नवीन लेखन...

नाझकाच्या अगम्य रेषा

कधीतरी ‘माणूस पृथ्वीवर उपराच’ आणि नंतर ‘चॅरिएटस ऑफ गॉडस’ ही पुस्तके वाचनात आली अन् मी झपाटून गेले. त्यात वर्णन केलेले इजिप्तमधील पिरॅमिड, कार्नाक, लक्झरची देवळं प्रत्यक्ष पाहिली तेव्हा तर त्या पुस्तकात लिहिल्याप्रमाणे ह्या बांधकामांची निर्मिती ही मानवी नसून परग्रहावरील कोणीतरी येऊन केलेली असावी असे खरोखर वाटायला लागले. विशेषत: त्यात वर्णन केलेल्या ‘नाझकाच्या अगम्य रेषा’ बद्दल वाचून कधी एकदा त्या बघायला जायला मिळेल असे झाले होते. तिकडे जाण्यासाठी ‘अनुभव ट्रॅव्हल्स’ या कंपनीची सहल आम्हाला मिळाली.

या रेषा व भूचित्रे (geoglyph) पहाण्यासाठी दक्षिण अमेरिकेतील पेरू या देशात जावे लागते. प्रवास खूपच लांबचा व कंटाळवाणा आहे. पण काहीतरी वेगळं पहायला जाण्याची ओढ आम्हाला तिथवर घेऊन गेली. नाझकाच्या रेषा पहायला पेरूच्या पराकस किंवा नाझका या छोट्या खेड्यातूनच जावे लागते. आम्ही पराकसचा मार्ग पत्करला. पेरूची राजधानी लीमा पासून दिवसभर बसप्रवास करून आम्ही पराकसला पोहोचलो. कौलारू घरांचे अगदी साधे गाव. पण जगातले मोठे आश्चर्य तिथेच होते. गाव पहाण्यापेक्षा नाझकाच्या रेषांकडे आमचे लक्ष लागले होते.

नाझकाच्या रेषा बघायला कधी व किती वाजता जायचं ते सर्वस्वी वाऱ्याच्या वेगावर, दिशेवर, दृश्यमानतेच्या प्रमाणावर (व्हिजिबिलिटी) अवलंबून असतं. आम्हाला योग्य ती परिस्थिती नशीबाने लगेचच उपलब्ध झाली. त्यामुळे आम्ही बसने पिस्कोच्या विमानतळावर गेलो. नाझका या खेड्यातल्या इका विमानतळावरूनही तिथे जाता येते. पण पराकसजवळच्या पिस्को पासून होणाऱ्या प्रवासात बराच वाळवंटी प्रदेश पाहायला मिळतो म्हणून आम्ही पिस्को गाठले.

विमानतळ अगदी छोटा, सुशोभीकरणाच्या कोणत्याही गोष्टी नसलेला साधासुधा होता. आम्ही तिथे पोहोचलो तेव्हा तिथे फक्त २-३ कर्मचारीच होते. बाकी सगळी सामसूम. १०-१२ आसनांची दोन विमाने बाहेर उभी होती. पासपोर्ट तपासून प्रत्येकाच्या वजनानुसार आमच्या हातात सीट नंबर असलेले तिकीट दिले गेले. ते घेऊन आम्ही कर्मचाऱ्यां पाठोपाठ विमानापाशी आलो.

१४ प्रवाशांची सोय असलेले छोटे विमान उड्डाणासाठी तयार होते. विमानाच्या दारात २ पायलट उभे होते. वर चढण्यासाठी मदत करून आसन क्रमांकाप्रमाणे त्यांनी आम्हाला स्थानापन्न केले. पट्टे बांधलेले आहेत ह्याची स्वत: पायलटने खात्री करून घेतली. आमचे स्वागत करून झाल्यावर विमानचालकाने आपत्कालीन परिस्थितीत घ्यावयाची काळजी, त्यासाठी वापरण्याची साधने याबद्दलची माहिती दिली. विमान बरेच खालून-कमी उंचीवरून उडणार असल्याने भरपूर हादरे, सतत वळणे घेतल्याने पोटात खड्डा पडणे, मळमळणे ह्या सारखा त्रास होणार याचीही माहिती पायलटने दिली व विमानाला गती दिली. हळूहळू जमीन खाली राहिली, आकाश जवळ यायला लागलं, पराकसची छोटीछोटी घरं अजून लहान व्हायला लागली, विमानाने वळण घेतलं आणि खाली पॅसिफिक महासागराचे पाणी दिसायला लागले.

विमान जसजसे उंचावर जाऊ लागले तसतसे सगळे ढगात अदृश्य झाले. तेही फक्त १० मिनीटे. लगेचच पायलटने “आपण आता पंपासच्या जुमाना वाळवंटावरून उडणार आहोत, हे वाळवंट सॅन जोन्स व पाल्पा या गावांच्या मध्ये अंदाजे १७० मैल पसरलेले आहे, विमान आता हळूहळू कमी उंचीवरून उडायला लागेल, खाली तुम्हाला डोंगर व दऱ्या दिसतील.” अशी माहिती सांगायला सुरुवात केली. खिडकीतून खाली पाहिले तर खरोखरच खूप दऱ्या, डोंगर, पाण्याने निर्माण झालेल्या घळी दिसत होत्या. खालच्या डोंगरदऱ्यांचा रंग करडा, तपकिरी, पांढरट होता. नव्याने तयार झालेला, नाझकाला लीमा आणि इतर भागांशी जोडणारा, पॅन अमेरिकन हायवेही त्या डोंगराच्या कडे खांद्यावरून लीलया सरपटताना दिसत होता. नाझकाचे खेडेही खाली दिसले. जेमतेम ५०-६० उंबरठ्याचे कौलारू छपरांचे ते गाव सर्व बाजूंनी डोंगरांनी वेढलेले होते. “ह्या गावाच्या आसपास इका लोकांच्या वेळची, ख्रिस्तपूर्व काळातली मातीची भांडी, पूर्वीच्या डिझाईनचे कपडे सापडले आहेत. त्यावरून नाझका संस्कृतीची व काळाची कल्पना येते.” पायलट सांगत होता व आम्ही ऐकत होतो.पण लक्ष सगळे नाझका रेषांवर लागले होते. जवळपास ३५ मिनिटांच्या प्रवासानंतर आम्ही नाझकाच्या वाळवंटी पठारावर आलो. विमान आता आणखी खाली आले. अंदाजे १५०० ते २००० फूट उंचीवर आम्ही उडत असल्याने खालचे पठार खूप स्पष्ट दिसत होते. निस्तेज लालसर काळपट असा हा भाग समुद्रसपाटीपासून १५०० ते १८०० फूट उंचीवर आहे. “सुमारे ६०० मैल पसरलेले हे पठार जगातील अत्यंत कोरड्या, रूक्ष, अगदी कमी पाऊस पडणाऱ्या पठारांपैकी एक आहे. इथले तपमानही वर्षभर २५-२७से.ग्रे. पर्यंतच असते. आश्चर्य म्हणजे इथे प्रचंड वारं किंवा पाऊस नसल्याने जमिनीची धूपही नाही.” पायलट सांगत होता.

“यापुढे जवळजवळ २० मिनिटे आपण १२००-१५०० फूट उंचीवरून उडणार आहोत, खूप डावी उजवी वळणे आपण घेणार आहोत तेव्हा सावधपणे बसा, कॅमेरे व वॉमिटिंग बॅग्ज हाताशी तयार ठेवा व मुख्यत: शांत रहा, जागा व बांधलेले पट्टे अजिबात सोडू नका” वगैरे सूचना जेव्हा पायलटने दिल्या, तेव्हा सगळे खिडकीतून बाहेर बघण्याचा प्रयत्न करू लागले. खाली जमिनीवर बऱ्याच वेड्यावाकड्या रेषा दिसत होत्या. पण अजून एकही स्पष्ट अशी आकृती दिसत नव्हती.

या रेषा म्हणजे एक न उलगडलेले कोडेच आहे. २० व्या शतकाच्या सुरुवातीला विमानातून दिसलेल्या या रेषा जगभरातल्या संशोधकांनी खूप अभ्यास करूनही अद्याप अनुत्तरितच आहेत. पहिल्यांदा खूप उंचीवरून अगदी बारीक रेशमाने विणलेल्या सुंदर विणकामासारखे दिसणारे जमिनीवरचे नक्षीकाम जवळून बघितल्यावर वेगळेच दिसू लागले. ८० कि.मी. च्या प्रचंड मोठ्या परिसरात खोदलेले सुमारे १३००० रेषा व ८००प्राणी, पक्षी यांसारखे आकार आढळून आले आहेत. या रेषा अगदी पट्टी ठेऊन आखाव्या इतक्या सरळ व स्पष्ट आहेत. काटकोनात एकमेकींना छेदणाऱ्या काय किंवा समांतर रेषा काय एकदम सरळ व आवश्यक तिथे अचुक वळवून एकमेकींना जोडलेल्या. एकही रेषा तुटक अथवा अर्धवट नाही. एवढ्या उंचीवर येऊन हा सगळा उद्योग कुणी व कशासाठी केला असावा ह्याचे सयुक्तिक स्पष्टीकरण अद्यापही मिळालेले नाही. साहजिकच कुतूहल निर्माण होऊन त्याचा अभ्यास सुरू झाला. नाझकाचे, पाल्पाचे खेडे म्हणजे मनुष्यवस्ती येथून बरीच दूर आहे. तेव्हा या आकृत्या कोणी, केव्हा व कशा तयार केल्या असाव्यात, या विषयी शोध घेणे व तर्क करणे सुरू झाले. जस जसा शोध सुरू झाला तशा नाझका, पाल्पा-पंपास द जुमाना या वाळवंटामध्ये सापडलेल्या अशा आकृत्यांची संख्या व त्यांनी व्यापलेला एरियाही बदलत गेला. एवढं मात्र खरं की ह्या आकृत्या खूपच सुंदर, प्रचंड आहेत. माकड, कोळी, हमिंग बर्ड, काँडोर वगैरे पशुपक्षी तर आहेतच, जोडीला ट्रॅपिझॉईड, सरळ समांतर रेषा या सारखे भूमितीचे आकार, राक्षस, अंतराळ वीरासारखे मानवी आकारही इथे दिसतात. या भागात ज्या मातीच्या वस्तु सापडल्या आहेत त्यावरून त्या आकृत्या व रेषा इ.सन ५०० ते ६०० मधल्या असाव्यात असे संशोधकांचे म्हणणे आहे. या रेषा १० ते १५ सें.मी. खोल आहेत, पृष्ठभागावर असणारे दगड बाजूला झाल्यामुळे तयार झालेल्या आहेत. आयर्न ऑक्साईडचा हा थर बाजूला झाल्यावर खालचा पांढरा स्वच्छ लाईमचा थर मोकळ्या हवेला उघडा झाला व सकाळचे धुके, ऊन व हवेचा परिणाम या सगळ्यांमुळे दगडाहूनही कठीण झाला. त्यातच इथे पाऊसनसल्याने जमिनीची झीज नाही, जोराचे वारे नसल्याने रेषा वा आकृत्या विस्कटण्याची भीती नाही. इथले तपमानही वर्षभर साधारण २५ ते २७ अंश से. इतकेच कायम असते. हे नाझकाचे पठार जगातले सर्वात कोरडे असे असल्याने व खूप वर्षे लोकांना माहितीच नसल्याने या रेषा व आकृत्या पूर्णपणे सुरक्षित राहिल्या. पॅन अमेरिकन एक्स्प्रेस वे झाल्यानंतर एकदा त्या भागात भूस्खलन झाले होते त्यात एक्स्प्रेस वे चे बरेच नुकसान झाले पण या पठारावरच्या रेषांना काहीही झाले नाही. १९९४ साली युनेस्कोने हा प्रदेश जागतिक ऐतिहासिक ठेवा म्हणून जाहीर केला. त्यामुळे यापुढे त्या रेषांना काही धोका होणार नाही अशी आशा आहे. त्या रेषा, आकृत्यांचा अचूकपणा, आकार, प्रमाण बद्धता प्रत्यक्ष बघितल्यावर नाझका संस्कृतीच्या लोकांनी या रेषा खोदल्या व त्याही तिथे सापडलेल्या लाकडी फळकुटांसारख्या अवजारांच्या सहाय्याने या गोष्टींवर विश्वास बसणे थोडे कठीणच आहे.

या रेषा व आकृत्या कशासाठी खोदल्या असाव्यात या बद्दल बरीच वेगवेगळी मते आहेत. गंमत म्हणून कोणी इतक्या अवघड ठिकाणी जाऊन १३ हजार रेषांचे जाळे व ७००-८०० पशुपक्षांचे आकार खोदणार नाही हे तर उघडच आहे. एक मत आहे की नास्का संस्कृतीच्या लोकांनी त्यांच्या पाण्याच्या शोधासाठी हे चर खणले असावेत. दुसऱ्या मताप्रमाणे वेगवेगळ्या देवांना प्रार्थना, पूजा करून खूश करण्यासाठी माकड, मासा, कोळी, पक्षी वगैरे आकार खोदले असावेत. कोणाच्या मताप्रमाणे पावसाच्या देवाला प्रसन्न करून पाण्याची नीट गावापर्यंत व्यवस्था करण्यासाठी नाझकाच्या राजाने प्रजेकडून हे काम करून घेतलं असावं. पुरुष ह्या कामात डोंगरावर गर्क रहातील तर आपोआपच प्रजेची नवनिर्मिती कमी होईल असेही एक गंमतशीर मत ह्या कामाबद्दल कोणीतरी मांडले आहे. पण ह्या सगळ्यांपेक्षा परग्रहावरून आलेल्या अंतराळवीरांना पुन्हा इथे येणे सोपे पडावे व सहज सापडावे म्हणून या खुणा नाझकाच्या रहिवाशांनी केल्या असाव्यात, हे मत जास्त योग्य वाटते. विशेषतः टॅपिझियम किंवा अंतराळवीर यांच्या आकृत्या पाहिल्यावर तर हेच मत पटते. पण पूर्णपणे पुराव्यानिशी पटेल असे एकही मत नाही.

“आता आपण बरेच खाली आलो आहोत. आता मी वळण घेणार आहे. तेव्हा डावीकडच्या प्रवाशांनी खाली बघावे. त्यांना बरोबर खाली कोळ्याची आकृती दिसेल असे पायलट सांगत होता तोच विमान झपकन डावीकडे वळले. आमच्या पोटात गोळाच आला. कारण विमानाचा डावीकडचा पंख खाली झुकला होता. कसेबसे सावरून खाली जमिनीकडे बघितले तर भलामोठा कोळी आपले हातपाय पसरून पहुडला होता. अबब! किती मोठ्ठा दिसत होता तो! जवळपास ४७ मीटर लांबीच्या त्या भव्य आकृतीचे जमेल तसे फोटो काढेपर्यंत विमान सरळ झालेही. थोडावेळ ते सरळ रेषेत गेले, माघारी वळले व “पूर्वसूचना” देऊन झपकन उजवीकडे वळले. आता उजवा पंख तसाच खाली गेला व तीच कोळ्याची आकृती पुन्हा एकदा दिसली. यावेळी आम्ही थोडेसे सावरलो होतो त्यामुळे कसातरी फोटो काढू शकलो. विमान एवढे हलत होते की व्हिडियो जवळपास अशक्यच! पुन्हा विमान सरळ होऊन दुसऱ्या आकृतीकडे गेले. ही आकृती होती ‘हमिंग बर्डची’. कोळ्यापेक्षाही जास्त मोठी. ९३ मीटर लांबीचा हमिंग बर्ड पहायला विमानाला त्याच्या कडेकडेने उडावे लागले. डावी-उजवी कडून वळणे घेत वैमानिक लीलया त्या परिसरात विहरत होता. आम्हाला आत्तापर्यंत पुस्तकात वाचलेले, त्यामुळे स्वप्नातही येणारे चित्र प्रत्यक्षात खाली दिसत होते, मध्येच आजुबाजुचे सगळे गरकन फिरल्यासारखे होत होते, पट्टे लावून तोल सावरत आसनावर कसेबसे बसून होतो तरी खालच्या दृश्यावरून नजर हलत नव्हती. एकामागोमाग एक आकृती डोळ्यांखालून जात होती.गोल गुंडाळलेली लांब शेपटी असणारी केकाटणाऱ्या (हाउलिंग) माकडाची ९३ मी.व ५८ मी. रुंद अशी आकृती दिसल्यावर नाझकाच्या रेषांचा ध्यास घेउन जे इथवर आलो होतो त्याचे सार्थक झाले असे वाटले. त्यानंतर दिसलेले काँडोर,फुलपाखरू त्यापेक्षाही मोठे होते. पण इथे सगळे आश्चर्य संपत नव्हते. पुढच्या छोट्या टेकडीच्या उतारावर अंतराळवीर आमची वाट पहात होता. एक४-५ फुट उंचीचा, आकाशाकडे बघणारा, मोठमोठ्या टपोऱ्या डोळ्यांचा मुलगा टेकडीला पाठ टेकून उभा असावा असे दिसत होते. आपल्या खेड्यातल्या मुलांप्रमाणे आमच्या विमानाला आपला उजवा हात उंचावून टाटा करत होता व डावा हात जमिनीकडे करून तो इथे सपाट जागा आहे पुन्हा याल तेव्हा इथे उतरा असे सांगत होता. अर्थात त्याचे हे हातांनी वरची खालची दिशा दाखवणे हे आमच्यासाठी नसून परग्रहावरून जे प्रवासी आले व परत गेले त्यांच्यासाठी होते हे ही एक मत नाझकाच्या रेषांबद्दल प्रचलित आहे.

आम्हाला आता सगळे पाहून संपले असेल तेव्हा आपण परत फिरणार असे वाटत होते तोच विमानाने परत वेगळ्याचे दिशेचे वळण घेतले. पायलट साहेबांच्या सूचनेनुसार खाली नजर टाकली तर एक लांबलचक समलंब चौकोनाची (ट्रॅपिझियम) आकृती जमिनीवर पसरली होती. त्याचे निमुळते टोक खूप लांबपर्यंत गेलेले दिसत होते. हे कशासाठी असावे याच्याबद्दलही वेगवेगळी मते आहेत. अंतराळवीरांनी जे विमान जमिनीवर उतरवलं, त्यामुळे पृष्ठभागावरचे दगड वाऱ्याच्या झोताने दूर झाले व ही आकृती तयार झाली असे एक मत. दुसऱ्याचे म्हणणे असे की परग्रहावरच्या अंतराळवीरांसाठी नाझकाच्या लोकांनी तयार केलेले हे विमानतळ असावे, तर तिसरे म्हणतात की ते अंतराळवीर नक्की परत येणार आहेत व त्यांना ही जागा अचूक सापडावी म्हणून केलेली ही खूण आहे. आणखी एका मतानुसार ही लांबलचक पट्टिका अँडीज पर्वताकडे जाण्याचा मार्ग दाखवते. नक्की हे काय व कशासाठी ह्याचा पुरावा नाही तोवर अशी मते प्रगट होणारच. पण एक मात्र नक्की, हे सगळे खूप पुरातन पण सुस्पष्ट आहे, या आकृत्या व रेषा आजूबाजूच्या जमिनीच्या रंगांपेक्षा पांढऱ्या व उठून दिसणाऱ्या आहेत, हे काम प्रचंड आहे व ते करणाऱ्यांचा भूमितीचा व चित्रकलेचा अभ्यास खूप काटेकोर असणार. त्यांच्या अंगात शक्ती व चिकाटी भरपूर असणार यात शंका नाही. डावी उजवीकडे वळणे घेऊन आम्हाला सर्व आकृत्या नीटपणे दाखवून वैमानिक महाशयांनी जाहीर केलं की “अशी अनेक वेगवेगळ्या रेषा असलेली ठिकाणे आहेत. एकूण ५०० चौ.किमी. पेक्षा जास्त प्रदेश या आकृत्या व रेषांनी व्यापलेला आहे. पशु, पक्षी, त्रिकोण, चौकोन, यापेक्षा वेगळ्या अशा पंचांग, पत्रिका मांडावी त्याप्रमाणे, घड्याळ्या प्रमाणे दिसणाऱ्या गोलात चक्राचा आकार असणाऱ्या पंख्याच्या आकाराच्या, झाडे, फुले यासारख्या विविध आकृत्याही इथे आहेत. हवामानाचा अंदाज, वर्षभराचे सूर्याचे उदयास्त, सूर्यग्रहणाचे वेळापत्रक या साऱ्याचे गणित नाझकाचे लोक या आकृत्यांवरून ठरवत असत असे संशोधकांचे मत आहे. पण हवेच्या लहरीपणामुळे सगळेच एकदम पहाता येत नाही. तरीही तुम्ही खाली पहात रहा. तुम्हाला त्याआकृत्याही दिसतील. आपण आता परत एकदा शेवटची चक्कर पुरी करून परतीच्या वाटेला लागत आहोत.” खालची जमीन अजूनही स्वच्छ दिसत होती. त्यात बऱ्याच आकृत्याही दिसल्या. पण त्याचे वेगळे वर्णन वैमानिकाने न केल्याने फारशा ओळखता आल्या नाहीत. जे काही पाहिले ते व झाली एवढीच कसरत आमच्यासाठी पुरेशी -पुरेशी काय जरा जास्तच होती. चक्कर मारून विमान हळूहळू परत उंच जात असल्याचे जाणवले. जमीन खाली खाली जाऊ लागली, डोंगर घळी दिसू लागल्या. नाझकाचे खेडे दिसले अन् नाझकाच्या अगम्य रेषा पहाण्याचे खूप वर्षांपासून पाहिलेले स्वप्न पूर्ण झाल्याचे समाधान मिळाले.
थँक्स टू अनुभव ट्रॅव्हल्स…..

–अनामिका बोरकर

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..