नवीन लेखन...

भारतमातेच्या वीरांगना – 11 – यमुना विनायक सावरकर


आपलं स्वतःच व्यक्तिमत्व पूर्णपणे झाकोळून टाकून दुसऱ्याची सावली बनून जगणे, म्हणजे आजच्या स्त्रीमुक्तीच्या भाषेत स्वतःचे अस्तित्व नाकारणे. असेच आयुष्य जगल्या यमुनाबाई सावरकर अर्थात माई.

नाशिक जवळील त्र्यंबकेश्वर येथे चिपळूणकर घरात यशोदाबाईंचा जन्म झाला ४ डिसेंम्बर १८८८ साली. घरची सधन परिस्थिती आणि घरातली थोरली कन्या यशोदाबाई सगळ्यांच्या जिजी झाल्या. जेमतेम ४ थी शिकलेल्या जिजी १९०१ साली सावरकर घरात विनायकराव तथा तात्या सावरकरांच्या पत्नी म्हणून आल्या आणि सावरकरांची सावली बनल्या.

घरात थोरल्या जाऊबाई म्हणजे येसू वहिनींना मदत करू लागल्या ती फक्त स्वयंपकात किव्हा घर कामातच नाही तर आत्मनिष्ठ युवीत संघाच्या कामात सुद्धा. एकअर्थी त्यांचीही सावलीच बनल्या. कवी गोविंदांच्या कविता, सावरकरांच्या कविता पाठांतर करून घेणे, केसरीतील लेखांचे सामूहिक वाचन करून घेणे, स्वदेशी चा प्रचार, प्रसार करणे इत्यादी सगळ्या गोष्टी अगदी सहज करू लागल्या. सावरकर लंडनला गेले त्यावेळी त्यांच्या स्त्रीसुलभ मनात नक्कीच आले असणार, आता ४ वर्षांनंतर घराची परिस्थिती बदलेल, पण सावरकरांना अटक झाली आणि दोन काळया पाण्याच्या शिक्षा म्हणजे ५० वर्ष सक्त मजुरी भोगाव्या लागल्या. काळ्या पाण्याच्या शिक्षेला जाण्या आधी, त्यांची भेट झाली तेव्हा सावरकर म्हणाले, ‘माई, आपल्याला संसार चिमणी कावळ्या सारखा नाही करायचा, फक्त काटक्या गोळा करून घरटी बांधणे, वगरे, संसाराचे ध्येय मोठे असावे, आपल्या मुळे इतरांचे संसार उभे राहायला मदत झाली पाहिजे. ‘ अश्या विचारांची शिदोरी घेऊन माई घरी परतल्या आणि घरकामा बरोबरच समाज जागृतीचे व्रत अव्याहतपणे सुरू ठेवले.

पती वियोग, पुत्र शोक, घरावर जप्ती कुठलीच परिस्थिती त्यांना त्यांच्या ध्येयापासून दूर करू शकली नाही. सावरकर रत्नागिरीत नजरकैदेत होते, तेव्हा माई त्यांच्या सतत अवतीभवती राहत. त्यांना काय हवे नको ते बघत आणि ह्याशिवाय सामाजिक कामात पण सावरकरांच्या सल्ल्याने काम करत, मग ते सामूहिक हळदी-कुंकू किव्हा सामूहिक जेवण ज्यात त्या काळातल्या अस्पृश्य स्त्रियांनासुद्धा निमंत्रण असे. ह्या स्त्रियांची ओटी भरणे, त्यांच्याबरोबर जेवायला बसणे, हे सगळं त्या आनंदाने करत. घरात देवपूजा करणाऱ्या माई घराबाहेर देशपूजा, समाजातील बुरसटलेल्या रूढींना छेद देणे अशी कामेही अगदी त्याच श्रद्धेने, तन्मयतेने करत. गांधी वधा नंतर झालेल्या हिंदू महासभेला सावरकर आणि माई दोघांनाही आमंत्रण होते, पण तेव्हाची सामाजिक, राजकीय परिस्थिती बघता सावरकर जाऊ शकले नाही, त्याला माई गेल्या. त्यांचे त्यावेळचे भाषण अतिशय छान झाले, स्वतःला वाळलेल्या फुलांची उपमा देऊन त्यांनी समाजाचा गौरव केला की त्यांचे जीवन हे देशाच्या चरणी वाहिलेले एक वाळलेले फुल आहे. अश्या माई, १९६३ साली दीर्घ दुखण्यातून उठू शकल्या नाहीत.

अहेव मरण हे प्रत्येक भारतीय स्त्रीने देवाकडे मागितलेला वर असतो. माईंचे आयुष्याकडे मागणं फक्त एकच होतं, देशसेवेचे अव्याहत व्रत घेतलेल्या आपल्या परिवाराची काळजी. स्वतः परिश्रमी, धाडसी, कणखर असलेल्या माई सावरकरांची सावली म्हणूनच जगल्या पण आपल्या कामाचा ठसा सगळ्या जगासमोर उमटवून गेल्या. त्यांना ही माझी शब्दसुमनांजली.

|| वंदे मातरम् ||

— सोनाली तेलंग.

संदर्भ :

http://xn--e4b.historyunderyourfeet.wordpress.com/

२. savarkar.org

३. त्या तिघी : शुभा साठे

४. स्त्रीशक्ती आणि स्वातंत्र्यलढा : डॉ अर्चना चव्हाण, स्मिता कुलकर्णी, भारतीय विचार साधना पुणे

Avatar
About सौ. सोनाली अनिरुद्ध तेलंग 60 Articles
मी सोनाली अनिरुद्ध तेलंग, विज्ञान शाखेत स्नातक आहे. सध्या "conginitive science based brain and skill development for growing child " वर काम करते. मी गेली १०-१२ वर्ष वेगवेगळ्या विषयांवर लिखाण करते. लिखाणाचा रोख मुख्यत्वे मनुष्य स्वभाव, भारतीय संस्कृती ह्यावर असतो. आपले पदार्थ आपल्या पुढच्या पिढीला वारसा हक्कात देण्याची जवाबदारी आपली असते, त्यामुळे मराठी व इतर पाककृती स्वतः करते आणि सगळ्यांबरोबर शेअर करते.

1 Comment on भारतमातेच्या वीरांगना – 11 – यमुना विनायक सावरकर

  1. यमुना म्हणजेच माई या चिपळूणकर यांच्या कन्या. चिपळूणकर हे जव्हार संस्थानाच्या राज्याचे दिवाण होते म्हणजे त्या जन्मता चांदीचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आल्या. अश्या स्त्रीला असे सतीच्या वाणाचे जीवन भोगावे लागले. म्हणजे किती धीरोदत्त आयुष्य जगावे लागले.

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..