नवीन लेखन...

प्रवास पंख्यांचा

आमच्या घरात आलेला पाहिला टेबल पंखा होता Rally चा. साधारण १९६३-६४ सालातली गोष्ट. आमच्या १२×१० च्या खोलीत एका कोपऱ्यात भिंतीला लावलेल्या फळीवर त्याची स्थापना केली होती. उद्देश हा, की सगळ्यांना पुरेशी हवा मिळावी. दोन्ही बाजूला तोंड असलेल्या सापाचं चिन्ह आणि त्याच्या मध्यावर R असं लिहिलेली गोल चकती त्याच्या मध्यावर होती. चकचकीत स्टीलची पाती असणारा हा टेबल पंखा, आमच्या संपूर्ण खोलीला तसा पुरेसा होता. खोलीत एक लोखंडी कॉट होती. बाकी सगळे खाली गाद्या घालून झोपायचे. स्वतःच्या डाव्या उजव्या बाजूला फिरत हा पंखा सगळ्यांना अगदी छान हवा द्यायचा. आज एकेका खोलीत दोन दोन छताचे पंखे असतात, दोघेही गरागरा फिरत असतात, पण हवा खाणाऱ्यांचं मात्र हुशऽऽऽ हुशऽऽऽ सुरूच असतं. असो,

तर, पूर्वी म्हणजे माझ्या लहानपणी आगगाडीमध्ये सुद्धा फिरते पंखे असायचे. त्यांची फिरण्याची शैली रगड्यावर वाटण वाटताना जसा वरवंटा फिरवतात ना तशी होती. स्वत:मध्येच मश्गूल असल्यासारखे ते पंखे फिरायचे. हवा मात्र किती द्यायचे……???हा एक विचार करण्यासारखा मुद्दा असे. आपण अगदी त्याच्या खाली , थोडं उजव्या डाव्या बाजूला कुठेही बसून पाहिलं( तेव्हा कुठेही बसण्याचा खरंच चॉईस होता अहो !)तरी पंख्याची हवा काही येत नसे. फक्त गाडीतलं तप्त वातावरण थोडं सोसणेबल करणे, इतकाच त्या पंख्यांचा उद्देश असायचा. पुढे आगगाडीत डाव्या उजव्या बाजूला फिरणारे पंखे आले. त्यांची आणखीन एक गंमत होती. स्विच ऑन केला तरी सुरू होण्याचं त्यांच्यावर बंधन नव्हतं. ते आपल्या पात्यासहीत स्थिर असायचे. मग कुणी फारच वैतागून स्विच तीन चार वेळा ऑन ऑफ करायचे; (एक आपला प्रयत्न)तरीही परिणाम शून्य. माझ्या बाबतीत तर अनेकदा मी जिथे बसतो, तिकडचा पंखा नेमका बंद असतो. आजूबाजूला पाहिलं तर सगळे पंखे पूर्ण वेगात फिरत असतात. नशीब आपलं, जाऊदे . मग कुणी प्रवासी, मागच्या खिशातून छोटा कंगवा किंवा पेन काढून ते पंख्याच्या जाळीतून आत सरकवत पात्याना पुढे ढकलायचे. आणि गंमत म्हणजे, हा प्रयोग अनेकदा यशस्वी ठरायचा. पण अनेकदा याचाही उपयोग न होता फक्त पात्यांवरची धूळ डोळ्यात जायची. तर काही वेळा एकदम जोसात फिरून पुन्हा टनटन आवाज करत पंखा स्थिर होत असे. पुढे, जरा मोठ्या जाळीचे पण एकाच दिशेने हवा फेकणारे पंखे आले, जे अगदी आजही अस्तित्वात आहेत. आता बाहेरगावी जाणाऱ्या आगगाड्यांमध्ये सगळ्यात वरचा बर्थ असतो ना, त्याच्या अगदी जवळ पंखा येतो. त्या बर्थवर झोपणाऱ्या प्रवाशाला त्याच्या आवाजाने आणि सरळ तोंडावर येणाऱ्या त्याच्या तीव्र झोतामुळे, झोप काही लागत नाही.

पूर्वीच्या कचेऱ्या ब्रिटिशकालीन बांधणीच्या असल्यामुळे त्यांचं छत फार उंच असायचं. उंचावरून लोंबत पंखा तोलणारे लांबच लांब पोकळ लोखंडी पाइप आणि त्यांना लावलेले पंखे काचेऱ्यांत जागोजागी लटकलेले असायचे. बरं हे पंखे, जेवण जड झाल्यासारखे दिसायलाही तुंदीलतनू आणि त्यांची पातीही जाड आणि जड अंतःकरणाने फिरल्यासारखी फेरे घ्यायची. वेगाच्या अगदी वरच्या नंबरवर ठेवला तर कुठे खाली बसणाऱ्याना थोडीफार हवा लागायची झालं. त्यामुळे मग हे पंखे जाऊन कार्यालय, कचेऱ्या, सभामंडप यामध्ये स्टँडवर ताठ उभे राहाणारे पंखे आले. यांच्याकडे पाहिलं की अंतरा अंतरावर सावधान मध्ये असलेले शिपाई उभे आहेत असच वाटतं. यांना दोन पाती असतात. हे पंखे सुरू करण्यापूर्वी सावधानता म्हणून, त्याच्या समोरच्या पट्ट्यात येणाऱ्या, वजनाने हलक्या असणाऱ्या सगळ्या वस्तू उचलाव्या तरी लागतात किंवा त्यावर काही वजन ठेवावं लागतं. कारण, तो सुरू झाला की अशा सुसाट वेगाने फिरतो की त्याच्या समोर बसलेल्या माणसाचे केस पार अस्ताव्यस्त होऊन त्याचं रूपच बदलून जातं. त्या पंख्याच्या आवाजात एकमेकांशी बोलणं कठीण होऊन बसतं. लग्नसमारंभात तर अजूनच धमाल होते. आपल्या प्लेटमध्ये पदार्थ वाढून घेऊन कुणी बसायला खुर्ची शोधत असताना या पंख्यासमोर आला, तर एका क्षणात त्याच्या प्लेटमधल्या पापड, कुरडया, क्वचित पुऱ्या उडून जातात किंवा दुसऱ्या कुणाच्या प्लेटमध्ये जाऊन विसावतात. म्हणजे ‘ हवा नको पण पंखा आवर ‘ अशी स्थिती होते. आज बहुतेक घरात भिंतीवरचे , टेबलावरचे पंखे जाऊन सर्रास छताचे पंखेच लागलेले असतात. यामध्येही अनेक प्रकारचे पंखे बाजारात उपलब्ध असतात. पूर्वी फक्त एकाच, म्हणजे सफेद रंगात पंखे मिळायचे. आता मधला गोळा एका रंगाचा तर पाती दुसऱ्या रंगाची, पात्यांवर सुंदर नक्षी असलेले पंखे तर काही पंख्याच्या मधल्या गोळ्याला दिवा आणि त्यावर सुंदर शेड असते. आता पंख्याचं काम काय? तर हवा देण्याचं. त्यामध्ये दिवा काय करायचाय ? चार छोट्या पात्यांचे तुफान वेगाने फिरणारे पंखे मिळतात. हल्ली वातानुकूलित यंत्रामुळे पंखेही जरा आउटडेटेड होऊ लागलेत.

मला ना, पूर्वी या छताच्या पंख्याची भीतीच वाटायची. आमच्या नात्यातल्या एका कुटुंबामध्ये एकदा त्यांच्या बेडरूम मधला छताचा पंखा सुरू असताना सुटून खाली आला, आणि त्याची पाती झोपलेल्या व्यक्तीच्या तोंडाला घासून गेली. ओठांच्या वर जखम झाली. तोच जर छातीवर किंवा डोळ्यांवर पडला असता तर ? काही भयंकर झालं असतं. तेव्हापासून मी अंथरुणावर पडल्यावर बराच वेळ वरच्या पंख्याकडे पहात रहायचो. जरा जरी फिरताना त्याची लयबद्धता डळमळीत दिसली की मी लगेच इलेक्ट्रिशियनला बोलावून त्याच्या मजबुतीची खात्री करून घेत असे. पुढे तो इलेक्ट्रिशियन सुद्धा कंटाळला. मी फोन केला की तो, “क्या काम है” म्हणून विचारत असे.

आज बऱ्याच घरात,
“तुम्ही AC नाही लावलाय ?”
“आमच्याकडे ना, AC सुरू केल्याशिवाय झोपतच नाही कुणी”.
“अहो, इतकंच काय, आमचा टॉम्या सुद्धा AC लावला नाही ना तर भुंकुन घर डोक्यावर घेतो अगदी.”
“आमची सहा महिन्यांची नात सुद्धा AC शिवाय झोपायचं नाव घेत नाही.”
“त्यामुळे आम्ही प्रत्येक खोलीत AC लावलाय.”
असेही संवाद कानावर पडतात. पण खरं सांगू का ? अजूनही पंख्याचा महिमा काही संपलेला नाही. त्यामुळे, “खूपच गरम होतंय, जरा पंखा वाढवतोस का रे ?”
असच म्हटलं जातं. माझ्या बेडरूममध्ये AC सोबत एक खूप जुना छताचा पंखा आजही आहे. तो ही आता वृद्धावस्थेत आहे. फक्त हिवाळ्याच्या दिवसात त्याची हवा जराशी लागते. मुलं म्हणतात,
“का म्हणून तुम्ही ठेवलाय तो ? काढून टाका ना. त्याची हवा जरा तरी लागते का ? आपण छान नवा घेऊया.”
पण पूर्वी वडिलांनी घेतलेल्या त्या पंख्याची हवा मला मात्र लागते आणि तो बदलायचं मी पुढे ढकलत रहातो झालं.

प्रासादिक म्हणे

— प्रसाद कुळकर्णी

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..