नवीन लेखन...

पुस्तक प्रदर्शन : आनंद यात्रा

काही वर्षांपूर्वी लोक एखाद्या पर्यटन स्थळी जाऊन आल्यानंतर तिथं काय काय पाहिलं, याचं रसभरीत वर्णन करीत आणि जोडीला एक वाक्य हमखास असे ‘आम्ही मनसोक्त विंडो शॉपिंग केलं!’ मॉलसंस्कृती उदयाला आल्यापासून विन्डो शॉपिंगचे दिवस संपले. लोकं आपल्याला आवडणारी, हवी असणारी वस्तू मॉलमध्ये अगदी हक्काने, हातात घेऊन, निरखून-पारखून घ्यायला लागले. त्या त्या वस्तूचं, गोष्टींचं मनसोक्त दृष्टीसुख आणि स्पर्शसुख अनुभव घेऊ लागले. त्या वस्तूंच्या प्रेमात पडू लागले. गरज असताना किंवा नसताना वस्तू घ्यायला लागले अन् कोट्यवधी रुपयांची उलाढाल होऊ लागली.

पुस्तक प्रदर्शनाच्या मॉलमधून फेरफटका मारताना नेमका हाच अनुभव मिळतो. याची जाण मॉलच्या प्रदर्शनीय खरेदीतून ग्राहकाला येऊ लागलेली आहे. त्यातूनच शहर, गांवागावांत, सभासंमेलनात होणाऱ्या कार्यक्रमातून वा अन्यत्र सातत्याने भरणाऱ्या पुस्तक प्रदर्शनातून पुस्तकांची विक्रमी विक्री उच्चांकाचे परीघ उंचावित अधिकाधिक उलाढाली करू लागली आहे.

वाचकप्रिय माणसाला औत्सुक्याने आवडती ग्रंथसंपदा प्रत्यक्ष हाताळून बघण्याच्या बालसुलभ निरागस मानसिकतेतून अनेकविध पुस्तकप्रदर्शनांना भेटी देण्याची किमया सहजतेन घडतांना दिसते. प्रकाशक नफा मिळवण्यासाठी नयनरम्य मांडणी, मोक्याची जागा आणि आकर्षक जाहिरात करून पुस्तकप्रदर्शन न म्हणता ‘ भव्य साहित्य जत्रा’ अशा शब्दातून लक्ष वेधण्यासाठी प्रयत्नशील असतात.

आजचं युग हे झटपट माहितीचं आगार बनलंय. आबालवृद्ध वर्ग हा इडियट बॉक्स (दूरचित्रवाणी) चा चाहता आहे. त्याला या चकाकत्या चौकोनाचं जबरदस्त आकर्षण आहे. यापासून त्याला मुक्त करण्यासाठी त्याच्या हाती ‘रिमोट कंट्रोल’ ऐवजी असं काहीतरी साधन हवंय, जे त्याच्या अभिरुचीला पूरक असेल, जे त्याला अधिक परिपूर्ण अशी माहिती देईल, मार्गदर्शन करेल आणि त्याचबरोबर मनोरंजनदेखील होईल.

कुठलंही ‘पुस्तक’ हे एक सुंदर आणि अद्भुत अशा कल्पनांचा आविष्कार असतं. ज्याच्या पानोपानात नवनवे रंगरूप, शब्दांचे जग आहे, जे वाचू तेवढे थोडे आहे. या शब्दप्रवाहाच्या वाचनरूपी सागरात वाहावत जाण्याचा आनंद हा कायम केवळ भरतीचाच आहे. ओहोटी नसलेला पुन्हा पुन्हा अनुभवण्याचा, हातात सामावणारा, दृष्टीने दूरवर नजर टाकण्याचा, कुठेही केव्हाही रमण्याचा, ज्याला फक्त हवा वाचण्याचा हव्यास !

बसचा प्रवास असो वा रेल्वेचा किवा विमानाचा वाचनाचा मूड कुठेही लागू शकतो! निसर्गातील नद्या-नाले, वृक्ष असो की, घरातील गच्ची व अंगण ! फ्लॅटमधील चिमुकला कोपरा, छोटसं स्वयंपाकघर किंवा शयनकक्षा वाटेल तिथे दिवस असो की रात्र वा कधी दुपारही ! अशा एकांतवेळी पुस्तकाचं अंतरंग हवं तेवढं स्पर्शिता येतं आणि त्यातून आजच्या ताणतणावरूपी दैनंदिनीत हमखास आनंद मिळवत थोडावेळ का होईना रिलॅक्स होता येतं हे माझ्या दृष्टीने जास्त महत्त्वाचं आहे.

आवडीच्या पुस्तकांच्या वाचनाने तुम्ही तुमचं वैयक्तिक दुःख, वेदना काही काळासाठी तरी विसरून जाता. कित्येकदा तुमच्या दुःखापेक्षा अधिक वाईट, खडतर जीवन जगणाऱ्या व्यक्ती, ज्या आत्मविश्वासानं आपलं ‘लाईफ एंजॉय’ करीत आहेत असं आपल्याला दिसत तेव्हा तुम्हाला ‘सुखी सदरा’ कुठला ते कळतं.

रडतखडत जगण्यापेक्षा आहे ते स्वीकारून जगण्याचे सामर्थ्य मिळविण्यात तुम्ही यशस्वी होता ते केवळ या पुस्तकांमुळेच नाही का? पुस्तकांशी संवाद असला की, एकटेपणाची भावना उरत नाही अन पुस्तक तुमचे बोट धरून साऱ्या विश्वाची सफर तुम्हाला घडवून आणते. पुस्तकांची सोबत ही एक अबोल पण तेवढीच बोलकी अशी मैत्री आहे.

पुस्तकांचे अनेक प्रकार आहेत. अगदी पॉकेटबुक्सपासून मोठ्या आकारातील ही पुस्तकं हातात घेऊन पाहाण्यास, त्यांच्याशी मैत्री करण्याचा आनंद हा आगळाच ! या मित्रांना भेटण्यासाठी जमेल तसे पुस्तक प्रर्दशनास भेट देणे मात्र आवश्यक आहे.

ही प्रदर्शनं जी माणसामाणसाला त्याच्या आवडीनुसार इच्छेनुसार ‘स्वत:चं अंतरंग खुलेआम डोकावण्यासाठी मुक्त करतात, ज्यामुळे लहानथोर वाचकाला कुठलाही बाऊ न वाटता एकाचवेळी अनेक प्रकाराची पुस्तके पाहण्याची संधी निर्माण होते, मनाला त्या पुस्तकाचं ‘रंगरूप’ भावतं. कधी मुखपृष्ठ लक्ष वेधून घेतं तर कधी पुस्तकाचं शीर्षक औत्सुक्य निर्माण करतं! मलपृष्ठावरचा मजकूर, मनोगत यामधून पाण्यात सूर मारणाऱ्या बालकासारखा वाचक मग त्या पुस्तकाच्या शब्दांत हरवून जातो अन् मग या वाचकाला या मित्राला घरी घेऊन येण्याची आस मनाला लागते.

ग्रंथालये आणि दुकानात ही इच्छा काहीशी अपुरी राहाते. ग्रंथालयात बरेचदा ठरावीक पुस्तकेच काऊंन्टरवर असतात तर बहुतांशी बंद कपाटात ‘दृष्टिआड सृष्टी’ची चुणूक दाखवतात.

आपल्याला काय वाचायचंय हे न ठरवताच सर्वसाधारण माणसं ग्रंथालयात डोकावत असतात, पण त्यांना त्यांच्या नकळत अभिरुची संपन्न साहित्य वाचायला मिळणं अपेक्षित असतं, जे साचेबंद ग्रंथालयातील पुस्तकातून न मिळता अचानकपणे संपूर्ण नव्या अशा पुस्तकातूनच ते लाभतं जे पुस्तक चाळता चाळता गवसतं अन् मन रमून जातं. हे फक्त पुस्तकप्रदर्शनात सहज साध्य होतं. कारण तिथे हा साहित्याचा खजिना, ‘खुल जा सिम सिम म्हणत तुम्ही जसा शोध घ्याल तसा उघडत जातो.’ अनेक प्रकाशन संस्थांची अनेकविध पुस्तकं, अनेक विभागांतून वर्गीकृत स्वरूपात पहायला मिळतात. त्यामुळे वाचकाची नजर आणि इच्छाशक्ती यांचा छान संगम होऊन वाचक वाचनानंदात डुंबू शकतो, कितीही काळ.

मग ते पोट धरधरून हसवणारे विनोद, किस्से यांच्या हास्यलहरी असतील. व्यक्तिमत्त्व विकास, योग, आरोग्य, खेळ, पाककृती, ललित, हस्तकला रांगोळी, रहस्य, जादू, बडबडगीते, चित्रमय कथा, परदेश प्रवास, ड्रायव्हिंग शिका, जंगल भ्रमन्ती सामान्यज्ञान, डोकं लढवा, अशी एक ना अनेक पुस्तकं आपलं लक्ष वेधून एकतरी धावती नजर वा प्रेमळ कटाक्ष टाकायला लावतातच इतकी ही पुस्तक रंगसंगतीने, दाटीवाटीने विराजमान झालेली दिसतात. आपल्याशी बोलका संवादच जणू साधतात अन् मग सर्व स्तरातील वाचक मनमुराद वाचनाचा आस्वाद घेण्यास आपापल्या स्टाईलने रेलत, रेंगाळत पायावर जोर देत, ओणवं होत, उभ्याउभ्यानं पुस्तक वाचण्यात रमून जातो.

ही गंमत दुकानात मिळत नाही. दुकानात गेलात तर काय हवं? कुठलं पुस्तक, लेखक कोण? कुठलं प्रकाशन? वगैरे अनेक प्रश्न उपस्थित होत राहतात. काऊंटर हा एक अडसर असतो, पण पुस्तक प्रदर्शनात ही सारी कसलीही माहिती नसली तरी चालते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे पुस्तकाच्या किंमतीचा अंदाज घेत आपल्या बजेटप्रमाणे पुस्तक खरेदीचा निर्णय तुम्ही घेऊ शकता अन् त्यावर घसघशीत अशी सूटही मिळते.

दुकानातून पुस्तकं खरेदी करताना किंवा बाहेरगावी घरपोच मागविताना भले सकृतदर्शनी काही सूट असली तरी प्रत्यक्षात त्यात अधिक टपालखर्च समाविष्ट होत असल्याने सवलतीचा पूर्ण लाभ मिळत नाही. मग ती व्हीपीपी असो अथवा आजचे स्पीडपोस्ट. याउलट पुस्तक प्रदर्शनात सवलतीसह काही संच एकत्र f घेतल्यास वा अन्य पद्धतींतून किमतीत सूट उपलब्ध होते. ही सूट कधीकधी ‘अल्पशी’ असते, पण ‘आनंदाला ना तोटा’! पुस्तक प्रदर्शनात सर्वच प्रकारचं स्वातंत्र्य असतं. जे हवहवसं वाटतं अन् अस बंधनमुक्त पुस्तकांचं जग प्रत्येक वाचनप्रेमी माणसाला अभिप्रेत असतं, जिथे त्याच्या स्टेटस्चा, तो कुठल्या स्तराचा आहे याचा विचार न होता त्याला एक ग्राहक म्हणून या प्रदर्शनात हिंडण्याचा आनंद मनसोक्त घेता येतो अन् सर्वात महत्त्वाचं म्हणजे पुस्तक खरेदी केलंच पाहिजे, असा दंडकही नसतो.

छोट्या गावांमध्ये तालुक्याच्या ठिकाणी फारसे सांस्कृतिक कार्यक्रम होत नाहीत. साहजिकच तिथे पुस्तक – प्रदर्शन, जत्रा फारशा भरत नाहीत. अशा ठिकाणी वाचक तर असतो, पण केवळ ग्रामीण भागात तो राहत असल्याने वाचनाच्या आनंदापासून तो वंचित होतो. अशा ठिकाणी आज आपल्याला ‘ग्रंथायन’, आणि ‘अक्षरधारा’ सारख्या प्रकाशनसंस्थांच्या मोबाईल व्हॅन पुस्तक विक्री करताना दिसतात. या मोबाईलव्हॅन म्हणजे छोटेखानी पुस्तक प्रदर्शनच जणू वाचकांच्या घरादाराजवळ अगदी राहत्या गल्ल्यांजवळ भरवलेली पुस्तक प्रदर्शनच. या मोबाईल व्हॅनमुळे ‘वाचकाला वाचनाची आवड पुरी होण्यास ही मोबाईल पुस्तक प्रदर्शन हातभार लावतात. मग अगदी शहरापासून गावापर्यंत या मोबाईल ग्रंथांची खरेदी करण्यास वाचक पुढे सरसावतात.

आजच्या वांचकाची क्रयशक्ती वाढली आहे. त्यामुळेच ग्संपूर्ण महाराष्ट्रातच वरचेवर प्रत्यक्ष दुकानात जाऊन विविध ‘पुस्तकांची खरेदी करणारा ग्राहक वाढतो आहे, ज्यात विद्यार्थी, प्राध्यापक, कलाप्रेमी, डॉक्टर, लेखक अशा अनेक स्तरातील चोखंदळ रसिक वाचक, आणि व्यावसायिक लोक आहेत. पुस्तक खरेदी करणारा वर्ग हा या लोकांव्यतिरिक्त वेगळ्या भिन्न थरातल्या सामान्य वाचक-ग्राहकांची संख्याही खूप मोठी असते.

मुंबईत क्रॉसवर्ड, ग्रंथ, पार्ल्याचं मॅजेस्टिक, बोरीवलीत शब्द “द बुक गॅलरी’, दादरच आयडियल अशी अनेक ग्रंथांची दुकानं तर नाशिकसारख्या सुप्रसिद्ध साहित्यिकांच्या नगरीतही ‘कुसुमाग्रज मायबोली’ हे ग्रंथदालन काऊंटरविरहित आहेत.

मुंबईत मॅजेस्टिक, मौज, पार्ल्याचं जवाहर बुक डेपो, चर्चगेटचं सेंटर तर्फे नियमितपणे भरविली जाणारी पुस्तक आशिष बुक प्रदर्शनं तर वाचकांची पर्यटनस्थळ ठरतात.

जवाहरतर्फे प्रामुख्याने सुट्टीच्या कालावधीत बालकांसाठी बालजल्लोष, म्हणजे गोष्टींचा खजिना, अनेकविध ज्ञानांचे भांडार, बच्चे कंपनीला या पुस्तक प्रदर्शनातून उपलब्ध होते, जे वाचनसंस्कृतीचं महत्त्व दृढ करतात. अशा उत्साही उपक्रमांमुळे बालवाचकांना त्यांची वाचनाची रुची गवसते.

मुंबईत मॅजेस्टिक, मौज, पार्ल्याचं जवाहर बुक डेपो, चर्चगेटचं सेंटर तर्फे नियमितपणे भरविली जाणारी पुस्तक आशिष बुक प्रदर्शनं तर वाचकांची पर्यटनस्थळ ठरतात.

जवाहरतर्फे प्रामुख्याने सुट्टीच्या कालावधीत बालकांसाठी बालजल्लोष, म्हणजे गोष्टींचा खजिना, अनेकविध ज्ञानांचे भांडार, बच्चे कंपनीला या पुस्तक प्रदर्शनातून उपलब्ध होते, जे वाचनसंस्कृतीचं महत्त्व दृढ करतात. अशा उत्साही उपक्रमांमुळे बालवाचकांना त्यांची वाचनाची रुची गवसते.

काही वेळेला आजकाल पुस्तकांची खरेदी ही ऑनलाईन चालते. काही निवडक पुस्तक ई-बुक स्वरूपात पण उपलब्ध होत आहेत, परंतु प्रदर्शनातील पुस्तक खरेदी ही नेहमी सजीवतेचा निखळ आनंद देणारी असते. ती काही रूक्ष रेल्वे वा विमान तिकिटांची खरेदी नव्हे. पुस्तक खरेदीची खरी मौज ही पुस्तक हातात घेऊन चालता चालता मुखपृष्ठ अन्य मजकूर यामध्ये हळूच डोकावून त्याच्या रंगरूपाशी जवळीक साधत या ‘बौद्धिक’ मित्राला घरीदारी, बस-रिक्षा अशा प्रवासात, कार्यालयात वा कुठेही सोबतीला घेत ‘विरंगुळण्याचा क्षण’ मिळविण्यात आहे. ही गंमत ऑनलाईनमध्ये हरवते.

‘घेशील किती दोन करांनी रमशील दूरवर दोन नयनांनी, साद घालता पुस्तक प्रदर्शनी, मैत्र गुंफीतो प्रेमानी’ असा उत्कट अनुभव दरवेळी प्रत्येक पुस्तक प्रदर्शनात सर्व वाचनप्रेमींना मिळतोच.

या प्रर्दशनांची एक आणखी एक खासियत म्हणजे आपल्या प्रियजनांना, मित्रांना, नातलगांना सुंदर सुंदर पुस्तकं भेट म्हणून देण्यासाठी निवडता येतात.

आपल्या परिचयातलं कुणी ट्रेकिंगप्रिय असतं, कुणी पंचाहत्तरी गाठलेलं असतं, कुणाला बाळ होणार असतं तर कुणी निवृत्त होणार असतं, कुणी बोबडे बोल बोलणार असतं. अशा या साऱ्यांना उपयुक्त ठरतील अशी पुस्तकं आपल्या सहज नजरेस पडतात अन् हलकेच मनावर मोरपीस फिरवित जणू आपल्या ‘स्नेहींच्या’ आठवणी जाग्या करतात अन् आपल्या नकळत आपण जणू त्या प्रियजनांच्या भेटीचा आनंद लुटतो अन् त्या पुस्तकांशी संवाद करू लागतो. अशा अनेक स्मृती मनात गर्दी करतात. हा सुंदर अनुभव केवळ पुस्तक प्रदर्शनातून मिळत राहातो.

मी जेव्हा जेव्हा पुस्तक प्रदर्शनात हिंडते, तेव्हा मला एखाद्या सुंदर अशा रंगीबेरंगी मोहक आकाराच्या मिठाईने सजवलेल्या हलवायाच्या दुकानात आल्या सारखे वाटते. माणूस हा प्रथम कुठलाही पदार्थ डोळ्याने चाखतो मग खाऊन तृप्त होतो. तीच चाळवणाऱ्या ‘रसनेची’ धुंदी या रंगीबेरंगी पुस्तकांच्या अनेकविध विभागातून, सुबक बांधणीतून, मुखपृष्ठाच्या रूपातून, मलपृष्ठाच्या मजकुरातून, अंतर्भागाच्या सजावटीतून अन् सर्वात महत्त्वाचे म्हणजे कोऱ्या कुरकुरीत पानांतून आम्ही नवीन आहोत हं, असं खुणावणाऱ्या, प्रदर्शनातून मिळते.

ही सारी शुभचिन्हं खचितच वाचन संस्कृतीत मोलाची भर घालतात. काहीही खर्च न करता थोडा वेळ का होईना, पण वाचक (पुस्तकप्रेमी) त्याच्या आवडीच्या जगात विहार करू शकतो. सारं काही विसरून अनेकविध ग्रंथांच्या गोफात स्वतःला लपेटत, इंद्रधनु जीवनाचे मनोहारी रंग बघू शकतो. ज्यातून त्याला त्याच्या दैनंदिन जीवनाचे तेच तेच रूटीन बाजूला सारीत पुस्तकाच्या जगातील ‘एक पान’ होता येतं.

ग्रंथाक्षर  या दिवाळी  २००९ विशेषांकात समता गंधे ह्यांनी लिहिलेला हा लेख

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..