पृथ्वीचा ७० टक्के भाग सागराने व्यापला आहे. पृथ्वीवरील ५० टक्के जीवन महासागरात आहे आणि पृथ्वीवरील ८० टक्के जीवांना अन्न पुरवण्याचे काम सागर करतो, तर पृथ्वीवरील ऑक्सिजनचा ७० टक्के पुरवठा सागरी वनस्पती करतात. अशा या उपयुक्त महासागरावर अनेक माहितीपट, लघुपट व चित्रपट निर्माण केले गेले आहेत. जनजागृतीचे हे उत्तम साधन आहे. समुद्राचे स्वरूप, मानवी हस्तक्षेपामुळे निर्माण झालेल्या समस्या, त्या सोडविण्याचे मार्ग आणि नवीन समस्या निर्माण होऊ नयेत, म्हणून घेता येण्यासारखी काळजी इत्यादी माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यात चित्रपट व माहितीपट मोठा हातभार लावतात.
या माहितीपट, लघुपट आणि चित्रपटांचे सागर, सागरी जीव, सागरी प्रदूषण, सागरातील सौंदर्यस्थळे, सागरी प्रकल्प, सागर सफरीच्या शौर्यकथा आणि अनोख्या सागर सफरी असे अनेक विषय आहेत. ‘ब्ल्यू प्लॅनेट’ भाग १ व २, ‘द लिव्हिंग सी’, ‘प्लास्टिक ओशन’, ‘मिशन ब्ल्यू’, ‘रेसिंग एक्स्टिंक्शन’, ‘शी इज द ओशन’, ‘चेसिंग कोरल’, ‘डॉल्फिन रीफ’, ‘शार्क वॉटर एक्स्टिंशन’, ‘एंड ऑफ द लाइन’, ‘वॉट्सन’, ‘डॉल्फीन रीफ’, ‘द लास्ट ओशन’, ‘एक्स्टिंशन सूप’, ‘चेसिंग आइस’, ‘अ लाइफ ऑन अवर प्लॅनेट’ इत्यादी चित्रपटांतून समुद्राची ओळख अत्यंत सुरस पद्धतीने करून देण्यात आली आहे. समुद्राविषयीच्या चित्रपटांची संख्या फार मोठी आहे. त्यातील काहींची थोडक्यात माहिती जाणून घेऊ या…. ‘ब्ल्यू प्लॅनेट’ १ आणि २ या चित्रपटांत महासागरांचे सौंदर्य, त्यातील रंगीबेरंगी जीवसृष्टी, आजूबाजूची निसर्गसृष्टी, सागराची महाशक्ती आणि सागराने मानवावर केलेली जादू या दोन भागांतून दाखवलेली आहे. ती दाखवत असताना डेव्हिड अटेनबरो यांनी त्यांच्या ओघवत्या वाणीने धावते वर्णन करून उपयुक्त माहितीची जोड दिली आहे. त्याचबरोबर हे महासागर कसे प्रदूषित झाले आहेत, कोणकोणत्या संकटातून जात आहेत, मानवाने स्वतः उपयुक्त सागर धोकादायक कसे केले आहेत, हे त्यात दाखवले आहे.
‘रेसिंग एक्स्टिंक्शन- चेंजिंग द वे वुई सी अवर प्लॅनेट’ असे लांबलचक नाव असलेला चित्रपट सागरी वन्यजीवांची अवैध विक्री करताना त्यासाठी फार मोठ्या प्रमाणावर क्रूर कत्तल कशी केली जाते हे दाखवतो. तेल व नैसर्गिक वायूशी निगडित खासगी कंपन्या अवैध कामे करताना सागरी वन्यजीवांचे आरोग्य व जीवन कसे उद्धवस्त करतात हे त्यात दाखवले आहे. संकटात सापडलेल्या सागरी वन्यजीवांचे संवर्धन व संरक्षण कसे केले जावे याविषयीचे मार्गदर्शनही त्यातून मिळते. त्यामुळे प्रेक्षक निराश न होता, उलट प्रेरणा घेतात, ही या चित्रपटाची जमेची बाजू आहे.
– डॉ. किशोर कुलकर्णी
मराठी विज्ञान परिषद
Leave a Reply