नवीन लेखन...

सणवार आणि पर्यावरण

अमक्या देवाच्या पूजेला अमकीच वनस्पती किंवा अमकं फूल लागतं आणि अमकाच नैवेद्य लागतो हे काही त्या देवानं सांगितलेलं नसतं. परिसरात अुपलब्ध असलेल्या पूजासाहित्यानंच पूजा करायची प्रथा पडते. पूजा करणार्‍या कुटुंबाचा जो आहार असतो त्या अन्नपदार्थांचाच नैवेद्य दाखवायचा असतो. जे अन्नपदार्थ मानवास खाण्यायोग्य नसतात, त्या अन्नपदार्थांचा नैवेद्य, कोणत्याही देवतेला दाखविल्याचं कुणी अैकलं आहे का?

ज्या काळी सणांच्या प्रथा आणि संकेत रूढ झाले त्या काळी समाजाची मानसिकता आणि राहणीमान आजच्यापेक्षा फारच वेगळं होतं. त्या काळास अनुसरून आणि अुपलब्ध असलेल्या पूजासाहित्यास अनुसरूनच या चालीरिती  आणि प्रथा रूढ झाल्या. कालमानानुसार त्यात बदल होणं अपरिहार्य असलं तरी तसं फारशा प्रमाणात घडलं नाही.

सणवार हा विषय, मुख्यत: हिंदुस्थान आणि भारतातील जनतेचा आहे. परदेशात स्थायिक झालेली कित्येक भारतीय कुटुंबं, भारत आणि हिंदुस्थानातच राहिल्यासारखे वागतात. अिंडियातील जनताही बर्‍याच प्रमाणात सणवार पाळते पण त्यात सोयीनुसार बदलही करते. या बाबतीत तरी या तीन स्तरातील तफावत कमी आहे. अिंडियातील लोकही नवस वगैरे करतात पण त्यात मनोभाव कमी आणि भपका जास्त, अशी स्थिती असते.

सणांमुळे, कुटुंबाला आणि समाजाला अेकात्मता येत असे. मन रिझविणं आणि मानसिक समाधान मिळविणं, सणोत्सवामुळे साधता येअी. सण साजरे करतांना लागणारी साधनसामुग्री स्वत:च मिळवावी लागे. व्यापारी तत्वावर अुत्पादन आणि कारखानदारी नव्हती. त्यामुळे निसर्गसंपत्तीवर ताण पडत नसे.

सण साजरे करणं हा सर्व धर्मातील, अेक सामाजिक, सामुहिक आणि व्यक्तीगतदेखील हक्क आहे. सण नसतील तर आपलं सामाजिक, कौटुंबिक आणि वैयक्तिक जीवन अगदीच अर्थहीन किंवा अळणी वाटेल. सण साजरे करणं हा सर्व धर्मातील आणि सर्व देशातील प्रजाजनांचा सांस्कृतिक वारसा आहे.

पण आता असं वाटू लागलं आहे की सण साजरे करतांना अंधश्रध्दा वाढीस लागल्या आहेत. सणांना व्यापारी आणि बाजारू स्वरूप येतं आहे आणि त्यामुळे पर्यावरणावर अनिष्ट परिणाम होत आहेत.

आपल्या सणांचा विचार केला तर लक्षात येअील की बरेचसे सण घरातल्याघरात, कुटुंबीय आणि नातलग यांच्यासह साजरे केले जातात. गुढीपाडवा, हनुमान जयंती, रामनवमी, अक्षय तृतीया, कोजागिरी, रक्षाबंधन यासारखे सण सामाजिक दृष्ट्या निरुपद्रवी असतात.

वटपौर्णिमा हा सणही तसा निरुपद्रवीच आहे. ग्रामीण भागात, या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करतात. परंतू शहरातल्या सर्वच सुवासिनींना पूजेसाठी, घराच्या आसपास वडाचं झाड मिळतंच असं नाही. त्यांच्यासाठी वडाच्या लहानलहान फांद्या बाजारात विकत मिळतात. त्या फांद्यांची पूजा केली जाते. अशारितीनं वटवृक्षाच्या पूजेची तहान वडाच्या फांद्यांनी भागविली जाते. मात्र त्यासाठी प्रचंड प्रमाणावर वडाच्या फांद्या तोडल्या जाअून अनेक वडाची झाडं छिन्नविच्छिन्न केली जातात आणि वटपौर्णिमेच्या मूळ संकल्पनेला आणि अुद्देशालाच अशा कृतीनं धक्का लागतो. वडाच्या झाडाच्या फांद्या तोडून, त्या विकून काही कुटुंबांचा चरितार्थ चालतो. दसर्‍यालाही आपट्यांच्या झाडांची तर फार मोठ्या प्रमाणावर कत्तल केली जाते. यातही व्यापारी दृष्टीकोन आहेच.

गणपतीसाठी दुर्वा, शंकरासाठी बेलाची पानं, विष्णूसाठी तुळशी, दर शनीवारी मारुतीच्या पूजेसाठी रुअीच्या पानांच्या माळा हे वनस्पतीसाहित्य या देवांच्या पुजेसाठी लागतं. शिवाय घरातल्या देवपूजेसाठी फुलं, दुर्वा, बेल, तुळशीच्या मंजिर्‍या लागतातच. श्रीसत्यनारायणाच्या पूजेसाठी केळीचे ४ खांब लागतात. बाजारात आता हे सर्व वनस्पती साहित्य, पैसे मोजले की भरपूर प्रमाणात मिळण्याची सोय झाली आहे.

अमक्या देवाच्या पूजेला अमकीच वनस्पती किंवा अमकं फूल लागतं आणि अमकाच नैवेद्य लागतो हे काही त्या देवानं सांगितलेलं नसतं. परिसरात अुपलब्ध असलेल्या पूजासाहित्यानंच पूजा करायची प्रथा पडते. पूजा करणार्‍या कुटुंबाचा जो आहार असतो त्या अन्नपदार्थांचाच नैवेद्य दाखवायचा असतो. जे अन्नपदार्थ मानवास खाण्यायोग्य नसतात, त्या अन्नपदार्थांचा नैवेद्य, कोणत्याही देवतेला दाखविल्याचं कुणी अैकलं आहे का?

गणपतीसाठी दुर्वा, शंकराला बेल, विष्णूला तुळशी असे संकेत पडले याचं कारण जास्तीतजास्त वनस्पतींची लागवड होअून त्यांच्याशी माणसांचा संपर्क यावा असा विचारवंतांचा अुद्देश असावा.

मनोभावे, मन आणि चित्तवृत्ती अेकाग्र करून ध्यानधारणा साधण्याला महत्व आहे. पूजासाहित्य हे फक्त साधन आहे. ते आवश्यकच आणि अपरिहार्यच आहे असं नाही. मनाची अेकाग्रता झाली, भक्तीभावना जागृत झाली की मनातले वाअीट विचार दूर सारले जातात, मनाचा प्रक्षोभ कमी होतो, याचाच, मनाला आणि शरीराला लाभ होतो. शरीरातील रक्ताभिसरणावर तर नक्कीच चांगला परीणाम होतो.

नागपंचमी या सणात तर नागांचे अक्षरश: हाल केले जातात. काही सण पाळतांना प्राण्यांचे बळी दिले जातात आणि त्यांच्या मांसावर मेजवान्या झोडल्या जातात.

मकरसंक्रांतीचा सण जवळ आला की भारतातील अनेक शहरात पतंग अुडविण्याचा कार्यक्रम आणि हौस यांना अुधाण येतं. आकाशात जिकडे तिकडे पतंगच दिसतात. पतंग अुडविण्याचा आनंद काही व्यक्तींना मिळत असला तरी बर्‍याच व्यक्तींवर आपले प्राण गमाविण्याची किंवा गंभीर जखमी होण्याची पाळी येते.

कबुतरं, कावळे अशासारखे मोठे पक्षी दोर्‍यात अडकून मांज्यामुळे जखमी होतात. आकाशात स्वच्छंदपणे अुडत असतांना, अनपेक्षितपणे, पतंगांच्या मांज्यामध्ये अडकून, कित्येक पक्ष्यांना, पंख कापले गेल्यामुळे जखमी व्हावं लागतं किंवा जमिनीवर आपटल्यामुळे प्राण गमवावे लागतात. तुमचा होतो खेळ पण आमचा जातो जीव असं म्हणण्याची वेळ पक्ष्यांवरदेखील येते.

अहमदाबाद, जयपुर, मुंबअी वगैरे शहरांतील दाट लोकवस्तीमुळे पतंग अुडविणार्‍यांची संख्या खूप असते. आकाशात जिकडे तिकडे पतंगच पतंग दिसतात. पतंग अुडविण्याचा छंद आणि त्याचा पर्यावरणावर होणारा परिणाम हे अेक वैशिष्टयपूर्ण अुदाहरण आहे. सध्या कोणताही छंद जोपासला जातांना त्याचे बर्‍याचच प्रमाणात व्यापारीकरण होतं.

पतंगाचं साहित्य बनविणं, पतंग बनविणं आणि त्याची विक्री करणं हा अनेक व्यक्तींचा रोजीरोटीचा प्रश्न आहे. पतंगांचं साहित्य विकणारे, निरनिराळ्या युक्त्या योजून, आपल्या मालाचा खप वाढविण्यासाठी प्रयत्न करतात. त्याचा परिणाम पर्यावरणातील अनेक घटकांवर होतो. छंद जोपासणार्‍या व्यक्तींना आपण नेमकं कुठे आणि केव्हा थांबावं हे समजत नाही आणि त्याचा दुष्परिणाम अितर व्यक्तींना आणि प्राण्यांना भोगावा लागतो.

गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव, हे सण आवाजाच्या प्रदूषणामुळे गाजतात. गणपतीच्या मूर्तीमुळे हजारो टन शाडूची माती खाणीतून काढली जाते आणि पाणवठयांच्या तळाशी पोचविली जाते. दिवाळीत तर वातावरणाच्या प्रदूषणाबरोबरच आवाजाचंही प्रदूषण होतं.

होळीच्या सणात देखील हजारो टन लाकडं जाळली जातात. धुळवडीच्या सणाबद्दल तर न बोललेलंच बरं. रंगीत पाण्यानं भरलेले फुगे अिमारतींच्या गच्चीवरून, मुली आणि महिलांवर फेकणं चालत्या बसेस, लोकल गाड्या, रिक्षा आणि मोटारींवरही फेकून आसुरी समाधान मिळविणं हे निंदास्पद आहे.

ज्या काळी सणांच्या या प्रथा आणि संकेत रूढ झाले, त्या काळी लोकसंख्या फारच कमी होती. मोठी शहरंही नव्हती. पर्यावरणाच्या मानानं लोकसंख्या घनता खूपच कमी होती. कालपरत्वे, सण साजरे करण्याच्या प्रथा, रूढी आणि संकेत यात बदल करणं अपरिहार्य आहे.

या पृथ्वीच्या वातावरणात, पर्यावरणात आणि तिच्या सर्व घटकांत अेक प्रकारचा समतोल आला असतो. त्यामुळे कोणताही अेक घटक बदलला किंवा कोणत्याही अेका घटकात थोडा बदल झाला तरी त्याचा परिणाम अितर घटकांवर होअून नंतर नवा समतोल साधला जातो. पण हा समतोल साधला जात असतांना काही घटकांचा फायदा होतो तर काही घटकांचं नुकसान होतं.

आपले सणवार पाळतांना देखील काही अती अुत्साही व्यक्तींमुळे समाजाला आणि पर्यावरणाला हानी पोचते आहे असं वाटतं. बदललेल्या काळानुसार आणि जीवनशैलीनुसार, परंपरागत रूढीत, विज्ञानीय दृष्टीकोनातून विचार करून, सकारात्मक बदल करता येतील. समाजानं प्रयत्न मात्र केले पाहिजेत.

— गजानन वामनाचार्य.

संदर्भ: मनबोली : मुंबअी तरूण भारत : शुक्रवार ८ मार्च २००२.

गजानन वामनाचार्य
About गजानन वामनाचार्य 85 Articles
भाभा अणुसंशोधन केन्द्र, (BARC) मुंबई येथील किरणोत्सारी अेकस्थ आणि किरणोत्सारी तंत्रज्ञान विभागातून निवृत्त वैज्ञानिक. मराठीसृष्टीवरील नियमित लेखक. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी मराठी विज्ञान परिषदेच्या कामात स्वारस्य घेतले. मविप च्या पत्रिका या मुखपत्राच्या संपादक मंढळावर त्यांनी १६ वर्षं काम केलं. ७५,००० हून जास्त मराठी आडनावांचा संग्रह त्यांच्याकडे आहे. आडनावांच्या नवलकथा यावर त्यांनी अनेक लेख लिहीले आहेत. बाळ गोजिरे नाव साजिरे हे मुलामुलींची सुमारे १६५०० नावं असलेलं पुस्तक त्यांनी २००१ साली प्रकाशित केलं आहे.
Contact: Website

1 Comment on सणवार आणि पर्यावरण

  1. लेख आवडला.

    कालानुरुप सण साजरे करण्यात बदल झाला पाहिजे.
    सणाचे महत्व समजाउन न घेशश केवळ मन मानेल तसे उत्सव साजरेकरण्याची प्रवृत्ती वाढते आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..