राज्य करण्यांस आला हें त्यांना आवडलें नाहीं. अशा दोन विरुद्ध विचारधारांमुळे, बरेचसे सरदार, काय बरोबर व काय चूक, अशा द्विधा मनस्थितीत होते. एखाद्या सरदारानें दुसऱयाला आपली बाजू पटवून दिली की तो दुसरा सरदार स्वतचा पक्ष बदलत असे.

अशा प्रकारें, संभ्रम, द्विधा मनस्थिती, तसेंच, गटबाजी, मानापमान, वतनांचें आमिष या सर्व कारणांमुळे मराठेशाहीत दुफळी माजली. अशी दुही माजवण्याचा औरंगजेबाचा हेतू सफल झाला व शिवाजी महाराजांनी कृतीतून साध्य केलेलें (आणि त्यांच्या मृत्यूनंतरही २७ वर्षें अबाधित राहिलेलें), ‘मराठा तितुका मेळवावा’ हें तंत्र बाजूला पडलें, ही दुर्भाग्याची गोष्ट आहे.

शिवाजी महाराज ‘हिंदवी स्वराज्य’ या ध्येयासाठी लढले. हिंदवी म्हणजे हिंदचें. (जसें, महमूद गझनवी म्हणजे गझनीचा, लखनवी कुडता म्हणजे लखनऊचा, शायर ‘दाग’ देहलवी म्हणजे दिल्लीचा. अमीर खुसरोच्या काळीं भारतीय भाषांना हिंदवी जबान असें म्हणत असत). हिंदवी स्वराज्य याचा अर्थ असा की, भारतीय प्रदेशावर भारतीयांचें राज्य असायला हवें, परकीयांचें नव्हे. याउलट, शाहूनें मुघलांची मन्सबदारी पत्करली, तो शिवप्रभू व स्वत;चा पिता संभाजी यांचें ब्रीद विसरला, हा दैवदुर्विलासच नाहीं काय? (इतिहासाचार्य राजवाडे यांनी स्पष्ट म्हटलें आहे की, ‘मराठ्यांचें साम्राज्य दिल्लीपतीची सेवा करतां करतांच वाढलें’).

या मन्सबदारीच्या अनुषंगानेंच बाळाजी विश्वनाथानें दिल्लीहून चौथाई-सरदेशमुखीच्या सनदा आणल्या. पुढे, मराठे वाढत्या मुलुखांच्या चौथाईचे करार मुघलांशी करत गेले ; अन् त्या चौथाईच्या वसुलीसाठी राजकारण व लढाया करणें मराठ्यांना भाग पडलें, आणि त्याचे बरेवाईट परिणाम नंतरच्या काळात दिसून आले.

वरील सगळ्या गोष्टींची पार्श्वभूमी डभईच्या लढाईला आहे, हें ध्यानात घेणें आवश्यक आहे.

— सुभाष नाईक.

सुभाष नाईक
About सुभाष नाईक 297 Articles
४४ वर्षांहून अधिक अनुभव असलेले सीनियर-कॉर्पोरेट-मॅनेजर (आतां रिटायर्ड). गेली बरीच वर्षें हिंदी/हिंदुस्थानी, मराठी व इंग्रजी या भाषांमध्ये गद्य-पद्य लिखाण करत आहेत. त्यांची ९ पुस्तकें प्रसिद्ध झाली आहेत. पैकी ६ ‘पर्यावरण व प्रदूषण’ या विषयावरील इंग्रजी न हिंदी कवितांची पुस्तकें आहेत. दोन पुस्तकें , ‘रामरक्षा’ व ‘गणपति-अथर्वशीर्ष’ या संस्कृत स्तोत्रांची मराठी पद्यभाषांतरें आहेत. अन्य एक पुस्तक ‘मृत्यू आणि गत-सुहृद ’ हा विषयाशी संल्लग्न बहुभाषिक काव्याचें आहे. गदिमा यांच्या ‘गीत रामायणा’चें हिंदीत भाषांतर. बच्चन यांच्या ‘मधुशालचें मराठीत भाषांतर केलेलें आहे व तें नियतकालिकात सीरियलाइझ झालेलं आहे. टीव्ही वर एका हिंदी सिट-कॉम चें स्क्रिप्ट व अन्य एका हिंदी सीरियलमधील गीतें व काव्य लिहिलेलें आहे. कत्थक च्या एका कार्यक्रमासाठी निवेदनाचें हिंदी स्किप्ट लिहिलें आहे. अनेक मराठी व हिंदी पब्लिकेशब्समध्ये गद्य-पद्य लेखन प्रसिद्ध झालें आहे, जसें की, महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, सत्यकथा, स्वराज्य, केसरी, नवल, धर्मभास्कर, धर्मयुग, धर्मभास्कर, साहित्य अकादेमी चें हिंदी जर्नल ‘समकालीन भारतीत साहित्य’ , मराठी अकादेमी बडोदा चॅप्टर चें मराठी जर्नल ‘संवाद’, तसेंच प्रोफेशनल सोसायटीचें इंग्रजी जर्नल यांत लेखन प्रसिद्ध झालेलें आहे.मराठी , हिंदी व इंग्लिश वेबसाईटस् वर नियमित गद्य-पद्य लेखन. कांहीं ई-बुक सुद्धा प्रसिद्ध.
Contact: Website

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..