विज्ञानविषयक मजकूर छापतांना पारिभाषिक शब्दांच्या बाबतीत बर्याच अडचणी येतात. सर्वमान्य पारिभाषिक शब्द वापरल्यास अर्थबोध चट्कन होतो. अुदा. ‘बॉयलिंग पॉअिंट’ या अिंग्रजी शब्दास ‘अुत्कलनबिंदू’ हा सर्वमान्य शब्द आहे. फार तर ‘अुत्कलनांक’ किंवा ‘अुकळांक’ हे शब्द वापरले तरी चालण्यासारखं आहे. पण ‘बुदबुदांक’ हा शब्द वापरल्यास अर्थबोध चट्कन होणार नाही. कोणताही द्रव अुकळत असतांना बुदबुद असा आवाज येतो हे खरं आहे.
टेबलाला मेज, पंपाला अुदंच, फोनला दूरभाष किंवा दूरध्वनी हे शब्द शक्यतो वापरू नयेत. कारण टेबल, पंप, फोन हे शब्द आता मराठीत रूळले आहेत. शास्त्रीय चिन्हे, घातांक वगैरे सारख्या ग्रीक/लॅटिन संज्ञा/अक्षरं, समीकरणं, सूत्रं वगैरे छापतांना बर्याच अडचणी येतात. आता संगणकाच्या सहाय्यानं छपाअी होत असल्यामुळे बर्याच अडचणी दूर झाल्या आहेत.
1957 सालच्या ऑक्टोबर महिन्याच्या 4 ताारखेस, रशियानं, पृथ्वीभोवती फिरणारा ‘स्फुटनिक’ हा अुपग्रह पाठविला, तेव्हापासून अंतराळयुगास किंवा अवकाशयुगास प्रारंभ झाला किंवा सुरूवात झाली. त्यानिमित्तानं आणि आजतागायत या क्षेत्रातील वृत्तवर्णनं देतांना अनेक नवीन अिंग्रजी शब्द प्रचारात आले आणि अजूनही येताहेत. त्यासाठी मराठी प्रतिशब्दही प्रचारात आले. आताच ‘प्रारंभ’ आणि ‘सुरूवात’ हे समानार्थी शब्द वापरले आहेत. विज्ञान मराठीत कोणता मराठी शब्द निवडावा याची थोडी चर्चा करू या.
मराठी शब्द अर्थवाही, लिहावाचायला सोपा, शक्यतोवर जोडाक्षरं आणि अुकार, वेलांट्या कमीतकमी असलेला आणि अुच्चारायला नादमधूर असेल तर तोच शब्द वापरणं चांगलं. म्हणून ‘सुरूवात’ हा शब्द चांगला वाटतो. वक्तृत्त्व स्पर्धा आपल्या चांगल्याच परिचयाची आहे.’वक्तृत्त्व’ हा शब्द लिहायलाही कठीण आणि अुच्चारायला तर त्याहूनही कठीण वाटतो. सरळसरळ ‘भाषणकला स्पर्धा’ का म्हणू नये ? ‘निवृत्तीवेतन’ म्हणण्यापेक्षा ‘पेन्शन’ हा सुटसुटीत शब्द काय वाअीट आहे ? हाच निकष वैज्ञानिक किंवा शास्त्रीय आणि तांत्रिक शब्दांनाही लागू केल्यास विज्ञान मराठी बरीच सोपी होअील.
‘वैज्ञानिक’ हा शब्द आपण ‘Scientist’ आणि ‘Scientific’ या दोन्ही अर्थानं वापरतो. वैज्ञानिकांचा मेळावा आणि वैज्ञानिक दृष्टीकोन. परंतू या दोन अिंग्रजी शब्दांसाठी शास्त्रज्ञ आणि शास्त्रीय हे दोन चांगले अर्थवाही शब्द आहेत. तेव्हा तेच वापरणं चांगलं. याच धर्तीवर अनुक्रमे ‘वैज्ञानिक’ आणि ‘विज्ञानीय’ हे शब्दही वापरता येतील. Scientific outlook साठी ‘वैज्ञानिक दृष्टीकोन’ याअैवजी ‘विज्ञानीय दृष्टीकोन’ असा शब्दप्रयोग जास्त संयुक्तिक वाटतो. शास्त्रत्र किंवा वैज्ञानिक हे Research किंवा Scientific Investigations करीत असतात आणि निरनिराळया शास्त्रीय मासिकात ते शोधनिबंध प्रसिद्ध करीत असतात. तेच त्यांचं व्रत असतं असं म्हटल्यास योग्य होअील. म्हणून त्यांच्यासाठी ‘विज्ञान संशोधक’ हा शब्दही वापरतात. Scientific Paper साठी शास्त्रीय शोधनिबंध हा खरोखर फार चांगला शब्द आहे.
आता अवकाशयुगामुळे कोणकोणते शास्त्रीय शब्द प्रचारात आले ते पाहू या.
आकाश, अंतराळ, अंतरिक्ष, अवकाश आणि दूरस्थ अवकाश या पाच शब्दांच्या अर्थछटा समजून घेणं किंवा त्यांचे अर्थ संकेतानं निश्चित करणं आवश्यक वाटतं.
पृथ्वीच्या वातावरणामुळे सूर्यपकाशाचं विकीरण होअून निळ्या रंगाची पोकळी दिसते ते आकाश. आकाशाच्या रंगावरून आकाशी रंगाची साडी हा शब्दप्रकार अस्तितवात आला. आकाशात ढग असतात, विजा चमकतात, विमानं अुडतात वगैरे. हिंदीतील हवाअी जहाज असा शब्द मराठीत न वापरता, रामायणातला विमान हा शब्द आपण वापरतो हे फार चांगलं आहे.
अंतराळ आणि अंतरिक्ष हे जवळपास समानार्थी शब्द वाटतात. पृथ्वीभोवती जे अुपग्रह फिरतात, जिथे भूस्थिर अुपग्रह (पृथ्वीचा स्वत:भोवती फिरण्याचा वेग आणि या अुपग्रहांचा पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालण्याचा वेग अगदी सारखा असतो. त्यामुळे पृथ्वीवरून त्या अुपग्रहाचे वेध घेतांना तो स्थिर असल्यासारखा वाटतो. अेकाच दिशेनं जाणार्या दोन लोकल गाड्यांचा वेग सारखाच झाला की त्या फलाटावर अुभ्या असल्यासाख्या स्थिर वाटतात तसं)आहेत किंवा फारफार तर चंद्राच्या कक्षेपर्यंत जी पोकळी आहे तिला अंतराळ म्हणू या. अंतराळ म्हणजे पृथ्वीच्या वातावरणापलिकडला प्रदेश. चंद्रावर अंतराळवीर अुतरले किंवा अंतराळवीरांनी हबल दुर्बिणीची दुरूस्ती केली किंवा मीर या अंतराळ स्थानकावरून अंतराळशास्त्रज्ञ पृथ्वीवर परतले, हे शब्दप्रयोग सार्थ वाटतील.
चंद्राच्या कक्षेपर्यंत झेप घेणार्या यानांना अंतराळ यानं म्हणता येअील. ‘यान’ हा शब्दप्रयोग फारच चांगला आहे. आकाशात किंवा वातावरणात अुडू शकतं ते विमान आणि वातावरणाच्या पलिकडील पोकळीत प्रवास करू शकतं ते यान. चंद्राच्या कक्षेपर्यंत प्रवास करतात ती अंतराळयानं. ज्यावर अंतराळवीर नसतात, फक्त अुपकरणंच असतात आणि जो पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालीत रहातो तो अुपग्रह. आणि ज्यात अंतराळवीर किंवा फक्त अुपकरणंही असतात आणि जे अेखाद्या खगोलाभोवती केवळ प्रदक्षिणाच घालीत नाही तर पुढचा प्रवासही करतं ते यान.
सूर्यमालेतील पोकळी म्हणजे शेवटच्या ग्रहाच्या कक्षेपर्यंतची किंवा सापडलाच तर दहाव्या ग्रहाच्या कक्षेपर्यंतच्या पोकळीस अंतरिक्ष म्हणू या. मंगळ, गुरू, शनि वगैरे ग्रहांचे ज्या यानांतून वेध घेतले ती अंतरिक्ष यानं, अंतराळयानं नव्हेत.
सूर्यमालेपलीकडील पोकळी म्हणजे अवकाश. सूर्यमालेपलिकडे जी यानं प्रवास करू शकतात ती अवकाश यानं. सूर्यमालेपलिकडील पोकळी नजिकच्या तार्यापर्यंत पोचते. त्या पलीकडील अवकाश म्हणजे दूरस्थ अवकाश.
— गजानन वामनाचार्य
Leave a Reply