नवीन लेखन...

प्रसार माध्यमे आणि सामाजिक भान

जनमत घडविण्यात आणि ‘बि’घडविण्यातही सर्वात मोठं योगदान असतं ते प्रसारमाध्यमांचं. या माध्यमात असलेल्या या ताकदीमुळेच त्याला लोकशाहीच्या चौथ्या खांबाचा दर्जा मिळाला. जगभरातल्या सर्वच देशांमध्ये कमी अधिक प्रमाणात प्रसारमाध्यमांची हीच भूमिका राहिली आहे. इंटरनेटचा वाढता वापर, सहज उपलब्ध होणारे स्मार्टफोन आणि सोशल मीडियामुळे प्रसार माध्यमांचं सर्व गणितच बदलून गेलंय. या नव्या गोष्टींमुळे माध्यमांची पारंपरिक चौकट पूर्णपणे मोडून पडली. जुने नियम मोडून पडले, लिहिणं बदललं, दिसणं बदललं, बोलणं बदललं, मूल्यही बदलली. गेल्या १०० वर्षात माध्यमांमध्ये जे बदल झाले नाहीत ते बदल गेल्या १० वर्षांमध्ये घडून आले. बदलांचा हा रेटा एवढा मोठा आहे की त्याच्याशी जुळवून घेईपर्यंत पुन्हा आपल्याला नव्या बदलाला सामोरे जावं लागतं. यामुळे जगभरातल्या माध्यमांमध्ये सध्या प्रचंड घुसळण सुरू आहे.

माध्यम कुठलंही असलं तरी ते वापरताना ‘भान’ असणं अत्यंत आवश्यक आहे. हे ‘भान’ सुटलं तर परिस्थिती ‘बे’भान झाल्याशिवाय राहत नाही. आज याच कुठल्यातरी मधल्या अवस्थेत आपली वाटचाल सुरू आहे. नव्या माध्यमांचा वेग प्रचंड आहे. त्याची पोहोचही कल्पेनेच्या बाहेरची आहे. त्याचा परिणामही खोलवर जाणारा आहे. या माध्यमांवर कुणाचेही नियंत्रण नाही, लगाम नाही. त्यामुळे ही माध्यमं बेलगाम आणि बेभान आहेत असं म्हटलं तरी अतिशयोक्ती ठरणार नाही. सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे याचा वापर आपण कशा प्रकारे करतो याचं भान बाळगण्याचं.

१९९० पर्यंत समाजमन घडविण्याचं काम वृत्तपत्रांनी केलं. त्यानंतर २००० – २००५ पर्यंत टीव्हीने आणि आता अधिराज्य आहे ते सोशल मीडियाचं. आता प्रत्येकाच्या हातात एक मीडिया हाऊसच उपलब्ध झालंय. तुम्ही आता व्यक्त होऊ शकता, तुमचे विचार मांडू शकता आणि जगाशी सहजपणे संवादही साधू शकता. शिवाय ही नवी माध्यमं अतिशय स्वस्त आणि हाताळायला सोपी आहेत. त्यामुळे ती झपाट्याने सर्वदूर पोहोचत आहेत. याच वेगामुळे भान सुटतं की काय अशी परिस्थिती आता निर्माण झालीय.

गेल्या काही वर्षांमधल्या घटनांवर नजर टाकली तर परिस्थिती किती चिंताजनक आहे याची कल्पना येते. सोशल मीडियामुळे वृत्तपत्र आणि टीव्हीची मक्तेदारी मोडून पडली. माहिती मिळविण्याचा पहिला स्रोत हा आता सोशल मीडिया बनला आहे. मागच्या वर्षी १ जुलैला जळगाव जवळच्या राईनपाड्यात मुलं पळविणारी टोळी आली असल्याची अफवा पसरली. ट्सअपमुळे ही अफवा गावागावांमध्ये पोहोचली लोकांमध्ये भीती आणि संशय निर्माण झाला. याच संशयातून भिक्षा मागणाऱ्या ५ जणांना लोकांनी ठेचून मारलं. अशी मुलं पळविणारी कुठली टोळी नाही आणि घटनाही घडली नाही हे पोलिसांनीही स्पष्ट केलं. मात्र लोकांच्या मनातली भीती ते घालवू शकले नाही. सामाजिक भान जेव्हा हरवते तेव्हाच अशा घटना घडत असतात.

जे घडलं ते सांगणं हे माध्यमांचं कर्तव्य आहे. ते सांगताना तुमची मतं त्यात येवू नये हाही संकेत आहे. मात्र जे घडलं नाही ते घडलं म्हणून सांगणं आणि ते सांगताना तुमचं मत त्यात घुसवणं असं जेव्हा होतं तेव्हा प्रश्न निर्माण होतात. सामाजिक शांततेला तडा जातो. या वेळेस आवश्यक असतं ते सामाजिक भान जपणं आणि वाढीस कसं लागेल हे बघणं. धार्मिक, सामाजिक, जातीय तणाव जेव्हा निर्माण होतो तेव्हा माध्यमांची ही जबाबदारी आणखीच वाढत असते. एखादी गोष्ट चुकीची घडली तरी त्यामुळे सामाजिक शांतता जर भंग होणार असेल तर ती गोष्ट न सांगणे किंवा न दाखवणे हेच योग्य असतं.

असं भान हे आज जपलं जातं का असा प्रश्न जर विचारला तर त्याचं उत्तर ठामपणे देता येत नाही हे कटू असलं तरी सत्य आहे आणि ते मान्य केलं पाहिजे. जीवघेणी स्पर्धा, फक्त बाजाराचा होत असलेला विचार, टीआरपीची काळजी यामुळे माध्यमांचं भान सुटलंय का असा सवाल आता विचारला जातोय. या गोष्टींना फक्त माध्यमच जबाबदार नाही तर नागरिकही तेवढेच जबाबदार आहेत. लोकांची आज अभिरुची बदलली, रिमोट हातात आल्याने संयमही संपला. त्यामुळे माध्यमं लोकांना खिळवून ठेवण्यासाठी अनेक खटपटी, लटपटी करत असतात. याच प्रकारांमुळे घट्ट असलेली सामाजिक विण उसवते की काय असा प्रश्न आज निर्माण झाला आहे.

अगदी ताजं उदाहरण जरी आपण पाहिलं तरी त्यातून आपल्याला अनेक गोष्टी लक्षात येतील. पुलवामातला हल्ला आणि नंतर भारताने दिलेले आक्रमक उत्तर या काळात माध्यमांची भूमिका ही संयमाची नव्हती. अशा काळात बेभान होऊन नाही तर भानावर राहून निर्णय घ्यावे लागतात. आक्रमकपणा आणि आक्रस्ताळेपणा, आनंद आणि उन्माद या फरक असतो. त्यामधली सीमारेषाही अतिशय पुसट असते. त्यामुळे वार्तांकन करताना अतिशय काळजी घ्यावी लागते. पण हे भान सुटत असलेलं सध्या तरी दिसतं आहे. भारताने आक्रमक उत्तर द्यावं असं सगळ्यांचं मत होतं मात्र देशात युद्धज्वर निर्माण झाला. अशा गोष्टींमुळे सरकारवरही प्रचंड दबाव निर्माण होते. त्याचे परिणामही देश आणि समाजावर दूरगामी होत असतात.

अभिनेत्री श्रीदेवी हिच्या निधनानंतरही माध्यमांचं हे सुटलेलं भान जगाला दिसलं. भडकपणामुळे लोकांचं लक्ष वेधलं जात असलं तरी त्यामुळे विश्वसनीयता मिळत नाही. उलट विश्वास कमी होतो हे वारंवार दिसून आलं आहे. या आधीही २६/ ११ ला मुंबईवर झालेला दहशतवादी हल्ला असो, की दिल्लीत झालेला बॉम्बस्फोट असो, की निर्भयावर झालेला बलात्कार माध्यमांच्या याच बटबटीतपणामुळे सर्व माध्यमांच्याच विश्वसनीयतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय.

सोशल मीडिया वापरताना काळजी घ्या

सोशल मीडियावर कुणाचंही नियंत्रण नसल्याने खोट्या बातम्यांचा (फेक न्यूज) सुळसुळाट झाला आहे. जगभर त्यावर चिंता व्यक्त करण्यात येत आहे. यावर कुठलं सॉफ्टवेअर निर्माण करुन उत्तर मिळणार नाही तर मेंदूचं सॉफ्टवेअर ठीक करणं हाच त्यावरचा मार्ग आहे. तर लोकांनीही हे माध्यम वापरताना किमान भान ठेवलं पाहिजे. आलेल्या प्रत्येक गोष्टीवर विश्वास न ठेवणं, कुठलीही माहिती फॉरर्वड करण्याआधी तिची खातरजमा करून घेणं. आलेल्या माहितीचा स्त्रोत तपासून बघणं आणि भडक, सामाजिक, धार्मिक सलोखा बिघडविणारी माहिती पुढे जाणार नाही याची काळजी प्रत्येकाने घेतली तर खूप मोठं काम होऊ शकते.

आशेचा किरण

असं चिंता करणारं वातावरण असलं तरी सर्वच परिस्थिती काही निराश करणारी नाही. खरं म्हणजे यात माध्यमांचा दोष नाही तर तो वापरणाऱ्यांच दोष आहे. काही दिवसांपूर्वी न्यूज चॅनेलने मराठवाड्यातल्या दुष्काळाची बातमी दाखवली होती. एका शेतकऱ्याला पाणी आणि चाऱ्याची टंचाई असल्याने आपल्याकडची बैल जोडी विकावी लागली. तो शेतकरी जेव्हा ती बैल जोडी बाजारात घेऊन जाऊ लागला तेव्हा त्या शेतकऱ्याची मुलगी त्या बैलांच्या गळ्यात पडून ढसा ढसा रडू लागली. ज्या बैलांसोबत ती लहानपणांपासून खेळली बागडली, कुटुंबाचाच सदस्य असलेले ते बैल विकावे लागणार असल्याने त्या शेतकरी कुटुंबाचा जीव टांगणीला लागला होता. शेतकरी कुटुंबाची ही व्यथा एका स्पेशल रिपोर्टमध्ये दाखविल्यावर राज्यातून मदतीचे अनेक हात पुढे आले. कुणी बैलांच्या चाऱ्याची व्यवस्था केली, कुणी पाण्याची तर कुणी त्या मुलीच्या शिक्षणाचा खर्च उचलला आणि पाहता पाहता ते शेतकरी कुटुंब पुन्हा उभं राहिलं.

नगरजिल्ह्यात राहिबाई यांची देशी बियाण्यांची बँक देशात प्रसिद्ध आहे. मात्र एवढं मोलाचं काम करणाऱ्या राहिबाईंना मात्र राहायला आणि बियाणं ठेवायला – साधं घरसुद्धा बांधण्याची ऐपत नाही ही बातमी जेव्हा – माध्यमांनी दाखवली तेव्हाही मदतीसाठी अनेक हात पुढे आले. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी या बातमीची दखल घेत राहिबाईंना घर आणि बियाण्यांची बँक बांधून दिली. एक नवं काम उभं राहिलं. साध्या एका बातमीने अशी शेकडो माणसांची आयुष्य बदलून गेल्याच्या घटना आहेत.

कुठल्याही गोष्ट ही पूर्णपणे वाईट नसते किंवा चांगली नसते. सत्य हे कुठेतरीमध्ये असतं. ते शोधण्याचा कायम प्रयत्न झाला पाहिजे. सामाजिक भान जपत प्रयत्न झाला तरच ते शक्य आहे. हे काम एकट्या माध्यमांचं नाही तर ते सर्वांचं आहे. हे भान जपलं तरच विश्वसनीयता जपली जाईल. बातमी आणि तिची सत्यता हाच माध्यमांचा प्राण आहे. त्यामुळे ती जपणं, वाढणं आणि विश्वसनीयता राहील. हे काम झाले तर त्यात माध्यमांचं, देशाचं आणि समाजाचंही भलं आहे. हे भान सर्वांमध्ये निर्माण होवो हीच सदिच्छा.

व्यास क्रिएशन्सच्या चैत्र पालवी 2019 या अंकात अजय कौटिकवार यांनी  लिहिलेला लेख.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..