नवीन लेखन...

“वळू”-एका डॉक्यूमेंट्रीचा सिनेमा

हा..कॅमेराकडे बघून बोला..
हो..हो तुम्हीच..
डूरक्याबद्दल बोला..
वळू म्हणजे देवाला सोडलेला बैल…
बाया माणसांचा फोटो काडू नये..
अशा अतरंगी बाईट्सनी वळू हा सिनेमा सुरु होतो..
आणि मग सुरु होते हास्याच्या सागरातली एक रोलर कोस्टर राईड..
दोन तासांची अशी राइड जी पूर्ण चित्रपट तुम्हाला खूपच हसवते..
एका वळूला पकडण्याचा झगडा..त्यावर बनलेली एक अनोखी डाक्यूमेंट्री..आणि त्यातली सर्व बहुरंगी, बहुढंगी पात्रं…
ही राइड सिनेमा संपल्यावर मात्र तुम्हाला अंर्तमुखही करते..
याला कारण गिरीश आणि उमेश या कुलकर्णी व्दयांची जबरदस्त पटकथा. पण मी हा लेख या सिनेमावर बेतणार नाहीये. मी फक्त या अविस्मरणीय सिनेमाच्या तितक्याच अविस्मरणीय प्रसंगांवर व संवादांवर लिहीणार आहे.
आपल्याला एखाद्या सिनेमाचे प्रसंग कशामुळे लक्षात राहतात तर मुख्यतः त्यातल्या संवादांमुळेच. (शोले, दिवार ही उदाहरणे. सलीम-जावेद जोडीकडे ते कसब होते) खरं तर छोट्या प्रसंगातून, संवादातून सिनेमा जेंव्हा पुढे सरकत राहतो तेंव्हा त्याची मजा येते कारण तो सिनेमा आपल्यात हळूहळू झिरपत जातो. ऑन-द-राॕक्स घेतलेल्या स्कॉच प्रमाणे जसे जसे प्रसंगांचे, संवांदाचे बर्फ ग्लासमधे वितळतात तसे तसे त्या सिनेमाची झिंग वाढत जाते..आणि हळू हळू तुम्हाला त्या सिनेमाची नशा चढू लागते.
वळू सिनेमा बद्दल अगदी तेच झालय…
आता पहा ना..खरं तर सिनेमाची स्टोरी म्हंटली तर ‘वन-लायनर..’
“एका खेडेगावात मोकाट झालेल्या एका वळूला एक फॉरेस्ट ऑफीसर येउन पकडून नेतो”. बस्स..एवढीच स्टोरी. पण इंग्रजीत म्हण आहे. ‘The devil is in the details’. वर म्हंटल्याप्रमाणे या कथेची पटकथा होताना या सिनेमात अनेक समांतर कथा गिरीश व उमेश कुलकर्णींनी इतक्या बेमालुमपणे मिसळलेत की हा एक एक बर्फाचा खडा सिनेमा संपेपर्यंत हळूहळू वितळत या स्कॉचची मजा तुम्हाला देत राहतो.
पात्रे सिनेमात येत राहतात व सिनेमा खुलत जातो.
फॉरेस्ट ऑफिसर स्वानंद गड्डमवार (अतुल कुलकर्णी), त्याचा डॉक्यूमेंट्री बनवणारा भाउ समीर आणि त्यांचा ड्रायव्हर जगनाडे हा सिनेमाचा मुख्य ट्रॅक. बिबट्या आणी बायसन पकडणाऱ्या गड्डमवारांना जबरदस्ती वळू पकडायला त्यांचे साहेब ‘कुसवडे’ या गावी पाठवतात. समीरही त्याच्यांबरोबर हा विचार करुन येतो की या वळूला पकडण्यात काही थ्रील असेल तर ते शुट करता येईल. आणि खरंच त्याला जे शुट करायला मिळते ते थरारक असतं हे नक्की.
सिनेमाची दुसरी ट्रॅक म्हणजे गावचे सरपंच म्हणजे अण्णा (मोहन आगाशे), त्यांची चेंगट बायको (भारती आचरेकर) आणि त्यांचा राइट हँड माणूस म्हणजे जिवन्या (गिरीश कुलकर्णी).
जीवन्या स्वतःची ओळख ‘फारेस्ट’ म्हणजे गड्डमवारांना करुन देतानाचा तो सीन फारच अप्रतिम. ‘आँ..डाउट काढला व्हय..अवो जीवन सुखदेव चौधरी..अण्णांचा राइट हँड..अण्णानीच सांगीतलं म्हणून सकाळपास्न कुसवडे फाट्याला थांबलोय तुमची वाट बगत..’ असं म्हणत हे हसरं पात्र पहिल्याच सिनमधे आपल्याला आणी गड्डमवारांना जिंकून घेतं.
सरपंच अण्णा म्हणजे तालेवार माणूस. सुपारी कातरत पहिल्या भेटीत फारेस्टला ‘स्वानंद गड्डमवारsss..वा..जोरदार नाव आहे..’ असे संबोधून सुपारीचा एक तुकडा खायला देत अण्णा त्यांना जेंव्हा सांगतात ‘आमच्या कुसवड्याला ऐतीहासीक परंपरा आहे बरं का..!! पानीपतच्या युद्धात आमच्या कुसवड्याची गाढवं गेली होती’ असे ते जेंव्हा सांगतात तेंव्हा फारेस्टला ठसका लागतो आणी आपण सोफ्यावरुन हसत खाली येतो..
जीवन्याची गोड लोभस आई (ज्योती सुभाष) आणी त्याची गुपचुप चाललेली तानी (वीणा जामकर) बरोबरची लव्ह स्टोरी हा या मुख्य ट्रॅक मधला एक साइड ट्रॅक. तानी बोलायला फटकळ. त्यामुळे तिचे डॉयलॉग ही तसेच. जेंव्हा आबा रेणुसे तिला अगदी खेटून आपली बुलेट नेतो तेंव्हा ती आपल्या मैत्रीणीला संगीला म्हणते
‘गावातली समदीच जनावरं माजल्यात जणू..’ तेंव्हा आपण लगेच त्याच्याशी रिलेट करतो. वळू (बैल) प्रत्यक्ष सिनेमात येण्याआधीच त्याच्याबद्दलची वातावरण निर्मीती असे अनेक संवादातून होत राहते.
सरपंच अण्णांचा कट्टर विरोधक आबा रेणुसे (नंदू माधव) व त्याचे चमचे हा सिनेमाचा तिसरा महत्वाचा ट्रॅक. या चमच्यांमधेही नामचीन मंडळी होती जशे की सतीश आबनावे (फक्त सतीश तारें), सुरेश (श्रीकांत यादव) आणि पोपट (सिद्धार्थ झाडबुके).
या तिघांनी ग्रामीण भागात राजकीय नेत्याला गोड बोलून झाडावर चढवणारे आबाचे चमचे इतके मस्त रंगवलेत की बस्स..
आबाच्या दोन वर्षाच्या पोरालाही (संपतराव) ते यात सोडत नाहीत. आबाही फुशारकीत ‘संपतरावांसाठी तर दिल्लीचा प्लॕन तयार आहे हो..’ असे म्हणतात तेंव्हा राजकारणातल्या घराणेशाहीला घेतलेला हा बारीक चिमटा आपल्याला गुदगुल्या करुन जातो.. आणि बिचारे संपतराव आबाच्या अंगावर शू करतात तेंव्हा तिघे आबाची मस्त फिरकीही घेतात.
आबाला डुरक्याला पकडून गावात हिरो व्हायचं असतं पण अण्णानी फॉरेस्ट ऑफीसरच त्याला पकडायला आणल्याने अण्णांनीच पहिला डाव जिंकलेला असतो. ‘आयला या अण्णाच्या….!! न्हाय या फारेस्टच्या आधी डुरक्याला पकडला तर नावाचा आबा रेणुशे नाही’ अशी शपथ आबा घेतो तेंव्हा गावातल्या या व अशा राजकीय चढाओढीचा आपल्याला गंमतशीर अनुभव सिनेमाभर येत राहतो.
संगीता (अमृता सुभाष) आणि शिवा (मंगेश सातपुते) यांची लव्हस्टोरी हाही एक सिनेमातला मजेशीर ट्रॅक आहे. ग्रामीण भागातली एक अल्लड, स्वप्नाळु, प्रेमात पडलेली तरुण पोरगी जशी बोलेल तसेच संवाद संगी च्या तोंडी आहेत. तिचा प्रियकर शिवाही असाच गावठी हिरो. ‘संगीवर माझं लव्ह हाय..ती माझी हाय आणी माझीच होणार..’ असले संवाद त्याला बरोबर शोभतात.
असाच एक समांतर ट्रॅक देवळाचा भटजी (दिलीप प्रभावळकर) आणी त्यांची बायको (निर्मीती सावंत) यांचा. घरात संडास नसल्याने गावाबाहेर विधीला सतत जावं लागत असतं आणि डुरक्याची भिती असल्याने बिचारी बायकोही रात्री अपरात्री दिवा घेउन त्याच्यामागे सोबतीला जात असते. त्यात बायकोचा विरोध असूनही तिखट खाणारे भटजीबुवा प्रभावळकरांनी मस्त केलाय. चटणीचा तो प्रसंग आणि बोलता बोलता झालेलः दोघांचे भांडण हा प्रसंग एकदम सुरेख. ‘डुरक्याचा सगळ्यात जास्त त्रास आमच्याच घराला होतो. आमच्या ह्यांना जरा पोटाचा त्रास आहे..त्यामुळे रात्री अपरात्री यांना परसाकडला जायला लागतं’ असं फारेस्टने बोलावलेल्या गावच्या मिटींगमधे त्या सांगतात तेंव्हा हसू आवरत नाही. ‘तुम्ही सरकारचेच आहात ना..मग आमचं संडासाचं काम तेवढं करुन द्या’ असे फॉरेस्ट ऑफीसरलाच सांगतात तेंव्हा त्यांच्या विनोदावर हसावं की त्यांच्या निष्पाप भावनेचे कौतुक करावे हेच समजत नाही.
इतर पात्रेही आपल्या खास संवादांमुळे लक्षात राहतात.
तानीची वहिनी तिला म्हणते कशी दिसते ग मी तेंव्हा तानी ‘प्रिती झिंटाच जणू’ म्हणते ते खूप नैसर्गिक वाटतं.
गावच्या हागीणदारी शेजारी राहणारे सतीश (तारे) जेंव्हा ‘हागीणदारी हलवा’ म्हणतो तेंव्हा भटजींचा पडलेला चेहराही लक्षात राहणारा.
कुठल्याही प्रसंगात ‘मधल्या हिरीतला गाळ काढून टाका’ असे सुचवणारा अण्णांचा नोकर शंकऱ्या (प्रशांत तपस्वी) ही भारीच.
अण्णासाठी सुपारी घ्यायला दुकानात आलेल्या शंकऱ्याला पैसे घेउन सुपारी न देता (कारण ती संपलेली असते) ‘मी संध्याकाळी घेतलेले पैसे देत नसते’ असे सुनावणारी सुऱ्याची बायको (अश्विनी गिरी), माहेरहून आल्यावर ‘डॉक्यूमेंटरी गावात आली हे तुम्हाला ठाउक हुतं का नव्हतं?’ आणि दिवसभरचा ‘गल्ला कुठाय?’ असे विचारत नवऱ्यावर जो जाळ काढते तो केवळ बघण्यासारखा आहे.
अशा या अफलातून सिनेमाविषयीच्या बऱ्याच गोष्टी लिहीता येतील. पण इथे कितीही केले तरी मला शब्दात सर्व मांडता येणार नाही. मला सिनेमा पाहून अनेक वर्षे झाली. पण मला आजही यातले कित्येक प्रसंग आणि संवाद अजून जसेच्या तसे डोळ्यासमोर उभे राहतात.
तुम्हीही बहुसंख्य गल्लीकरांनी हा मराठीतला ‘कल्ट’ म्हणावा असा सिनेमा पाहिला असेलच. तुमचा आवडता प्रसंग वा संवाद नक्की कमेंट्स मधे लिहा.
सर्व गल्लीकरांना दसऱ्याच्या शुभेच्छा!!
‘सिनेमाचे सोने घ्या..अन..सोन्यासारखे रहा..’
ता.क –
सतीश तारेंनी निभावलेला सतीश आबनावे डुरक्याविषयी माहिती द्यायला समोर येतो तेंव्हा दोन मिनीटात आपल्या भावमुद्रा व टायमींगने त्यांनी जी रंगत आणलीय ती फक्त एकदा पहा. सतीश तारे हा बाप माणूस का होता हे लगेच कळतं.
लिंक देतोय.

निर्मीती सावंत यांची जबरदस्त भटजींची बायको..अफलातून सीन. पाहताना हसून पोट दुखेल.

वळूचे ट्रेलर

— सुनील गोबुरे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..