नवीन लेखन...

स्टॅम्प आजोबा

टिंग टॉंग sss .. दारावरची बेल वाजली .. मन्याच्या मुलीनी दरवाजा उघडला .
“बाबा .. पोस्टमन काका आलेत .. बोलवतायत तुम्हाला !!”..

कसलीशी कागदपत्रं आली होती पोस्टाने .. ती बघून पाकीट ठेवता ठेवता मन्याचा हात नकळत त्यावर लावलेल्या स्टॅम्पवर गेला .. एकदम काहीतरी आठवलं . अलगद त्यानी तो स्टॅम्प काढला .. कोणीतरी डोळ्यासमोर आलं आणि अंगात वीज संचारल्यासारखा वेगात तो आपल्या बेडरूम मधल्या कपाटापाशी गेला .. बरंच काही उचकून ठेवलं .. बायकोच्या शिव्या खाण्याइतका पसारा करून ठेवला .. पण त्याचं मन थाऱ्यावरच नव्हतं .. आणि अखेर त्याला हवी असलेली वस्तु सापडली .. त्याची बालपणीची आठवण .. त्याची “स्टॅम्पवही”.. एक एक पान उलटत तो हळूहळू भूतकाळात जात होता .. इतक्यात एका विशिष्ट पानावर येऊन एकदम थांबला .. थेट ३० वर्ष मागे गेला.. पार 90’s मध्ये ..

मन्या तेव्हा साधारण ५वी-६वीत असेल .. मस्त खेळा-बागडायचं वय .. त्या वर्षीच्या मे महिन्याच्या सुट्टीपासून मन्यासाहेबांना वेगवेगळ्या देशांचे स्टॅम्प गोळा करायचा छंद लागला …… न वापरलेली एक जुनी डायरी त्यानी त्याची स्टॅम्पवही बनवली .. त्यावर पहिल्या पानावर मस्त चित्र वगैरे काढून , मोठ्ठ्या अक्षरात “Manya’s Stamp Book” वगैरे लिहून , असे आपल्या वयाला अनुसरून सगळे सोपस्कार केले होते … व्यवस्थित अनुक्रमणिका , त्यात सगळ्या देशांची नावं , त्याला दिलेले पान क्रमांक सगळं छान टापटीप होतं …. घरी आलेल्या प्रत्येक पत्रांचे स्टॅम्प काढायचे .. अजूनही कुठून मिळतील तिथून घ्यायचे.. एकसारखे २-३ असतील तर स्टॅम्प जमवणाऱ्या इतर मित्रांकडून “एक्स्चेंज” करायचे … हे सगळं सुरू होतं .. मन्याचं घर तळमजल्यावर … एके दिवशी त्याच्या घरी पत्रं द्यायला पोस्टमन काका आले होते . सध्या जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणी फक्त “स्टॅम्प एके स्टॅम्प” दिसत असलेल्या मन्याला ;अर्जुनाला दिसलेल्या पोपटाच्या डोळ्याप्रमाणे पोस्टमन काकांच्या हातातल्या गठ्ठयात इतक्या साऱ्या पत्रांमध्ये चक्क “अमेरिकेचे स्टॅम्प” लावलेलं एक पत्र दिसलं ..आणि त्यावर नाव होतं तिसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या आजोबांचं ..तसे ते फार वयस्कर नव्हते पण मन्यानी “आजोबा” म्हणण्याइतके नक्कीच मोठे होते …. त्या आजोबांचा मुलगा गेल्याच महिन्यात नोकरीनिमित्त ३-४ वर्षांसाठी अमेरिकेत गेला होता .. पोस्टमन पोचायच्या आत पत्राची वर्णी देत “स्टॅम्प मिळवण्याच्या सुप्त आशेने” हाफ चड्डीतला मन्या तुरुतुरु धावत त्या आजोबांच्या घरी पोचला सुद्धा ss !! .. अमेरिकेत गेल्यापासून लेकाचं पहिलं वहिलं आलेलं पत्र वाचण्याची उत्सुकता असूनही प्रेमळ स्वभावाच्या आजोबांना मन्याची निरागस चलबिचल लक्षात आली . त्यांनी पत्राचं पाकीट उघडायच्या आधी त्यावरचे स्टॅम्प नीट काढून देत त्याच्या आनंदात सामील झाले. .. मन्या सुद्धा अचानक लॉटरी लागल्यासारखा खुष होऊन नाचतच घरी आला … त्या दिवसापासून नेहमी अमेरिकीतून पत्र आलं की आजोबा आठवणीने स्टॅम्प काढून ठेवायचे आणि जाता येता कधीतरी मन्याला द्यायचे .. हे चक्र नियमित सुरू झालं .. या सगळ्यात त्या आजोबांचं नाव “स्टॅम्प आजोबा” कधी होऊन गेलं हे कळलंच नाही.

साधारण दर १५-२० दिवसांनी पत्र यायचं .. मन्या तर स्टॅम्प आजोबांची वाटच बघत असायचा .. कधी जरा उशीर झाला की जाता येता विचारायचा .. “स्टॅम्प आजोबा ss .. आलं का पत्र ???” .. साता समुद्रापार असलेल्या मुलाच्या आई वडिलांपेक्षा हाच पत्राची आतुरतेने वाट बघायचा … कारण तेवढेच नवनवीन स्टॅम्प त्याच्या कलेक्शन मध्ये यायचे आणि इतर मित्रांसामोर थोडा भाव सुद्धा खायला मिळायचा .. दोन-अडीच वर्ष हे सगळं सुरू होतं. २-४ खेपेला एकसारखेच , त्याच चित्रांचे स्टॅम्प आले ; मग शेवटी मन्या आजोबांना म्हणालाच .. “स्टॅम्प आजोबाss .. तुम्ही पत्र पाठवाल तेव्हा प्लीज दादाला वेगवेगळे स्टॅम्प लावून पत्र पाठवायला सांगा ना !!” मन्याच्या अपेक्षा वाढल्या होत्या पण आजोबाही त्याचा छंद तितक्याच उत्साहात जोपासत होते . “ हा हा sss सांगतो बाळा नक्की !!”…. त्यानंतर काहीच दिवसात एकदम तडकाफडकी आजी-आजोबा अमेरिकेत गेले .. त्यांच्या मुलाने ऑफिसमधल्याच एका दाक्षिणात्य मुलीबरोबर लग्न ठरवलं होतं अमेरिकेत . त्या गडबडीत सुद्धा; गेल्या गेल्या दुसऱ्याच दिवशी आजोबांनी मन्याला वेगवेगळे स्टॅम्प लावून पत्र पाठवलं .. मन्यासाठी एकदम पर्वणीच !!..

“स्टॅम्प आजोबा” अमेरिकेतून परतल्यानंतर सुद्धा हा स्टॅम्प हस्तांतरण सोहळ्याचा “सिलसिला” दर २-३ आठवड्यांनी नेमाने सुरू होता ..आणि गंमत म्हणजे तेव्हापासून प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या प्रकारचे , आकाराचे , चित्रांचे स्टॅम्प यायला लागले .. बहुतेक अमेरिकेत गेले होते तेव्हा आजोबांनी त्या दादाला चांगलीच तंबी दिली असणार .. कधीकधी तर स्टॅम्प सोबत एखादं चॉकलेट , बिस्किटचा पुडा , मावा केक अशी सरप्राईझ सुद्धा मिळायची स्टॅम्प आजोबांकडून .. खूप लाड करायचे ! …. पुढे पुढे बऱ्याच गोष्टी बदलल्या . मन्या १० वीत गेला त्यामुळे त्याचा अभ्यास वाढला , तंत्रज्ञानात अमूलाग्र प्रगती झाली , फॅक्स प्रकार येऊन गेला . इंटरनेटच्या युगात ईमेलचा वापर होऊ लागला , पत्र पाठवणं कमी झालं .. आणि एव्हाना “स्टेशनरीच्या दुकानात हव्या त्या देशाचे स्टॅम्प ५०-१०० रुपयांना विकत मिळू लागले”. या सगळ्यांमुळे स्टॅम्प जमवण्यातली पूर्वीची मजा आता उरली नाही . आताशा मन्याची ती डायरीवजा स्टॅम्पवही त्याच्या कप्प्यात, एका कोपऱ्यात पडून राहिली.

एखादं वर्ष गेलं असेल आणि कुठल्याशा आजाराचं निमित्त होऊन “स्टॅम्प आजोबा” हे जग सोडून गेले. सगळं अचानक घडल्यामुळे आजोबांच्या मुलाला लगेच अमेरिकेतून निघणं शक्य झालं नाही. ३-४ दिवसांनी कॉलेज कुमार मन्या त्याच्या आई बरोबर सकाळी आजीना भेटायला आणि नाश्ता द्यायला गेला. “स्टॅम्प आजोबा” गेल्याचं साहजिकंच त्याला खूप वाईट वाटलं होतं . स्टॅम्पच्या निमित्ताने एकदम मित्रासारखं नातं झालं होतं एकमेकांचं. मन्या स्टॅम्प आजोबांच्या फोटोच्या बाजूला ठेवलेल्या खुर्चीत बसला आणि त्याची आई आज्जीजवळ सोफ्यावर. आईनी कुतुहलाने आजींना विचारलं “ अमेरिकेतली मंडळी निघाली का ? कधी येतायत ?? .. त्याक्षणी आज्जी रडायलाच लागल्या .. “ ते कसले येतायत गो ?? काय सांगू तुला आता ?? केव्हाच संबंध तोडलेत त्यानी. ३-४ वर्षांसाठी म्हणून गेला .. आता तिथेच राहणार म्हणतो .. खूप बदलला गं लेक आमचा ..कशात आडकाठी केली नाही आम्ही .. लग्न सुद्धा त्याच्या मनाप्रमाणे तिकडेच केलं …भारतात काय ठेवलंय म्हणतो … आम्ही गेलो होतो तिकडे तेव्हाच वाजलं बाप-लेकांचं खूप .. तो वाट्टेल तसं बोलला यांना .. दोन-अडीच वर्ष झाली बघ आता .. आम्ही जाऊन आल्यापासून आजवर काहीही संपर्कच नाही…… नातू झाल्याचं तोंडदेखलं कळवलं , तेव्हढं एकदाssच काय ते !… बाकी इतक्या वर्षांत “एक साधं पत्र नाही” की फोन नाही !!!!” … हे sss वाक्य ऐकताच मन्या एकदम चपापलाच …“पत्र नाही ??? मग आजोबा ते स्टॅम्प द्यायचे मला अधून मधून ते ????…. मन्याने आश्चर्याने विचारलं..

आजी म्हणाल्या .. “ ये रे बाळा मन्या ये sss !! असा माझ्यापाशी बस .. असं म्हणत जवळ आलेल्या मन्याला सोफ्यावर आपल्या बाजूला बसवत , त्याच्या गालावर , केसावरून प्रेमाने हात फिरवत आज्जी पुढे सांगू लागल्या .. “ आता सगळं समजण्याएव्हढा मोठा झालायस रे तू !.. अरेss तुला देण्यासाठी खंडीभर स्टॅम्प अमेरिकेतूनच घेऊन आले होते तुझे “स्टॅम्प आजोबा” .. तुझ्यावर खूप जीव रे त्यांचा .. पण तिकडे हे सगळं असं झालं ss .. मग म्हणाले आता काही पत्र येतील असं वाटत नाही .. म्हणून तेच आणलेले स्टॅम्प थोड्या थोड्या दिवसांनी तुला द्यायचे .. नवे-कोरे कळू नयेत म्हणून कधीकधी थोडे मळवून-चुरगळून द्यायचे .. आपल्या नातवंडाचे लाड काही करता येत नव्हते .. तुझ्यातच नातवाला बघायचे आणि खाऊ सुद्धा आणायचे तुझ्यासाठी .. ते स्टॅम्प संपले तेव्हा बाजारातली कितीतरी दुकानं पालथी घालून स्टॅम्प विकत घेतले .. मग थोडे दिवस त्यातले दिले .. तुझ्या छंदात आनंद शोधत होते रे ते .. त्यानाही सवय झाली होती तुझी आणि त्या स्टॅम्पची .. पण आतून खचले होते बिचारे .. तू मात्र आई-बाबांना कधीही सोडून जाऊ नकोस रे मन्या !!!” ..

मन्याच्या आईच्या डोळ्यात पाणी आलंच .. मन्याही थोडा भावूक झाला . स्टॅम्पसारख्या फुटकळ गोष्टीसाठी आणि स्वतःवर दुःखाचा इतका मोठा डोंगर कोसळला असूनही ; केवळ मला वाईट वाटू नये , मला माझ्या छंदाचा आनंद मिळावा यासाठी आजोबांनी इतक्या तडजोडी केल्या .. यासाठी थोडं अपराधीही वाटत होतं .. पण सगळं “जीव ओतून” आणि “जीव लावून” केलं होतं हेही समजत होतं … स्टॅम्प आजोबांबद्दल आदर अजूनच वाढला त्याचा.. पण अर्धवट वयातल्या मन्याला त्याच्या अशा मानसिक अवस्थेत आजींसमोर कसं व्यक्त व्हावं हेच कळत नव्हतं ……. तो तडक उठला , धाडधाड पायऱ्या उतरत खाली आपल्या घरी आला .. स्टॅम्प वही काढली .. त्यातलं अमेरिकेचं पान काढलं … आजवर आजोबांनी दिलेले सगळे स्टॅम्प लावलेल्या त्या पानाकडे बघत , तेव्हाचे किस्से , संभाषण आठवत अक्षरशः ढसाढसा रडला ….

…………… आणि आज ३० वर्षानंतरही मन्या स्टॅम्पवहीच्या त्याच पानावर येऊन थबकला.. त्याच सगळ्या आठवणी ताज्या झाल्या … डोळ्यात पुन्हा कृतज्ञतेच्या आसवांनी गर्दी केली .. स्टॅम्प आजोबांच्या आठवणीने आलेल्या अश्रूंनी मन्याच्या डोळ्याची साथ सोडली आणि ओघळत येऊन त्याच आजोबांनी दिलेल्या एका स्टॅम्पवर ते विसावले … प्रत्येक अश्रुत आता फक्त आणि फक्त “स्टॅम्प आजोबा” तरळत होते ..

— ©️ क्षितिज दाते , ठाणे

Avatar
About क्षितिज दाते , ठाणे 79 Articles
केवळ एक हौस म्हणून लिखाण सुरू केलं . वेगवेगळ्या विषयांवर पण साध्या सोप्या भाषेत लेखन . आकाशवाणीवरील कार्यक्रमात काही लेखांचं प्रसारण झालं आहे .काही लेख/कथा पॉडकास्ट स्वरूपात देखील प्रसारित झाल्या आहेत . Snovel या वेबसाईट / App वर "सहज सुचलं म्हणून" या शीर्षकाखाली तुम्ही ते पॉडकास्ट ऐकू शकता.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..