नवीन लेखन...

राडा ..दांगोडा.. ! (नशायात्रा – भाग २७)

(कुतुहल, मित्रांचा आग्रह किंवा तात्पुरती मॊजमस्ती उसना आनंद म्हणून आयुष्यात प्रवेश केलेले दारु व इतर मादक पदार्थांचे व्यसन कसे आयुष्य उध्वस्त करते याचा मागोवा या सदरात घेतलेला आहे..)


नाशिक विभागातील बहुतेक सर्व मुले गोळा होऊन मोठ्याने आरडा ओरडा करत नाचत होती ( साधी सरळ मुले मात्र केव्हाच आपल्या खोल्यात झोपली होती ) आम्ही बहुतेक जण दारू पिऊन करत असलेला धिंगाणा ..रात्रीचे ११ वाजून गेलेले . आमची राहण्याची सोय केलेल्या प्रताप कॉलेजच्या वसतिगृहातील तळ मजल्यावर केलेली होती तर वरच्या मजल्यावर त्याच कॉलेजच्या होस्टेलची मुले राहत होती त्यांची परीक्षा महोत्सव संपल्यावर काही दिवसातच होणार असल्याने रात्री बहुतेक मुले आभ्यासात मग्न होती सुरवातीला आमचा धिंगाणा पाहून ती सगळी मुले वरच्या मजल्यावरच्या गँलरीत जमा होऊन आमची गम्मत पाहू लागली मात्र अर्धा तास होऊन गेला तरी आमचा गोंधळ काही थांबेना , आमच्या सोबतचे सर्व व्यवस्थापक त्यांना सोय करून दिलेल्या वेगळ्या निवासस्थानी केव्हाच झोपलेले , कॉलेजचे जी .एस अधूनमधून आम्हाला चला रे बस करा आता म्हणत होते पण दारू पिऊन धुंद झालेली आणि विजयाचा उन्माद संचारलेली मुले ऐकणार थोडीच होती कोणाचे..

वरच्या मजल्यावर गोळा झालेल्या स्थानिक मुलांचे कुतूहल शमले तसे त्यांच्यापैकी एकाने ‘ ओ ..भाऊ चला बर आता तुम्ही झोपून जा , असे ओरडून म्हंटले ‘ तसे आमच्यातील एकाने ‘ ए ..आज रातभर नही सोयेंगे ..मस्ती करेंगे ..नाचेंगे, आम्ही पाहुणे आहोत तुमचे ” ‘ असे प्रत्युत्तर दिले आणि पुन्हा एकदा जयजयकार सुरु केला आम्ही . आमचे असे उत्तर एकून वरची मुले चिडली असावीत ‘ पाहुणे आहात तर पाहुण्याच्या पायरीने रहा , दांगोडा करायचा असेल तर तसे सांगा ‘ असे उत्तर आले वरून , नशेत असलेल्या आम्हाला देखील या उत्तराचा राग आला आणि ‘ तुम्हाला काय करायचे ते करा .. म्हणत आरडा ओरडा सुरु केला , त्यावर प्रतिक्रिया म्हणून वरच्या मजल्यावरून एक खुर्ची आमच्या घोळक्यात फेकली गेली ती कोणाच्या अंगावर पडली नाही पण आम्ही वाजवत असलेल्या कोंगोवर पडली , झाले ठिणगी उडाली , आम्ही लगेच शिवीगाळ सुरु केली , ती पडलेली खुर्ची जमिनीवर आपटून तिचे पाय मोकळे केले गेले , ते खुर्चीच्या पायाचे दांडे हातात घेऊन आम्ही वर ललकारले ‘ आओ सालो .. मैदानमें , हिम्मत असेल तर खाली येऊन बोला ‘ मी त्या वेळी लावारीस टाईप बूट घातलेले होते त्याच्या आत माझे ते लोखंडी चेनला गोळा लावलेले हत्यार लपवले होते ते बाहेर काढले .

आता परिस्थिती गंभीर झालेली होती मग आमच्या लक्षात आले की आम्ही धिंगाणा करणारे सुमारे ३० मुले होतो तर होस्टेल मध्ये राहणारी मुले जास्त होती संख्येने .. हळू हळू वरच्या होस्टेल मधली मुले खाली येऊन चारही बाजूने आम्हाला घेरत होती एव्हाना ही बातमी आमचे व्यवस्थापक फडके सर् यांच्या पर्यंत पोचली होती ते धावत येऊन आम्हाला समजावू लागले पण आम्ही ऐकायला तयार नव्हतो कोणीतरी राणाप्रताप कॉलेजच्या होस्टेल वार्डनने ऑफिस मध्ये जाऊन पोलिसांना फोन केला आहे अशी खबर आणली , तशी आम्ही फडके सर आम्हाला खूप रागावले आणि त्यांनी आम्हाला आमच्या खोल्यात कोंबायला सुरवात केली एकूण तीन खोल्यात त्यांनी आम्हाला कोंबले आणि बाहेरून दाराला कड्या लावून घेतल्या ते बाहेरून ओरडून सांगत होते ” तुम्ही सगळे झोपा आता गुपचूप , पोलीस येणार आहेत ‘” आमच्या जागा बदलल्या गेल्या होत्या आमचे सामान दुसऱ्या खोलीत तर आम्ही तिसऱ्याच खोलीत असे झाले होते . घडल्या प्रकारची दबक्या आवाजात चर्चा करत आम्ही मिळेल त्या ठिकाणी बसलो , खोलीत आधीच काही साधी सरळ मुले झोपी गेलेली होती , त्यांना एकदम काय गोंधळ आहे ते समजेना त्यांना बाजूला सरकायला सांगत आम्ही जागा करून घेतली आमच्यासाठी ..

साधारण १५ मिनिटे झाली असावीत तरी बाहेरून कसली चाहूल लागेना , आम्हाला वाटले फडके सरांनी आम्हाला घाबरवले असावे पोलिसांचे नाव सांगून. थोडे निवांत झालो तशी मी चिलीम काढून गांजाचे दम मारले , एकदोघांना मी चिलीम ऑफर केली पण त्यांनी नाकारली व माझ्याकडे ते कुतूहलाने पाहू लागले तशी मला अजून जोर चढला , जोरात दम मारून , मी किती बिनधास्त आहे हे प्रदर्शन करू लागलो तितक्यात दुरून पोलिसांच्या गाडीचा सायरन ऐकू आला तसे आमचे धाबे दणाणले , मी पटकन चिलीम विझवून माझ्या बुटात लपवली , कोणीतरी म्हणाले लाईट बंद करा खोलीतील म्हणजे पोलिसांना वाटेल आपण झोपलो आहोत , लाईट बंद करून आम्ही उताणे पडून बाहेरील आवाजांचा कानोसा घेत होतो ..

मोठमोठ्याने बोलण्याचे आवाज येत होते बाहेरून , मध्येच फरशीवर चालताना होणारा बुटाचा आणि दंडुका आपटल्याचा आवाज …आम्ही एकदम चिडीचूप झालो होतो आमच्या बाजूच्या दोन्ही खोल्यात देखील आमच्यातीलच मुले कोंबली होती सरांनी, त्या खोलीचे दार बाहेरून ठोठावल्याचा आणि दार उघडल्याचा आवाज आला मग एक मोठा आवाज आला ‘ वास घ्या एकेकाच्या तोंडाचा आणि दारूचा वास आला तर सरळ आत घ्या ‘ म्हणजे पोलीस नक्की आले होते आणि ते प्रत्येकाच्या तोंडाचा वास घेणार हे आम्हाला समजले . काही वेळातच मग आमच्या खोलीचे दार बाहेरून वाजवले गेले , कोणाचीच हिम्मत होईना पुढे होऊन दार उघडण्याची आम्ही निपचित पडून होतो , काही क्षणांनी पुन्हा जोरात दार वाजवले गेले , तेव्हा आमच्यात नसलेल्या पण खोलीत आधी पासून झोपलेल्या एकाला दाराचा आवाज एकन जाग आली आणि त्याने सरळ उठून डोळे चोळत लाईट लावला व दार उघडले त्या बरोबर एकदम आठ दहा पोलीस आत शिरले पहिले दार उघडणाऱ्या मुलाच्या एक कानाखाली वाजवली आणि त्याला ओढत बाहेर नेले , हे पाहून आमची फाटली ..

आम्ही सगळे एकदम उठून उभे राहिलो . त्या पोलिसांच्या मध्ये एक सहा फुट उंच धिप्पाड व्यक्ती अधिकारवाणीने बोलत होती आम्ही ओळखले हेच ते बाजीराव पाटील ,’ चला रे वास घ्या एकेकाच्या तोंडाचा ‘ बाजीराव गरजले , पोलिसांनी एकेकाला धरून ‘ चल तोंड उघड , वास दे तोंडाचा असे सुरु केले , आम्ही प्यायलेले लोक मागे मागे सरकत होतो , अर्थात तरी आमची पाळी येणारच होती , माझे डोके वेगाने काम करत होते यातून कसे वाचायचे ? हा विचार सुरु होता ..मला एक कल्पना सुचली ( ती कल्पना मानसशास्त्रावर आधारित होती हे आता समजते आहे ) मी विचार केला की जे वास द्यायला घाबरत आहेत , किवा मागे राहत आहेत त्यांच्या बाबतीत पोलिसांची खात्री असणार की हे प्यायलेले आहेत व जी मुले आपणहून सहजतेने पुढे येत आहेत त्यांच्या बाबत बहुधा हे प्यायलेले नसावेत असे वाटत असणार ,, सगळ्यांच्या लक्षात येईल अश्या बेताने एकदम पुढे सरकू लागलो आणि डायरेक्ट बाजीराव पाटील यांच्यासमोर जाऊन माझा वास घ्या असे म्हंटले , माझे मानसशास्त्र आणि भोळा भाबडा चेहरा कामी आला , बाजीराव पाटील यांनी स्वतः माझा वास न घेता बाजूच्या शिपायाला ‘ ”ए याला बघ रे घाई झालीय ‘ असे म्हणून माझा वास घ्यायला सांगितले , त्या पोलिसाने देखील पटकन माझ्याजवळ येऊन तोंड उघडण्यास सांगितले , मी तोंड उघडले पण श्वास बाहेर न सोडता मोठ्याने आँ असा आवाज काढत श्वास आत ओढला , तो पोलीस माझ्या आधीच्या हालचालींनी माझ्या बाबत बहुधा बेसावध होता त्याने पटकन ‘ चल , हो बाजूला म्हणत मला न प्यायलेल्या मुलांच्या घोळक्यात ढकलले . वा , मी चक्क निर्दोष ठरलो होतो !

( बाकी पुढील भागात )

— तुषार पांडुरंग नातू

तुषार पांडुरंग नातू
About तुषार पांडुरंग नातू 93 Articles
मी नागपुर येथे मैत्री व्यसनमुक्ती केंद्र या ठिकाणी समुपदेशक म्हणून गेली १८ वर्षे कार्यरत असुन फेसबुकवर देखिल व्यसनमुक्तीपर लेखन करतो व्यसनमुक्ती या विषयावर माझी ३ पुस्तके प्रकाशित झाली असुन त्यातले एक पुस्तक माझे स्वतचे आत्मकथन आहे . व्यसनमुक्ती व भावनिक संतुलन, स्ट्रेस मॅनेजमेंट, तसेच सामाजिक समस्यांवर प्रबोधनपर लिखाण करतो

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..