नवीन लेखन...

मनं निर्ढावत चालली आहेत

ललितलेख

हिरवी हिरवी रानं….निळं निळं आकाश…लख्खं लख्खं सूर्यप्रकाश पात्यापात्यावर चमकणारे दवबिंदू …उंच माळाच्या पोटाला अलगद बिलगून जाणारी चिमुकली पाय वाट. हलकेच झाडाला हेलकावून टाकणा-या वा-याच्या लहरी… झाडावर बगळ्यांची पांढरी नक्षी हे सारं असं मनात साठवलेलं होतं.. पूर्वी.परिसराची किती किती ओढ होती म्हणून सांगावी…. निसर्गाविषयी खूप आकर्षण वाटायचं.. तासनतास घालवायचे नदीच्या काठावर.. पिवळी- पिवळी कन्हेरीची फुलं गोळा करायची.. वाटत रहायचं आपल्याला ह्या फुलाशिवाय या निसर्गाशिवाय पर्यायच नाही… अगदी बुडून जायचो निसर्गाच्या रुपात तेंव्हा.. हळूहळू काळ बदलला.. एक एक करून अनुभवाचे पक्षी -हदयाच्या झाडावर गोळा होऊ लागले.त्यातले काही विचित्र होते.. काही थोडे निराशावादी होते. तर काहीना वर्गीकरणाच्या कुठल्याच कप्प्यात बसवता येणार नाही एवढे भयानक होते….

#मनं निर्ढावत चालली आहेत.

ज्या निसर्गावर जीवापाड प्रेम करावं. जीव ओवाळून टाकावा असे वाटायचे तोच निसर्ग आज खायला उठल्यासारखा वाटू लागला आहे.. आपल्याला शेत आहे याची जाणीव होऊ लागली.. मग नदीला मोठ्ठा पूर आला तर सारी पिकं वाहून जातील… नुकसान होईल अशी भिती वाटू लागली. त्यामुळे पूर्वीसारखा मोठ्ठा पाऊस आल्यावर पूर आला तर टाळ्या वाजवून होणारा आनंद आज राहिला नाही… जाणिवांची मनात पक्की वस्तीस्थानं होत गेली.. अन पूर्वीच्या आनंदाच्या झोपडीचं पुनर्वसन होत गेलं… एक एक करून हळूहळू खळाळून हसणं विरुन गेलं…उरलं फक्त नाटकी हसणं तेवढंच…

आत्ता आत्ता मुर्दाड विचारांनी डोकं वर काढायला सुरुवात केली आहे. हळूवार भावनांचे पक्षी दूर देशी उडून गेलेत आपण एक निगरगठ्ठं दगडी माणूस बनू लागलोय… तरीही आपण हात- पाय हलवून जिवंत असल्याचं नाटक करत असतो… आपण जिवंत नसतोच मुळी.. आपल्या भावना मृत… आपल्या संवेदनांना बोथट कातडीची साल.. कासवाच्या पाठीवरील टणटणीत… कवचासारखी किंवा आपण म्हणजे एखाद्या खाटीकखान्यात कसाई… कुणाबद्दलही कशाबद्दलही अनुकंपा न बाळगणारं आपलं स्वार्थी कठोर मन… या सार्या गोष्टी पुरेशा आहेत आपले मुर्दाड जीवन स्पष्ट करायला…. फक्त श्वास घ्यायलाच आपण जीवंत जीवन समजत असतो.

आता तर आपल्या डोळ्यांमध्ये स्प्लेन्डर किंवा कॅलीबर्सची स्वप्न तरळू लागली आहेत. कधी कधी आपण एखादी ड्रीम राईडही घेऊ लागतो त्यावरून. एखाद्या गाडीची ठेकेदार फायरींगही रुंजी घालू लागते… आपल्या कानात… सेकंड … थर्ड करत करत आपण सुसाट वेगाने धावू लागतो.. काळ्या करकरीत.. डांबरी रस्त्यावरुन … काही रुपायाचं पेट्रोल गाडीत टाकून चेहऱ्यावरुन फुटका आनंद आणि दळभद्री समाधान मिरवत असतो आपण नेहमीच… पण ज्यांना संध्याकाळच्या फोडणीच्या तेलाची भ्रांत आहे अशी माणसं दिवसभर हाडाची काडं करून राबल्यावर संध्याकाळी त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारं निखळ समाधान किंवा खळाळून हसणं आपल्याला हेवा वाटावं असंच असतं… पण आपल्याला त्याचं काहीच नसतं आपण फक्त खोट्या समाधानाच्या पाठीमागे लागलेलो असतो. आपल्याला आता ओळखू येत नाही ओढ्याचा खळखळणारा आवाज किंवा पाखरांचे कुजबुजणे, झाडांचे पानांच्या आडून डोकावणे… फुलांचे हळुवार पसरणे…. मोरांचे केकारव… काही काहीच वाटत नाही कशाचं ….समजत नाही त्यांची भाषा. आपली सौंदर्य दृष्टीच वेगळी झाली आहे पूर्णपणे.. कृत्रिम फुलं काचेच्या भांड्यात टेबलावर ठेवणं किंवा चित्रात दिसणारं संकुचित सौंदर्य एवढंच आपल्याला माहीत असतं..

एखादं सुंदर गीत मुक्तपणे ऐकायला येईनासं झालं आहे हल्ली कुठलाच स्वर मधुर वाटत नाही गीत कितीही हळुवार असलं तरीही कानावर कर्कश्य आघात व्हावेत किंवा मुर्दाड भावनाच सारख्या मनात येऊ लागतात राहून-राहून सर्वांनाच सवय झाली आहे याची.. कुणालाही कशाचेही काहीही वाटत नाही.. सर्वांची मनं वरचेवर निर्ढावू लागली आहेत… प्रत्येक जण घाई… गर्दी .. गडबड यातच एवढा रमला आहे की त्याला किंचितही कळवळा वाटत नाही.. करुणेचा झरा कोरडा पडू लागलेला आहे… नावाभोवती वलंयं तयार होत आहेत.. मोठेपणाचे बेगडी मुखवट्यावर मुखवटे चढवले जात आहेत.. भावनांचेही व्यावसायीकरण होऊ लागलं आहे.. करकचून बांधून टाकलं आहे आपण आपल्या मनाच्या मुक्ततेला ‘लाईफ स्टेटस’च्या नावाखाली आपल्याला फार मोठं टेन्शन येतं आपल्या बायकोला पिक्चरला घेऊन जाता आलं नाही याचं.. उटी.. कुलू मनालीला जायचं रिझर्वेशन तिकीट मिळालं नाही याचं.. कधीकधी नळाच्या पाण्याचं किंवा पेपर उशिरा आल्याचं टेन्शन येतं… आपल्याला पण आपल्याला चुकूनही आठवण होत नाही आपल्या शेजाऱ्याचा मुलगा का आतल्याआत धुमसतो आहे? किंवा परवा गल्लीत कोणी तरी का आत्महत्या केली? कारण आपण त्यांच्यावर खदाखदा हसण्याशिवाय काहीच करू शकत नसतो तसे आपण… आपण स्वतःला जिवंत समजत असतो तसं आपलं वागणंही फार काही चूक नसतं…

अनुभवाच्या पक्षाच्या टोचण्या खात -खात प्रवास चालू असतो मात्र आपलीच फसवणूक करीत असतो… आपण… नेहमीच!

— संतोष सेलूकर
परभणी
७७०९५१५११०

Avatar
About संतोष सेलूकर 13 Articles
प्राथमिक शिक्षक जि.प.परभणी येथे कार्यरत असून दूरचे गाव हा कविता संग्रह प्रकाशित आहे.अनेक ठिकाणी कविसंमेलने व साहित्यसमेलनात सहभाग. सातत्याने १९९५ पासून कविता व ललितलेख लेखन विविध काव्यलेखन स्पर्धेत पारितोषिक प्राप्त.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..