कणकवलीत होणारं ‘मालवणी बोली साहित्य संम्मेलन’

कणकवलीत होणारं ‘मालवणी बोली साहित्य संम्मेलन’; माझ्या ‘आई’च्या कृतज्ञतेचा सोहळा..

दिनांक १२ व १३ मे २०१८ असे दोन दिवस सिंधुदुर्गात ‘मालवणी बोली साहित्य संमेलन’ भरणार मालवणी बोली सम्राट श्री. गंगाराम गवाणकर यांच्या अध्यक्षतेखाली भरणार असल्याची बातमी वाचली आणि मनापासून आनंद झाला. त्यात मालवणी बोलीचं पांचवं सलग संमेलन आहे, हे ऐकून आणखी आनंद झाला, कारण मला स्वतःला भाषा आणि तिच्या बोली यांच्याविषयी आत्यंतिक प्रेम आहे आणि मालवणी ही माझी ‘मातृभाषा’ आहे आणि साहजिकच माझी ही बोली टिकवण्यासाठी प्रयत्न करणारांचाही मला अभिमान वाटतो..

आपली प्रमाण भाषा मराठी आहे. तशी ती महाराष्ट्रातल्या सर्वच बोलींची प्रमाण भाषा मराठी आहे. व्यवहारासाठी एक भाषा असणं सोयीचं असतं म्हणून प्रमाण भाषेचं महत्व. अन्यथा त्या त्या भागातील. सर्वसामान्य लोकांचा विचार विनिमय स्थानिक लोकभाषेतच होत असतो. तद्वत, सिंधुदुर्गात मराठी जरी व्यवहाराची भाषा असली, तरी लोकव्यवहाराची भाषा मालवणी आहे. आपण मराठी ही आपली मातृभाषा आहे असं म्हणत असलो, तरी आपली खरी मातृभाषा ‘मालवणी’ आहे. मराठी आणि मालवणीतला फरक नेमका सांगायचा तर सहावारी साडी आणि नऊवारी साडडी येवढाच सांगता येईल. नऊवारी नेसणाऱ्या आपल्या मालवणी आईने, मराठीची सहावारी साडी नेसावी, इतकाच फरक या दोन भाषांमधे आहे..

जगाचं जाऊदे, पण आपल्या देशातील इंग्लिश भाषेच मराठीवरील आक्रमण किंवा अतिक्रमण चिंताजनक आहेत. हे लोन आता, कमी असलं तरी, सिंधुदुर्गातही पोचलंय. इंग्रजी भाषा आपली प्रमाणबोली मराठी हळू हळू संपवत आणत चाललेली आहेत, तिथे मालवणीसारख्या विविध बोली कितपत टिकाव धरू शकतील याचीच शंका वाटते. काही वर्षांपूर्वी ज्येष्ठ भाषा तज्ञ प्रा. गणेश देवींची एक मुलाखत ‘लोकसत्ते’त प्रसिद्ध झाली होती. श्री. देवी साहेब सांगत होते, की १९६१ च्या जनगनणेत माहिती मिळाल्याप्रमाणे, आपल्या देशातील मातृभाषांची (बोली ही खऱ्या अर्थाने मातृभाषा असते. या अर्थाने माझी मातृभाषा मालवणी होते).) संख्या एकूण १६५२ होती. सेन्ससमध्ये उल्लेख केलेली ‘मातृभाषा’ संपूर्णत: ‘स्वतंत्र भाषा’ असतेच असे नाही. बऱ्याचदा एकाच विशिष्ट भाषेची वेगवेगळी नावे सांगितली जातात. त्यामुळे १६५२ ‘मातृभाषा’ सेन्ससमध्ये दर्शविल्या गेल्या असल्या तरी ही प्रत्यक्ष भाषांची संख्या साधारणत: ११०० इतकी होती, हे ध्यानात घेणे जरुरीचे आहे. ही संख्या आताआणखी उतरत गेलेली असून ती जवळपास ५००च्या आसपास आली असावी.

भाषा आणि बोलीभाषा अशा नष्ट होण्याचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे त्या बोलण्याचं प्रमाण कमी होणं. ती ती भाषा बोलणारे ते ते ‘लोक’ त्या त्या भाषेचा ‘राजा’ असतात. हे भाषेचं राज्य सांभाळण्याची, वाढवण्याची आणि टिकवण्याची जबाबदारी लोकांची असते. आपलेया मातृभाषेतूनच जास्तीत जास्त व्यवहार करणेयाने भाषा टिकून राहाते. मालवणीची जबाबदारी आपली आहे. ही सरकारवर जबाबदारी टाकून चालणार नाही. भाषा टिकवणं आणि वाढवणं हे सरकारचं आणि बिनडोक नोकरशाहीचं कामच नव्हे. ही जाबाबदारी आपली सर्वांची आहे म्हणूनही या संम्मेलनाचं महत्व..अशी भाषिक संम्मेलनं भाषांच्या संवर्धनात मोलाचं काम करु शकतात..

बोलीभाषांच नष्ट होण, हे त्या बोलीची जी प्रमाण भाषा असते असते, तिच्यासाठीही अत्यंत धोकादायक असत. कारण प्रमाण भाषेला विविध शब्दांचा अखंड पुरवठा बोलीभाषा करत असते. म्हणजे एका अर्थाने बोलीभाषा ही प्रमाणभाषेचा स्त्रोत असते. प्रमाण भाषेला शब्दांतून समृद्ध करायचं नि:शब्द काम बोलीभाषा करत असते. आणि म्हणून बोलीभाषेचं टिकणं त्या प्रमाण भाषेसाठी आवश्यक असते. सिंधुदुर्गात होणाऱ्या मालवणी बोली साहित्य संमेलनाचे महत्व मला या साठीही वाटतं..

भाषा किंवा बोलीभाषेतले शब्द हे ती भाषा बोलणाऱ्या जनसमुदायाची संस्कृती आणि परंपरांचे वाहक असतात. मागच्या पिढीकडून पुढच्या पिढीकडे परंपरा आणि संस्कृती भाषेच्या माध्यामातून आपसूकपणे सोपवली जाते. आपल्या भाषेतील एकेका शब्दाला हजारो वर्षांच्या आपल्या संस्कृतीचा इतिहास असू शकतो, नव्हे असतोच. उदा. सिंधुदुर्गातील तळेरे-कासार्डे परिसरात मालवणीत कंदीलासाठी ‘फनास’ आणि ‘लाटान’ असे शब्द वापरले जातात. या शब्दांच्या उगमाचा शोध घेतला असता, कोणेकाळी या परिसरात असलेल्या अरबी-फारशी आणि त्यानंतरच्या हिन्दी-इंग्रजी राजवटींचा मागोवा घेता येतो. अरबी-फारशीत ‘कंदील’ म्हणजे ‘फाणूस’ जो ‘फनास’म्हणून आणि इंग्रजी अमलातला ‘लॅन्टर्न’, हिन्दी ‘लालटेन’ व नंतर देशी ‘लाटान’म्हणून स्थिरावला. हे दोन शब्द केवळ शब्द नसून शेकडो वर्षांपूर्वीच्या त्याकाळात घेऊन जाणारे आहेत. इतक्या वर्षांची आपली संस्कृती त्या तीनन शब्दांत सामावलेली आहे.

बोली आणि भाषेतले शब्द संस्कृतीचे वाहक असतात. ‘दिन दिन दिवाळी, गाई म्हशी ओवाळी’ हे शब्द उच्चारल्यानंतर माझ्या पिढीच्या मनात जे सुखद तरंग उमटतील, तेवढे आताच्या इंग्रजी माध्यामात शिकणाऱ्या आपल्याच पिढीच्या मनात उमटतील किंना कसं याबद्दल मला शंकी वाटते. आपल्या बोली आणि भाषा नष्ट होत जाणं याचा अर्थ म्हणजे ती बोली आणि ती भाषा बोलणाऱ्या समुदायाचे सांस्कृतिक अस्तित्व नष्ट होणे इतका सोपा आहे. सिंधुदुर्गात होणारे साहित्य संमेलन या अर्थाने मोठे आहे. हे केवळ ती बोली भाषा टिकवण्याचा आणि वाढवण्याचा प्रयत्न नसून, माझी ही मालवणी भाषा बोलणाऱ्या माझ्या समुदायाचं सांस्कृतिक अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न आहे, म्हणून या संमेलनाचे आयोजक आणि प्रायोजक अभिनंदनाला पत्र आहेत.

भाषा टिकते ती सातत्याने बोलल्यामुळे. इतर प्रांतांचं माहित नाही, मात्र माझा सिंधुदुर्ग या दृष्टीने भाग्यवान आहे, कारण इथे आजही मालवणी बोली विविध स्तरातल्या लोकांकडून बोलली जाते. मी स्वत: महाड ओलांडलं की माझ्या मालवणी भाषेत बोलतो, नव्हे ती आपोआप जीभेवर पाझरायला लागते. पण बोलणंच पुरेसं नाही. आपली भाषा वाढवायची असेल तर मग मुद्रणाला पर्याय नाही. देशाच्या प्रत्येक भागातल्या, त्या त्या भागात बोलल्या जाणाऱ्या बोली मुद्रित स्वरुपात न आल्याने लोप पावल्या, हे प्रा. गणेश देवींचं निरीक्षण आहे. मुद्रित स्वरूपात त्या त्या बोलीतलं वा भाषेतलं साहित्य आलं, तर ती भाषा अथवा बोली अधिक मोठ्या प्रमाणात लोकांपर्यंत जाऊ शकते आणि दीर्घकाळ टिकतेही. श्री. गंगाराम गवाणकरांच्या नाट्य संहितेवर आपल्या श्री. मच्छिंद्र कांबळीनी ‘वस्त्रहरण’ या नाटकाच्या माध्यमातून आपली मुळातच गोड असलेली मालवणी बोली अधिक लोकप्रिय केली यात वाद नाही. श्री. मच्छिंद्र कांबळी यांनी मालवणी बोलीला केवळ लोकप्रियच केल नाही, तर तिला प्रतिष्ठ देऊन सातासमुद्रापलीकडे पोचवली, या श्री. गवाणकर आणि श्री. मच्छिंद्र कांबळींचं श्रेय कुणाला नाकारता येणार नाही. हाच प्रयत्न आणखी पुढे सुरु ठेवायला हवा. सिंधुदुर्गातल्या प्रथितयश साहित्यिकांनी, नाटककारांनी मालवणी भाषेतून लिखित साहित्य छापील कश्या प्रकारे होईल हे पाहायला हवं आणि या बाबतीत अश्या उत्साही लोकांना समाजाने मदत करायला हवी. हे कर्तव्य समाजाचंच आहे. या गोष्टीला लोकाश्रय नसेल तर काहीच उपयोग नाही. या संम्मेलनाची निमंत्रण पत्रिकाही आयोजकांनी मालवणीत छापलीय ह्याबद्दलंही त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे..नाहीतर हल्ली हाडाच्या मराठी पोरांच्या लग्नाची पत्रिकाही फक्कड इंग्रजीत असते. हा बडेजाव इथे टाळला हे उत्तम..

सिंधुदुर्गातल्या मालवणी बोलीचं संवर्धन करू पाहाणाऱ्या या ‘मालवणी बोली साहित्य संम्मेलना’ला माझ्या मन:पूर्वक शुभेच्छा..हे केवळ बोलीचं संवर्धन करणारं संम्मेलन नसून ही बोली बोलणाऱ्या माझ्या मालवणी समाजाचं सांस्कृतिक संवर्धन आहे असं मी समजतो. मलाही या संम्मेलनाला यायची खुप इच्छा होती, मात्र मी समारोपाच्याच संध्याकाळी गांवी पोहोचतोय. त्यानुळे शक्य होणार नाही. हे संम्मेलन भरवण्यास पुढाकार घेतलेल्या सर्व व्यक्तींचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि त्या सर्वांना माझ्या शुभेच्छाही देतो..

थांबतंय आता..

— नितीन साळुंखे
9321811091

नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश
About नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश 377 Articles
श्री नितीन साळुंखे (मित्रपरिवारात गणेश या नावाने परिचित) हे मुळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील खांबाळे या गावचे. सध्या मुक्काम मुंबईत. वाचन, लेखनाची अत्यंत आवड. स्वत:चा ७०० हून जास्त पुस्तकांचा संग्रह. इतिहास, भाषा,शब्दांचा जन्म, देव, धर्म, संस्कृती, प्रथा, परंपरा यांचा अर्थ काय व त्या कशा अस्तित्वात आल्या याचा शोध घेण्याची विशेष आवड. लहानपणापासून संघ स्वयंसेवक व संघविचारांशी एकनिष्ठ. पुणे येथील संघप्रणित सर्वात मोठ्या अशा जनता सहकारी बॅंकेतील प्रदिर्घ नोकरीनंतर त्यांचे मित्र आणि आमदार प्रमोद जठार यांच्याबरोबर काम करण्यासाठी त्यांनी २००७ मध्ये नोकरी सोडली. त्याचबरोबर मित्राबरोबर मुंबईत बांधकाम व्यवसायात पदार्पण. २०-२२ वर्षांचा ज्योतिष शास्त्राचा अभ्यास असल्यामुळे परिचितांमध्ये एक उत्तम ज्योतिषी म्हणून ओळख. सर्व थरातील मित्र. त्यातही बहुतकरून लेखक, कविंचा, कलाकारांचा जास्त भरणा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

जालना जिल्ह्यातील ऐतिहासिक अंबड

अंबड शहरात मत्स्योदरी देवीचे पुरातन मंदिर आहे. हे मंदिर इ.स.१८ ...

विदर्भाचे प्रवेशद्वार : मलकापूर

मलकापूर  हे बुलडाणा जिल्ह्यातील महत्त्वाचे औद्योगिक, शैक्षणिक केंद्र आहे. मलकापूर ...

जलग्राम : जळगाव

मेहरुणच्या नैसर्गिक तलावामुळे जलग्राम म्हणूनही जळगाव शहराची ओळख आहे. उत्तर ...

Loading…