प्रतिभावंत गायक शिवपुत्र सिद्धरामय्या कोमकली उर्फ कुमार गंधर्व

कुमार गंधर्व नावाची ही जादूच अशी आगळीवेगळी होती. त्यांचे मूळ नाव शिवपुत्र सिद्धरामय्या कोमकली. त्यांचा जन्म ८ एप्रिल १९२४ साली बेळगावजवळच्या सुळेभावी खेड्यात कानडी कुटुंबात झाला. लहान वयातच त्यांनी आपल्या गायकीची चमक दाखवली. आपल्या आगळ्यावेगळ्या शैलीने त्यांनी रसिकांवर अक्षरशः गारुड केले. घराणेशाहीच्या चौकटीत बंदिस्त व्हायला त्यांनी साफ नकार दिला. त्याऐवजी आपली स्वतःची गानशैली जनमानसात रुढ केली. ‘कुमार गंधर्व’ ही पदवी गुरुकल्ल मठाचे स्वामी यांनी त्यांना वयाच्या सातव्या वर्षी दिली. त्यांचे वडीलही गायक होते. जन्मापासून रुजत असलेल्या संस्कारांमुळे वयाच्या सहाव्या वर्षी एकदम गाऊच लागले.

१९३६ सालच्या अलाहाबादच्या अखिल भारतीय संगीत परिषदेतील गायनाने एकदम प्रसिद्धी मिळून त्यांच्यावर बक्षिसे व पदके यांचा वर्षाव झाला. १९४० च्या दशकात पंडित बी. आर. देवधर यांचे शिष्यत्व त्यांनी स्वीकारले. त्यावेळीच कुमारजींच्या नावाचा दबदबा भारतीय शास्त्रीय संगीत क्षेत्रात निर्माण झाला. एप्रिल १९४७ मध्ये भानुमती कंस यांच्याशी कुमारजींचा विवाह झाला आणि ते मध्य प्रदेशातील देवासमध्ये स्थायिक झाले. त्याचवेळी काळाने त्यांच्यावर आकस्मिक आघात केला. त्यांना टीबीची बाधा झाली. या दुखण्याने त्यांची फुफ्फुसे खालसा केली. असं म्हणतात की, या दुखण्यात त्यांचं एक फुफ्फुस कायमस्वरुपी निकामी झालं. पत्नी भानुमती यांनी याकाळात त्यांची सेवाशुश्रुषा केली. त्या आधी देवधरबुवांकडे आणि नंतर कुमारजींकडेच गाण्याचे शिक्षण घेत होत्या. त्यांच्याच मदतीने पंडितजी आजारातून बरे झाले आणि १९५३ मध्ये आजारानंतरची त्यांची पहिली मैफल रंगली. परंतु या दुखण्याने त्यांच्या स्वरराज्याला चांगलाच हादरा दिला होता.

१९६१ मध्ये बाळंतपणात पत्नी भानुमतीचे निधन झाले. त्यानंतर कुमारजींनी वसुंधरा श्रीखंडे यांच्याशी विवाह केला. त्याही देवधरबुवांच्या शिष्या होत्या. कुमारजी आणि वसुंधराबाईंची कन्या कलापिनी ही अनेकदा गाण्याच्यावेळी तानपु-यावर त्यांना साथ द्यायची. माळव्याची लोकगीतं, निर्गुणी भजन , नवरागनिर्मिती यांवर कुमारजींचा मोठा व्यासंग होता. कुमारजींची लोकप्रियता अफाट होती. संगीतातील जाणकार मंडळी त्यांच्या गायकीवर जीव ओवाळून टाकायची. त्यामध्ये महाराष्ट्रीय मंडळींची संख्या मोठी होती. पुणे आणि मुंबईच्या उपनगरातील रसिकांच्या हृदयावर कुमारजींनी अधिराज्य गाजवले. याचठिकाणी त्यांच्या गाण्याच्या मैफली रंगायच्या. चेंबूरसारख्या परिसरात शाळांमध्ये त्यांच्या मैफली व्हायच्या. अगदी फुकट. खरेखुरे संगीताचे दर्दी या मैफलींना हजेरी लावायचे आणि कुमारजींच्या गाण्याची हरएक तान कानात जपून ठेवायचे. कुमार गंधर्वांनी ग्वाल्हेर, आग्रा, जयपूर, भेंडीबाजार वगैरे सर्व घराण्यांचे सार काढून नवीनच गायकी निर्माण केली.

माळवी लोकगीतांचा विशेष अभ्यास करून त्यांवर आधारित असे ‘गीत वर्षा’, ‘गीत हेमंत’, ‘गीत वसंत’ इ. कार्यक्रम सादर केले व संगीताला एक नवीनच क्षेत्र उपलब्ध करून दिले. १९६५ साली अनुपरागविलास हा नव्या- जुन्या रागांत स्वत: बांधलेल्या बंदिशींचा संग्रह प्रसिद्ध केला. सूरदास, कबीर, मीराबाई यांच्या पदांच्या गायनाचे कार्यक्रम व खास माळवी लोकगीतांच्या मैफली त्यांनी केल्या.

कुमार गंधर्वांची गायकी चित्रित करण्यासाठी एकदा जब्बार पटेल कॅमेरा घेऊन आले. मधु लिमये आणि ज्येष्ठ साहित्यिक विंदा करंदीकर त्यावेळी उपस्थित होते. मैफलीत कॅमेरा पाहून कुमारजींना आश्चर्य वाटले. पंडितजींनी जब्बारना विचारले , कॅमेरात किती मोठा रोल आहे ? थोडक्यात किती वेळाचे गाणे चित्रित करायचे आहे ? जब्बार यांनी सांगितले , पावणे चार मिनिटे. एका चीजेसाठी पावणे चार मिनिट म्हणजे फारच अवघड काम. पण पंडितजींनी घड्याळ लावले आणि सांगितले सुरू करा चित्रीकरण. त्यांनी तराणा सुरू केला. समा बांधली आणि बरोबर २२५ सेकंदात समेवर येऊन गाणे संपविले. भारत सरकारने १९९० साली कुमारजींना पद्म विभूषण पुरस्कार देऊन गौरव केला होता. त्यांचे पुत्र मुकुल शिवपुत्र आणि कन्या कलापिनी कोमकली हे दोघेही गायक आहेत. त्यांच्या कन्या कलापिनी कोमकली आणि रेखा इनामदार-साने यांनी संपादित केलेल्या ‘कालजयी कुमार गंधर्व’ या ग्रंथात कुमार गंधर्व यांची प्रयोगशीलता आणि वैचारिकता यांचा शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. पहिला खंड मराठीमध्ये असून, दुसरा खंड हिंदी आणि इंग्रजी असा द्वैभाषिक आहे. जीवनाच्या विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या ४५ मान्यवरांचे लेख, कविता आणि मुलाखतींचा या ग्रंथात समावेश आहे. प्रसिद्ध गायक आणि विश्लेषकांनी कुमार गायकीचं मर्म उलगडून दाखवलं आहे. प्रसिद्ध छायाचित्रकार रघु राय, अविनाश पसरिचा आणि कोमकली कुटुंबियांच्या संग्रहातील दुर्मिळ छायाचित्रंही ग्रंथाच्या दोन्ही खंडात समाविष्ट करण्यात आली आहेत. मा.कुमार गंधर्व यांचे १२ जानेवारी १९९२ रोजी निधन झाले.

संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ. इंटरनेटसंजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 1749 लेख
श्री संजीव वेलणकर हे पुणे येथील कॅटरिंग व्यावसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती या विषयांवर ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

महाराष्ट्राची आयटी अनुकूल शहरे

भारतीय माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील व्यावसायिक संघटना नेस्कॉमच्या (नॅशनल असोसिएशन ऑफ ...

श्रध्दास्थान मुक्तागिरी

विदर्भातील अमरावती जिल्हयात मुक्तागिरी हे निसर्गरम्य तसेच जैनधर्मीयांचे महत्त्वाचे धार्मिक ...

करवीरनगरी अर्थात कोल्हापूर

करवीरनगरी अर्थात कोल्हापूर जिल्ह्यास ऐतिहासिक, सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक वारसा लाभलेला ...

अंबेजोगाई

अंबेजोगाई बीड जिल्ह्यातील एक शहर आहे. १३व्या शतकात स्वामी मुकुंदराज ...

Loading…