
रत्नागिरी जिल्ह्यात रत्नागिरी पासून दक्षिणेला जेमतेम १५ कि.मी. वर छोटेसे गोळप हे गाव वसलेले आहे. पावस गावाचे जणू जुळे भावंडच. या गोळप गावात आहे निसर्गाच्या कुशीत वसलेले ‘हरिहरेश्वर मंदिर’. एका छोट्या दारातून मंदिर प्रांगणात प्रवेश होतो. आत गेल्यावर उजव्या हाताला दिसते एक छोटेसे व्यासपीठ. उत्सवात इथे नाटके सादर केली जातात. लाकडी खांबांचा सभामंडप असलेल्या या मंदिराच्या गाभाऱ्यात मूर्ती आहेत त्या ब्रह्मा विष्णू आणि महेशाच्या.
ब्रह्मा-विष्णू-महेशाच्या या मूर्ती सुबक असून त्या एकाच कलाकाराने कोरलेल्या दिसून येतात. मूर्तीची उभे राहण्याची पद्धत, त्यांच्या अंगावर असलेले अलंकार एकसारखे कोरलेले आहेत. या तीनही देवतांच्या हातातील आयुधे यथायोग्य कोरलेली आहेत. ब्रह्मदेवाची चार तोंडे, त्याला असलेली दाढी अगदी नेमकी दिसून येते. साधारणतः तीन-चारशे वर्षे जुन्या असलेल्या या तीनही मूर्ती वाराणसीवरून आल्या गेल्या आहेत. अत्यंत सुबक, सुघड आणि देखण्या अशा या मूर्ती म्हणजे नुसत्या गोळपचेच नव्हे तर कोकणचे वैभव म्हणायला हवे.
लेखक – श्री. आशुतोष बापट.
Leave a Reply