नवीन लेखन...

‘सर’ – हाथ से छूके इसे रिश्तों का इल्ज़ाम न दो !!

गुलज़ार महोदय “खामोशी” त म्हणून गेले- ” प्यार को प्यार ही रहने दो कोई नाम न दो I” लताने आपल्या तलम आवाजात त्याचं भरजरी सोनं केलं. पण हे आख्ख गाणं चक्क एक नितांतसुंदर, हळुवार चित्रपट बनून पडद्यावर येईल हे त्याकाळी गुलज़ार /लता /वहिदा /हेमंतकुमार यांच्या दूरवरच्या स्वप्नातही आलं नसावं.

ते नेटफ्लिक्स ने तिलोत्तमा आणि विवेकच्या माध्यमातून जिवंत केलं – जगभरातील फेस्टिवल्स मध्ये कौतुक झेलून हा चित्रपट सध्या “टॉक ऑफ द टाऊन ” बनलाय.

लग्न मोडलेला तरुण एकटा मालक आणि त्याची तरुण विधवा मोलकरीण – जगरहाटीकडे दुर्लक्ष्य करीत एका छताखाली राहतात.तो तिचा आत्मसन्मान जपत असतो आणि ती त्याचे उध्वस्त खासगीपण ! अधून-मधून त्याला सावरतही असते- ” जीनेमे क्या जाता हैं ?” म्हणत.
तो क्षणिक वाहवला तरी ती खडकासारख्या सरी/लाटा झेलत अभेद्य – ” मला फरक पडतो नं !” असं त्याला स्पष्ट बजावत. ” मी काही इथे तुमची रखेल बनून राहण्यासाठी आलेले नाही, मला फॅशन डिझायनर व्हायचंय ” इतकी क्लॅरिटी तिच्याकडे आहे आणि जमिनीला चिकटलेले पाय अजिबात सोडायची तिची तयारी नाही.

मालकाच्या अनुपस्थितीत त्याच्या फुल साईझ आरश्यासमोर नव्या ड्रेसची ट्रायल घेताना तो अचानक आल्यावर ती सहज म्हणते- ” आज पहिल्यांदाच तुमच्या अपरोक्ष तुमच्या खोलीत आले. माझ्याकडे मोठा आरसा नाहीए. आणि हो इतर मोलकरीणींप्रमाणे तुम्ही नसताना मी दिवसभर टीव्ही लावून बसत नाही. ”

अशा प्रसंगांमधून तो तिच्याबद्दल वेगळा विचार करू लागतो. तिच्या सच्चेपणाची , तिच्या धडपडीची त्याला जाणीव होते. तो मग तिला बहिणीच्या लग्नासाठी आर्थिक मदत देतो, तिला शिवण यंत्र आणून देतो. प्रत्येकाचे एक स्वप्न असते, असावे याचा नकळत आदर करतो. तीही त्याला वाढदिवसानिमित्त शर्ट देते. नवा शर्ट घालून तो कामावर जायला निघतो तेव्हा ती बजावते- ” मी दिलाय हे कोणाला सांगू नका.”

अशी छोटी छोटी गुंतवणूक पण माणूसपण सांभाळत होणारी. गणेशविसर्जन मिरवणुकीत तिला बेभान होऊन नाचताना तो बघतो आणि हरखतो. पार्टीतल्या गेस्टला झापत तिचे स्थान जपतो. ” माणसाने माणसाशी माणसा सम वागणे ” हे तत्व न कळत पाळतो. नोकरमंडळी जेवत असताना तो तिला काही विचारायला आल्यावर “सगळे मला हसत होते ” असं ती त्याला सुनावते. त्याच्या हे गांवीही नसतं म्हणून तो माफी मागतो.

मित्राच्या हितोपदेशाकडे दुर्लक्ष करीत जेव्हा तो हटवादीपणे तिच्या मागे लागतो, तेव्हा ती लक्ष्मणरेषा आखते- ” सर, असला वावदूकपणा मला शक्य नाही. माझ्यासारखीला सासरच्यांनी तुमच्याकडे काम करायची परवानगी दिली आहे कारण त्यामुळे घरातील एक खाणारे तोंड कमी झाले आणि मी दरमहा त्यांना ४०००/- रू पाठवीत आहे म्हणून ! ही रसद बंद झाली तर ते मला केसांनी खेचत, फरफटत घरी नेतील.”

शांतपणे ती त्याचे घर (आणि घरकाम )सोडते आणि बहिणीकडे जाते. शेवटी तिला एके ठिकाणी तिच्या आवडीचे काम मिळते आणि तो अमेरिकेला परतलाय हे माहित नसल्याने ती त्याच्याकडे येते आणि चित्रपट संपतो. मात्र तिचा “स्व” जपला गेल्याने आता ती फोनवर त्याला चक्क नांवाने – ” अश्विन ” म्हणून हाकारते.

प्रचंड खरे अभिनय, सशक्त कथानक, गोळीबंद प्रसंगांची आखणी आणि पार्श्वभूमीला मूल्यांची जपणूक सारं २०२१ मधलं वाटतच नाही. माणसं जवळ आली की नात्यांच्या गाठी होणारच, पण त्याही हळुवार हातांनी (अगदी प्रेक्षकांनाही न दुखावता ) हा चित्रपट सोडवतो.

मी पांढऱ्या पडद्यावर पाहिलेली पहिली गुंतागुंतीची कविता – ” बाजार “, दुसरी “इजाजत ” आणि प्रदीर्घ खंडानंतर कालची “सर !”
दरवेळी स्त्री पात्रांची सरशी करणारी आणि त्याला समर्थपणे दाद / साथ देणारी पुरुषपात्रांची !

— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे 

डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
About डॉ. नितीन हनुमंत देशपांडे 378 Articles
शिक्षणाने अभियंता, व्यवसायाने व्यवस्थापन सल्लागार, आवडीने लेखक ! माझी आजवर अकरा पुस्तके ( ८ मराठीत, २ इंग्रजीत आणि १ हिंदीत) प्रकाशित झालेली आहेत. आणखी चार पुस्तकांवर काम सुरु आहे. सध्या दोन मराठी वृत्तपत्रात साप्ताहिक सदर लेखन सुरु आहे. कथाकथन,काव्यवाचन, वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धांमध्ये राज्यपातळीवर सहभाग आणि पारितोषिके !

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..