नवीन लेखन...

श्रीपाद श्रीवल्लभ महाराज, कुरवपूर

श्रीपाद श्रीवल्लभ यांची माहिती दत्तसंप्रदायाचा वेदतुल्य ग्रंथ जो ‘गुरुचरित्र’ त्याच्या पाच, आठ, नऊ व दहा या चार अध्यायात आलेली आहे. त्यापलीकडे त्यांची माहिती इतर कोठल्याही ग्रंथात विशेष करून मिळत नाही. काही वर्षांपूर्वी प्रसिद्ध झालेल्या श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृतामधुन त्यांचे चरित्र सर्वश्रुत झाले आहे. श्रीगुरुचरित्र ज्यांनी लिहिले त्या श्रीसरस्वती गंगाधरांचा हेतू श्रीनृसिंहसरस्वतींची लीला वर्णन करण्याचा असल्यामुळे श्रीपादश्रीवल्लभांची माहिती त्यात केवळ पूर्वपीठिका सांगण्यापुरतीच आलेली आहे.

श्रीपादश्रीवल्लभांचा जन्म मद्रास प्रांतातील पीठापूर या गावी झाला. त्या गावात आपस्तंब शाखेतील आपळराज या नावाचा एक ब्राह्मण राहत असे. सुमता हे त्यांच्या साध्वी स्त्रीचे नाव!

एकदा अमावास्येच्या दिवशी त्यांचे घरी श्राद्ध होते. त्यावेळी मध्यान्ह काळी श्रीदत्त अतिथिवेष घेऊन त्यांचे घरी गेले. ‘नानावेष भिक्षुकरूप। दत्तात्रेय येती साक्षेप।’ अशी श्रीदत्तात्रेयांची प्रसिद्धी पूर्वीपासूनच आहे. श्रीदत्तात्रेय आपळराज ब्राह्मणाच्या घरी गेले त्यावेळी श्राद्धकर्मासाठी आलेल्या ब्राह्मणांचे भोजन व्हावयाचे होते. ते झाल्याखेरीज अतिथीला भोजन घालणे शास्त्रनियमांच्या विरुद्ध होते. परंतु त्या तेजःपुंज अतिथीला विन्मुख पाठविणेही सुमतेला योग्य वाटले नाही व तिने अगत्याने त्या अतिथीला भिक्षा घातली.

त्यावेळी तिची उत्कट श्रद्धाभाव पाहून प्रभू दत्तात्रेयांनी आपले निजस्वरुप प्रकट करून तिला म्हटले, ‘माते, तुझ्या भिक्षेने मी संतुष्ट झालो आहे. तुला काय हवे असेल ते माग.’ त्यावर सुमता समयसूचकतेने म्हणाली, ‘मला आपण ‘माते’ असे म्हणालात. तेव्हा तेच आता खरे करून दाखवा.

त्यावर प्रभूंनी प्रसन्न हास्य करून ‘तथास्तु!’ असा आशीर्वाद दिला व ते गुप्त झाले. अशा प्रकारे अमावास्येला अतिथिपूजन घडले आणि सुमताजननीचे पोटी लवकरच बिजेच्या चंद्राप्रमाणे श्रीपाद जन्मास येऊन चंद्रकलेप्रमाणे वाढू लागले. सातव्या वर्षी त्यांचे मौंजीबंधन झाले व तेव्हापासून चतुर्वेद, मीमांसा, तर्क यावर ते अधिकारवाणीने भाष्य करू लागले. त्यामुळे ते जणू ज्ञानसूर्यच आहे असे सर्वांना वाटले! वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांच्या लग्नाचा प्रश्न निघाला. त्यावेळी श्रीगुरू हसून म्हणाले, ‘वैराग्य हीच माझी स्त्री असून अन्य स्त्रिया मला मातेसमान आहेत.’ त्याच वेळी ‘जाणे असे उत्तरपंथा। दीक्षा द्यावया साधुजना।’ असे आपले अवतारकार्य असल्याचेही श्रीगुरूंनी स्पष्ट केले व त्यासाठी आपल्याला उत्तरपंथाला जाऊ देण्याची परवानगी त्यांनी आपल्या वडिलांजवळ मागितली. परंतु या सर्वशास्त्र प्रवीण, विद्वान व गुणी मुलाचा विरह त्याच्या माता-पित्यांना सहन होणेच शक्य नव्हते कारण त्यांची इतर मुले आंधळी, पांगळी व मूढ होती. त्यामुळे हा निघून गेल्यावर आपले रक्षण कोण करील अशी शंका त्यांनी श्रीगुरूंजवळ बोलून दाखविली. त्यावर श्रीगुरूंनी आपल्या चंद्राप्रमाणे शीतल अशा अमृतदृष्टीने त्या मुलांकडे पाहिले. त्याबरोबर ती मुले विद्वान आणि अव्यंग झाली!

नंतर माता, पिता व बंधू यांचा निरोप घेऊन श्रीगुरू तत्काळ अदृश्य झाले व श्रीक्षेत्र काशी येथे मनोवेगाने जाऊन तेथे गुप्तरुपाने राहिले. तेथून पुढे बद्रिकाश्रमी नारायणाचे दर्शन घेऊन ते यथाक्रम गोकर्णास आले. तेथे तीन वर्षे राहून ते कुरवपुरास प्रकट झाले. तेथे अंबिका नावाची एक विधवा स्त्री, आपला एकुलता एक मुलगा अत्यंत मूढ निघाला म्हणून जीवनाला वैतागून गंगेत मुलासह देहत्याग करण्यास सिद्ध झाली होती. श्रीगुरूही त्यावेळी गंगास्नानासाठी आले होते. त्यांची तेजोमय, प्रसन्न मूर्ती पाहून देहत्यागापूर्वी त्यांचे दर्शन घ्यावे असा विचार करून अंबिका मुलासह त्यांचेजवळ आली व आपला प्राणत्यागाचा हेतू सांगून तिने त्यांना म्हटले, ‘गुरुमहाराज, पुढच्या जन्मी तरी तुमच्यासारखा ब्रह्मज्ञानी व सर्वांना पूज्य असा पुत्र मला होऊ दे.’ त्यावर श्रीगुरूंनी ‘प्रदोष काळी श्रीशंकराची आराधना केल्यास तुझी मनोकामना पूर्ण होईल’ असे तिला सांगितले. श्रीगुरूंनाच पुढे श्रीनृसिंहसरस्वती या नावाने अवतार घ्यावयाचा होता व त्या अवताराची ही पार्श्वभूमी अशा प्रकारे तयार झाली होती आणि ही पार्श्वभूमी सांगण्यापुरतेच श्रीपादश्रीवल्लभांचे चरित्र श्रीसरस्वती गंगाधरांनी आपल्या ग्रंथात दिलेले आहे. ‘आणिक कार्य कारणासी। अवतार घेऊ परियेसी । वेष धरूनि संन्यासी । नामनृसिंहसरस्वती।’ या ओव्या या दृष्टीने चिंतनीय आहेत.

त्याच गावात घडलेल्या आणखी एक विचित्र घटनेचे धागेदोरे श्रीगुरूंच्या पुढील अवतारपटाशी जोडले जावयाचे होते. त्या गावात एक म्हातारा रजक (धोबी) राहात होता. रोज प्रातःकाळी घाटावर आल्यानंतर त्याला श्रीगुरूंचे दर्शन घडत असे. त्यांच्या दिव्य, प्रसन्न व तेजोमय मूर्तीला रोज भक्तिभावाने नमन करून तो आपले दैनंदिन काम सुरू करीत असे. एक दिवस त्याच्या उत्कट भक्तिभावावर संतुष्ट होऊन, ‘सुखे राज्य करी आता’ असा आशीर्वाद श्रीगुरूंनी त्याला दिला. त्या रजकाने हे राज्योपभोग आपण पुढील जन्मी भोगू असे श्रीगुरूंना विनम्रपणे सांगितले. तेव्हा ‘तू पुढील जन्मी राजा होऊन मला भेटशील’ असा त्यास त्यांनी वर दिला.

या हकिगतीवरून असे स्पष्ट दिसते की, ‘वासना’ या मोक्षमार्गात अडथळा निर्माण करतात. त्या दरिद्री रजकाला, गंगेत जलक्रीडा करणाऱ्या राजाचे वैभव पाहून राज्योपभोगाची वासना निर्माण झाली. ती वासना ओळखूनच श्रीगुरूंनी ‘तू राजा होशील’ असा वर त्यास दिला, वासनांचा क्षय केवळ हट्टाने होत नाही, तो भोगूनच करावा लागतो. ‘निववावी इंद्रिये सकळ। ना तरी मोक्ष नव्हे निर्मळ बाधा करिती पुढती केवळ जन्मांतरी परियेसा।।’ या ओव्यांचे मर्म हेच आहे.

त्यानंतर आश्विन वद्य १२ शके १३५० या दिवशी श्रीगुरू गंगेत अदृश्य झाले. परंतु त्यानंतरही आपण अदृश्य रूपाने भक्तांच्या पाठीशी उभे आहोत याचे प्रत्यंतर दाखविण्यासाठी श्रीगुरूंनी वल्लभेश नामक एका भक्ताला चोरांच्या हल्ल्यातून वाचविल्याची एक आश्चर्यकारक कथा गुरुचरित्रात आली आहे. श्रीपादश्रीवल्लभ यांचेविषयी श्रीगुरूचरित्रांत यापेक्षा अधिक माहिती मिळत नाही. तथापि त्यांनीच पुढे ‘नृसिंहसरस्वती’ या नावाने नवा अवतार धारण केला, अशी दत्तोपासकांची दृढ श्रद्धा आहे व तिला पोषक असे अनेक भक्कम पुरावे श्रीनृसिंहसरस्वतींच्या दिव्य चरित्रांत पाहावयास मिळतात.

-लेखन: कै. वि. के. फडके.
सौजन्य साभार: श्रीगजानन आशिष –
दिवाळी अंक १९९३

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..