आमुचा प्याला दुःखाचा डोळे मिटून प्यायचा या अवस्थेत अनेक जण जगत असतात. दुःख हे काही जणांच्या पाचवीलाच पुजलेल असतं. काही जणांचा प्रवास फुलांच्या पायघड्यावरून होतो तर काही जणांचा प्रवास काटेरी मार्गावरून होतो.
बऱ्याचशा वेळेला साहित्याचा प्रवास आणि वास्तव हातात हात धरून चालतं. लेखकाची निरीक्षण शक्ती ही टीपकागदाप्रमाणे असते. सांडलेली शाई जसा टिपकागद शोषतो तसेच व्यक्त झालेले दुःख लेखक टिपत असतो. प्रा. व्यंकटेश सोळंके यांची अरसड ही कादंबरी वाचल्यानंतर लेखकाच्या कुंचल्या मधून साकारलेले दुःखाचे गडद रंग मनाच्या कॅनवास वर खोलवर रुजतात. जे भावल ते लिहिलं यापेक्षा जे पाहिलं ते मनाला जास्त भिडतं. जग कितीही बदललं तरीही जग व जगाच्या रिती या व्यक्ती व व्यक्तीच्या पार्श्वभूमीवर अवलंबून असतात, त्यास काळ वेळ व सामाजिक परिस्थिती कारणीभूत असते ती परिस्थिती सफल व समृद्ध बनवण्यासाठी व्यक्ती झटत असते, ती परिस्थिती सफल व समृद्ध बनवण्यासाठी व्यक्ती झटत असते, पण परिस्थिती कधी कधी बदलत नसते तेव्हा लोक त्या कुटुंबातील दुर्गुण हुडकून त्यावर कटाक्ष करतात. हे वर्णन कादंबरी विषयी बरच काही सांगून जातं. मनी नावाच्या एका कृषी कन्येच्या दुःखाचा हा प्रवास लेखकाने टीप कागदाप्रमाणे टिपला आहे. अनेकांचे बालपण हे उपेक्षा आणि वंचनाने भरलेल असतं.
आई मुलाच्या नात्यातील हृदय हेलावून टाकणाऱ्या अनेक प्रसंगाचं वर्णन वाचून आपल्याही त्याची झळ पोहोचते, पडीक जमिनी डोळ्यात पाणी आणतेच त्याचप्रमाणे अवकाळी नंतरची जमीनही डोळ्यात पाणी आणतेच,अडसड कधीतरी फुलेल आणि त्याचे श्रावण होणे आपल्याला पाहायला मिळेल या आशेने माणसे जगत असतात.
या कादंबरीतील काही पात्राच्या माध्यमातून उदाहरणार्थ चक्रम, यादव, गंगा,सूर्याजी,मारुती ही पात्रे व्यंकटेश सोळंके आपल्यासमोर व्यक्तीचित्रणाची फळी उभी करतात.अनेक नातेसंबंध हे दिखाऊ असतात त्यातलं पोकळ असणं काय असतं हे आपल्याला अस्वस्थ करून जातं. श्रद्धा, अंधश्रद्धा याबाबत समाजात असलेली धारणा, पूर्वपार चालत आलेल्या प्रथा, परंपरा, विविध चालीरीतीतून साकारलेलं समाजमन सर्वसामान्या समोर येतं. परिस्थिती सामान्यांना बदलूच देत नाही, गुंतवून ठेवत मुक्तीच्या वाटा विसरायला लावते आणि अशा पिढीसमोर आदर्शाची वानवा असल्यामुळे सर्व पिढीच अडसड प्रमाणे रूक्ष व चैतन्यही जीवन जगत असते.
अनेक प्रसंग केवळ काट्या सारखे खूपत नाहीत तर ते ठसत असतात आणि हे माणसाचं अस्वस्थ मन दुसऱ्याच्या चष्म्यामधून पाहून जसेच्या तसे जेव्हा उतरतं तेव्हा ते मनाला भावतं. दुःख हे फक्त वाचायला चांगलं वाटतं सहन करायला नाही पण ज्यांना वाचणे ऐवजी सहनच करावं लागतं अशांचं जीवन अडसड सारखंच असतं. पण निवडुंगालाही जशी फुल येतात तशी मानवी मनाला सुद्धा अशी पालवी फुटते. माणसे आज वर जगत नाहीत उद्या वर जगतात. उद्याच्या आशेने आजचं अरसड फुल होईल या आशेने माणसे जगतात. आपल मानवी मन सुद्धा कधी अरसड होतं,तरीही दुःखातून ताऊन सुलाखूवून निघाल्यावर शंभर नंबरी सोन होण्याची वाट पाहणे ही मानवी प्रवृत्ती आहे. चित्र जसं फोटोत कैद करता येतं. माणसांनाही आणि माणसांच्या मनातल्या संवेदनानाही कैद करता यायला हवं. काही सुंदर क्षणांनाही, वेदनेलाही दुखालाही संघर्षालाही कैद करता यायला हवं, हे सर्व व्यंकटेश सोळंके यांनी अरसड मध्ये चितारलंआहे. आनंदी क्षण हे अत्तरारासारखें असतात, त्यांनाही कैद करता यायला हवं. अत्तर जसं कुपीत सुरक्षित असतं,तसं काही आनंदी क्षण सुरक्षित ठेवायला हवेत, दुःखाच्या प्रसंगी कामाला येतात.
सर्व सुख दुःख निसर्गातच आहे फक्त टिपायला नजर हवी. काही आनंदी क्षणांना वेळ प्रसंगी आठवावे मनाचे सांत्वन करण्यासाठी तें क्षण वापरावेत. मोरपिसामुळे मोराचं सौंदर्य आहे,जसं चांगले व अर्थपूर्ण शब्दं हे आशयाचं सौंदर्य आहे.आशयाचं सुंदर असणं शब्दावर आहे. प्रत्येकाचा आनंदाचा, दुःखाचा कोटा ठरलेला आहे. आपणच आपल्या आनंदाला आणि दुःखाला कारणीभूत असतो हे माहीत असूनही माणसे चाकोरी सोडत नाहीत. आनंदाचे क्षण वेचायचे असतात सामान्या मध्यें, त्यांच्या दुःखामध्ये, त्यांचे सांत्वन करून सुद्धा आनंदाचे क्षण मिळतात.
स्वतःच्या आनंदापेक्षा दुसऱ्यांच्या आनंदाला, दु:खाला जास्त महत्व देतात ते खरेच आनंदाचे भागीदार असतात. आनंदाचा उत्सव साजरा करायला, कौतुकाला, दुःख ऐकायला साक्षीदार हवें असतात. आपल्या आनंदाला, दुःखाला वेदनेला कोणीतरी फुंकर घालावी. कुणीतरी गोंजारावं, कुरवाळावं असं प्रत्येकाला वाटतं. कौतुक सोहळा हा आनंदाचा असतो. कौतुकाच्या शब्दांनी माणसे बहरतात, सुखावतात. दुःख कुणाबरोबर तरी शेअर केल्यावर हलकं वाटतं. पारिजातकाचा सडा पडतोच तो हलवून पाडायचा नसतो. तुमचे कर्तृत्वच तुमच्यावर कौतुकाचा वर्षाव करतं. तुमचं दुःख तुम्हाला नाउमेद करतं.
मोराचा पिसारा कोणाला पाहून फुलत नसतो,तर स्वतः मध्ये अंतरीक आनंदाची उर्मी आल्यावर मोर व्यक्त होतो,असं माणसालाही व्यक्त होता आलं तर सगळेच आनंदी दिसतील, राहतील.माणसांनीही असं निर्व्याज व्यक्त व्हायला हवं. माणसे उडत राहतात ही अवस्था अडसड ची आहे. पहाटेच्या समयी पक्षांचा किलबिलाट, मुलांचं बागडणं हे आपल्यासाठी आनंददायी आहे पण आपण उठल्यावर आपल्या स्वार्थाचे हिशोब करतो. माणसांचा सगळा दिवस दुसऱ्यांच्या मनांचा अभ्यास करण्यात जातो. स्वतःच्या मनाची काळजी माणसे फार क्वचित करतात. दुसऱ्यांच्या विचार करत असताना तुलना नावाचा तराजू त्याला स्वस्थ बसू देत नाही. स्वतःचा आनंद व्यक्त करताना मोर जसा स्वतः आनंद अनुभवतो तसं माणसांचं नाही त्याला आपल्या तालावर व आपल्या बोटावर माणसांना नाचवल्यावरच आनंद मिळतो.
निसर्गात प्रत्येक गोष्टीकडून आनंद घेण्यासारखं काहीतरी आहे. निसर्ग न पाहण्याचा,अनुभवण्याचा संसर्ग आज अनेकांना झाला आहे.
घरात स्वतः स्वतःच्या कोषात माणसें इतकी गूरफटून गेली आहेत, त्यातल्या त्यात निर्जीव भवतालाने त्यांना इतकं गुंतवून ठेवलं आहे की रात्रंदिवस ही उठल्यावर ते त्यांचाच विचार करतात, जे त्याला त्रास देतात. अनेकांचा आनंद वेटिंग वरच असतो आणि आप कतार मे है असेच प्रत्येकाला उत्तर मिळतं.आणि त्याचं मन या सगळ्या गोष्टींनी व्यापलं असल्यामुळे आनंद कुठून मिळणा? फुलांचा सुगंध, फुलांचा स्पर्श घेतल्याशिवाय आनंदाची अनुभूती मिळत नाही. अनुकूल वातावरण असले की वनस्पती, फुलं बहरून येतात. माणसांचेही तसेच आहे, त्यांच्यासाठी संपर्कात चांगली माणसे आली, आवडीची माणसें संपर्कात आली तर माणसेही आतून उमलतात. माणसाचं आतून उमलणं फार महत्त्वाचं आहे.
काही विशिष्ट चांगली लोकं आपल्या संपर्कात आली म्हणून आपण बऱ्यापैकी चांगले घडत असतो.
भाजीवर जसं पाणी टाकलं की भाजी ताजी टवटवीत दिसते ,तसंच माणसांचं आहे.कौतुकाचे चार शब्द पडले तर माणसें शहारून जातात, सुखावून जातात. अडचण दूर करण्यासाठी माणसा माणसांमध्ये संवाद हवा तेव्हाच नात्याचं इंद्रधनुष्य बहरतं. मिलिंद कडणे यांचे मुखपृष्ठ मोहक व दाहक आहे.
अरसड
लेखक : प्रा. व्यंकटेश सोळंके
प्रकाशक : लोक वाङ्मयग्रह प्रकाशन
मूल्य : रु.४००/-
पृष्ठसंख्या : २१८
समिक्षक : डॉ.अनिल कुलकर्णी


Leave a Reply