नवीन लेखन...

करोना (कथा)

नमस्कार सर, मी पालकमंत्री इसाक साहेबांचा पीए गोखले बोलतोय….

साहेब, आमच्या साहेबांनी जिल्ह्यातील सर्व आमदार व खासदारांची अर्जंट मीटिंग बोलावली आहे, आज संध्याकाळी 5 वाजता ताज मध्ये, तुम्ही नक्की या साहेब……शरद गोखले एका पाठोपाठ एका फोनवर आर्जव, विनंती करत होते. त्यांना पूर्ण माहीत होते, जिल्ह्यातील राजकारणावर त्याचे साहेब इसाक बागवान, पालकमंत्री यांची मजबूत पक्कड असली तरी जिल्ह्यातील काही आमदार, खासदार खासगीत त्यांना अजिबात गिनत नाहीत आणि मिटिंगचा विषय इतका महत्वाचा होता की, एखाद्या आमदारांची मिटींगला गैरहजेरी इसाक साहेबांना खरोखर जड गेली असती.

म्हणूनच शरद गोखले हा इसाक साहेबांचा पीए, आवाजात शक्य तितके मार्दव आणत, नाटकी विनम्रता आणून जिल्ह्यातील १० आमदार आणि दोन खासदारांना मनोभावे फोन करत होते. कारण हि तसेच होते. कोविड १९ ने जन मानसामध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले होते,व्यापारी, उद्योजक, सरकारी नोकर अक्षरशः रडकुंडीला आले होते, सरकारने लॉक डाउन ऐवजी जारी केलेल्या जनता कर्फ्यु मुळे. व्यापारी व उद्योजकांचे व्यवसाय बंद तर सर्व खर्च चालू हि भयावह अवस्था होती तर सरकारी नोकरांची मलई बंद झाली होती.

१६-१८ तास काम करून सरकारी डॉक्टर, नर्सेस, पॅरा मेडिकल स्टाफ आणि पोलीस मेटाकुटीला आले होते तर खाजगी इस्पितळे प्रत्येक रुग्णांमागे दिवसाला लाखभर रुपयांचे मीटर पाडत होते. टोसिलिझुमॅब, रेमेडीसिव्हर आणि अशी अनेक नावं रुग्णाच्या नातेवाईकांच्या तोंडाला फेस आणत होती तर भाग्यवान नातेवाईकांचे खिसे मुळापासून कापत होती. हे निर्बंध कधी संपणार आणि सामान्य जीवन कधी जगणार या काळजीत तमाम जनता डिप्रेशन मध्ये गेली असताना, इसाक साहेब या सर्वातून कुठे दूध काढता येईल का यावर विचार करत होते. साहेबांचं एक चांगलं होतं, मनात कांही आलं तर जास्त मनस्ताप जरून न घेता, ते भाडोत्री घेतलेला गोखल्याचा मेंदू वापरून आपले उद्दिष्ट गाठत आणि, साहेबांचे ध्येय कवेत येईपर्यंत जितके हात ओले होतील त्यात गोखले खुश असत.

इसाक साहेबांचे वडील, महसूल मंत्री असताना, अचानक हार्ट अटॅक ने गेले आणि तिशीतला इसाक आमदार झाला. वडिलांची पुण्याई आणि जात निहाय प्रतिनिधित्व देण्याच धोरण यामुळे मंत्री सुद्धा झाला.इसाक लहान असतांना त्याला शु ला कडेवरून बाजूला नेणारे गोखले चाचा, बाप जाताच इसाकचे ‘गोखले’ झाले.कोणीही कोणतेही काम घेऊन आलेकी, गोखलेंनी मान डोलवल्याशिवाय साहेब निर्णय घेत नसत.
अर्थात माघारी, साहेब, गोखल्याना काय म्हणत, हे पूर्णपणे माहीत  असूनही सुज्ञ गोखले तिकडे दुर्लक्ष करत असत.

गोखलेंचा फोन ठेवल्या ठेवल्या गणपतरावानी, शिवलिंगप्पाना फोन केला, अप्पा, पालकमंत्री बोलवतोय, काय करूया ?

“करणार काय , जाऊ अन बघू, कुणाकुणाला बलीवलाय ?”

” समद्या खासदार, आमदारांना ”

“आयला म्हणजे बापू पण असणार?!

” न्हाई अप्पा, त्यो विधानपरिषद वरचा आमदार, त्याला कोन गिनतय !

अशा चर्चा , गप्पा करत सगळे मान्यवर ताज मध्ये पोचले. मीटिंगसाठी दरबार हॉल बुक असला तरी,इसाक साहेब, ७ व्या मजल्यावरच्या रूम मध्ये बसले होते, गोखले त्यांचे शंकानिरसन करत होते.

अब्दुल हा साहेबांचा चुलत भाऊ, येणाऱ्या आमदार, खासदारांचे स्वागत करून त्यांना बसवून घेत होता, वेटर लगबगीने बिसलेरीची बाटली, खाऱ्या काजूची डिश आणि मॉकटेलचे आकर्षक ग्लास समोर ठेवत होते. सगळा कोरम फुल्ल होताच, अब्दूलने साहेबाना निरोप दिला आणि हॉल मध्ये पालक मंत्र्यांचे आगमन झाले. नमस्काराच्या फैरी झडल्या आणि इसाक साहेब खुर्चीवर बसले आणि गोखले त्या खुर्चीला बिलगून उभे राहिले.

गोखल्यांना दोन दिवसापूर्वीची ती संध्याकाळ आठवत होती, इसाक साहेब रॉयल चॅलेंजचा पतियाळा पेग सुक्या मटणाबरोबर संपवताना म्हणाले, चाचा, इस करोना का कुछ तो करना पडेगा.  गोखले नी मान हलवून अनुमोदन दिले, सर माझा प्लॅन तयार आहे. जिल्ह्यात ५ मोठी शहर आहेत, तिथे ५०० बेडचे एकेक हॉस्पिटल टाकू, प्रत्येक बेडला ऑक्सिजन देऊ, २०% बेड ना व्हेंटिलेटर लावू, जिल्ह्याच्या ठिकाणी ५०० बेडची १० हॉस्पिटल याच धर्तीवर उभारू.

चाचा, इतकं बांधकाम होई तो, करोना संपून जाईल.

सर, बांधकाम नाही करायचे, सगळी मंगल कार्यालय, शाळा, हायस्कुल, कॉलेज ताब्यात घेऊ, तिथे कॉट गाद्या टाकू.

मग चाचा ऑक्सिजन सिलिंडर कुठून आणणार ?

सर आपण कॉट ओळीत लावू, ऑक्सिजन साठी पाईपलाईन टाकू, एक टोक सिलिंडर ला जोडू. ऑक्सिजन आहे की नाही हे, आपल्याला आणि डॉक्टरला माहीत, त्या सगळ्यांना मॅनेज करू!

पण चाचा, डॉक्टर न्हाई ऐकला तर ?
त्याच्या अंगावर आपले कार्यकर्ते सोडू, मेलेल्या पेशंटचे नातेवाईक म्हणून ….
इसाकसाहेब आता पूर्ण आश्वस्त झाले, चाचा , म्हणजे सब मिला के १०००० बेड, आणि रोज कोटीत कमाई!! ईसाक साहेबांनी मटणाचा मोठा लचका तोडला.
सर, प्रत्येक कोविड सेंटरला ४-४ औषध दुकानं जोडून ठेऊ, रेमेडीसिवर, टोसीलोझुमॅब  फक्त तिथेच मिळेल, बाकी कुठे मिळणार नाही अशी व्यवस्था करू.
मास्क पासून पीपीइ किट पर्यंत सगळीकडून मलई काढू.

चाचा, तुमारे दिमाग मे जादू भरा है जादू….पण बाकीच्या आमदार, खासदार यांचं काय? त्यांच्या तोंडात काय कोंबू ?

सर प्रत्येकाला ५००-१००० बेड द्या, त्या बेडवर त्याचा कार्यकर्ता ! त्याला ₹ १०००/- पर डे, सकाळी नाश्ता, दोन वेळा, फसक्लास जेवण, फळ, ज्युस, आईस्क्रीम, ते, हे, सगळं फुकट.

चाचा, दिवाळ काढतोस काय माझं ?

नाही सर, हे सगळे बेड कार्यकर्त्याला टेम्पररी द्यायचे. एअरपोर्ट,स्टेशन, बस, आणि एन्ट्री सगळीकडे चेकिंग सेंटर बसवायचे, 1 रिपोर्ट निगेटिव्ह दिला, की 4 पॉझिटिव्ह अशी सिस्टीम लावायची.

मग बेडसाठी पाळी लागल ! बेड दिला  की लाख भर रुपये नक्की!
चाचा त्या कार्यकर्त्याला कसं काढणार ? फुकटची एन्जॉयमेंट सोडून तो का जाईल ?

सर, सोप्प आहे सगळं, बेड सोडला की 10 हजार द्यायचे! वर एक खंबा !

गोखले, ठीक है, पण लोचा नाही झाला पाहिजे, कूठपण .

चढणाऱ्या रॉयल चॅलेंज, मुळे चाचाचे रूपांतर गोखले मध्ये झाले होते.

पण गोखले चाचांची आयडिया मेंदूत उतरली होती, रक्तात भिनली होती आणि इसाक साहेबांनी एकेक पॉईंट मीटिंग मधल्या आमदार, खासदारांना सांगायला सुरुवात केली.

बेटा इसाक, बडे भाई मीटिंग कधी अशी कोरडी घेत न्हवते, अरे, मीटिंग ओली झाल्याशिवाय तिच्यात जान येत नाही. सर्वात सिनियर खासदार गोपाळदादा एकदम हक्काने आणि वचकाने म्हणाले तसे इतरांचे घसे तहानले, मनोमन आनंद झाला.
किंचित शरमून इसाक भाई म्हणाले, चाचाजी बंदोबस्त तो पुरा है, आपके हुकूम का इंतझार था.

बरं बरं पण तुझं ते आरसी, बिरसी नको, जरा जॉनी वॉकर मागव, गोपाळ दादा म्हणजे, तिथं अपील नाही.

हां दादा, ब्लॅक लेबल है, करो एन्जॉय ! पडत्या फळाची आज्ञा घेऊन गोखलेंनी वेटरना खूण केली आणि सोनेरी द्रवाच्या प्याल्यानी सर्व मीटिंग व्यापून टाकली.

पालक मंत्री इसाक भाई एकेक पॉईंट शांतपणाने मांडत होते, इतर सर्व आमदार, खासदार बऱ्याचदा मान डोलवत होते, तर कांहीवेळा खुसपट काढून अवघड प्रश्न विचारत होते. अशावेळी इसाक भाई , हळूच गोखले चाचाना खुणावत होते आणि गोखले नम्र पणे एकेक प्रश्न, केसांचा गुंता सोडवावा तसे सोडवत होते.

एकंदरीत घबाड खूप मोठं आहे आणि पदरात २०-२५ खोकी पडू शकतात हे चाणाक्ष लोकप्रतिनिधी च्या लक्षात आले होते.

इतरवेळी एकमेकांना विरोध करणारे यावेळी मात्र जनते चे सर्वांगीण हित लक्षात घेऊन सर्व बाबीवर एकमत व्यक्त करत होते.

त्याचवेळी आमदार बाळासाहेबांची ट्यूब पेटली, ते नाहीतरी आता तरंगत होते, जॉनी वॉकर ची नशा, तशात २५ कोटींचे घबाड खिशात, त्यांनी नेहमीप्रमाणे मनोमन 100 एकर बागायत विकत घेऊन निम्मा ऊस आणि निम्म्या शेतात द्राक्ष लागवड केली.त्या द्राक्षाचे घड डोळ्यासमोर दिसू लागले होते. पालक मंत्र्याशी लगट करत म्हणाले, इसाक भाई तुम्हारी मीटिंग हमेशा लई भारी ! मीटिंग ने जान तो आ गयी अब जवानी भी लाओ !

इसाक भाई नी हसून, छद्मी पणाने गोखले च्या कडे पाहिले, गोखले शांतपणे म्हणाले सर रूम नंबर ९०१ ते ९१२ आपल्यासाठीच रिझर्व आहेत, तिथे सगळं पोच होईल.
आपण सर्वांनी पालक मंत्र्यांवर विश्वास दाखवला याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत………

गोखले आभार मानत असतानाच आमदार खासदारांनी भरलेल्या दोन्ही लिफ्ट ९ व्या मजल्याकडे प्रस्थान करत होत्या.

गोखलेंनी एका फाटक्या माणसाकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिले, त्याने रूम नंबर ९०१ ते ९१२ मध्ये स्पाय कॅम बसवून, चालू केले आहेत याची हमी म्हणून थम्सअप ची खूण केली.

इमानदार गोखले खुश झाले, उद्या या डझनभर रेकॉरडेड सीडी हाती पडल्या की त्या लॉकर मध्ये ठेवताना इसाक साहेब कसे खुश होऊन शाबासकी देतील या कल्पनेने त्यांच्या अंगावर मूठभर मांस चढलं! एकंदरीत भविष्यातील राजकारण, इसाक साहेबांच्या मुठीत येणार होते.

कोविड १९ संदर्भात पालकमंत्र्यांनी सर्व आमदार, खासदारांची मीटिंग ताज मध्ये बोलावली आहे, याची खबर मीडिया पर्यंत पोचली होतीच
इतक्या कामाच्या व्यापात सर्व आमदार खासदार यांना योग्य वाटेला लावून, पालकमंत्री इसाक भाई मीडियाला सामोरे गेले आणि जिल्ह्यात कोविड १९ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व योग्य इलाजासाठी १०००० रुग्णांना सामावून घेतील अशा  २० हॉस्पिटलची उभारणी त्वरित करणार असल्याचे सांगून या समाजकार्यासाठी वैयक्तिक ₹ दहा लाखाची देणगी जाहीर केली आणि समाजातील श्रीमंत व समाजसेवी घटकांनी भरीव मदत घ्यावी अशी विनंती केली.

मीडियाच्या श्रमपरिहारास्तव जॉनी वॉकर नेहमीप्रमाणे न चालता तिथेच थबकला होता.

गोखले नेहमीप्रमाणे सर्वांची काळजी घेत मीडियाची सरबराई करत होते.

डझनभर निर्जीव स्पाय कॅमेरे यंत्रवत आपले काम पार पाडत होते.

उद्याच्या वृत्तपत्रात हेडलाईन आणि आता रात्रीच्या न्यूज चॅनेल वर ब्रेकिंग न्यूज असणार होती, पालकमंत्री इसाक साहेबांच्या पुढाकाराने आणि सर्व आमदार, खासदारांच्या सहकार्याने कोविड १९ ची हि लाट लौकरच आटोक्यात येणार.

या सर्व कसरतीत दमलेले इसाक भाई, या लाटेतून किती लाटता येतील आणि नंतर या पुढील लाटेतुन किती या बद्दल शांतपणे विचार करत आरसी रिचवत होते.

कोविड १९ च्या रुग्णांना उपचारानंतर होणाऱ्या म्युकरमायकोसिस चे महत्व खूपच वाढल्याने करोना आपल्या अस्तित्वाबद्दल शंका येऊन घाबरुन हवालदिल झाला होता.

— अरविंद टोळ्ये.
९८२२०४७०८०

मूळ कल्पना : मटालोखा मॉल हा लेख : लेखक : जेष्ठ साहित्यिक श्री. श्रीकृष्ण जोशी, रत्नागिरी.
सदर कथा संपूर्णतः काल्पनिक असून कुठेही साधर्म्य आढळल्यास निव्वळ योगायोग समजावा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..