नवीन लेखन...

एकविसाव्‍या शतकातील मातृभाषेचे स्‍थान : भाग १ – अ-१

टीप – १९९०च्या दशकाच्या मध्यावर , वडोदरा — बड़ोदा — येथें भरलेल्या ‘गुजरात मराठी साहित्य संमेलना’त, प्रस्तुत लेखकानें हा ‘पेपर’ — प्रबंध — वाचला होता. आज पंचवीसएक वर्षांनंतर, त्यावर, आजच्या परिस्थितीनुसार भाष्य करण्यांसाठी एक नवीन लेख यथावकाश लिहिला जाईल. तूर्तास, ही पुनर्भेट.. 


पु. ल. देशपांडे म्‍हणतात की – ‘विनोद ही माणसाला मिळालेली एक देणगी आहे. दोन कुत्र्यांना हसतांना कधी कोणी पाहिलेलं नाहीं’. (अर्थातच, विनोद हा भाषेशी संबंधित आहे).
चार्लस् बार्बर हा भाषाशास्‍त्रज्ञ म्‍हणतो – ‘भाषा ही पटकन दिसून येणारी अशी एक गोष्‍ट आहे जी माणसाचं प्राणीजगताहून वेगळेपण दाखवून देते’.
आजच्‍या परिसंवादात आपण भाषेचा एका विशिष्‍ट दृष्टिकोनातून विचार करणार आहोत.
**
भाग – १
भाग-१-अ :
भाग-१-अ.१

 हे उघड आहे की आजचा विषय निवडतांना, इंग्रजीच्‍या आक्रमणामुळे पुढील काही दशकांनंतर आपल्‍या भारतीय भाषा अस्तित्‍वात राहणार आहेत की नाहीं, आणि राहिल्‍यास त्‍यांचं स्‍थान काय असेल? असाच विचार संयोजकांच्‍या मनात होता.
इंग्रजीचं भारतीय भाषांवर आक्रमण होत आहे व त्‍यामुळे आपल्‍या भाषांच्‍या अस्तित्‍वालाच धोका आहे, अशी चर्चा सर्वत्र होत असते. अनेक विचारवंतही वारंवार असंच म्‍हणतात.
इतिहासाचार्य राजवाडे यांनी एका शारदोपासक संमेलनाच्‍या अध्‍यक्षीय भाषणाच्‍या वेळी, हवा तेथे इंग्रजी शब्‍दांचा मराठीत धुडगूस चाललेला पाहून, ‘‘मराठी भाषा मरणार’’ असें भविष्‍य वर्तवले होते. सुदैवाने मराठी भाषा अजून जिवंत आहे!
तेव्‍हां आपण आतां या प्रश्नाचा बुद्धिप्रामाण्‍यतेनुसार उहापोह करूं या.
त्‍यासाठी आपल्‍याला भाषाशास्‍त्राचा व भाषेच्‍या इतिहासाचा विचार करणे क्रमप्राप्‍त आहे.

 भाषाशास्‍त्रज्ञ सांगतात की, भाषेचा विचार करतांना एक गोष्‍ट लक्षात ठेवणे आवश्‍यक आहे की बोलली जाणारी मौखिक भाषा हेंच भाषेचं मूलभूत स्‍वरुप आहे; लिखित भाषे हें त्‍यापासून तयार झालेलं व दुय्यम दर्जाचं स्‍वरुप आहे.
साहित्‍याला आपण ‘वाङ्मय’ (वाक्.मय) म्‍हणतो, ‘लिख्.मय’ म्‍हणत नाही. प्रत्‍येक माणूसही लहानपणी बोलण्‍याचं शिक्षण आधी घेतो त्‍यानंतर लिहिण्‍याचं.
आपल्‍याला चिंता वाटते ती मराठी भाषा टिकेल की नाहीं याची. मोडी लिपी अस्‍तंगत झाली याची खंत फारसं कोणी करतांना दिसत नाही. मला लिपीचं महत्त्व माहीत आहे. तिच्‍यामुळे साहित्‍याचा विस्‍तृत प्रसार होतो व ते दीर्घकाळ टिकून राहतं. पण आपल्‍याला मूलतः मौखिक भाषेचा विचार करायला हवा. त्‍यानंतर, व त्‍या अनुषंगाने आपण लिखित भाषेचा विचार करुं शकूं.
भाषा ही नदीसारखी आहे. ती प्रवाही आहे, गतिमान आहे. ती सतत वाहत असते, बदलत असते. काळाच्‍या ओघाबरोबर भाषा कशी बदलत जाते हे पाहण्‍यासाठी आपण एका युरोपीय भाषेचं उदाहरण घेऊं. हा उतारा पहा –
‘We cildra biddap pē, ēala ūs sprecan rihte, forpām ungetoerade wē sindon, and genioemmodlice wē sprecap’.
हा उतारा इंग्लिशमधला आहे. एलफ्रिक ( आयनशॅम चा बिशप ) याने AD (इ.स.) ९९० मध्‍ये लिहिलेल्‍या ‘कॅलिक्‍वे’ यातील हा उतारा आहे. याचा अर्थ आजच्‍या इंग्रजीत असा आहे.
‘We children beg you, oh teacher, please teach us to speak correctly, as we are ignorant and speak correctly’.
ती सुद्धा इंग्लिशच, अन् ही सुद्धा इंग्लिशच!

 भाषेनं लवचिक असायलाच हवं. भाषेनं काळानुसार बदलायलाच हवं, स्थिर अविचल असूंच नये. वापरात असलेल्‍या कुठल्‍याही भाषेत बदलाची प्रक्रिया सारखी सुरुंच असते. जिवंत भाषा बदलत असतात, मृत भाषा बदलत नाहीत.
भाषेत कुठल्‍या प्रकारचे बदल होतात –
१) नवीन शब्‍दांची भर
अ) कालानुसार नवीन शब्‍द तयार होतात, घडतात.
ब) दुस-या भाषेतून घेतले जातात.
२) नवीन वाक्प्रचार व म्‍हणी
३) उच्‍चारात बदल
४) शब्‍दांच्‍या स्‍वरुपात बदल, वाक्‍यरचनेत बदल, व्‍याकरणात बदल, अर्थामध्‍ये बदल.
५) लिपीत बदल.

इंग्रजीच्‍या, भारतीय भाषांवरील व विशेषतः मराठीवरील आक्रमणाचा विचार करतांना ,
*पहिली गोष्‍ट अभिप्रेत आहे ती,
– मराठीत शिरणार्‍या इंग्रजी शब्‍दांबद्दल ,
*आणि, दुसरी ही, की
– इंग्रजी रोजच्‍या बोलचालीची भाषा म्‍हणून आपल्‍या मातृभाषेची – मराठीची – जागा घेईल, व आपल्‍या मातृभाषेला हद्दपार करून टाकेल, नामशेष करून टाकेल.
**
(पुढे चालू)

— सुभाष स. नाईक

सुभाष नाईक
About सुभाष नाईक 297 Articles
४४ वर्षांहून अधिक अनुभव असलेले सीनियर-कॉर्पोरेट-मॅनेजर (आतां रिटायर्ड). गेली बरीच वर्षें हिंदी/हिंदुस्थानी, मराठी व इंग्रजी या भाषांमध्ये गद्य-पद्य लिखाण करत आहेत. त्यांची ९ पुस्तकें प्रसिद्ध झाली आहेत. पैकी ६ ‘पर्यावरण व प्रदूषण’ या विषयावरील इंग्रजी न हिंदी कवितांची पुस्तकें आहेत. दोन पुस्तकें , ‘रामरक्षा’ व ‘गणपति-अथर्वशीर्ष’ या संस्कृत स्तोत्रांची मराठी पद्यभाषांतरें आहेत. अन्य एक पुस्तक ‘मृत्यू आणि गत-सुहृद ’ हा विषयाशी संल्लग्न बहुभाषिक काव्याचें आहे. गदिमा यांच्या ‘गीत रामायणा’चें हिंदीत भाषांतर. बच्चन यांच्या ‘मधुशालचें मराठीत भाषांतर केलेलें आहे व तें नियतकालिकात सीरियलाइझ झालेलं आहे. टीव्ही वर एका हिंदी सिट-कॉम चें स्क्रिप्ट व अन्य एका हिंदी सीरियलमधील गीतें व काव्य लिहिलेलें आहे. कत्थक च्या एका कार्यक्रमासाठी निवेदनाचें हिंदी स्किप्ट लिहिलें आहे. अनेक मराठी व हिंदी पब्लिकेशब्समध्ये गद्य-पद्य लेखन प्रसिद्ध झालें आहे, जसें की, महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, सत्यकथा, स्वराज्य, केसरी, नवल, धर्मभास्कर, धर्मयुग, धर्मभास्कर, साहित्य अकादेमी चें हिंदी जर्नल ‘समकालीन भारतीत साहित्य’ , मराठी अकादेमी बडोदा चॅप्टर चें मराठी जर्नल ‘संवाद’, तसेंच प्रोफेशनल सोसायटीचें इंग्रजी जर्नल यांत लेखन प्रसिद्ध झालेलें आहे.मराठी , हिंदी व इंग्लिश वेबसाईटस् वर नियमित गद्य-पद्य लेखन. कांहीं ई-बुक सुद्धा प्रसिद्ध.
Contact: Website

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..