नवीन लेखन...

साहित्यिक पत्रकारिता

मराठी साहित्य परंपरेला पत्रकारितेचा परिसस्पर्श झाला आणि साहित्य सृष्टी सुवर्णकांती प्रमाणे झळाळू लागली. साहित्य वाचकांशी संवाद साधणारं एक प्रमुख साधन. साहित्याच्या वेगवेगळ्या प्रांगणातून मुक्त संचार करीत वाचक आणि लेखक परस्परांशी संवाद साधतात. लेखकाच्या भावभावनांना, त्याच्या विचारांना वाचकांच्या हृदयापर्यंत पोहोचणारं एक प्रभावी माध्यम म्हणजे साहित्य रचना. साहित्य हे केवळ शब्द आणि कल्पनेच्या दुनियेत वावरत नसते तर समाज आणि जनतेशी जोडलेले असते. पत्रकारिता हे समाज आणि साहित्य यांना जोडलेला दुवा आहे म्हणून पत्रकारिता आणि साहित्य एकमेकांना पूरक आहेत.

मराठी साहित्याला मराठी पत्रकारितेने समृद्ध केले आहे. विष्णुशास्त्री चिपळूणकर, लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर, शि. म. परांजपे, ग.त्र्यं. माडखोलकर, आचार्य प्र. के. अत्रे,. ह. रा. महाजनी अशा अनेक आधुनिक मराठी वाड्मयातील विचारवंतांचे महत्त्वाचे लिखाण नियतकालिकातून प्रसिद्ध झालेले आहे. किंबहुना या लेखक श्रेष्ठींनी आपले विचार लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ग्रंथ माध्यमापेक्षा नियतकालिकातील लेखनाच्या माध्यमाचा आधार घेतला. इंग्रजी वाड्.मयाच्या परिचयानंतर आधुनिक मराठी साहित्याचे निबंध, लघुकथा, कादंबरी, कविता इत्यादी साहित्य प्रकार प्रथम मराठी नियतकालिकातूनच प्रसिद्ध होऊन मान्यता पावलेले आहेत. लोकजागृती, समाजशिक्षण, लोकप्रबोधन यासाठी सुरुवातीच्या काळात पत्रकारिता प्रयत्नशील होती.

स हित ते साहित्य. वैचारिक लेखन, प्रवचन, जनहित दृष्टी पुढे ठेवून केले जाणारे हितावह आणि हितासह असणारे वैचारिक वाड्मय म्हणजे साहित्य होय. ह. ना. आपटे यांनी ‘शिक्षण देणे, मनोविकार विचार जागृती आणि मनोरंजन असे वाड्मयाचे हेतू सांगितलेले आहेत. आचार्य अत्रे यांनी साहित्याची लोकरंजन, लोकशिक्षण आणि लोक जागृती ही कार्य आहेत असे म्हटले आहे. केवळ मनोरंजन हे साहित्याचे उद्दिष्ट न मानता समाज जीवनावर प्रकाश पाडून त्या जीवनातील प्रागतिक प्रवृत्तींचा पुरस्कार करणे हा ललित साहित्याचा हेतू असावा असे म्हटले आहे. रंजन भावनांचा कलात्मक आविष्कार, जीवनातील अनुभवांचे प्रकटीकरण, परिपूर्ण ज्ञान याबरोबरच उपदेश, लोकजागृती, उच्च ध्येयाची पूर्ती यासाठी साहित्याची निर्मिती होत असते.

स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये वृत्तपत्र हे जनता जागृतीचे आणि क्रांतीचे एक बलाढ्य साधन होते. पारतंत्र्याच्या अंधारात जनतेला उजेड दाखवण्यासाठी पत्राची मशाल पेटवून हाती घेतली होती. सामाजिक परिवर्तन आणि स्वातंत्र्यप्राप्ती ही त्या काळाची गरज होती, त्यातूनच वृत्तपत्रांचा जन्म झाला. मराठी वृत्तपत्रांचा इतिहास पाहिल्यास वृत्तपत्रांनी प्रबोधन, सामाजिक सुधारणा, राजकीय जागृती, सामान्य माणसाला हक्क मिळवून देण्यासाठी केलेला संघर्ष आहे. यामध्ये अनेक स्थित्यंतरे झाली आणि वृत्तपत्रसृष्टी बहरली आणि प्रवाहित झाली. मराठी वृत्तपत्रसृष्टी आणि मराठी साहित्य यांचा जेव्हा आपला अभ्यास करतो तेव्हा असे आढळून येते की वृत्तपत्राच्या माध्यमातूनच मराठी साहित्याचा उदय झाला आहे. मराठीतील नामवंत लेखकांनी आणि विचारवंतांनी वृत्तपत्र आणि नियतकालिके ही माध्यमे साहित्य निर्मितीसाठी वापरली. मराठीतील पहिले वृत्तपत्र ‘दर्पण’ चा साहित्य दृष्टया विचार करता मराठी भाषेला सुस्पष्ट व बांधेसूद बनविण्याचा प्रयत्न केला. दर्पण च्या रूपाने नियतकालिक हा नवा प्रकार मराठीत रूढ झाला. ग्रंथांची परीक्षणे कशी करावीत, सडेतोड विचार कसे व्यक्त करावेत याचा आदर्श दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांनी घालून दिला. १८४० मधील ज्ञानचंद्रोदय मासिकातून कृष्ण लीलामृत ग्रंथ क्रमशः प्रसिद्ध होत असे. ज्ञानप्रकाश मधून काव्यशास्त्रविनोद हे सदर लोकप्रिय झाले होते. पुस्तकांवर अभिप्राय देण्याची प्रथा तत्कालीन वृत्तपत्रातून आढळते. हरी नारायण आपटे यांच्या करमणूक या वृत्तपत्रातून पण लक्षात कोण घेतो सारखी कादंबरी प्रसिद्ध होत होती. केशवसुतांच्या कविता करमणूक मधूनच प्रसिद्ध होत. काही सामाजिक आणि ऐतिहासिक मिळून आठ कादंबऱ्या बारा वर्षात वाचकांना दिल्या. सुमारे चारशे कविता, चारशे चटकदार गोष्टी असे भरगच्च साहित्य करमणूक मधून प्रसिद्ध होत होते. त्याच सुमारास खास साहित्य रुची वाढावी म्हणून काही नियतकालिके, मासिके प्रसिद्ध झालेली दिसतात. आचार्य अत्रे यांचे नवयुग, ना. सी. फडके यांचे झंकार साप्ताहिक यातून साहित्य चळवळींची चर्चा आढळते. प्रतिभा या नियतकालिकातून यशवंत यांनी आपल्या कविता लिहिल्या. साहित्य विचाराला वाहिलेले अग्रगण्य मासिक म्हणजे नवभारत व सत्यकथा. या मासिकांचे साहित्य प्रकारांवरील विशेषांकही विशेष गाजले. वृत्तपत्रसृष्टीमुळे साहित्यसृष्टीही बहरली.

साहित्य हे समाजात निर्माण होते त्यामुळे समाजाचे प्रतिबिंब साहित्यामध्ये उमटलेले दिसून येते. मराठी पत्रकारिता आणि मराठी साहित्य हे एकाच कालखंडात उदयाला आले आहे यावरून दिसून येते. मराठी साहित्याचा जन्म हा तत्कालीन वृत्तपत्रातून झाला हा गौरवशाली इतिहास आपण लक्षात घेतला पाहिजे.

साहित्य आणि पत्रकारिता या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. दोन्हींचा प्रमुख हेतू सत्याचा शोध घेणे हाच आहे. माहिती आणि लोकशिक्षणाबरोबर जी पत्रकारिता साहित्य विषयांना प्राधान्य देते ती साहित्यिक पत्रकारिता होय. साहित्यविवेचन समीक्षण करणारी पत्रकारिता म्हणजे साहित्य पत्रकारिता. मराठी वृत्तपत्रसृष्टीला साहित्यिक पत्रकारांची तेजस्वी परंपरा आहे. प्रखर परखड आणि तितकीच हृदयस्पर्शी भाषाशैली हे गोपाळ गणेश आगरकर यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य होते. उपमा, अलंकार, संस्कृत वचने यांचा यथायोग्य वापर ते करीत असत. काळकर्ते शिवराम महादेव परांजपे हे संस्कृत साहित्याचे पंडित होते. काव्यकल्पना, अलंकार यांचे आकर्षक कोंदण प्रत्येक विषयाला चढवायचे हे त्यांच्या अग्रलेखांचे प्रमुख वैशिष्ट्य होते. याच परंपरेतील साहित्यिक पत्रकार म्हणजे ग.त्र्यं. माडखोलकर. साहित्यिक गुणांनी उतरलेले पल्लेदार अग्रलेख हे माडखोलकर यांचे वैशिष्ट्य. लोकसत्ताचे संपादक विद्याधर गोखले यांचे संपादकीय लेखन हे रंजकतेकडे झुकणारे होते. राजकीय लेखन करतानाही ते लेखन साहित्यिक शैलीने नटवण्याची त्यांची वृत्ती होती. आचार्य अत्रे, पु.भा भावे, ग. दि. माडगूळकर, ना. सी. फडके यांच्या मृत्यूनंतर त्यांनी लिहिलेले अग्रलेख चिरंतन स्वरूपाचे आहेत. साहित्यिक पत्रकारितेमधील एक महत्त्वाचे पत्रकार म्हणजे लोकसत्ताचे माजी संपादक माधव गडकरी. वैचारिक लेख लालित्यपूर्ण करण्यात त्यांचा हातखंडा होता. गुलमोहराची पाने हे त्यांचे सदर साहित्यिक पत्रकारितेचे उत्तम उदाहरण आहे. कवी, विडंबनकार, शिक्षक, नाटककार, कथाकार, वक्ता, चित्रपटकार या सर्वांचा संबंधित वारसा हे आचार्य अत्रे यांच्या पत्रकारितेचे वैशिष्ट्य होते. अत्रेय पत्रकारितेने काही नवीन साहित्यप्रकार दिले आणि त्यांच्या साहित्याने नव्या देणग्या पत्रकारितेला दिल्या.

सामान्य माणूस आणि साहित्य यांची जवळीक त्यांनी साधली. समाज व साहित्य यांना जोडणारा वृत्तपत्रीय पूल म्हणजे अत्रेय मृत्युलेख होय. आपल्या अष्टपैलू साहित्याचे कर्तृत्व त्यांनी पत्रकारितेला बहाल केले होते. वृत्तपत्र व्यवसायात मी माझे हृदय कधीही गमावले नाही, हे माझ्या वृत्तपत्रीय जीवनाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे असे ते नेहमी म्हणत.

या नंतरच्या काळात ज्येष्ठ संपादक गोविंद तळवलकर, दिलीप पाडगावकर, अरुण साधू आणि ह. मो. मराठे यांनी पत्रकारितेसह साहित्य आणि विचारविश्वातही मूलभूत काम केले. तसेच स्वतःची रूची ओळखून वेगळ्या वाटा कशा निर्माण करायच्या याचा वस्तूपाठच त्यांनी घालून दिला. पत्रकारिता व साहित्य या दोहोंमधलं भान सजगपणे जपणाऱ्या संपादकांनी हा वारसा अखंड जपला.

आधुनिक युगात पत्रकारिता ही केवळ वृत्तपत्रांपुरती सीमित राहिलेली नाही. नभोवाणी, दूरचित्रवाणी व्हिडिओ पत्रकारिता, इत्यादी पत्रकारितेची विविध रूपे आहेत. साहित्य आणि पत्रकारिता याचा विचार करता मुद्रित माध्यमाबरोबरच इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा विचार करणे आवश्यक आहे. दूरचित्रवाणी, आकाशवाणी या माध्यमांनीही या विषयाला स्थान दिल्याचे आढळते. साहित्यकृतींवर आधारित मालिका प्रसारित करण्यात आल्या. यात प्रामुख्याने पौराणिक महाकाव्यावर आधारित रामायण-महाभारत, रणजित देसाई यांची स्वामी, आर. के. नारायण यांचे मालगुडी डेज अशा मालिकांचा उल्लेख करावा लागेल. हा प्रवाह आजही चालू आहे. दूरदर्शन वरील प्रतिभा आणि प्रतिमा या कार्यक्रमाने ही एक विशेष ओळख निर्माण केली. आकाशवाणीवरूनही साहित्यकृतींचे क्रमशः वाचन चालू असते.

साहित्य आणि पत्रकारितेने जरी हातात हात गुंफून वाटचाल केली असली तरी आज तिचे स्वरूप बदलले आहे. पत्रकारिता आणि साहित्य यात मोठे अंतर निर्माण झाले आहे. माध्यमे ही आजच्या व्यवहारी जगाचा आरसा आहेत तर साहित्य हे जनमानसाच्या आतील मनाचा आरसा आहे. माध्यमे ही वर्तमानाविषयी विशिष्ट किंवा तोकड्या वेळेत झालेल्या आकलनावर बोलण्याचा प्रयत्न करतात तर साहित्य ही दीर्घकालीन आणि अनुभवाच्या पातळीवर रुजेलेल्या आकलनावर होणारी निर्मिती आहे. माध्यमे जे सादर करतात, तो सामुहिक कृतीचा आविष्कार असतो आणि त्याला ते माध्यम, त्याला मिळणारा वेळ किंवा जागा, त्या माध्यमांची धोरणे अशा अनेक मर्यादा असतात. माध्यमांच्या रूपाने होणारी निर्मिती ही बहुतेक वेळा अल्पकाळ टिकणारी असते तर साहित्य निर्मिती मात्र दीर्घकाळ टिकते. अर्थात, साहित्य निर्मितीची ठिणगी पेटविण्याचे काम माध्यमे करू शकतात. आज साहित्य चळवळींनी जोर धरलाय याचं प्रतिबिंब माध्यमातूनच दिसून येतं. साहित्य आणि पत्रकारिता यांनी परस्परांना काय दिले हे निर्विवादपणे सांगणे कठीण असले तरी याचा शोध अखंडित आहे. ही दोन्ही माध्यमं एकमेकांचा हात गुंफूनच वाटचाल करीत गेले आणि दुसऱ्या हातातील थैल्यात घेतलेले पाथेय एकमेकांच्या थैलीत टाकत गेले मराठी साहित्य व पत्रकारिता यांना एकमेकांना पूरक असे साहित्य निर्माण व्हायला पाहिजे. मराठी साहित्यातील साहित्यिकांनी पत्रकारितेसाठी काम केले पाहिजे आणि मराठी पत्रकारितेत मराठी साहित्य अभिप्रेत आहे.

व्यास क्रिएशन्सच्या चैत्र पालवी 2019 या अंकात प्रतिष्ठा सोनटक्के यांनी  लिहिलेला लेख.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..