भारतीय अधिकार्‍याने “आयएसआय”ला गोपनीय माहिती पुरविणे गंभीर बाब

भारताच्या माजी राजनयिक अधिकारी माधुरी गुप्ता यांना १९ मे  दिल्लीच्या एका न्यायालयाने ३ वर्ष तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयला महत्त्वाची आणि गोपनीय माहिती पुरवल्याच्या आरोपाखाली त्यांना दोषी ठरवण्यात आलं आहे. परदेशात असताना परदेशी लावण्यावतींच्या जाळ्यात म्हणजेच हनीट्रॅपमध्ये अडकून देशाशी गद्दारी करणारे पुरुष अधिकारी तर खूप असतील पण शुक्रवारी दोषी ठरवलेली माधुरी गुप्ता तशी पहिली अधिकारी असावी. माधुरी गुप्ता परराष्ट्र सेवेमध्ये असताना पाकिस्तानच्या भारतीय दूतावासामध्ये बसून पाकसाठी काम करीत होत्या, असे उघडकीस आले आहे. या निर्णयाविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यासाठी २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर त्यांना जामीन मंजुर करण्यात आला.

माधुरीवर विश्वासाला तडा पोहोचवणे, गुन्ह्याचा कट रचणे असे आरोप लावण्यात आले आहेत. माधुरी गुप्ता यांना सरकारी गोपनियता अधिनियम कायद्याच्या कलम ३ आणि ५ अंतर्गत दोषी ठरवलं. यामध्ये ३ वर्ष तुरुंगवास आणि दंडाची शिक्षा झाली. 22 मार्च 2012 पासून माधुरी यांच्याविरोधात हा खटला सुरू होता.

जुलै २०१० मध्ये माधुरी यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आलं होतं. आरोपपत्रात, माधुरी इस्लामाबादमधून लॅपटॉप आणि ब्लॅकबेरी फोनच्या माध्यमातून गोपनीय माहिती आयएसआयला पाठवत होत्या असं म्हटलं होतं. आयएसआयचे दोन अधिकारी मुबशर राजा राणा आणि जमशेद यांच्याशी माधुरी या संपर्कात होत्या, इतकंच नाही तर जमशेद सोबत त्यांचे प्रेमसंबंध जुळले होते असंही आरोपपत्रात म्हटलं होतं. २२ एप्रिल २०१० रोजी त्यांना अटक करण्यात आली होती. माधुरी गुप्ता १९८३ साली परराष्ट्र सेवेत रुजू झाल्या.

महिला डिप्लोमॅटची हेरगिरी

आयएसआयसकट तमाम पाकिस्तानी गुप्तचर संस्था भारतात सातत्याने घातपाती कारवाया करीत असल्याचे सर्वज्ञात आहे. त्याच संस्थांना भारताच्या परराष्ट्र धोरणाबाबत गोपनीय आणि संवेदनशील माहिती पुरवणारे हेरगिरी रॅकेट २०१० मध्ये उघड झाले.
ही हेरगिरी एकट्या गुप्ता यांनी केल्याची शक्यता नसल्याने भारतीय उच्चायुक्त ऑफिसमधील, तसेच गुप्तहेर यंत्रणेतील अधिकाऱ्यांभोवतीही संशयाचे ढग जमा झाले होते.तीन वषेर् गुप्ता (५३) इस्लामाबादमध्ये असून उच्चायुक्त ऑफिसमधील मीडियाशी संबंधित जबाबदारी त्यांच्याकडे सोपवली होती. उर्दूवर प्रभुत्व असणाऱ्या गुप्ता यांनी २००७-१० या काळात भारताच्या पाक तसेच अफगाणिस्तानमधील डावपेचांची माहिती व दस्तऐवज पाकला पुरवल्याचा संशय होता. गुप्ता यांच्या कार्यकक्षेत न येणारी माहितीही त्या उच्चायुक्त ऑफिसमधील अधिकाऱ्यांना विचारू लागल्याने गुप्ता यांच्या हेतूंबद्दल भारतीय गुप्तचर यंत्रणांना शंका निर्माण झाली. त्या पाकिस्तानी यंत्रणाच्या ‘पे-रोल’वर असल्याचा संशय बळावल्याने गेले वर्षभर गुप्तांच्या इस्लामाबाद तसेच नवी दिल्लीतील हालचालींवर नजर ठेवण्यात आली.

‘सार्क’ परिषदेच्या तयारीच्या चचेर्साठी दिल्लीला येण्यास गुप्ता यांना परराष्ट्र खात्याने सांगितले. गुप्ता भारतात परतल्यावर त्यांना दिल्लीतील निवासस्थानी अटक केली गेली .इंटेलिजन्स ब्युरो, रॉ तसेच दिल्ली पोलीस यांनी त्यांची चौकशी केली. गुप्ता यांच्याकडून ७ दस्तऐवज, मोबाइल फोन हस्तगत झाले.

पैशांसाठी देशाशी गद्दारी करणाऱ्या माधुरी गुप्ता यांना महिन्याला किमान ७० हजार रुपयांपर्यंत पगार होतो,  या पगाराव्यतिरिक्त निवास, प्रवास आदींसाठीची तरतूद निराळी असते.

‘परराष्ट्र खात्यात दिलेल्या जबाबदारीबाबत मी समाधानी नव्हते. शिवाय, मला पैशाचीही गरज होती. त्यामुळेच पाकसाठी हेरगिरी केली’, अशी कबुली माधुरी गुप्ता यांनी दिली . गोपनीय कायद्याचा भंग केल्याचा गुन्हा गुप्ता यांच्यावर ठेवला गेला. पाकमध्ये नियुक्त भारतीय अधिकाऱ्यांवर आयएसआयची २४तास नजर असते. तसेच त्यांना बाहेर कोठेही जायचे असेल तरी कडेकोट सुरक्षेत काहीवेळा तर चिलखती गाड्यांमधूनच जावे लागते. माधुरी मात्र जणू अपवाद होती. तिने कोणालाही आपलेसे करण्याच्या स्वभावाच्या बळावर मोठा मित्रपरिवार जमवला होता. त्यातच तिचे वरिष्ठ अधिकाऱ्यांशी खटके उडू लागले. ती थेट आयएफएस नसून प्रमोटी असल्याचा उल्लेख करत ते टोमणे मारत अशी तिची तक्रार असे. तिची ती खंत ही संधी असल्याचे नेमके ओळखले ते राणा या पाकिस्तानी आयएसआय अधिकाऱ्याने. माधुरी राणाच्या जाळ्यात गुरफटली. ती त्याच्या एवढी जवळ पोहचली की त्याच्यासाठी ती काहीही करायला तयार होऊ लागली. एक ब्लॅकबेरी फोन आणि वैयक्तिक वापरातील काँप्युटरचा वापर करुन ती माहिती पुरवू लागली. त्या अधिकाऱ्याने तिला ईमेलचा वापर करुन कशी पकडले न जाता माहितीची देवाण-घेवाण करायची ते शिकवले. त्याचा ती वापर करु लागली. संशय असाही होता की ती भारतातील आयएसआय एजंटच्या माध्यमातून माहिती पुरवत असे. तसे केल्यामुळे संशय येणार नाही अशी आयएसआयची रणनिती होती.

घरभेद्यांचे घातक उद्योग

भारतीय अधिकाऱ्याने “आयएसआय’ला गोपनीय माहिती पुरविणे ही गंभीर बाब आहे. अंतर्गत सुरक्षेच्या आव्हानाशी झगडत असताना असे घातक उपद्व्याप चालू राहणे परवडणारे नाही.पाकिस्तानातील एखाद्या राजनैतिक अधिकाऱ्याने पाकिस्तानला गोपनीय माहिती पुरविल्याचा हा प्रकार धक्कादायक असून, त्याकडे पुरेशा गांभीर्याने पाहिले पाहिजे. एकीकडे देश अंतर्गत सुरक्षेच्या आव्हानाचा मुकाबला करीत आहे; अस्तनीतील या निखाऱ्याची व्याप्ती नेमकी किती, हे शोधून काढून वेळीच त्याचा बंदोबस्त केला पाहिजे.

पाकिस्तानकडुन भारतविरोधी कारवायांत खंड पडत नाही

गेली दोन वर्षे माधुरी गुप्ता पाकिस्तानला माहिती पुरवीत होत्या. त्यांनी नेमकी कोणती माहिती फोडली, हे अद्याप स्पष्ट नाही. माधुरी गुप्ता जनसंपर्क विभागात काम करीत असल्याने व हा विभाग राजकीय विभागापेक्षा वेगळा असल्याने फार महत्त्वाची माहिती त्यांना उपलब्ध असणे शक्य नाही. पण किती महत्त्वाची माहिती पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेला मिळाली, हा मुद्दा जसा महत्त्वाचा आहे, तेवढाच असे कृत्य करण्याच्या मानसिकतेचाही आहे. राजनयाचे (डिप्लोमसी) काम करणाऱ्यांना सखोल असे प्रशिक्षण दिले पाहिजे, असा एक मुद्दा यानिमित्ताने उपस्थित करण्यात येत आहे; परंतु देशाविषयीची मूलभूत निष्ठा प्रशिक्षणाने कशी निर्माण होणार? ती एक सहज, स्वाभाविक प्रेरणा असली पाहिजे, असे मानले जाते. परंतु त्या समजाला तडा देणाऱ्या अनेक घटना अलीकडे घडताहेत, ही जास्त खेदाची बाब आहे. या हेरगिरी प्रकरणाने “आयएसआय’च्या भारतविरोधी हालचालींचे स्वरूप पुन्हा एकदा प्रकर्षाने समोर आले असून, त्याचीही भारतीय धोरणकर्त्यांनी गंभीर दखल घेतली पाहिजे.

विविध आघाड्यांवर सजग राहावे लागणार

सामरिक रणनीतीबाबत गुप्ता यांच्यासारख्या अधिकाऱ्याकडून “आयएसआय’च्या हाती काही माहिती लागण्याची शक्यता खूपच कमी आहे. कारण गुप्ता यांचे तुलनेने दुय्यम असलेले पद. शिवाय गेली चार महिने त्यांच्यावर सरकार लक्ष ठेवून असल्याने संशय आल्यानंतर त्यांना मुद्दाम खोटी माहिती पुरविण्यात आली असावी. त्यामुळे हेरगिरीचा हा प्रकार उघड झाला. म्हणून घबराट निर्माण होण्याचे काहीच कारण नाही. मात्र प्रश्न आहे तो राजनैतिक पातळीवरील संघर्षाचा. गेल्या काही वर्षांत पाकिस्तानच्या संदर्भात आपण आंतरराष्ट्रीय पातळीवर जो मुद्दा सातत्याने मांडत आहोत, तो आहे दहशतवादाचा. मग तो मुंबईवरील दहशतवादी हल्ला असो; काश्मींरमधील घुसखोरी असो. यामागे पाकिस्तानी लष्कर व आयएसआय हेच सक्रिय आहेत.

भारतीय दूतावासात “घुसखोरी’ हा त्या प्रयत्नांचा एक भाग आहे. दहशतवादाला चिथावणीव्यतिरिक्त इतरही आघाड्यांवर त्या देशाचे भारतविरोधी उपद्व्याप सुरू असतात. मग ते वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवरून भारतासंबंधी चुकीची माहिती पसरविणे असो किंवा अन्य मुस्लिम राष्ट्रांमध्ये भारताविषयी द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न असो. ही पार्श्वभूमी लक्षात घेतली तर भारताच्या धोरणांविषयीची माहिती मिळविण्याचा खटाटोप पाकिस्तानकडून का केला जातो, हे लक्षात येते. सध्या त्या देशाची सर्वांत जास्त अस्वस्थता आहे ती अफगाणिस्तानात भारताच्या वाढत असलेल्या महत्त्वामुळे. तेथे भारताचा प्रभाव वाढू देणे पाकिस्तानला नको आहे. यासंबंधीची भारताची धोरणे काय आहेत, हेही जाणून घेण्याचा आटापिटाही पाकिस्तान करीत असणार.भारताला विविध आघाड्यांवर सजग राहावे लागणार आहे. सर्वच देशांतील दूतावासांबाबत आता काळजी घ्यावी लागेल. विशेषतः तेथील कर्मचारी-अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करताना अधिक काटेकोर रहावे लागेल.

प्रकारात सापडलेले हे घरभेदीच आहेत. पण त्यांच्यामागे असणारी साखळी कुणाची आहे, या चौकशीने तळ गाठला तरच निदान यासारखे गुन्हे वारंवार घडणार नाहीत.

— ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि)

ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि)
About ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि) 250 Articles
ब्रिगेडियर हेमंत महाजन हे राष्ट्रीय सुरक्षा या विषयावर नियमितपणे लेखन करत असतात. त्यांचे लेख मराठीतील अनेक वर्तमानपत्रांत नियमितपणे प्रसिद्ध होतात. अनेक दूरचित्रवाणी वाहिन्यांवर ते नियमितपणे तज्ज्ञ वक्ते म्हणून कार्यक्रमांत सहभागी असतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…