नवीन लेखन...

कोकण, नारळ आणि कोकम

 

कोकण म्हणजे एक अंगठी मानली तर त्यात कोकम म्हणजे माणिक, पाचू म्हणजे हिरवागार निसर्ग आणि नारळ म्हणजे गोमेद अशी तीन रत्न त्यावर जडली आहेत असं म्हणायला हरकत नाही. आहे त्यात भागवण्यापेक्षा जे आहे त्यात साजरं कसं करता येईल असा स्वभाव असणाऱ्या कोकणी माणसाकडे आदरातिथ्य यथायोग्य होतंच.

भटो भटो कुठे गेला होतात.. कोकणात..
कोकणातून काय आणलं..

लहान असताना शालेय अभ्यासक्रमात असणारी ही कविता कोकणाबद्दल कुतूहल वाढवणारी.आमच्या लहानपणी गावाला जायचं असं म्हंटल की कोकणात जायचं असं पक्क ठरलेलं असायचं आणि येताना कोकणचा मेवा घेऊन यायचं हें ओघाने आलंच.

कोंक या धातूपासून तयार झालेला शब्द म्हणजे कोकण..

समुद्र आणि पर्वतरांगा हे कोकणचं वैशिष्ट्य. दोन्हीतली अथांगता पहात राहावी.समुद्राच्या पाण्यात पाय ठेवल्यावर आपसूक मोकळं होणारं मन आणि पर्वतराजीतून फिरताना लाभणारा शांतपणा याची तुलना करूच शकत नाही.

या पर्वतरांगांनी आणि समुद्राने कोकणाला समृद्ध केलंय.किनारपट्टीवर असणारी नारळाची बनं, डोंगरावर उभी असणारी रातांबा आणि काजूची झाडं ही तळकोकणाची खरी संस्कृती.

कोकणात फिरताना मोक्याच्या ठिकाणी तुम्ही कांदा भजी,बटाटा वडा, वडा उसळ पाव याचा आस्वाद घेऊ शकता. सोबतीला कडक चहा असतोच.

वेंगुर्ल्याच्या बंदरावर एका बाजूला बोटीतून माश्यांच्या पाट्या उतरत असतात आणि बाहेर मस्त खरपूस कांदा भजी, चहा, आणि आईसफ्रूट ची गाडी खुणावत असते. शिरोड्याला गेलात तर बटाटाभजी पाव, आणि मिसळ खाल्ल्याशिवाय तुम्ही किनाऱ्यावर जाणारच नाही.

तारकर्ली, देवबागमध्ये मिळणारी आंबोळी चटणी आणि उकडीचा मोदक बीच वर बसून खाण्यातली मौज काही वेगळीच.

नारळाचा आणि कोकमाचा यथेच्छ वापर तळकोकणातल्या खाद्यपदार्थांमध्ये होतो.

इथे फिरताना जर अगदी ताजी ताजी नारळ उतरवणी झाली असेल तर त्यातल्या पांढऱ्या नारळाचा रस तुम्ही सोलकढीत किंवा माशाच्या आमटीत वापरून पहा..किंवा घावणाबरोबर नारळाचं गुळ घालून केलेला रस…. रसना म्हणजे जिव्हा आणि उदर म्हणजे पोट तृप्त होऊन आशीर्वादच देतं त्या गृहिणीला.

शिरवाळे आणि रस असाही एक खाद्यपदार्थ आहे बरं का.. तो करायचा असेल तर दोन दिवस अगोदरपासून तयारी असते ती पांढरा कोवळा नारळ शोधण्याची. तो जोवर मिळत नाही तोवर काही खरं नसतं घरातल्या तरुण पोरांचं. पिटाळून पिटाळून नारळ शोधायला लावतात. तशीच कथा उकडीच्या मोदकांची आणि पातोळ्याची. नारळ खवताना त्यात एकही तूस किंवा करवंटीचा तुकडा नको अशा कडक सूचना असतात.

बरं अशी कितीशी सामग्री लागते या पदार्थांसाठी तर सुगंधीत तांदळाची पीठी, ओलं खोबरं,वेलची, जायफळ, खसखस,गुळ, तूप, थोडासा सुका मेवा, आणि हळदीची पानं. एक गुळ आणि वेलची, खसखस सोडली तर सगळं कसं घरचं.

नवीन जावई यायचा असेल तर त्या दिवशी कोकणातल्या घरात मटण किंवा चिकन चा घाट घातलाच जातो. बरोबर तळलेले मासे असतातच. मालवणी कोंबडी वडे ही डिश तर एकदम वल्ड फेमस. अनेक ठिकाणी ही स्पेशल डिश खाण्यासाठी लोकांची रांग लागते. चिकन मटण करायचं असेल तर चुलीवर खरपूस भाजलेलं कांदा खोबऱ्याचं वाटण आणि पाट्यावर वाटलेलं आलं लसूण आणि कांदा खोबऱ्याचं वाटण लावून केलेल्या चुलीवर रटरटणाऱ्या चिकन चा घमघमाट भूक चळवल्याशिवाय राहत नाही. आंबोळी, वडे, तांदळाच्या भाकऱ्या, चुरचुरीत तळलेले मासे, सुकटाची चटणी, लाल तांदळाचा भात, सोलकढी असा फक्कड बेत असतो.

नुसते मासे करायचे तर ओला नारळ खवून हात दुखतात कधीकधी.. पण जिभेचे चोचले पुरवायचे तर एवढं हवंच नै का?बांगड्याचं सुकं करायचं तर ओलं खोबरं, कांदा, तिरफळ, मिरी, धणे, एखादी सुकी लाल मिर्ची, हळद आणि मीठ घालून जरा सरसरीत वाटून घ्यावं लागतं… त्याची वेगळी तयारी, एखाद्याला सुरमईचं तिखलं खायचं असतं त्याची वेगळी तयारी, मग माझ्या आवडीचं कोलंबीचं खदखदं कर अशी वशारपव असतेच…आणि मग सोलकढी लागतेच. म्हणजे पहा किती नारळ खवायला लागतात.

पण तळकोकणात ओल्या नारळाशिवाय स्वयंपाक करण्यात मजा नाही. घरात दळलेल्या भाजणीच्या थालपीठा बरोबर कधीतरी ओलं खोबरं खाऊन पहा.. एहे रे test

तसाच एक कृपा प्रसाद लाभलाय तो कोकम या फळाला. शहरात  आमसुलं म्हणून ओळखलं जातं खरं पण खरा कोकणी माणूस कोकमाला कधीच आमसुलं म्हणणार नाही. आंबटपणासाठी कोकणात ह्याचा भरपूर वापर होतो. कुळथाचं पिठलं, रोजची डाळीची आमटी (ओलं खोबरं घातलेली) यात कोकमाचाच वापर होतो. घरी अचानक एखादा पाहुणा आला आणि चहा करण्याएवढा वेळ नसेल तर पटकन कोकम सरबताचा पेला त्याच्यासमोर ठेवला जातो.

एकदा का रातांबा झाडावरून काढला की कोकम, कोकम सरबत, कोकमाच्या बियांपासून केलं जाणारं तेल किंवा कोकम आगळ इतकं काय काय तयार होतं.

ओल्या काजूची उसळ, कुळथाची पिठी, वेगवेगळी कडधान्य वापरून बनवले जाणारे आमट्यांचे प्रकार,  काळ्या वाटण्याची आमटी, समुद्री मेथीची भाजी, शहाळ्याची भाजी असे रुचकर पदार्थ रोजच्या जेवणात केले जातात.  जिभेचे लाड एवढ्यावरच थांबत नाही  तर आमसूल वापरून केलेल्या चटपटीत चटण्या, मोहरी घालून केलेलं आंब्याचे रायतं, आंबोशी याने केळीचं पानं सजतं.

संध्याकाळच्या खाण्यासाठी कोकणात घरी केलेले शेंगदाणा लाडू, शेवेचे खटखटे लाडू, चुरमुरे लाडू, फणसाचे तळलेले गरे  असतातच.

आपल्या महाराष्ट्राला 720 कि.मी.ची किनारपट्टी लाभली आहे. साधारण संस्कृती एकसारखी असली तरी दर दहा किलोमीटरवर बदललेली भाषा आणि खाद्यसंस्कृती कोकणच वेगळेपण अधोरेखित करते.

सुक्या नारळाचा वापर, चिंच असो वा सुक्या माशांचा रोजच्या वापरात केला गेलेला वापर अस्सल खवय्यांसाठी एक मोठी उपलब्धी आहे.

पदार्थाचं नाव सारखं असलं तरी करण्याची पद्धत आणि वापरले जाणारे मसाले यांनी जेवणाचं पान अगदी सुंदर दिसतं.

कोकण म्हणजे एक अंगठी मानली तर त्यात कोकम म्हणजे माणिक, पाचू म्हणजे हिरवागार निसर्ग आणि नारळ म्हणजे गोमेद अशी तीन रत्न त्यावर जडली आहेत असं म्हणायला हरकत नाही.

आहे त्यात भागवण्यापेक्षा जे आहे त्यात साजरं कसं करता येईल असा स्वभाव असणाऱ्या कोकणी माणसाकडे आदरातिथ्य यथायोग्य होतंच.

-वृंदा दाभोलकर

(व्यास क्रिएशन्स च्या कोंकण प्रतिभा दिवाळी २०२२ ह्या विशेषांक मधून प्रकाशित)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


 

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..