नवीन लेखन...

कवितांची जन्मकथा

कोणतीही कविता निर्माण व्हायला मराठीत (किंवा इतर कुठल्या भाषेत) कोणते शब्द अस्तित्वात आहेत हा दैवाचा भाग अटळपणे नेहमी प्रकर्षाने असतो.

मुख्यत्वे संस्कृत आणि फारसी/अरबी/उर्दू शब्द जसेच्या तसे किंवा अपभ्रष्ट रूपांमधे अवतरून सध्याच्या मराठी भाषेतले शब्दभांडार तयार झाले आहे.

केवळ एक उदाहरण म्हणून मी ग. दि.माडगूळकरांचे खालचे सुंदर गीत उद्धृत करत आहे.

—————————-

सावळाच रंग तुझा, पावसाळी नभापरी
आणि नजरेत तुझ्या, वीज खेळते नाचरी!

सावळाच रंग तुझा, चंदनाच्या बनापरी
आणि नजरेत तुझ्या, नाग खेळती विखारी!

सावळाच रंग तुझा, गोकुळीच्या कृष्णापरी
आणि नजरेत तुझ्या, नित्य नादते पावरी!

सावळाच रंग तुझा, माझ्या मनी झाकळतो
आणि नजरेत तुझ्या, चंद्र पाहू केव्हा उगवतो

सावळाच रंग तुझा, करी जीवा बेचैन
आणि नजरेत तुझ्या, झालो गडी बंदीवान!

—————————-

वरचे तालबद्ध/यमकबद्ध गीत निर्माण होण्याकरता मराठीत “परी” शब्दाशी जुळणार्‍या उच्चारांचे “नाचरी”, “विखारी”, “पावरी” हे शब्द संस्कृत/फारसी/अरबी/उर्दू भाषांमधून जसेच्या तसे किंवा अपभ्रष्ट रूपांमधे मराठीत अवतरले असण्याच्या दैवाचा भाग होता. ते शब्द मराठीत नसते तर दैववशात असलेले दुसरे कुठलेतरी शब्द हुडकून त्यांची वरची romantic कविता वेगळ्या स्वरूपात माडगूळकरांना निर्माण करावी लागली असती.

वरच्या गीतातल्या पहिल्या तीन कडव्यांमधे “परी” शब्दाशी जुळणार्‍या उच्चारांचे “नाचरी”, “विखारी”, आणि “पावरी” हे शब्द योजून माडगूळकरांनी अंत्ययमक साधले होते. पण पुढच्या दोन कडव्यांमधे तेच यमक योजण्याकरता उचित शब्द मराठीत नसल्याने त्यांनी दोन वेगळी यमके साधली होती.

“नाचरी” ( नाचना > नाचरी), “पावरी”, “बेचैन” आणि “बंदीवान” हे शब्द फारसी/अरबी/उर्दूमधून आणि “विखारी” हा शब्द संस्कृतमधून मराठीत अवतरले आहेत. (विष > विखार > विखारी.)

पावरी (म्हणजे लहान बासरी) हा शब्द मराठीत नसता तर माडगूळकरांनी पावरीऐवजी बासरी हा “सुदैवाने” असलेला पाच मात्रांचाच उर्दू शब्द वापरला असता. (“पावरी” हा शब्द बराच अप्रचलित असूनही “कृष्णापरी” ह्या शब्दातल्या “प”शी अनुप्रासाने जास्त जुळणारा तो शब्द माडगूळकरांनी “बासरी”ऐवजी योजला होता.)

सावळा हे संस्कृत श्यामलचे अपभ्रष्ट रूप आहे.

सावळा, पावसाळी, खेळते, गोकुळीच्या, आणि झाकळतो हे “ळ” अक्षर असलेले पाच शब्द वापरून, आणि नभापरी, नजरेत, नाचरी, चंदनाच्या, बनापरी, नाग, नित्य, नादते, बेचैन, आणि बंदीवान हे “न” अक्षर असलेले दहा शब्द वापरून अनुप्रासजन्य गेयता माडगूळकरांनी ह्या गीतात आणली आहे.

मराठी बोलीत वास्तविक “आकाश” हा संस्कृत शब्द रूढ आहे, “नभ” शब्द रूढ नाही, पण “आकाश” हा शब्द त्याच्या उच्चारातल्या पाच मात्रांमुळे कवितेतला ताल राखण्याकरता पहिल्या ओळीत वापरता न येऊन माडगूळकरांना “नभ” हा दोन मात्रांचा संस्कृत शब्द वापरावा लागला होता. अश्या प्रकारची तडजोड कविता रचणार्‍यांना अपरिहार्यपणे सतत करावी लागते. “नभ”‘च्या बाबतीत माडगूळकरांचे सुदैव असे होते की त्या शब्दाचा अर्थ बहुतेक मराठी माणसांना माहीत असतो. आता “नभ” हा दोन मात्रांचा शब्द मुळात संस्कृतमधेच नसता तर आकाश ह्या अर्थी संस्कृतमधे असलेल्या इतर १४ शब्दांपैकी एकही शब्द दोन मात्रांचा नाही. शिवाय त्यांपैकी गगन आणि अंबर ह्या प्रत्येकी तीन आणि चार मात्रांच्या शब्दांखेरीजचे इतर (सुरवर्त्म, पुष्कर, विहाय ह्यांसारखे) बारा शब्द सामान्य मराठी भाषिकांना अजिबात माहीत नसतात. म्हणजे मग आकाशाशी संबंधित असलेल्या पावसाळी हवेच्या आणि नाचर्‍या विजेच्या रूपकांचा वापरही माडगूळकरांना करता आला नसता.

— आकाश विहारकर

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..