नवीन लेखन...

डभईची लढाई (भाग दोन)

 

पेशवे व दाभाडे यांचा उदय आणि उत्कर्ष:

पेशवे:

बाळाजी विश्वनाथाचा उल्लेख आधी झालेलाच आहे. १६८९ च्या सुमारास तो घाटावर आला. राजारामाच्या कारकीर्दीत तो पुण्याचा सरसुभेदारीवर होता. १७०७ च्या खेडच्या लढाईच्या वेळी तो धनाजी जाधवाच्या पदरी अंमलदार होता. त्यावेळच्या कारस्थानातील बाळाजीच्या सहभागामुळे शाहूची मर्जी त्याच्यावर बसली. त्यानंतर बाळाजी चढतच गेला व त्याला वरची पदें मिळत गेली. नोव्हेंबर १७०८ मध्ये शाहूनें ‘सेनाकर्ते` हें पद निर्माण करून तें बाळाजीला दिलें.

१७१३ मध्ये सरखेल कान्होजी आंग्र्याचा पेच पुढे आला, तेव्हां बाळाजीनें चतुराईनें शाहूकडून स्वतची पेशवा म्हणून नेमणूक करून घेतली  (आणि आपल्या गोड संभाषणानें आंग्र्याला ताराबाईच्या पक्षातून शाहूच्या पक्षात आणलें ).  पुढे १७२० मध्ये बाळाजीचा मृत्यु झाल्यावर शाहूनें बाजीरावाची पेशवा म्हणून नेमणूक केली. त्या वेळी बाजीराव २० वर्षांचा होता. बाळाजीप्रमाणेंच बाजीरावानेंही निष्ठेनें शाहूच्या राज्याची सेवा केली.

दाभाडे:

खंडेराव दाभाडे याला राजारामानें जुन्नर भागातील ७९५ गावांच्या सरपाटीलकीचें वतन करून दिलें होतें. उत्तरोत्तर खंडेरावाची भरभराट होत गेली. ताराबाईच्या सेवेत असतांना गुजरातचे कार्य खंडेरावाकडे होतें. १७०७ मध्ये खेडच्या लढाईत खंडेराव ताराबाईच्या बाजूनें लढत होता व कैद झाला होता. पुढे तो शाहूच्या पक्षात आला. तेव्हां शाहूनें खंडेरावाची गुजरातची जबाबदारी (व त्याचे वतन आणि मोकाशाचा अधिकार) तशीच ठेवली. १७०८ मध्ये खंडेराव पुन्हां (चंद्रसेन जाधवाबरोबर) ताराबाईकडे गेला. तेव्हां शाहूनें त्याची वतनें जफ्त केली (उपरोक्त सरपाटीलकीचें वतन फत्तेसिंह भोसले याला दिलें व नाशिकचा मोकासा बाळाजी विश्वनाथ यास बेगमीसाठी दिला). पुन्हां १७१० मध्ये खंडेराव शाहूकडे आला. तेव्हां शाहूनें त्याला ‘सेनाखासखेल’ हा किताब दिला. (खेल म्हणजे दल. सेनाखासखेल म्हणजे सेनेच्या खास दळाचा प्रमुख). त्यानंतर कांहीं काळानें फिरून खंडेराव ताराबाईकडे गेला, पण नंतर पुन्हां तो शाहूकडे आला. पुढे १७१७ मध्यें शाहूनें त्याला सेनापतिपद दिलें (पण पदाचा पूर्ण सरंजाम दिला नाहीं). १७१८-१९ मध्ये खंडेरावही बाळाजी विश्वनाथाबरोबर दिल्लीला गेला होता. त्याचें व बाळाजीचा स्नेह होता व चांगलें एकमत होतें. मृत्यूपर्यंत सेनापतीपद खंडेरावाकडे होतें.

मराठे आणि गुजरात ; दाभाडे व पेशवे यांच्यामधील कलह:

१५७२ मध्ये अकबर बादशहानें गुजरात जिंकून घेतला व राजा तोडरमल याची तेथें सुभेदार म्हणुन नेमणूक केली. तेव्हांपासून तो प्रांत मुघलांच्या अधिपत्याखाली आला.

शिवाजी महाराजांनी सुरत शहरावर दोनदा धडक मारली होती. नंतरही वेळोवेळी खानदेश-गुजरात मुलुखावर मराठे अधूनमधून हल्ले करत होते. पण मराठे व गुजरात यांचा राजकीयदृष्ट्या खरा संबंध अठराव्या शतकातच सुरू झाला.

१७०२ मध्ये, औरंगजेबाशी युद्ध चालू असतांना, मराठ्यांनी सुरतेवर शह बसवला. (त्या काळात धनाजी जाधव मराठ्यांचा सेनापति होता). १७०५ सालीं राजपीपल्याजवळ नर्मदा ओलांडून मराठ्यांनी पलिकडच्या प्रदेशात स्वाऱया आरंभल्या. १७११ मध्ये मराठ्यांनी गुजरातचा सुभेदार अमानतखान याचा अंकलेश्वर येथें पराभव केला.

१७१७ मध्ये जेव्हां शाहूनें खंडेराव दाभाडे याला सेनापतिपद दिलें, तेव्हां त्याला गुजरात प्रांतावर मोहीम काढून तो प्रांत कब्जात आणण्याचा हुकूम दिला. खंडेराव महाराष्ट्राच्या सीमेवर मुक्काम ठोकून खानदेश, गुजरात व वऱहाड या प्रांतांवर नजर ठेवीत असे. पुढे, तो वृद्ध झाल्यामुळे, आणि त्याला पोटशूळाची व्यथा जडल्यामुळे, त्याचा मुलगा त्रिंबकराव आणि कारभारी पिलाजी गायकवाड हे गुजरातेत अंमल बसवूं लागले. १७१९ मध्ये बाळाजी विश्वनाथ दिल्लीहून सनदा घेऊन आल्यावर, नवीन मिळालेल्या हक्कांच्या जोरावर, मराठ्यांच्या फौजा निरनिराळ्या प्रांतांमध्ये मुक्त संचार करूं लागल्या. त्याच वर्षी पिलाजीनें सुरतेवर स्वारी करून मुघल फौजेचा पराभव केला, व सोनगड येथें कायमचें ठाणें दिलें. तापी नदीच्या दक्षिणेस सुरतपासून सुमारे ४० मैलांवरील सोनगड किल्ल्याची बांधणी पिलाजीनेंच केली होती. १७२३ मध्ये मराठ्यांनी गुजरातच्या भागावर चौथाई लागू केली, व त्यासाठी त्यांना अनेक युद्धें  लढावी लागली.

१७२० मध्यें शाहूनें बाजीरावाला पेशवा केलें. (पेशवा या फारसी शब्दाचा अर्थ आहे नेता). पेशवा म्हणजे छत्रपतीच्या मंत्रीमंडळाचा प्रमुख. पेशवा झाल्यामुळे बाजीरावाचें महत्व वाढलें व त्याच्या वाढत्या पराक्रमामुळे तें उत्तरोत्तर वाढतच गेलें. मराठा दरबारातील सरदारांना, विशेष करून जुन्या सरदार मंडळींना, बाजीरावाबद्दल आकस वाटूं लागला, जसें प्रतिनिधि (जो त्याआधीच शाहूच्या पक्षात आलेला होता), मंत्री नारो राम इत्यादि. (नागपुरच्या रघूजी भोसल्याचेही बाजीरावाशी घर्षण होत होतें ). या साऱयाला खंडेरावही अपवाद नव्हता. बाजीराव खंडेरावाला काका म्हणून संबोधत असे. आपल्या पोराच्या वयाच्या बाजीरावाचें शाहूजवळील वाढतें वजन खंडेरावाच्या गळीं उतरेना. तो बाजीरावानें योजलेल्या कामातून अलिफ्त राहूं लागला. त्याबद्दल शाहूला त्याची कानउघाडणीही करावी लागली. पण, शाहू  धास्तीनें सरदारांविरुद्ध, (खासकरून जुन्या सरदारांविरुद्ध), कांहींच करूं शकत नव्हता. दुसरें म्हणजे, शाहू निर्वीर्य व अकर्तृत्ववान होता आणि सुखासीन होता. (शाहूच्या सुखासीनतेचे दाखले उपलब्ध आहेत). शाहूला ‘पुण्यश्लोक’ म्हटलें जातें. तो सच्छील, सौम्य, कनवाळू  व अनाग्रही होता. (इतकेंच काय, कोल्हापुर गादीबद्दलही त्याला आकस नव्हता). परंतु राज्यशकट योग्यप्रकारें हांकण्यासाठी तें पुरत नाहीं. मुघलांसमवेत १८ वर्षे राहिल्यामुळे शाहूला ऐषारामी जीवनाची सवय लागली होती. त्याला राज्याची व्याफ्ति वाढवण्याची जाण होती; परंतु तो मोहिमांसाठी, युद्धांसाठी, व पराक्रमांसाठी आपल्या सरदारांवर अवलंबून रहात असे. सुरुवातीचा थोडा काळ सोडला (जेव्हां त्याला निरुपायानें लढावेंच लागलें ), तर शाहूनें स्वतच्या नेतृत्वाखाली मोठी मोहीम अशी काढलीच नाहीं. राज्यामधे राजाचा एकछत्री अंमल असावा लागतो, त्याला आपल्या सरदारांवर नियंत्रण ठेवावे लागते, सगळ्या सरदारांना एकदिलानें एका ध्येयासाठी कार्य करण्यांस प्रवृत्त करावें लागतें, दूरगामी परिणामांचा विचार करून धोरण ठरवावें लागतें, ठाम निर्धार ठेवावा लागतो, प्रसंगी कटु निर्णयही घ्यावा लागतो. या गुणांमध्ये शाहू कमी पडला. त्यातून, शाहूचें सर्व आयुष्य दक्षिणेतच गेलें होतें. (१७०७ मध्ये, अन् तेंही मुघलांचा कैदी असतांना, फक्त एकदाच तो उत्तरेस बुऱहाणपुरापर्यंत गेला होता). त्यामुळें, त्याला उत्तरेच्या राजकारणाची सखोल जाण असणें कठीण होतें. राजाच्या या साऱया अकर्तृत्वाचा फायदा सरदारांनी  घेतला नसता तरच नवल! आणि, तें करत असतांनाच सरदारांचे आपसांतील संबंध ताणले गेले.

१७१३ मध्ये बाळाजी विश्वनाथाला शाहूनें पेशवाईची वस्त्रें दिली, त्याच वर्षी निजाम उल्मुल्काची दिल्लीच्या बादशहानें दक्षिणचा सुभेदार म्हणून नेमणूक केली होती. निजामाचा बाप गाझीउद्दीन हा १७०८ पासून ते १७११  पर्यंत गुजरातचा सुभेदार होता. पुढे, १७२० ते १७२३ निजाम स्वतही गुजरातचा सुभेदार होता. निजाम आपला दक्षिणेचा कारभार औरंगाबाद येथून पहात असे. बाजीरावाचें ध्येय होतें छत्रपतींच्या मराठी राज्याचा प्रभाव व विस्तार वाढविणें. निजाम तर शाहूला फक्त एक मन्सबदार समजत होता, आणि त्याचा उद्योग होता मुघलांचें राज्य टिकवणें व बादशहाच्या नाममात्र अधिपत्याखाली स्वतचें राज्य वाढविणें. म्हणून निजामानें (आधी चंद्रसेन जाधवाला आणि नंतर दाभाड्याला हाताशी धरून) शाहूच्या व बाजीरावाच्या विरुद्ध राजकारण केलें.

२५ फेब्रुवारी १७२८ ला बाजीरावानें निजामाचा औरंगाबादजवळ पालखेड येथें कोंडमारा केल्यानंतर, (आणि ६ मार्च १७२७ त्या दोघांचा मुंगीशेवगाव येथें तह झाल्यापासून), गुजरात, माळवा व दिल्ली येथील राजकारणाला भिन्न स्वरूप प्राफ्त झालें होतें. अल्प काळातच बाजीरावानें माळवा व बुंदेलखंड ह्या प्रांतांवर अंमल बसवला, आणि चिमाजी आप्पानें गुजरातेत उतरून तेथें आपला जम बसवला.

त्रिंबकराव दाभाडे व बाजीराव साधारणपणें समवयस्क होते. त्रिंबकराव आणि पिलाजी गायकवाड हे जेव्हां खंडेरावाच्या मुखत्याराची कामें बधत, तेव्हां त्यांचें व पेशव्यांचें कधीच जमलें नाहीं. १७२९ मध्ये खंडेराव मरण पावला. त्यानंतर शाहूनें १७३० मध्ये त्रिंबकरावास सेनापति केलें आणि त्याचा भाऊ यशवंतराव याला ‘सेनाखासखेल’ हा किताब दिला. खंडेरावाच्या मृत्यूनंतर त्रिंबकरावाचा पेशव्याशी बेबनाव सुरू झाला. त्यानें मावळात व कल्याण-भिवंडीकडे पेशव्याच्या हद्दीत शिरून उपद्रव मांडला, तसेंच निजामाशी संधान जोडून पेशव्याला शह देण्याची खटपट आरंभली. निजामानेंही (१७३० मध्ये) त्रिंबकराव दाभाड्याला फितवून पेशव्याला नेस्तनाबूद करण्याचा डाव रचला व त्याच वेळी कोल्हापुरच्या संभाजीला हाताशी धरून शाहूला उखडून टाकण्याचा प्रयत्न केला.

दाभाडे व पेशवे यांच्यातल्या वाढत्या कलहामागील या घटनांचा आपण आतां वेध घेऊ.

— सुभाष नाईक.

सुभाष नाईक
About सुभाष नाईक 295 Articles
४४ वर्षांहून अधिक अनुभव असलेले सीनियर-कॉर्पोरेट-मॅनेजर (आतां रिटायर्ड). गेली बरीच वर्षें हिंदी/हिंदुस्थानी, मराठी व इंग्रजी या भाषांमध्ये गद्य-पद्य लिखाण करत आहेत. त्यांची ९ पुस्तकें प्रसिद्ध झाली आहेत. पैकी ६ ‘पर्यावरण व प्रदूषण’ या विषयावरील इंग्रजी न हिंदी कवितांची पुस्तकें आहेत. दोन पुस्तकें , ‘रामरक्षा’ व ‘गणपति-अथर्वशीर्ष’ या संस्कृत स्तोत्रांची मराठी पद्यभाषांतरें आहेत. अन्य एक पुस्तक ‘मृत्यू आणि गत-सुहृद ’ हा विषयाशी संल्लग्न बहुभाषिक काव्याचें आहे. गदिमा यांच्या ‘गीत रामायणा’चें हिंदीत भाषांतर. बच्चन यांच्या ‘मधुशालचें मराठीत भाषांतर केलेलें आहे व तें नियतकालिकात सीरियलाइझ झालेलं आहे. टीव्ही वर एका हिंदी सिट-कॉम चें स्क्रिप्ट व अन्य एका हिंदी सीरियलमधील गीतें व काव्य लिहिलेलें आहे. कत्थक च्या एका कार्यक्रमासाठी निवेदनाचें हिंदी स्किप्ट लिहिलें आहे. अनेक मराठी व हिंदी पब्लिकेशब्समध्ये गद्य-पद्य लेखन प्रसिद्ध झालें आहे, जसें की, महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, सत्यकथा, स्वराज्य, केसरी, नवल, धर्मभास्कर, धर्मयुग, धर्मभास्कर, साहित्य अकादेमी चें हिंदी जर्नल ‘समकालीन भारतीत साहित्य’ , मराठी अकादेमी बडोदा चॅप्टर चें मराठी जर्नल ‘संवाद’, तसेंच प्रोफेशनल सोसायटीचें इंग्रजी जर्नल यांत लेखन प्रसिद्ध झालेलें आहे.मराठी , हिंदी व इंग्लिश वेबसाईटस् वर नियमित गद्य-पद्य लेखन. कांहीं ई-बुक सुद्धा प्रसिद्ध.
Contact: Website

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


 

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..