नवीन लेखन...

माझी तत्वसरणी :: (४९) पंचमहाभूते आणि पृथ्वीवरील मूलद्रव्ये.

इलेक्ट्रॉन हे आधुनिक युगाचे महामहाभूत आहे. इलेक्ट्रॉनमुळेच वीजप्रवाह निर्माण होतो. त्यामुळे आपली जीवनशैलीच बदलूनगेली आहे. सजीवांचे शरीरही वीजप्रवाह निर्माण करू शकते आणि तेही सजीवांच्या आहाररूपी इंधनातूनच. मेंदू, ह्रदय, यांचे कार्य देखील वीजप्रवाहामुळेच चालते. त्यामुळेच ईसीजी, ईईजी वगैरे आलेख काढून ह्रदय आणि मेंदूतील दोष हुडकून काढता येतात.

सध्या, जगातील मोठमोठे शास्त्रज्ञ, विश्वनिर्मितीचे गूढ उकलण्यात गुंतले आहेत. मूलकणांना वस्तूमान प्राप्त करून देणारे हिग्जबोसॉन हे कण सापडले तर ते प्रचंड महाभूत ठरेल. विश्वात, गुरुत्वाकर्षण बल निर्माण करणारे ग्रॅव्हीटॉन नावाचे मूलकण सापडले तर तेही प्रचंड महाभूत ठरेल.

आपल्याला दिसते ते विश्व आणि पृथ्वीवरील सर्व सजीवसृष्टी पंचमहाभूतांपासून निर्माण झाली आहे ही संकल्पना वेदकालापासून रूढ झाली आहे. मानवाचा मेंदू जेव्हा विचार करण्याइतका प्रगत झाला तेव्हा भोवतालच्या निसर्गाच्या केलेल्या निरीक्षणांची तो, त्याच्या कुवतीनुसार स्पष्टीकरणे देऊ लागला. त्याच्या लक्षात आले की सजीवांची उत्पत्ती आणि अस्तित्व हे, अवतीभोवतीच्या निसर्गात आढळणार्‍या काही घटकावरच अवलंबून आहे. पाच प्रमुख घटक त्याने बरोबर हेरले. माती, पाणी, सूर्यप्रकाश, हवा, आणि जागा, (स्पेस). त्यांना त्याने नावे दिली…पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. आयुर्वेदात देखील रोगनिदान करतांना या पाच घटकांचा विचार केला जातो. या प्रत्येक महाभूताला, विचारवंतांनी, काही गुणधर्म बहाल केले. आपल्या अनुभवातून मिळालेल्या ज्ञानातूनच त्यांनी हे गुणधर्म बरोबर हेरले होते. ही पाच महाभूते आणि त्यांना बहाल केलेल्या गुणधर्मांमुळे, विचारवंतांनी, हजारो वर्षांपासून, अनेक निरीक्षणांची अचूक स्पष्टीकरणे दिली आहेत.

आता विज्ञानाने या सर्व घटकांचा कार्यकारणभाव शोधला आहे. पृथ्वीवरील सर्व अचेतन घटक, हैड्रोजन, ऑक्सीजन, कार्बन, नायट्रोजन, कॅल्शियम, लोह, फॉस्फोरस, वगैरेपासूनच घडले आहेत. याच वस्तूद्रव्यांपासून, पृथ्वीवरील सर्व सजीवही घडले आहेत. प्रत्येक सजीवात असलेल्या आनुवंशिक तत्वामुळेच, त्या सजीवाची प्रजाती आणि त्यातील व्यक्ती ठरते. म्हणजे मानव ही प्रजाती, मानवाचे निरनिराळे वंश या उपप्रजाती आणि प्रत्येक वंशातील कुटुंबे आणि त्यांचे कुटुंबीय म्हणजे व्यक्ती. घोडा ही प्रजाती, घोड्यांच्या निरनिराळ्या जाती आणि त्यातील प्रत्येक घोडा म्हणजे व्यक्ती.

मातीचे घटक आता पूर्णतया माहित झाले आहेत. पृथ्वीच्या कवचातील खडकात आणि मातीत युरेनियमपर्यंतची ९२ मूलद्रव्ये शोधून काढण्याचा, शास्त्रज्ञांचा महान प्रयत्न म्हणजे युगप्रवर्तक प्रयत्न आहे. आता कृषिशास्त्र खूपच प्रगत झाले आहे. जमिनीतल्या क्षारांचे स्वरूप, कोणती जमीन सुपिक का असते? कोणती जमीन नापिक का असते? कोणत्या पिकाला कोणती जमीन योग्य आहे? कोणती खते किती प्रमाणात वापरावी म्हणजे पिकांचा दर्जा आणि एकरी उत्पादन वाढेल? वगैरे बाबींचा सखोल अभ्यास झाला आहे. पृथ्वीनामक महाभूताला आता पूर्णतया जाणले आहे.

पंचमहाभूतापैकी दुसरे महाभूत म्हणजे …आप…जल…पाणी. म्हणजे सजीवांचे, वनस्पतींचे जीवन आहे. पृथ्वीचा जलमय पृष्ठभाग, मातीमय पृष्ठभागापेक्षा जास्त आहे. नद्या, पाणवठे, समुद्र नसते तर पाऊसही नसता आणि पृथ्वी हिरवी झालीच नसती. पृथ्वीवर द्रवरूप पाणी आहे ही एक अती सामान्य पण असामान्य बाब आहे.

पाणी म्हणजे हायड्रोजनचा ऑक्साईड आहे. पाणी, सूर्यप्रकाशामुळे मिळणारी नीलातीत प्रकाशाची उर्जा, कार्बन ऑक्साइड वायू, आणि वनस्पतीतील हरितद्रव्य यांच्या सान्निध्यात, प्रकाश संश्लेषण ही अती महत्वाची रासायनिक क्रिया घडून येते आणि त्यामुळेच सजीवांचे अन्न निर्माण होते हेही माहित झाले आहे.

पंचमहाभूतांपैकी तिसरे महाभूत म्हणजे…तेज. पृथ्वीवरील सजीवांचे अस्तित्व सर्वथा सूर्यावर अवलंबून आहे हे विचारवंतांनी फार पूर्वीच जाणले. म्हणूनच सूर्याला देवांचे स्थान दिले आणि सूर्यपूजेला खूप महत्व दिले. सूर्यापासून मिळणारा प्रकाश आणि उष्णता यामुळेच सजीवांना या पृथ्वीवर जगणे शक्य होते याची जाणीव मानवाला फार पूर्वीपासूनच झाली आहे.

आता शास्त्रज्ञांना, सूर्याबद्दल आणि सूर्यमालेबद्दल सखोल विज्ञानीय माहिती झाली आहे. खग्रास सूर्यग्रहणाचे वेळी खास अशी माहिती, गेल्या दोन-अडीचशे वर्षांपासून मिळविली जाऊ लागली आहे. सूर्यावरील हायड्रोजनच्या अणुसंमीलनाच्या क्रियेमुळे म्हणजे हायड्रोजन बॉम्बच्या स्फोटामुळे सूर्याची प्रचंड उष्णता आणि प्रकाश निर्माण होतो हे आता सिद्ध झाले आहे.

४ थे महाभूत…वायू. पृथ्वीवरील हवेचे अस्तित्वही आदिमानवाला देखिल जाणवले होते. श्वासोच्छवासाद्वारे, सजीव, सभोवतालच्या हवेतून प्राण शरीरात घेतात असा विश्वास वाटत होता. प्राण, अपान, व्यान वगैरे वायूंचे प्रकार आहेत हे ही त्यांनी बरोबर ओळखले होते. हवेचे खरे स्वरूप आता माहित झाले आहे. आपल्याभोवतीची हवा म्हणजे सुमारे ७८ टक्के नायट्रोजन, २१ टक्के ऑक्सीजन आणि बाकीचे महत्वाचे घटक म्हणजे पाण्याची वाफ आणि कार्बन ऑक्साइड याचे मिश्रण आहे. हवेचे स्वरूप जाणणे हाही एक महत्वाचा टप्पा आहे. हवेतला ऑक्सीजन, सजीवांना किती आवश्यक आहे हे निराळे सांगणे नको.

आकाशाची कल्पनाही अचाट आहे. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून वरचा भाग म्हणजे आकाश. तेथे जीवनदाता सूर्य आहे, पृथ्वीला सुजलामसुफलाम करणारा पाऊस येतो, झाडे उंचउंच जातात, पक्षी उडतात …ते आकाश…जीवनावश्यकच. पृथ्वीवरील किंवा अवकाशातील कोणताही घटक आपल्या अस्तित्वासाठी जागा व्यापतो. ते आकाश. शब्द हा आकाशाचा गुणधर्म मानला आहे. खरे आहे. दोन व्यक्तीमध्ये अंतर असले तरी आवाजाच्या माध्यमातून एकमेकांशी संवाद साधता येतो.

थोडक्यात म्हणजे पंचामहाभूतांचे खरे स्वरूप आता विज्ञानाने जाणून घेतले आहे. याच आणि अशाच अनेक धार्मिक संकल्पनांना विज्ञानाने जाणून घेतले आहे. त्याचा आदर धर्ममार्तंडांनी केला पाहिजे.

मूलद्रव्ये म्हणजे आधुनिक महाभूतेच :
ऑक्सिजन (प्राण), गंधक, कार्बन, सोने, चांदी, लोखंड, कथील, शिसे, तांबे, जस्त, पारा वगैरे. बरेचसे धातू पुरातन काळापासून माहित होते. परंतू त्यांची वेदिक साहित्यातील नावे आणि सध्याची नावे यांचे नाते जुळविणे कठीण आहे. आर्सेनिक, मॅग्नेशियम, कॅल्शियम, वगैरे मूलद्रव्ये, निराळ्या नावांने माहित असावी. आपल्या भारतात, कणाद रुशीँनी, विश्वातील सर्व पदार्थ कणांनी बनलेले आहेत हा महत्वाचा सिध्दांत फार पूर्वीच मांडला होता. परंतू, निसर्गात आढळणारी मूलद्रव्ये आणि संयुगे यातील फरक माहितच झाला नव्हता.

हेन्री कॅव्हेन्डिश या विज्ञानरुशींने हायड्रोजन या मूलद्रव्य असलेल्या वायूचा १७७६ साली शोध लावला. ऑक्सीजन या वायूरूप मूलद्रव्याचा शोध, विल्हेल्म शील आणि जोसेफ प्रिस्टले या विज्ञानरुशींनी, स्वतंत्रपणे १७७३ आणि १७७४ साली लावला. त्यानंतर १७८१ साली हेन्री कॅव्हेन्डिशने हैड्रोजन वायूचे ऑक्सीजन वायूत ज्वलन करून पाणी तयार केले. ज्या वायूपासून पाणी निर्माण झाले त्या वायूला हायड्रोजन असे नाव देण्यात शास्त्रज्ञांनी फार मोठे औचित्य साधले आहे. ग्रीक भाषेत Hydros म्हणजे पाणी आणि gen म्हणजे निर्माण करणारा म्हणून तो वायू हैड्रोजन. मराठीत पाणी म्हणजे उदक आणि जन म्हणजे निर्माण करणारा. म्हणून मराठीत, हैड्रोजनला उदजन वायू असे म्हणतात. आप म्हणजे जल… पाणी, हे महाभूत, हे दोन वायूंपासून, म्हणजे आणखी एका महाभूतापासून निर्माण होते, हा विज्ञानाच्या दृष्टीने फार महत्वाचा शोध समजला पाहिजे. अध्यात्माला हा फार मोठा धक्का होता. नैट्रोजन या आणखी एका महत्वाच्या वायूरूप मूलद्रव्याचा शोध डॅनियल रुदरफोर्ड या विज्ञानरुशीने १७७२ साली लावला.

सोडियम, पोटॅशियम, अॅल्युमिनियम, मॅग्नेशियम, बोरॉन, कोबाल्ट, निकेल, क्रोमियम, मँगनीज, क्लोरीन, हेलियम आणि युरेनियम, थोरियम, रेडियम, पोलोनियम वगैरे किरणोत्सारी मूलद्रव्येही मानवाने शोधली. इतकेच नव्हे तर युरेनियम पलीकडली म्हणजे प्लुटोनियम, अमेरिशियम वगैरे, खरीखुरी पण कृत्रिमरित्या, टनावारी मात्रेत तयार केली.

निसर्गात ही मूलद्रव्ये शुध्द स्वरूपात क्वचितच सापडतात. एकमेकांबरोबर प्रक्रिया होऊन लाखो संयुगे निर्माण झाली आहेत. सोडियम हा अत्यंत क्रियाशील धातू आहे, पाण्यात टाकला तर तो पेट घेतो. क्लोरीन हा अत्यंत विषारी वायू आहे. या दोन्हीमुळे आपल्याला तात्काळ मृत्यू येऊ शकतो. पण या दोघांचा संयोग झाला की, आपण रोज जेवणात वापरतो ते आणि आपल्याला अत्यंत गरजेचे असलेले मीठ निर्माण होते. या मूलद्रव्यांची लाखो संयुगे निसर्गात आढळतात आणि आपल्या दैनंदिन जीवनात आपण त्यांचा भरपूर प्रमाणात वापरही करतो. आता ही सर्व मूलद्रव्ये म्हणजे आधुनिक महाभूतेच समजली पाहिजेत.

पृथ्वीवर, मूलद्रव्ये कशी आणि केव्हा आली?
१४ अब्ज वर्षांपूर्वी पृथ्वी वर झालेल्या महास्फोटातूनच मूलद्रव्ये निर्माण झालीत. महास्फोटानंतर काही सेकंदातच हायड्रोजन, हेलीयम आणि लिथियम ही मूलद्रव्ये निर्माण झालीत असे जॉर्ज गॅमॉव्ह या विज्ञान रुशीँचा सिध्दांत आहे. ४.६ अब्ज वर्षांपूर्वी जेव्हा आपली सूर्यमाला आणि पृथ्वी निर्माण झाली तेव्हा तिच्या वाट्याला ९२ पेक्षा जास्त मूलद्रव्ये आली त्यापैकी जी किरणोत्सारी होती ती नाहिशी होऊन त्यांचे रुपांतर दुसर्‍या मूलद्रव्यात झाले. टेक्निशियम आणि प्रोमिथियम ही मूलद्रव्ये पृथ्वीवरील निसर्गात आढळत नाहीत.

हैड्रोजन या मूलद्रव्याचा अणू आकाराने आणि वजनाने सर्वात लहान आहे. त्यामुळे इतर मूलद्रव्याचे अणू हैड्रोजन अणूपेक्षा किती पट जड आहेत हे प्रयोगांनी ठरवितात. या पटीसंख्येला त्या मूलद्रव्याचा अणूभार असे म्हणतात. ऑक्सीजनचा अणूभार १६, नायट्रोजनचा अणूभार १४, कॅल्शियमचा अणूभार ४० याप्रमाणे कित्येक मूलद्रव्यांचा अणूभार मोजण्यात शास्त्रज्ञांना यश आले.

अणुविज्ञानाची प्रचंड झेप :
पृथ्वीवरील अचेतन आणि सचेतन सृष्टी कशापासून बनली आहे याचा शोध फार पूर्वीपासून घेतला जातो आहे. पृथ्वीवरील सर्व घटक सूक्ष्म आणि शक्तीमान कणांपासून बनले आहेत हे भारताच्या कणाद रुशीने फार पूर्वीच जाणले. जॉन डाल्टन या ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञाने, १८०३ साली अणुसंबंधी अनेक नियम मांडले की जे कुणालाही, केव्हाही आणि कितीही वेळा पडताळून पाहता आले.

विसाव्या शतकाच्या सुरुवातीपासूनच अणूच्या अंतरंगाचा शोध घेणे सुरू झाले. १८९८ साली हेन्री बॅकेरील या फ्रेंच शास्त्रज्ञानेलावलेल्या किरणोत्साराच्या शोधामुळे, अणूचे अंतरंग जाणणे शक्य झाले. सूर्यमालेत ज्याप्रमाणे केन्द्रस्थानी सूर्य आहे आणि त्याच्याभोवती ग्रह फिरतात, त्याचप्रमाणे अणूच्या केन्द्रस्थानी अणूगर्भ असतो आणि त्याभोवती इलेक्ट्रॉन फिरत असतात हा अती युगप्रवर्तक शोध १९१३ साली रुदरफोर्ड या शास्त्रज्ञाने लावला. अणुगर्भात, प्रोटॉन, न्यूट्रॉन वगैरे अनेक मूलकण गतीमान अवस्थेत असतात आणि त्यांच्यातच अणुउर्जा साठलेली असते. त्यामुळेच अणुभट्ट्या उभारता आल्या, अणूशक्ती मिळविता आली आणि अणुस्फोट करता आले.

इलेक्ट्रॉन हे आजच्या काळातील महामहाभूत आहे. इलेक्ट्रॉनमुळेच वीजप्रवाह निर्माण होतो. त्यामुळे आपली जीवनशैलीच बदलून गेली आहे. सजीवांचे शरीरही वीजप्रवाह निर्माण करू शकते आणि तेही सजीवांच्या आहाररूपी इंधनातूनच. मेंदू, ह्रदय, यांचे कार्य देखील वीजप्रवाहामुळेच चालते. त्यामुळेच ईसीजी, ईईजी वगैरे आलेख काढून ह्रदय आणि मेंदूतील दोष हुडकून काढता येतात. सजीवांच्या कार्यप्रणालीत विजेचा वापर करण्याचे तंत्र, निसर्गाने कोट्यवधी वर्षांपूर्वी शोधले आणि त्याचा यशस्वी वापरही केला ही बाब अतर्क्य आहे.

सध्या, जगातील मोठमोठे शास्त्रज्ञ, विश्वनिर्मितीचे गूढ उकलण्यात गुंतले आहेत. मूलकणांना वस्तूमान प्राप्त करून देणारे हिग्जबोसॉन हे कण सापडले तर ते प्रचंड महाभूत ठरेल. विश्वात, गुरुत्वाकर्षण बल निर्माण करणारे ग्रॅव्हीटॉन नावाचे मूलकण सापडले तर तेही प्रचंड महाभूत ठरेल. हे प्रचंड महाभूत अजुनही सापडले नसले तरी त्याचा परिणाम, विश्वनिर्मितीपासूनच होतो आहे.

— गजानन वामनाचार्य

गजानन वामनाचार्य
About गजानन वामनाचार्य 85 Articles
भाभा अणुसंशोधन केन्द्र, (BARC) मुंबई येथील किरणोत्सारी अेकस्थ आणि किरणोत्सारी तंत्रज्ञान विभागातून निवृत्त वैज्ञानिक. मराठीसृष्टीवरील नियमित लेखक. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी मराठी विज्ञान परिषदेच्या कामात स्वारस्य घेतले. मविप च्या पत्रिका या मुखपत्राच्या संपादक मंढळावर त्यांनी १६ वर्षं काम केलं. ७५,००० हून जास्त मराठी आडनावांचा संग्रह त्यांच्याकडे आहे. आडनावांच्या नवलकथा यावर त्यांनी अनेक लेख लिहीले आहेत. बाळ गोजिरे नाव साजिरे हे मुलामुलींची सुमारे १६५०० नावं असलेलं पुस्तक त्यांनी २००१ साली प्रकाशित केलं आहे.
Contact: Website

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..