नवीन लेखन...

भारतीय सेनादले: आवाहन आणि आव्हान

 

१९६२सालच्या भारत-चीन युद्धात, १९६५ व १९७१भारत-पाकिस्तान युद्धात सहभाग. नागा व मिझो बडंखोरांना वठणीवर आणण्याचे अद्वितीय कार्य. २२ वर्षांच्या कार्यकालात २१ वार्षिक मेरिट पदकांसह ७ विशेष सन्मानपदके प्राप्त. मेजर गावंड हे ‘ठाणे भूषण’ आहेतच शिवाय महाराष्ट्र शासनाच्या मानाच्या सेवा पुरस्काराचेही ते मानकरी आहेत. ‘संडे मिलिटरी स्कूल’ चे ते संस्थापक असून त्यांनी प्रशिक्षित केलेले ५००० हून अधिक विद्यार्थी-विद्यार्थिनी भारताच्या वेगवेगळ्या दलात कार्यरत आहेत.

भारतीय सेनादलात दरवर्षी हजारो तरुणांना शिपाई ते अधिकारीपदासाठी सुवर्णसंधी उपलब्ध होत असते. परंतु चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होणारी मुले सैन्यदलाकडे पाठ फिरवताना दिसतात त्याचे मुख्य कारण काही गैरसमजुती, सैन्यदलाविषयी अपुरी माहिती आणि मृत्यूचे भय, तरुण पिढीला मार्गदर्शनपर माहिती मिळावी म्हणून हा लेखप्रपंच.

सैन्यदलात विविध स्तरांवरील प्रवेश

प्राथमिक स्तर :

इयत्ता सहावीत असलेल्या विद्यार्थ्यांना सातारा सैनिक स्कूल, बेळगाव मिलिटरी स्कूल, बंगलोर मिलिटरी स्कूल इथे प्रवेश दिला जातो. त्यात मागासवर्गीयांसाठी १० टक्के आरक्षण असते. ऑक्टो. च्या सुमारास ह्या शाळांशी संपर्क साधून अर्ज करावा लागतो. लेखी परीक्षेत पास  ल्यानंतर मुलाखत होते. इथे बारावीपर्यंत शिक्षण दिले जाते. नंतर बरीचशी मुले नॅशनल डिफेन्स अकॅडमीसाठी निवडली जातात. वायुदल, नौदल आणि सेनादल ह्यांत ऑफिसर्स म्हणून दाखल होतात.

माध्यमिक स्तर :

सर्व्हिसेस प्रिपरेटरी इन्स्टिट्यूट, सेक्टर एन १२, सिडको, मौलाना आझाद कॉलेजच्या मागे, औरंगाबाद ह्या पत्त्यावर दहावीत असतानाच अर्ज करायचा असतो. शालान्त परीक्षा संपल्यावर चाचणी परीक्षा होते. दुसऱ्या दिवशी उत्तीर्ण झालेल्या मुलांची मुलाखतीची चाचणी घेऊन त्यातून उत्तीर्ण झालेल्या मुलांना औरंगाबाद इथे ११ वी, १२वी विज्ञान शाखेत प्रवेश दिला जातो. नॅशनल डिफेन्स अकॅडमीच्या पूर्वपरीक्षेसाठी त्यांना प्रशिक्षित केले जाते. पालकांनी पाच वर्षांच्या प्रश्नपत्रिका मागवून मुलांकडून परीक्षेचा सराव केला तर उत्तम.

शालान्त परीक्षेनंतर :

तिन्ही दलांत तसेच बॉर्डर सिक्युरिटी फोर्स, सेंट्रल रिझर्व्ह फोर्स, कोस्ट गार्ड, सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स वगैरे ठिकाणी शिपाईपदावर जाता येते. दहावीत कमीत कमी ४० टक्के मार्क्स असावे लागतात. मागासवर्गीयांसाठी ९वी पास पात्रता चालते. उंची ५ फूट ७ इंच, छाती ३२ इंच व फुगवून ३४ इंच, वजन ५० किलो आणि वय १६ ते २० वर्षे ९ महिने. टेक्निकल पदासाठी १२वी सायन्स, ५० टक्के मार्क्स आवश्यक. क्लार्कसाठी १२ वी पास, टंकलेखन, बेसिक कम्प्युटरचे ज्ञान आवश्यक. नौदलासाठी उंची कमी चालते. वयोमर्यादा १९ वर्षे, दहावीत ६० टक्के मार्क्स आवश्यक बी.एस.एफ., सी.आय.एस.एफ., कोस्ट गार्ड त्याचप्रमाणे सी.आर.पी.एफ. साठी उंची जास्त लागते.

ह्या सर्व जागांसाठीच्या सूचना ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’ किंवा ‘रोजगार समाचार’ ह्या भारत सरकारद्वारे प्रसिद्ध होणाऱ्या साप्ताहिकात प्रसिद्ध होतात.

बारावीत असताना/उत्तीर्ण झाल्यानंतर:

बारावीत प्रवेश घेतल्याबरोबर एन.डी.ए. चा फॉर्म भरावा. वयाची अट १८ वर्षे ६ महिने. बारावीत ७० टक्के गुणांनी उत्तीर्ण झालेल्यांना फिजिक्स, केमिस्ट्री व मॅथमेटिक्स घेऊन उत्तीर्ण झालेल्यांना नेव्हल इंजिनीअरिंग खडकी, पुणे इथे प्रवेशासाठी अर्ज करावा लागतो. निवडक विद्यार्थ्यांना प्रवेश मिळतो. रुपयादेखील खर्च न करता ते इंजिनीअरची पदवी प्राप्त करू शकतात. पुढे इंडियन मिलिटरी अकॅडमी किंवा नेवल अकॅडमीमधून प्रशिक्षण घेऊन ते ऑफिसर्स होतात.

इंजिनीअरिंगमधील डिप्लोमाधारकांना भारतीय नौदलात आर्टिफिशर ह्या पदावर ज्युनि. कमिशन्ड ऑफिसर म्हणून जाता येते. बायोलॉजी हा विषय बारावीत घेतलेला असेल तर आणि वैद्यकीय क्षेत्रात जायचे असेल तर ऑक्टो. मध्ये आर्मड् फोर्सेस मेडिकल कॉलेज, पुणे येथे अर्ज करावा लागतो. मुलीसुद्धा अर्ज करू शकतात. अखिल भारतीय स्तरावर परीक्षा घेतली जाते. त्या परीक्षेसाठी आय.सी.एस.सी. व सी.बी.एस.च्या दहावीच्या अभ्यासक्रमाचा सराव आवश्यक असतो. पुढे एकही पैसा खर्च न करता साडेचार वर्षे प्रशिक्षण मिळते. त्यानंतर पुणे विश्वविद्यालयातून एम.बी.बी.एस. ही पदवी मिळते. ३० वर्षांवरील तरुणींना वरील कॉलेजमध्ये नर्सिंग ऑफिसर्सपदासाठी जाता येते.

पदवीधरांसाठी :

दरवर्षी कंबाईंड डिफेन्स सर्व्हिसेस एक्झामिनेशन घेतली जाते. त्यात परमनंट आणि शॉर्ट सर्व्हिस कमिशनसाठी अर्ज करता येतो. इंडियन मिलिटरी अकॅडमी व ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी इथे यशस्वी उमेदवारांना प्रशिक्षण दिले जाते. पुढे त्यांची नेमणूक लेफ्टनंट ह्या हुद्यावर होते.

इंजिनीअरिंग पदवीधरांसाठी :

इंजिनीअरिंग पदवीधरांसाठी आणि पदव्युत्तरांसाठी वयोमर्यादा २० ते २७ वर्षे. एम.ए.एम.एड., एम.एस.सी. उत्तीर्णांसाठी सैन्यदलात प्राध्यापक तसेच ऑर्डनन्स विभागात शेतकी पदवीधरांना मिलिटरी फार्ममध्ये व पशुविज्ञान शाखेतील पदवीधरांना रिमाऊंड व वेटर्नरी कोअरमध्ये जाता येते. एल.एल.बी. पदवीधारकांना जज्ज, अॅडव्होकेट जनरल बँचमध्ये ऑफिसर होता येते. हवाईदलात अॅडमिनिस्ट्रेटिव्ह बँचमध्ये फायटर कंट्रोलर, एअर ट्राफिक कंट्रोलर, मेट्रोलॉजिकल ब्रँचमध्ये प्रवेश घेता येतो. एअर ट्राफिक कंट्रोलर व फायटर कंट्रोलरसाठी प्रथम वर्गाची पदव्युत्तर पदवी, अकाउंट बँचसाठी बी.कॉम. प्रथम श्रेणी किंवा एम.कॉम. व एव्हिएशन व मेट्रोलॉजी बँचसाठी एम.एस.सी.फिजिक्स अप्लाईड मॅथमेटिक्स व मेट्रोलॉजी विषयात पदव्युत्तर पदवी आवश्यक असते. वयोमर्यादा २५ वर्षांपर्यंत.

तरुणींसाठी :

दरवर्षी प्रत्येकी १०० तरुणींना सेनादल, नौदल, वायुदल इथे ऑफिसर्स होण्याची संधी असते. वय २० ते २५ वर्षे, उंची १५२ सेंमी., वजन ४२ किलो अपेक्षित असते आणि पायाची लांबी ९९ सें.मी.पेक्षा अधिक असावी लागते. वैमानिक होण्यासाठी पदवीपरीक्षा पहिल्या वर्गात उत्तीर्ण होणे आवश्यक असते आणि वय २३ वर्षाच्या आत असावे लागते. हवाई व नौदलात जाण्यासाठी फिजिक्स आणि मॅथमेटिक्स घेऊन बी.एस.सी. पदवीधर असणे किंवा बी.ई. होणे आवश्यक असते.

लेखी परीक्षा, सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्डची मुलाखत ह्यातून तरुणींनाही जावे लागते. उत्तीर्ण तरुणींना एका वर्षाचे प्रशिक्षण वेगवेगळ्या अकॅडमींमध्ये दिले जाते. त्यांना दहा वर्षांसाठी शॉर्ट सर्व्हिस कमिशन दिले जाते. ते वाढवून चौदा वर्षे करता येते. त्यानंतर एका वर्षासाठी सिम्बॉयसिस, पुणे येथून मॅनेजमेंटचा अभ्यासक्रम सरकारी खर्चाने करता येतो. निवृत्त झाल्यानंतरदेखील चांगली नोकरी मिळते. प्रशिक्षणाच्या काळात विवाह मात्र करता येत नाही. ऑफिसर झाल्यावर करता येतो. एम.ए., एम.एस.सी., एम.कॉम., एम.सी.ए., एल.एल.बी. पास झालेल्या तरुणींचे वय २७ वर्षांपर्यंत चालते. सर्व तरुणींनी शारीरिकदृष्ट्या कणखर असावे, तसेच काही तरी खेळ खेळून शारीरिक क्षमता वाढती ठेवावी. आपले सामान्य ज्ञानही वाढवावे.

सैन्यदलातील फायदे :

सैन्यदलातील वेतन कदाचित आकर्षक वाटणार नाही पण त्यासोबत मिळणारे जे इतर फायदे आहेत, ते दामदुपटीने आहेत, हे लक्षात घेतले पाहिजे. उत्तम पौष्टिक आहार, राहायला मोफत घर, कपडे मोफत, वैद्यकीय सेवा मोफत, बायपास सर्जरी/किडनी शस्त्रक्रिया मोफत, प्रवास मोफत. इंडियन एअर लाईन्सच्या प्रवासात निम्मी सवलत. वर्षातून दोन महिने वार्षिक सुट्टी. एक महिना आपत्कालीन सुट्टी. प्रशिक्षण घेतानाही इतर काहीच खर्च नसल्याने जवान भरपूर पैसे घरी पैसे पाठवू शकतो. बटालियन बॉर्डरवर जाते त्यावेळी कुटुंबाला कुठे ठेवावे हा प्रश्न त्याला पडत नाही. मुंबई-पुणे इथे सर्व सोयींनी युक्त आणि सुरक्षित अशी फॅमिली क्वार्टर्स असतात. वीरगती मिळालेल्या व्यक्तीची विम्याची रक्कम जवानाला दहा लाख तर ऑफिसरला पंधरा लाख, इतर डेथ कम ग्रॅट्युइटि वगैरे धरून मृत जवानाच्या कुटुंबीयांना १० ते १२ लाख रु. व ऑफिसरच्या कुटुंबाला १५ ते २० लाख रु. मिळतात शिवाय त्याचे पेन्शन चालू होते. हे आकडे (२००८ सालचे आहेत, हे कृपया लक्षात घ्यावे.) मृत जवानाच्या पत्नीने आपल्या लहान मुलाला सांभाळण्यास असमर्थता व्यक्त केली तर त्या मुलाला रेजिमेंटच्या वसतिगृहात प्रवेश देऊन त्याची सर्व जबाबदारी रेजिमेंट घेते. पुढे त्याला सैन्यातच ऑफिसर, डॉक्टर, इंजिनीअर होण्यासाठी तसे शिक्षण रेजिमेंटतर्फे दिले जाते.

मित्रांनो, भारत सरकारद्वारे प्रसिद्ध होणारे ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’, ‘रोजगार समाचार’ दर शनिवारी विकत घ्या. आपल्यामध्ये राष्ट्राभिमान बाळगा. दुर्घटना, बॉम्बस्फोट घडल्यास पाकिस्तानी झेंडे किंवा त्यांच्या नेत्यांचे पुतळे जाळत बसू नका. देशात ‘बंद’ पाडून कोट्यवधी रुपयांचे नुकसान करू नका. शत्रूच्या हजारो सैनिकांना ठार मारण्याची क्षमता ठेवा. अभिमानाने म्हणा, ‘देशासाठी घेईन प्राण !’

लक्षात ठेवा, सैन्यात आपण शत्रूला मारायला जातो. मरायला नाही! सैन्यात ‘हर गोली पर लिखा है खानेवाले का नाम’ हे ब्रीद वाक्य. असते. ज्या गोळीवर तुमचे नाव लिहिलेले असेल तीच तुम्हाला लागेल. इथे जितकी माणसे रोज अपघाताने वगैरे मरतात त्यापेक्षा किती तरी कमी जवान लढाईक्षेत्रात शहीद होतात. मरण कधीही येणारच. इथे काय किंवा सीमेवर काय! आपल्या मृतदेहावर असेल स्वस्तातले पांढरे कापड. पण सैन्यात शहीद होणाऱ्या व्यक्तीच्या मृतदेहावर असतो राष्ट्राचा तिरंगी झेंडा ! अंत्यसंस्काराच्या वेळेस आकाशात रायफल्स किंवा तोफा खणखणतात. म्हणजे यमालासुद्धा वाटते की, कोणी तरी व्हीआयपी स्वर्गात येतो आहे. तोही त्याच्या स्वागतासाठी तयारी करतो.

सर्वधर्मसमभाव ठेवा. संघटित व्हा. देशाचे रक्षण करण्यासाठी मोठ्या संख्येने सैन्यात दाखल व्हा. आपले आणि देशाचे भवितव्य उज्ज्वल करा.

संदर्भ: ‘लष्कर’च्या भाकऱ्या चवदार-मेजर सुभाष गावंड, व्यास क्रिएशन, डी ४, सामंत ब्लॉक्स, घंटाळी पथ, नौपाडा, ठाणे (प), ४००६०२, तिसरी आवृत्ती २०१७.

-मेजर सुभाष गावंड

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


 

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..