नवीन लेखन...

डभईची लढाई (भाग पाच)

 

युद्धानंतर:

बाजीरावाला विजय मिळाला तरी त्याची परिस्थिती बिकटच होती. त्याला निजामाची धास्ती होतीच. तसेंच, त्रिंबकरावाचे भाऊ फौजा घेऊन बाजीरावाच्या मागे लागले होते. पण बाजीराव झपाट्यानें लांब लांब मजला मारून पुण्याला परत आला, व साताऱ्याला जाऊन शाहूला भेटला.

चहूंकडे या प्रकरणाची चर्चा चालू झाली. छत्रपतीच्या पेशव्याशी लढतांना छत्रपतीचा सेनापति मारला गेला, हें कोणालाही जरी योग्य वाटलें नाहीं, तरी बाजीरावाची पूर्ण चूक होती असें कोणी मानलें नाहीं. (परंतु, बाजीरावाची कांहीं अंशी चूक होतीच हें मात्र आपण मान्य करायला हवें).

दाभाड्याच्या मृत्यूबद्दलची शाहूची प्रतिक्रिया चिटणिसानें नोंदवली आहे, ती अशी – महाराजांनी चित्तात आणलें की, ‘अविवेकें करून नबाबाशी (निजामाशी) राजकारण केलें, दुर्बुद्धि धरून आगळीक करून आपणांतच लढाई केली, त्याचें फळ झालें.परंतु मोठें माणूस पदरचें,व्यर्थ जाया झालें. झाली ते गोष्ट पुन्हा येत नाहीं. पुढे उभयतांचेही मनास आणून करणें तसें करतां येईल’.

शाहूनें दिलसफाईचे प्रयत्नही केले. स्वत तळेगावला जाऊन त्रिंबकरावाची आई उमाबाई हिला भेटून तिचें सांत्वन केलें, बाजीरावाला तिच्या पायावर घातलें. सेनापतीच्या कुटुंबाचा सन्मान पुढेही यथायोग्य रहावा अशी तजवीज शाहूनें केली. त्रिंबकरावाचे भाऊ यशवंतराव आणि सवाईबाबूराव यांना सेनापति व सेनाखासखेल ही पदें दिली. माळवा व गुजरात यांची हद्द ठरवून दिली; दाभाड्यांनी गुजरातचा निम्मा ऐवज पेशव्यांचे मार्फत सरकारात द्यावा, आणि बाकीच्या अर्ध्यात दाभाड्यांनी स्वतच्या फौजेचा व आपला खर्च भागवावा, असा तह करून दिला. त्याप्रमाणे, बाजीरावानें नंतर गुजरातमध्ये लक्ष घातलें नाहीं.

दाभाड्यांबरोबर गेलेल्या, पवार, गायकवाड व अन्य सरदारांची चूक पदरात घातल्यावर, बाजीरावानें पुढे त्यांच्याशी स्नेहभाव ठेवला.

परंतु दाभाड्यांकडून खरी दिलजमाई झालीच नाहीं. (अन्, होणार कशी! ). १७३७ पर्यंत शाहूनें पुन्हां पुन्हां उमाबाईला समजावायचे प्रयत्न केले, पण फारसा उपयोग झाला नाहीं. यशवंतराव व्यसनाधीन होता. त्याला प्रोत्साहन देण्याची शाहूनें शिकस्त केली, पण व्यर्थ. पुढे उमाबाई  व दाभाडे मंडळी मराठ्यांच्या राजोद्योगात भाग घेईनासे झाले, त्यांच्या मनातलें वैमनस्य गेलेंच नाहीं. अगदी १७४८ मध्ये सुद्धा नानासाहेब पेशवा व उमाबाई दाभाडे यांची बोलणी झाली, पण ती फिसकटली.

दाभाड्यांच्या घराण्यात त्रिंबकरावानंतर नंतर पराक्रमी पुरुष निघाला नाहीं. कांहीं काळातच दाभाड्याचें कर्तृत्व नांवापुरतें राहून, गुजरातेतील कारभार त्यांच्यातर्फे गायकवाडच मुखत्यारीनें पाहूं लागले.

डभई युद्धाच्या नंतर कांहीं काळातच मुघलांचा सुभेदार अभयसिंह यानें बोलणी करण्यासाठी पिलाजी गायकवाड याला डाकोरजी येथें बोलावलें व घातपातानें त्याला ठार केलें. त्यानंतर त्याचा मुलगा दमाजी हा गुजरातचा कारभार बघूं लागला. १७३४ मध्ये मराठ्यांनी बडोदा कायमचें ताब्यात आणलें, व तेव्हांपासून तें मराठ्यांची तेथील राजधानी बनलें.

पुढील कांहीं घटना व दीर्घकालीन परिणाम:

पुढील काळात, शाहूच्या मृत्यूनंतर, दाभाडे-गायकवाड नानासाहेब पेशव्याविरुद्ध गेले, त्यांनी बंडाळीचा प्रयत्न केला व युद्ध केलें. दमाजीनें फेब्रुवारी १७५१ मध्ये पुण्यावर स्वारी केली, पण त्याचा हेतू साध्य झाला नाहीं. १५ मार्च व ३० मार्च (१७५१) अशा दोन लढायांमध्ये सातारा भागात दमाजीचा पेशव्यांच्या सरदारांकडून पराभव झाला. नानासाहेबानें उमाबाईस पुण्याला आणून स्थानबद्ध केलें व दमाजीला बेड्या घालून लोहगडावर ठेवलें.

नंतर ३० मार्च १७५२ ला दमाजी-पेशवे करार झाला. त्यायोगें उमाबाईची व दमाजीची सुटका झाली. या कराराची मुख्य कलमें अशी होती – दाभाड्यांनी गुजरातवरील हक्क सोडावा;  सेनापती हा किताब मात्र त्यांच्याकडेच राहील. दमाजीनें गुजरातचा प्रमुख म्हणून कारभार पहावा; त्याला वंशपरंपरेनें ‘सेनाखासखेल’ हा किताब राहील.  त्यानें दाभाड्यांना खर्चासाठी सालीना सव्वा पाच लाख रुपये द्यावेत. त्यानें पेशव्यास दंडादाखल १५ लाख रुपये द्यावेत व गुजरातच्या उत्पन्नाचा अर्धा भाग द्यावा. पेशव्यास जरूर पडेल तेव्हां दमाजीनें १५००० सैन्यासह मदत करावी.

एका अर्थी दमाजी भाग्यवान होता, कारण बंडावा करूनही त्याचें दंडावरच भागलें, व त्याला पुन्हां गुजरातच्या कारभाराची जबाबदारी मिळाली. (याउलट, तुळाजी आंग्र्याला जन्मभर नानासाहेबाच्या कैदेत खितपत पडावे लागलें.) पुढे पानिपतावर सदाशिवराव भाऊबरोबर दमाजी उपस्थित होता.

बडोदा व गुजरातच्या दृष्टीनॅं १७३१ च्या डभई युद्धाचा एक महत्वाचा दूरगामी परिणाम म्हणजे, दाभाड्यांचे महत्व संपून, गायकवाडांचा अंमल चालू झाला. पुढे १८१८ मध्ये पेशवाई लयाला गेली. परंतु, गायकवाडांनी इंग्रजांशी जमवून घेतलें, व १९४७ पर्यंत गायकवाडांचें राज्य अबाधित राहिलें. त्यातूनच पुढे, सयाजीराव महाराजांसारका प्रजाहितदक्ष राजा बडोद्याला लाभला.

समारोप:

घटनांच्या विस्तारानें केलेल्या वर्णनावरून, १७३१ च्या डभई युद्धापूर्वीची परिस्थिती किती गुंतागुंतीची होती याची कल्पना येते. सहृदय परंतु अकर्तृत्ववान राजा शाहू; सातारा-कोल्हापुर अशा दोन गाद्यांमुळे मराठेशाहीत माजलेली दुही; मुघल बादशहाकडून मन्सब म्हणून शाहूला मिळालेला दक्षिणेचा अधिकार व शाहूचें त्याविषयीचें धोरण; बादशहाचा दक्षिणेचा सुभेदार म्हणून निजामानें केलेलें राजकारण; चौथाईसाठी मराठ्यांनी गुजरातेत (व इतरत्र) लढवलेले डावपेच, केलेली धरसोड, वेगवेगळ्या पक्षांशी केलेली हातमिळवणी वा विकत घेतलेले शत्रुत्व;  सरंजामशाहीची पद्धत; शाहूच्या सरदारांमधील हेवेदावे व गटबाजी, त्यांनी स्वतच्या स्वार्थाला राज्यापेक्षा दिलेले महत्व व त्यासाठी  आपसात केलेल्या लढाया, आणि शत्रूशीही हातमिळवणी करून स्वकीयांशी लढण्याची त्यांची वृत्ती; असा हा बुद्धिबळाचा पट आहे.

निजामाशी व कोल्हापुरकरांशी संधान बांधलें, ही नक्कीच दाभाड्याची चूक होती, परंतु आगळीक त्यानें सुरू केलेली नव्हती. बाजीरावाचीही कांहीं अंशी चूक होतीच. मुख्यत, शाहूचें धोरण व ढिला कारभार हें दाभाडे-पेशवे संघर्षाला कारणीभूत ठरलें. या सर्वांचाच परिणाम म्हणजे डभईची लढाई.  सेनापति त्रिंबकराव दाभाड्याला मारायचा शाहूचा अथवा बाजीरावाचा कोणताही बेत नसतांना, अनपेक्षितपणें युद्धात तो ठार झाला. तो शाहूच्या भेटीला गेला असता किंवा कैद झाला असता, तरी काम भागलें असतें. पण तो बाणेदार होता व कांहींसा हटवादीपणानें वागला; तसेच तो थोडासा बेसावध राहिला. त्यामळे युद्धात बाजीरावाची सरशी झाली व त्रिंबकराव मारला गेला. निर्माण झालेला पेच त्रिंबकरावाच्या मृत्यूनें सुटलासा वाटला, पण खरें म्हणजे मराठेशाहीचें नुकसानच झाले.

इतिहासकार जदुनाथ सरकार यांनी एके ठिकाणी मराठ्यांबद्दल लिहिलें आहे की, ते शूर सामर्थ्यशाली होते, स्वातंत्र्यप्रिय होते, पण त्यांच्यात एकोपा नव्हता. व्यक्तिगत स्वार्थासाठी मराठ्यांमधील घराणी वंशपरंपरेनें एकमेकांशी झगडत होती. आणि, याचा दुष्परिणाम सर्व राष्ट्रावर झाला.

डभईच्या युद्धाला कारणीभूत झालेल्या मराठेशाहीतील अपप्रवृत्ती पुढील काळात कमी झाल्या नाहीत, त्या तशाच राहिल्या; आणि त्याचा अनर्थकारी परिणाम ३० वर्षांनी पानिपतावर दिसून आला.

— सुभाष नाईक.

सुभाष नाईक
About सुभाष नाईक 295 Articles
४४ वर्षांहून अधिक अनुभव असलेले सीनियर-कॉर्पोरेट-मॅनेजर (आतां रिटायर्ड). गेली बरीच वर्षें हिंदी/हिंदुस्थानी, मराठी व इंग्रजी या भाषांमध्ये गद्य-पद्य लिखाण करत आहेत. त्यांची ९ पुस्तकें प्रसिद्ध झाली आहेत. पैकी ६ ‘पर्यावरण व प्रदूषण’ या विषयावरील इंग्रजी न हिंदी कवितांची पुस्तकें आहेत. दोन पुस्तकें , ‘रामरक्षा’ व ‘गणपति-अथर्वशीर्ष’ या संस्कृत स्तोत्रांची मराठी पद्यभाषांतरें आहेत. अन्य एक पुस्तक ‘मृत्यू आणि गत-सुहृद ’ हा विषयाशी संल्लग्न बहुभाषिक काव्याचें आहे. गदिमा यांच्या ‘गीत रामायणा’चें हिंदीत भाषांतर. बच्चन यांच्या ‘मधुशालचें मराठीत भाषांतर केलेलें आहे व तें नियतकालिकात सीरियलाइझ झालेलं आहे. टीव्ही वर एका हिंदी सिट-कॉम चें स्क्रिप्ट व अन्य एका हिंदी सीरियलमधील गीतें व काव्य लिहिलेलें आहे. कत्थक च्या एका कार्यक्रमासाठी निवेदनाचें हिंदी स्किप्ट लिहिलें आहे. अनेक मराठी व हिंदी पब्लिकेशब्समध्ये गद्य-पद्य लेखन प्रसिद्ध झालें आहे, जसें की, महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, सत्यकथा, स्वराज्य, केसरी, नवल, धर्मभास्कर, धर्मयुग, धर्मभास्कर, साहित्य अकादेमी चें हिंदी जर्नल ‘समकालीन भारतीत साहित्य’ , मराठी अकादेमी बडोदा चॅप्टर चें मराठी जर्नल ‘संवाद’, तसेंच प्रोफेशनल सोसायटीचें इंग्रजी जर्नल यांत लेखन प्रसिद्ध झालेलें आहे.मराठी , हिंदी व इंग्लिश वेबसाईटस् वर नियमित गद्य-पद्य लेखन. कांहीं ई-बुक सुद्धा प्रसिद्ध.
Contact: Website

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


 

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..