नवीन लेखन...

कवी अरुण बालकृष्ण कोलटकर

मराठी, हिंदी, व इंग्रजी भाषांत कविता करणारे कवी अरुण बालकृष्ण कोलटकर यांचा जन्म १ नोव्हेंबर १९३२ रोजी  कोल्हापुर येथे झाला.

अरुण कोलटकरांचे मूळ घराणे कोकणातील. पण पुढे वाडवडील कोल्हापुरात स्थायीक झाले. त्यामुळे कलेचा वारसा त्यांना दोन्ही बाजूनी मिळाला म्हणायला हरकत नाही. तेथेच त्यांचे शालेय शिक्षण झाले. चित्रकलेच्या परीक्षा झाल्या. पुढे अरुण कोलटकर मुंबईला सर जे जे स्कुल ऑफ आर्ट मध्ये दाखल झाले. पेंटिंग विभागात त्यांचे चिंतनशील काम सुरु असे. वाचनाची आवड तर मुळातलीच होती. खरतर मराठी माध्यमातून शिक्षण झाल्यामुळे इंग्रजी हा त्यांचा तसा खास आवडीचा विषय नव्हता. पण ज्ञान लालसेपोटी कोलटकरानी या विषयाचा चांगलाच अभ्यास केला, प्रचंड वाचन केले आणि पुढील आयूष्यात त्यांना त्याचा उपयोगही झाला. पेंटिंगसोबत त्यांना काव्याचीही ओढ लागली. वास्तवीक अरुण यांचे वडील शिक्षणखात्यात निरीक्षक होते. त्यांची इच्छा होती की मुलाने भवितव्य म्हणून या पेंटिंगच्या भानगडीत पडू नये. पण काव्य – कलेच्या उर्मी या अरुणच्या रोमारोमात रुजल्या होत्या. पेंटींग अन काव्य हेच जीवनाचे ध्येय ठरविलेल्या कोलटकरानी पुढच्या आयूष्याच्या स्थैर्याचा विचारही मनांत कधी आणला नाही, त्यामुळे त्यांनी आपले संपूर्ण जीवनच त्यामध्ये झोकून दिले. कवीतेची आत्यंतीक ओढ असलेल्या कोलटकरांनी १९५५ च्या आसपास काव्याच्या निर्मितीला आरंभ केला.

१९७४ साली त्यांनी लिहिलेल्या ‘ जेजुरी ‘ या इंग्रजी काव्य संग्रहाला राष्ट्रकूल पारितोषीक मिळाले , आणि अरुण कोलटकर हे नांव थेट जागतीक पातळीवर पोहोचले. अन पुढे ते भारतीय इंग्रजी कवी म्हणून प्रसिद्ध पावले. पाठोपाठच त्यांचा ‘ अरुण कोलटकरांची कवीता ‘ हा काव्यसंग्रह अशोक शहाणे यांनी प्रकाशित केला. शहाणे हे मराठीतील अनियतकालीक चळवळीचे पहीले वारकरी, आणि त्या मुशीतूनच अरुण कोलटकर या नावाची निर्मिती झाली. जेजूरीच्या यशामुळे मान्यता पावलेल्या कोलटकरांनी पुढे अनेक वर्षे आपला दबदबा राखला होता !

कोलटकरांचे इंग्रजी तसेच मराठी या दोन्ही भाषांचे ज्ञान अमर्याद होते. या भाषांवर त्यांचे जबरदस्त प्रभुत्व होते. या असामान्य प्रभुत्वामुळे ते उत्तम कॉपी रायटींगही करीत. शब्दांच्या व चित्रांच्या बाबतीत ते कमालीचे दक्ष असत. जाहीरात करतांना आवश्यक असणारी कल्पनाशक्ती व सर्जनशीलता याची त्यांना निसर्गदत्त देणगीच असल्याने त्यांच्या कल्पनेच्या भरारीला मर्यादाच नव्हती. आणि येथेच त्यांचे काम इतरांपेक्षा वेगळ्या धाटणीचे ठरे. त्यांचे व्हीज्युलायझेशन वैचारीक व प्रभावी असे. तसेच त्याला काव्याची जोड असल्याने त्यातील गोडवा हा वेगळाच असे.

कोलटकरांनी आपल्या जाहीरात कारकीर्दीत खूप काम केले. बोमास, युनीट -६१, एम सी एम, पुढे लिंटास, कांही वेळ स्वतःचे डिझाईन हाऊस, अजंठा अशा विविध भूमिका बजावत त्यांनी असंख्य अश्या जाहीरात मोहीमेची निर्मिती केली. त्यांच्या विमान तळाजवळील सेंटॉर हॉटेलच्या जाहिरातींचे घोषवाक्य होते, ‘ The only hotel with attached airport ! ‘

त्यांनी सी एम सी, वामा, एच एम टी, लिबर्टी शर्ट्स, आदी उत्पादकांच्या जाहीरात मोहिमही समर्थपणे व सृजनशीलपणे हाताळल्या. आपल्या कविता संग्रहाची मुखपृष्ठेही ते स्वतःच करीत.

‘चिरीमिरी’ या त्यांच्या काव्यसंग्रहावर त्यांनी मोठी, मधोमध कापलेली सिमला मिरची दाखवून त्यात कांही ब्रिटिश कालीन नाणी कोंबलेली दाखविली होती. त्यांना बळवंतराव हे व्यक्तीमत्व जेव्हां भेटलं तेव्हां त्यांच्या भाजीच्या दुकानांतील नोकर पैसे चोरताना ही युक्ती योजायचा. कांही नाणी मोठ्या आकाराच्या मिरचीत खुपसून जातांना भाजीच्या रूपाने ती लांबवायचा.

१९५०–१९६० च्या दशकांत त्यानी लिहिलेल्या कविता या मुंबईतील विशिष्ठ बोली मराठीतल्या असून त्यात मुंबईत आलेल्या निर्वासितांच्या व गुन्हेगारांच्या जीवनाचे दर्शन घडते. उदाहरणार्थ, मै भाभीको बोला/क्या भाईसाबके ड्यूटीपे मै आ जाऊ?/भड़क गयी साली / रहमान बोला गोली चलाऊँगा / मै बोला एक रंडीके वास्ते? / चलाव गोली गांडू. त्यांच्या ‘जेजुरी’ या काव्यसंग्रहाला १९७७ मध्ये ‘कॉमनवेल्थ रायटर्स प्राइझ’ तर ‘भिजकी वही’ संग्रहाला २००४ ला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. ‘अरूण कोलटकरच्या कविता’, ‘चिरिमिरी’, ‘द्रोण’, ‘काला घोडा पोएम्स’ ही त्यांची अन्य पुस्तक.

अरुण कोलटकर यांचे २५ सप्टेंबर २००४ रोजी निधन झाले.

— संजीव वेलणकर
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट/ मं. गो. राजाध्यक्ष

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4228 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..