नवीन लेखन...

राशोमान – सत्य असत्याचा विलक्षण खेळ

एकच घटना. त्याचे चार साक्षिदार. प्रत्येकजण त्या घटनेचा वेगवेगळे पदर उलगडतात. पण शेवटपर्यंत सत्य काय घडले असावे याचा उलगडा होत नाही. चित्रपटात जेंव्हा प्रत्येक साक्षिदार त्या घटनेच्या घटनाक्रमाची साक्ष देतो तेंव्हा मानवी मनाच्या स्वार्थीपणाचा बुरखा आपल्यासमोर टराटरा फाडला जातो आणि शेवटी उरते ते केवळ नग्न सत्य.

मी पुण्यात आशय क्लब तर्फे ‘राशोमान’ हा जपानी भाषेतला चित्रपट पाहिला तेंव्हाच अकीरा कुरोसावा या अवलियाच्या सिनेमांच्या प्रेमात पडलो. सत्यजीत राय, कुरोसावा व व्हिट्टोरी डि-सिका या त्रयींच्या सिनेमांचा मी त्याकाळातच मोठा चाहता झालो. निओ-रिॲलिझम जेंव्हा जागतिक सिनेमावर अधिराज्य करीत होते ते़व्हा या तिघांनी दिलेले चित्रपट हा जागतीक वारसा आहे. असो, त्याविषयी पुन्हा कधीतरी..

राशोमान ची मध्यवर्ती थिम अशी आहे. एक योद्धा (सामुराई) आपल्या पत्नीसह जंगलामधुन प्रवास करताना एक दरोडेखोर त्यांना आडवा जातो. तो दरोडेखोर त्या सामुराईला भारी पडतो..त्याला झाडास बांधून ठेवतो..व मग त्याच्या पत्नीवर अती प्रसंग करतो. त्याला नंतर पकडण्यात येतं व त्याच्यावर खटला चालवला जातो.

आता या घटनेच्या आसपास दोन लोकांनी त्यांना पाहिलेलं असतं. एक लाकूडतोड्या व एक धर्मगुरु. त्या दरोडेखोराच्या खटल्यात साक्ष देण्यासाठी त्यांना बोलावलं जातं. ते दोघेही जी साक्ष देतात तिच्यात विसंगती असते. लाकूडतोड्या खोटी साक्ष देतो व धर्मगुरुने जे पाहिलेले असते त्यानंतर घटना घडलेली असते. त्यातुन सत्य बाहेर येत नाही. त्यामुळे घटनेमधे प्रत्यक्ष सहभागी व्यक्तींची साक्ष घेतली जाते.

स्वतःच्या बचावामधे दरोडेखोर जी साक्ष देतो त्यातून त्या कथेला एक वेगळाच कांगोरा प्राप्त होतो. त्याच्यामते त्याने तिच्यावर अतिप्रसंग केला नाही तर ती स्वतःच त्याला समर्पण करते. नंतर तिच त्याला चेतावते की माझ्या नव-याशी निर्णायक युद्ध कर त्यामुळे तिला एकाच कोणाची तरी बनून राहता येईल. लढाई होते व तिचा पती त्यात मारला जातो पण त्या गडबडीत ती पळ काढते.

आतिप्रसंग झालेली स्त्री आपल्या साक्षीमधे स्वतःला एक अन्याय झालेली स्त्री दर्शवते. बळजबरी झाल्याने मला नव-याने अव्हेरले असे ती सांगते. मी अपवित्र झाले मला मारुन टाक असे मीच नव-याला सांगितले पण त्याने तसे केले नाही. उलट मी शुद्धीत आल्यावर माझी रत्नजडीत किमती कट्यार नव-याच्या पोटात होती व तो मरुन पडला होता असे तिचे म्हणने ती मांडते.

मरण पावलेल्या सामुराईच्या आत्म्याला दुस-या व्यक्तीच्या शरीरात पाचारण करुन बोलतं केलं जातं. तेंव्हा तो सामुराई त्याच्या मृत्युला कारण आपल्या पत्नीने दरोडेखोराबरोबर सहमतीने केलेला व्यभिचार आहे हे सांगतो तेंव्हा सारेच स्तंभित होतात. तिच्या वागण्याने व्यथित होउन, दरोडेखोराने त्याला न मारता सोडून दिल्यावरही, तिच्याच कट्यारीने तो आत्महत्या करतो अशी साक्ष देउन त्याचा आत्मा नाहिसा होतो.

राशोमान म्हणजे गावाच्या वेशीवर कमानीजवळ प्रचंड पावसात आस-याला थांबलेल्या एका सामान्य माणसाला तो लाकूडतोड्या व तो धर्मगुरु ही गोष्ट सांगत असतात. कोसळणा-या पावसाच्या क्षणाक्षणाला बदलणा-या रुपात व या घटनेवरील त्या तिघांमधील चर्चेमधुन सत्य काय हे शेवटी बाहेर येते ते लाकुडतोड्याच्या सत्य कथनातून जे त्याने त्याच्या खटल्यात दिलेल्या साक्षीमधे लपवलेले असते. त्याने जे पाहिलेले असते ते वरील सर्व साक्षींपेक्षा वेगळे असते. ते सत्य काय असते हे मी इथे सांगणार नाही. या चित्रपटाचा शेवटही अतिशय सुंदर. तोही मी सांगणार नाही. त्यासाठी तुम्ही हा चित्रपट एकदा पहावाच.

राशोमान हा केवळ चित्रपट नाही. तो एक आरसा आहे. माणसाच्या स्वार्थी विचारांचा, आचरणाचा व दुट्टपीपणाचा.

प्रत्येक जण जेंव्हा एकच घटना सांगत असतो तेंव्हा कोणीही ती पूर्ण सत्य सांगत नाही. आपला स्वार्थ त्यात बेमालुम मिसळून प्रत्येक व्यक्ती ती घटना मांडते. त्यामुळे काही काळ सत्य झाकोळले जाते. पण ते उघड होते तेंव्हा आरशालाही त्याची लाज वाटावी इतके नग्न असते.

राशोमान पाहताना त्यातील सिनेमॕटीक इलेमेंट्स बद्दल बोलायला हवंच. पावसाचा एखाद्या व्यक्तीरेखेप्रमाणे पूर्ण चित्रपटात केलेला वापर अतिशय परिणामकारक आहे. इतका की चित्रपटाच्या क्रेडीट्समधे पावसाला अगदी वरचं स्थान द्याव़ असे वाटावं.

टू अँड फ्रो फ्लॕशबॕक (कथा सतत भूतकाळात जाउन वर्तमानकाळात येणे) या गोष्टीचा इतका जबरदस्त वापर मी पहिल्यांदा पाहिला या चित्रपटात. फ्लॕशबॕकमधून प्रत्येकवेळेला वर्तमानात येताना पावसाचा बदललेला आवेग चित्रपट पाहणा-या प्रेक्षकांना थिजवून ठेवतो.

राशोमानमधील कलाकारांचा अभिनयही इतका सहज सुंदर की त्यामुळेच फक्त एका घटनेभोवती फिरणारा हा चित्रपट एक अप्रतिम कलाकृती बनू शकला. विशेषतः दरोडेखोर ताजोमारु च्या भुमिकेत तोशिरो मिफुनेने खरोखरीच अजरामर काम केलं आहे.

राशोमान १९५० चा चित्रपट. तरीही कालजयी.

नंतर द सेवन सामुराईज व योजींबो हे कुरुसावा यांचे चित्रपट मला पहायला मिळाले. या तीनही चित्रपटांनी माझ्या मनावर एक जबरदस्त छाप सोडली, सिनेमा या विषयाकडे पहायची नवी दृष्टी दिली. त्यासाठी मी अकीरा कुरुसावा ह्या चलचित्र जादुगाराचा कायम कृतज्ञ राहिन.

— सुनील गोबुरे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..