नवीन लेखन...

नाट्याभिमानी शशी जोशी

ठाणे रंगयात्रामधील मकरंद जोशी यांचा लेख.


आपल्या वडिलांकडून मिळालेला अभिनयाचा आणि नाट्यप्रेमाचा वारसा जिवापाड जपणारं आणि ठाण्याच्या नाट्यवर्तुळाचा झेंडा अमेरिकेत फडकावणारं नाट्यरंगी रंगलेलं व्यक्तिमत्त्व म्हणजे शशी जोशी. आपल्या 56 वर्षांच्या आयुष्यात शशी जोशींनी सदैव विचार केला तो फक्त नाटकाचाच. नटवर्य नानासाहेब फाटकांपासून ते विक्रम गोखल्यांपर्यंत मराठी रंगभूमीवरच्या अनेक दिग्गज कलाकारांबरोबर अभिनय करण्याची आणि त्यांची शाबासकी मिळवण्याची संधी लाभलेल्या शशी जोशींना नाटकाचा वारसा लाभला तो त्यांचे वडील कै. शंकर कृष्ण जोशी यांच्याकडूनच. शंकरराव स्वत: उत्तम गायक नट होते. पेशाने शिक्षक असलेल्या शंकररावांचे गाणे ऐकून बालगंधर्वांनी त्यांना गंधर्व नाटक कंपनीत पुरुष भूमिका करण्यासाठी निमंत्रित केलं होतं. पण घरच्या विरोधामुळे शंकरराव व्यावसायिक रंगभूमीवर जाऊ शकले नाहीत. मात्र हौशी मंडळांच्या माध्यमातून शंकरराव जोश्यांनी ‘तोतयाचे बंड’, ‘आग्य्राहून सुटका’, ‘बेबंदशाही’, ‘एकच प्याला’, ‘सौभद्र’, ‘भावबंधन’, ‘पुण्यप्रभाव’, ‘मानापमान’ इ. नाटकांमधून विविध भूमिका दर्जेदारपणे साकारून आपल्या नाट्यप्रेमाला वाट करून दिली. पुढे ठाण्यातील ब्राह्मण विद्यालयाचे मुख्याध्यापक म्हणून काम करत असताना त्यांनी शालेय नाट्यस्पर्धेसाठी ‘शंभूराजे’ हे विद्यार्थ्यांचे नाटक दिग्दर्शित करून, त्या स्पर्धेत प्रथम पारितोषिक मिळवले. 1961 साली ब्राह्मण विद्यालयाच्या रौप्य महोत्सवानिमित्त त्यांनी ‘नेकजात मराठा’ हे नाटक दिग्दर्शित केले आणि याच नाटकातून शशी जोशींनी ‘जयवंतराव’ या भूमिकेतून रंगमंचावर पदार्पण केलं. वयाच्या 18व्या वर्षी त्यांच्या चेहऱ्याला जो रंग लागला तो पुढे कधीच उतरला नाही. 1965 साली शंकररावांनी पुढाकार घेऊन ‘नाट्याभिमानी’ ही हौशी नाट्यसंस्था सुरू केली आणि शशी जोशींच्या नाट्यप्रेमाला मुक्त वाव मिळाला.

नाट्याभिमानीच्या मंचावर ‘वेगळं व्हायचंय मला’, ‘काका किशाचा’, ‘मुंबईची माणसे’ या तेव्हा व्यावसायिकवर गाजणाऱ्या नाटकांचे बहारदार प्रयोग केल्यानंतर त्यांनी आपला मोर्चा राज्य नाट्यस्पर्धेकडे वळवला. त्याचवेळी नाट्यव्यवस्थापक एस. पुरुषोत्तम यांच्याशी ओळख झाली आणि व्यावसायिक रंगभूमीचा दरवाजा त्यांच्यासाठी उघडला गेला. 6 जानेवारी 1968 रोजी ‘एकच प्याला’ मध्ये ‘विरुपाक्ष शास्त्री’ ही छोटीशी भूमिका करून त्यांनी नाटकांच्या मुख्य प्रवाहात पाऊल ठेवलं. त्यावेळी ‘पुण्यप्रभाव’, ‘राजसंन्यास’, ‘एकच प्याला’, ‘लग्नाची बेडी’ अशा लोकप्रिय नाटकांचे प्रयोग नामवंत कलावंतांच्या संचात करण्याची पद्धत लोकप्रिय होती. मात्र या नाटकांचे प्रयोग सातत्याने होत नसल्याने त्यातील छोट्या भूमिका करण्यासाठी कलाकार शोधावे लागायचे. तल्लख स्मरणशक्ती, स्पष्ट शब्दोच्चार आणि नैसर्गिक अभिनय क्षमता या जोरावर त्यांना अशा नटसंचामध्ये वेगवेगळ्या भूमिका करण्याची संधी मिळाली. अगदी एक दिवसात गडकऱ्यांच्या ‘राजसंन्यास’ मधील किंवा ‘पुण्यप्रभाव’मधील लफ्फेदार संवाद अस्खलितपणे सादर करण्याचे तंत्र गवसल्याने त्यांनी त्या काळात दामुअण्णा मालवणकर, नानासाहेब फाटक, रमेश देव, पद्मा चव्हाण, सतीश दुभाषी अशा नामवंतांबरोबर कामे केली. या निष्णात अभिनेत्यांबरोबर काम करणं हे जणू शशी जोशींसाठी अभिनयाचं प्रशिक्षणच होतं. या अनुभवामुळे त्यांच्यातला अभिनेता अधिक समृद्ध झाला. आयत्यावेळी केलेल्या, रिप्लेसमेंटच्या भूमिकांमधूनच आपल्याकडे नवी कोरी भूमिका चालत येईल हे त्यांना माहीत होतं. त्यामुळे 1968 ते 1973 या काळात व्यावसायिक रंगमंचावर या प्रकारच्या भूमिका ते उत्साहाने करत राहिले. याच काळात ठाण्यात नाट्याभिमानीच्या माध्यमातून त्यांनी नाटककार म्हणूनही आपली लेखणी सरसावली होती. ‘त्रिकोणी प्रेमाची पॉलिसी’ (1971) आणि ‘सुराविण तार सोनियाची’ (1972) ही दोन वेगवेगळ्या प्रकारची नाटके लिहून त्यांनी स्वतमधील नाटककाराला आजमावले.

व्यावसायिक रंगभूमीवर त्यांना मिळालेली पहिली नवी कोरी भूमिका होती 1974 साली रंगभूमीवर आलेल्या श्याम फडके लिखित आणि राम मुंगी दिग्दर्शित ‘बायको उडाली भुर्रर्र…’ या नाटकातील. धोपेश्वरकर ही विनोदी व्यक्तिरेखा शशी जोशींनी आपल्या ढंगात अशी फर्मास सादर केली की, त्यांना प्रेक्षक आणि समीक्षकांची भरभरून दाद मिळाली. या नाटकात त्यांना ज्येष्ठ अभिनेत्री सुलभा देशपांडे यांच्याबरोबर एकच प्रसंग होता, पण त्यात ते धम्माल उडवायचे. मग व्यावसायिक रंगभूमीवर एकामागून एक नाटके मिळत गेली आणि ‘मृत्युंजय’, ‘समोरच्या घरात’, ‘पृथ्वी गोल आहे’, ‘वरचा मजला रिकामा’, ‘गारंबीचा बापू’, ‘लेकुरे उदंड झाली’, ‘कलंदर’, ‘संभूसांच्या चाळीत’, ‘राजू तू खरं सांग’, ‘पारू’, ‘घेतलं शिंगावर’, ‘सिंहगर्जना’, ‘मायबाप’, ‘अक्कल धावते घोड्यापुढे’, ‘पार्टनर’, ‘ह्याला जबाबदार कोण’, ‘जन्मगाठ’, ‘वाहतो ही दुर्वांची जुडी’, ‘दुरितांचे तिमिर जावो’, ‘हॅप्पी होम बोंबाबोंब’ अशी त्यांची रंगयात्रा 1999 पर्यंत सुरूच राहिली. या रंगयात्रेत शशी जोशींना ज्याप्रमाणे वेगवेगळ्या भूमिका करायला मिळाल्या, महाराष्ट्रातील गावागावांमधील रसिकांची दाद मिळाली, त्याचप्रमाणे काही सहकलाकारांबरोबर त्यांचे कायमचे स्नेहबंधही जुळले. यशवंत दत्त, रमेश भाटकर, विनय आपटे, प्रभाकर पणशीकर, भालचंद्र पेंढारकर, श्रीकांत मोघे या कलाकारांचा स्नेह हा त्यांचा खरा ठेवा होता. या प्रवासात दिलीप कोल्हटकर दिग्दर्शित ‘पार्टनर’ या अनोख्या पद्धतीने सादर होणाऱ्या नाटकाच्या निमित्ताने लोकप्रिय लेखक व. पु. काळे यांच्या मैत्रीचा ओलावा त्यांना अनुभवता आला. ‘पार्टनर’मधील शशी जोशींचा एक प्रवेश बघायला व. पु. विंगेत हमखास थांबायचे. त्यांनी ‘पार्टनर’मध्ये साकारलेल्या देवधर या व्यक्तिरेखेचं कौतुक करताना वपुंनी लिहिलंय् ‘कपिलदेवनं धावा किती काढल्या हे पाहायचं नाही. तो येतो, धडाकेबाज खेळतो, ठसा ठेवून जातो. शशी भैया पार्टनरमधले तुम्ही कपिल, नो अपिल!’

व्यावसायिक रंगमंचावर वाटचाल करत असतानाच शशी जोशींमधल्या कलाकाराला एका वेगळ्या वाटेनं साद घातली, ही वाट होती एकपात्री सादरीकरणाची. मराठी रंगभूमीला एकपात्री सादरीकरणाची परंपरा लाभलेली आहे. शशी जोशींनी त्यांचे परममित्र आणि नाट्याभिमानीचे हक्काचे नाटककार शशिकांत कोनकर यांच्याकडून ‘सदाशिव गणेश जोशी’ या सरळसाध्या माणसाची हसरी गोष्ट लिहून घेतली आणि सुप्रसिद्ध दिग्दर्शक शशिकांत निकते यांच्या मार्गदर्शनाखाली रंगमंचावर अवतरला एक मनोवेधक एकपात्री कार्यक्रम ‘उचक्या’. नेपथ्याशिवाय आणि रंगमंचावर सादर होणारा ‘उचक्या’ त्यांनी ठाणे, मुंबई, पुणे, नाशिक या शहरांप्रमाणेच लहान-लहान गावातही सादर केल्याच, पण जुलै 1990 मध्ये थेट अमेरिकेत दौरा करून, तिकडे ‘उचक्या’चा रौप्य महोत्सव साजरा केला. त्याचबरोबर अमेरिकेतल्या मराठी प्रेक्षकांसाठी जुन्या मराठी नाटकांमधील प्रवेश, कविता, रंगभूमीबाबतचे किस्से यांचे फर्मास ‘कॉकटेल’ सादर करून, नव्या एकपात्री कार्यक्रमाचा शुभारंभ केला. अमेरिकेतील मराठी प्रेक्षकांची दाद घेऊन, भारतात आल्यानंतर त्यांनी उचक्याच्या बरोबरीने ‘कॉकटेल’चे प्रयोग करून आपल्या एकपात्री कार्यक्रमांचा धडाका सुरू ठेवला. 1997 साली आचार्य अत्रे यांचे जन्मशताब्दी वर्ष होते. ‘अत्रेभक्त’ असलेल्या शशी जोशींनी या वर्षात भक्तिभावाने आचार्य अत्र्यांचे चरित्र रंजकपणे, रसाळपणे कथन करण्यासाठी ‘अत्रे आख्यान’ हा नवा एकपात्री कार्यक्रम सुरू केला. अष्टपैलू आचार्य अत्र्यांच्या चौफेर कामगिरीचा जिवंत आलेख सादर करणारा हा कार्यक्रम सादर करताना ते रंगून जात आणि प्रेक्षकांनाही अत्र्यांच्या आठवणींमध्ये रंगून टाकत.

शशी जोशींनी आपली कारकीर्द बहरात असताना अचानक 12 जानेवारी 1999 रोजी या जगाच्या रंगभूमीवरून एक्झिट घेतली. ‘एकच प्याला’ मधील तळीराम ही त्यांनी केलेली शेवटची भूमिका ठरली. 30-35 वर्षांच्या प्रदीर्घ रंगयात्रेत 1990 साली ‘ह्याला जबाबदार कोण?’ या नाटकातील डॉ. आचरेकर या भूमिकेसाठी मिळालेल्या महाराष्ट्र राज्य शासनाच्या सर्वोत्कृष्ट पुरस्काराशिवाय त्यांच्या वाट्याला फारसे मान-सन्मान आले नाहीत. व्यावसायिक रंगमंचावर रिप्लेसमेंट आर्टिस्ट असा विनाकारण शिक्का बसल्याने त्यांच्या वाट्याला नव्याकोऱ्या भूमिका अभावानेच आल्या. नाटकाचे प्रयोग आयोजित करण्यापासून ते नटाअभावी प्रयोग अडू नये म्हणून ऐनवेळी काम करण्यापर्यंत कायम स्वतला नाटकाशी जोडणारे शशी जोशी आज या जगात नाहीत, पण ठाण्याच्या नाट्यवर्तुळात एकपात्रीचा झेंडा डौलाने फडकावणारे रंगकर्मी म्हणून आजही ते नाट्यरसिकांच्या स्मरणात आहेत!

— मकरंद जोशी – 9869304053

(साभार ठाणे रंगयात्रा)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..