शालेय विद्यार्थ्यासह छावा हा बहुतचर्चित चित्रपट पाहण्याचा योग आला. खरंतर चित्रपट मनोरंजनातून प्रबोधनाकडे असा चित्रपटाचा सरळ प्रवास असावा .
चित्रपट पाहिल्यानंतर कुंभकर्णप्रमाणे कित्येक वर्षे झोपलेल्या जाणीवा जागृत व्हाव्यात आणि त्यानिमित्ताने का असेना आपले सुप्त राष्ट्रप्रेम राष्ट्रीय भावना जाग्या व्हाव्यात हा निर्मात्याचा उद्देश असावा.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर पोरक्या झालेल्या स्वराज्याला आधार देऊन मुघल सल्तनतीला आव्हान देत औरंगजेबाला तब्बल पावणे नऊ वर्ष झुलवत ठेवणाऱ्या धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानावर आधारित छावा हा चित्रपट लोकप्रियतेबरोबरच वादाच्या घेऱ्यातसुद्धा वेढलेला आहे मात्र असे असले तरी छत्रपती संभाजी राजांचे कार्य आणि त्यांचे स्वराज्याप्रति समर्पण लोकांसमोर ठेवण्यात निर्माते आणि दिग्दर्शक यशस्वी झाले आहेत असं ठामपणे म्हणता येईल.
शिवरायांच्या निधनानंतर मराठा साम्राज्याला सहजपणे गिळंकृत करता येईल अशी कपटी आशा मनात ठेवून औरंगजेब दख्खनमध्ये आला. अर्थात त्याला अनेक कारणे होती बऱ्हाणपूरची लूट हे तर एक निमित्त ठरले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर अवघ्या काही महिन्यातच म्हणजे 31 जानेवारी 16 81 रोजी छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या मावळ्यांसह मध्य प्रांतातील बऱ्हाणपूर या मुघलांच्या प्रतिष्ठित शहरावर हल्ला केला . सिंह गेला तरी त्याचा छावा आहेच हा संदेशच जणू संभाजीराजांनी औरंगजेबाला दिला. संभाजी महाराजांच्या मराठा फौजेने तीन दिवस बराणपुरातच धुमाकूळ घातला होता.
शिवाजी महाराजांनी यापूर्वी दोनदा सुरत लुटले होते तशीच करा फक्त यावेळी नायक संभाजी राजे होते.
दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी मराठ्यांची ही धाड अतिशय चांगल्या प्रकारे चित्रित केली आहे तरीही यात कल्पकतेचा अनावश्यक वावर दिसून येतो छत्रपती संभाजीराजांची सिंहाबरोबर झालेली मुठभेड आणि त्याचे चित्रण अतिशययोक्तीपूर्ण दिसून येते पण तरीही चित्रपटाने ट्रॅक न सोडता पुढे वाटचाल केलेली दिसते .
संभाजी महाराज आणि महाराणी येसूबाई यांच्यातील संवादात कुठेही औपचारिकता अथवा कृत्रिमता दिसून येत नाही यातही उतेकर उत्तीर्ण झालेले आहेत .
सोयराबाई आणि अण्णाजी दत्तो मंडळींनी संभाजी राजेंद्र अर्थातच स्वराज्याविरुद्ध केलेले कारस्थान अगदी कमी वेळेत आटोपशीर पद्धतीने मांडून दिग्दर्शकाने चित्रपटाचा बराचसा जाणारा वेळ आणि त्यामुळे प्रेक्षकांचा होणारा घोळ यापासून चित्रपटाला वाचवले आहे.
चित्रपटातील संभाजी राजे म्हणून विकी कौशल यांची भूमिका रश्मिका मंधाना यांची येसूबाई प्रेक्षकांच्या पसंतीला उतरली यात शंकाच नाही. विनीत कुमार यांनी साकारलेला कवी कलश, आशुतोष राणा यांची सेनापती सरलष्कर हंबीरराव मोहिते भूमिकाही भलताच भाव खाऊन गेली आहे.
संतोष जुवेकर आणि इतर काही कलाकारांना मिळालेल्या छोट्याशा भूमिकांचेही त्यांनी सोने केले आहे.
उतेकरांनी दाखवलेला शहेनशहापुत्र अकबर काहीकेल्या उमगत नाही दिल्लीच्या शासनकर्त्याचा मुलगा अकबर अशा पद्धतीने संभाजी राजासमोर आणि त्याचे इतके स्वस्त असणे काही केल्या मनाला पटत नाही.
औरंगजेबाच्या भूमिकेत असलेल्या अक्षय खन्नाने शहेनशहा बऱ्यापैकी साकारला आहे तरी त्याच्या तोंडी घातलेले काही संवाद कृत्रिमच वाटतात.
संभाजी राजांना संगमेश्वर येथे पकडल्यानंतर त्यांना समोर आणले जाते त्यावेळेस औरंगजेबाच्या चालण्याचा वेग आणि त्याच्या हालचाली 90 वर्षाच्या वृद्धाप्रमाणे वाटत नाहीत इथे औरंगजेबाला अचानक तारुण्य आल्यासारखा भास चित्रपटात होतो.
शिवाजी सावंत यांच्या लोकप्रिय छावा या कादंबरीचा आधार निर्मात्यांनी घेतला आहे.
चित्रपट हा काल्पनिक असणार परंतु ऐतिहासिक पार्श्वभूमी , ऐतिहासिक कथानक साकारताना वास्तविकतेचा पदर सावरणे गरजेचे असते , हा वास्तविकतेचा पदर ढळला की चित्रपट उघडा पडतो . हा वास्तविकतेचा पदर ढळणार नाही याची काळजी दिग्दर्शक आणि निर्मात्याने घ्यायला हवी.
छावा चित्रपटात फितुरीच्या संशयाची सुई गणोजी शिर्के यांच्या दिशेने दर्शवली आहे नव्हे वतनासाठी मुघलांना फितूर झालेले गणोजी शिर्के मुकर्रब खानाला संभाजी संगमेश्वरात आहे हे कळवतात. अंबा घाटातून संगमेश्वराकडे जाणारी दुर्गम वाट दाखवतात . स्वराज्याशी केलेली गद्दारी दिग्दर्शकाने दाखवली असून याबाबत शिर्के यांच्या कथित वारसदारांनी आक्षेप घेतला आहे ही बाब सर्वांना माहीत आहे यातील ऐतिहासिक तथ्य शोधून काढणे व त्यानंतरच सत्य लोकांसमोर मांडणे ही निर्माता आणि दिग्दर्शक यांची जबाबदारी आहे .
चित्रपटातील कथानकात काय असावे यापेक्षा काय नसावे याची दक्षता घेतली तर चित्रपट कधीही वादाच्या भोवऱ्यात सापडत नाही.
या चित्रपटाची चांगली बाब अशी की स्वराज्य, छत्रपती शिवाजी महाराज, जिजाऊ मासाहेब यांच्याशी असलेले नातेसंबंध जतन केले आहेत हा धागा कुठेही सोडून दिलेला नाही त्यामुळे चित्रपट आपल्या लक्ष्या पासून कुठेही भरकटत नाही.
चित्रपटातील संवाद ही चित्रपटाची मोठी जमेची बाजू आहे.
चित्रपटांने आर्थिक कमाई किती केली हा प्रश्न गौण आहे अवास्तविक लेखनातून आजवर संभाजी राजांची प्रतिमा मलिन केली होती संभाजी राजांची स्वराज्याप्रति असलेली निष्ठा , महाराजांचे कर्तृत्व आणि त्यांचे बलिदान लोकांसमोर आणण्यात दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर आणि निर्माते दिनेश विजान यशस्वी ठरले आहेत.
चित्रपटात चितारलेले काही प्रसंग काल्पनिक व अतिशयोक्ती पूर्ण वाटतात मात्र असे असले तरी चित्रपट प्रेक्षणीयच आहे .
ए आर रहमान यांचे संगीत चित्रपटाचे प्रेक्षणीयमूल्य वाढवते इतर काही ऐतिहासिक चित्रपटांप्रमाणे शृंगारिक गाण्यांचा फाफटपसारा यात नाही . चित्रपटाच्या 161 मिनिटांपैकी प्रत्येक मिनिट सत्कारणी लागलेला आहे.
एकंदरीत छावा हा चित्रपट पुन्हा पहावा असाच आहे.
– कृष्णा हाबळे
Leave a Reply