नवीन लेखन...

कोजागरी – कोण जागे आहे?

आम्ही साहित्यिक फेसबुक ग्रुपचे लेखक पार्थ जोशी यांचा लेख


‘पोर्णिमा’ ही समस्त जगातील प्रतिभावंतांची आदिम प्रेरणा झाली आहे. त्या एकमेवाद्वीतीय चंद्राच्या शीतल प्रकाशबिंदूंनी जणू प्रतिभेच्या कमळाला फुलण्याची अंतःप्रेरणा मिळते. ते शतदलकमल मग फुलून येतं मनस्वीपणे, चंद्रासारखंच!

म्हणून कुणीही कलावंत हा त्या चंद्रासाठी आर्त आसुसलेला चकोर वाटतो. ज्याची रात्र हेच आयुष्य असतं. अनेक अर्थांने!! त्याच्या आत अव्यक्ताचा कितीही प्रकाश असला तरी बाहेर अंधारच तर असतो! अनंत अंधार. त्याच अंधारात ध्यानस्थ असतो तो, स्वतःमधे. बाहेरचे अंधार निष्ठुरपणे भंग करु पहातात त्याची साधना. पण तो मात्र अविचल असतो चंद्राच्या ध्यासाने. आतले अंधार हे असतात जन्मापाशी नेणारे. गर्भजळातील अंधाराशी आणि विश्वब्रम्हांडाच्या आदिम काळोखाशी नातं सांगणारे.

तेच पाहात तो झटत असतो, आपल्या कलेच्या माध्यमातून ते अंधार प्रकाशून टाकण्यासाठी. अपुरेपणाचं हवहवसं दुःख तो रोज अनुभवत असतो नवेपणी. सोसण्याच्या याच सामर्थ्याने रोज खणतही जातो खोल.. खोल.. अस्तित्वाचे कृत्रिम पदर रोज उकलत आणि छाटतही जातो खंबीरपणे.

पण अंधाराला तहान लागली असते उजेडाची. असा उजेड, जो मिटवून टाकत नाही अंधाराचं अस्तित्व, पण बहरुन टाकतो अंधाराला! तेव्हा उजळून जातो अंधार, संपत नाही! मोहक होते रात्र, उतरत नाही!
अंधार दुय्यम नसतो हे खरंच, पण चंद्र हवा असणं अटळ असतं. त्याचं अस्तित्व मोलाचं वाटलं तरी वाटत नाही गरजेचं फार वेळा. म्हणून रात्रीलाही लागतातच की कित्तीक दिवस, स्वतःतून उगवून यायला, चंद्राची खुण शोधायला आणि प्रकट करायला.

कारण चंद्राशिवाय अपूर्ण असते रात्र. अगदीच. या अर्थाने तशा तर कितितरी रात्री अपूर्ण असतात. पण पोर्णिमेची पूर्णता आपल्याला भुरळ घालते. कारण आकर्षण हे अपूर्णत्वाचं पूर्णाकडेच तर असतं!

म्हणजे अपूर्ण आहे आपलीही रात्र!! तिच्यात चंद्र नाही अजून, हवाय तसा. चंद्र? आयुष्याच्या रात्रीलाही आस लागली असते चंद्राची. तोच तर आयुष्य अर्थपूर्ण करतो. पण कुठला चंद्र? तो असतो आपल्या जीवनाचा अर्थ.. तो शोधण्यातच संपत जाते रात्र पण एकदा सापडला, की ती उजळून जाते सबाह्य, पौर्णिमेच्या मोहक रात्रीसारखीच.

या भवरात्रीमधे भोगविलासांत रमत अथवा न संपणार्या कामकल्पनांमधे झुरत कुणीही निजू शकतं बेफिकीरपणे. पण हा अर्थ शोधत, आपला चंद्र शोधत कोण जागत आहे हेच तर देवी विचारते! ‘को जागरति?’ म्हणजे, कोण जागे आहे? आपल्या आतल्या प्रवासात, अंधार बाजूला सारत कोण प्रयत्न करत जागं आहे हे ती विचारते, पाहाते. जो जागा आहे त्याला चंद्रदर्शनाचं आश्वासनही देते आणि अर्थात् आशिर्वादही! कारण आपल्या रात्रीचा चंद्र म्हणजेच आपल्या आयुष्याचा अर्थ, हाच तर आपलं जीवन सौंदर्यपूर्ण करतो. कारण सौंदर्य हे ‘अर्था’तच असतं. मग तेव्हा त्याचा शोध हा अधिक सौंदर्यसंपन्न वाटू लागतो. जो जातो चंद्राच्या शोधात, त्याचं आयुष्य साधनेच्या वाटेवर होत जातं अधिक व्यापक, इतरांसाठी प्रेरक आणि तितकंच लोभसही! मग जेव्हा उमगतो आणि उगवतो आपला चंद्र तेव्हा फुलून येतो पूर्णत्वाचा उमाळा, इतक्या उत्कटपणे, की रात्रीचा मुळ अंधार आणि त्यावरिल शीतल चंद्रप्रकाश यांच्या संमिश्र रंगात तेजाळून जातं जीवनाचं आकाश. ज्यापुढे हात जोडतात लोक, आणि आपणही! शेवटला श्वास मग प्रकाश होऊन जातो, त्याच आकाशात.

म्हणूनच तर इतकी पिपासा असते चंद्राची. कारण त्याच्या असण्यातच सार्थक असतं जन्माचं. आयुष्याच्या अंधाराला तहान लागलीये त्या सोमदेवाची. वर म्हटल्याप्रमाणे, त्या कलावंताप्रमाणे आतला ‘तो’ झुरतो आहे व्याकुळतेने. अर्थाशिवाय त्याला शांती नाही. कारण जेव्हा गवसेल आयुष्याचा अर्थ (कदाचित यथामतीही!) तेव्हाच होईल सौंदर्याचा इंद्रियातीत साक्षात्कार. त्याचसाठी आतला चकोर आसुसला आहे, केव्हापासून!! त्याचं म्हणणं ऐकूयात. आपलाच अंतर्नाद क्षणभर अंतर्मुख होऊन ऐकूयात. तेव्हा आयुष्याच्या रात्रीला डोहाळे लागतील चंद्राचे. त्यासाठी सहनही करेल ती आतल्या कळा, जाग्या झालेल्या विरहाच्या वेदना. मग हळूहळू जाणवू लागेल चंद्र, आणि प्रकटेलही. आपला चंद्र तेव्हा आपल्यातूनच प्रकट होईल!

आपापल्या चंद्राचा शोध, आयुष्याच्या अर्थाचा शोध, हेच तर सांगतेय कोजागरी. त्याचा शोध घेण्यात आतल्या वाटेवर कोण जागं आहे हेच देवी विचारतेय.
“को जागरति?”
“को जागरति?”

— पार्थ जोशी
28parthjoshi@gmail.com

Avatar
About `आम्ही साहित्यिक' फेसबुक ग्रुप 280 Articles
आम्ही साहित्यिक या फेसग्रुप ग्रुपवरुन आलेले लिखाण. हा ग्रुप मराठीसृष्टीने बनवला आहे व त्यावरील निवडक साहित्य मराठीसृष्टीवर प्रकाशित केले जाते. मराठीतील हा एक लोकप्रिय आणि दर्जेदार साहित्यविषयक ग्रुप आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..