नवीन लेखन...

भारतमातेच्या वीरांगना – 7 : सुशीला दीदी

दिल्लीतल्या चांदनी चौक येथील एका रस्त्याचे नाव सुशीला मोहन मार्ग आहे. कुठल्याही मार्गाला एखाद्या व्यक्तीचं नावं दिलं जातं त्यावेळी त्या व्यक्तीचं कार्य निश्चितच तेवढं मोठं असतं, पण काळाची पुटं आपल्या स्मृतीवर गडद होत जातात आणि कालांतराने सवयीचं होऊन आपण सहज विसरून जातो. अशीच एक वीरांगना क्रांतिकारी भगत सिंगाची दीदी सुशीला दीदी.

५ मार्च १९०५ साली त्यांचा जन्म पंजाब येथे एका सैनिकी परिवारात झाला. त्यांचे वडील सैन्यात डॉक्टर म्हणून कार्यरत होते. कवितेची जाण त्यांना उपजतच होती आणि त्या फार सुंदर कविता स्वतः रचायच्या, ज्यात प्रामुख्याने देशाभिमान, देशप्रेम, राष्ट्रप्रेम असे विषय असायचे. हे सगळं असलं तरीही अजून प्रत्येक्ष क्रांती ला सुरवात झाली नव्हती. जालंधर ला विद्यालयीन शिक्षण घेतांना तिथल्या तत्कालीन मुख्याध्यापिका श्रीमती शन्नो देवी आणि आधीच्या मुख्याध्यापिका कुमारी लज्जावती ह्या स्वतः क्रांतिकारी विचारांच्या होत्या त्यामुळे, अभ्यासाबरोबरच क्रांतीचे पाठ सुद्धा सहज गिरवले गेले.

देहरादून येथे एका हिंदी साहित्य परिषदे साठी त्या आपल्या महाविद्यालया तर्फे गेल्या होत्या. तिथे त्यांची भेट लाहोरच्या क्रांतिकारी गटाशी झाली आणि पुढे कालांतराने त्या श्री भगवती चरण व्होरा आणि श्रीमती दुर्गा देवी व्होरा ह्यांच्या संपर्कात आल्या आणि एका क्रांतिकारी संघटनेचा भाग झाल्या. इथून त्यांच्या आयुष्याने वेगळे वळण घेतले.

भारतीय स्वातंत्र्य संग्रामात काकोरी रेल लूट ही एक मोठी घटना होती. त्या क्रांतिकारकांना जेव्हा फाशी सुनावण्यात आली तेव्हा सुशीला दिदींना त्यांच्या देशप्रेमाने आणि कर्तव्याने स्वस्थ बसू दिले नाही. आता त्यांनी पूर्णवेळ स्वातंत्र्य चळवळीत जीव ओतून काम करायाचे ठरविले. एका स्त्रीला सगळ्यात जवळची गोष्ट म्हणजे तिचे दागिने, ह्या घटनेच्या वकिली कामासाठी त्यांनी आपल्या सोन्याच्या बांगड्या सहज देऊन टाकल्या. आपल्या मुलीचे इंग्रजांविरुद्ध बंड आपल्या नौकरीसाठी धोकादायक ठरू शकणार होते, पण आपल्या वडिलांच्या ह्या विरोधाला न जुमानता त्या घरा बाहेर पडल्या आणि दोन वर्षे आपल्या घरी परतल्या नाही. दोनवर्षांनंतर तेव्हाच परतल्या जेव्हा त्यांच्या वडिलांनीसुद्धा आपल्या सरकारी नौकरीला रामराम ठोकला आणि पूर्णवेळ स्वातंत्रता चळवळीचे काम सुरू केले.

आपल्या मुख्याध्यापक ह्यांच्या सांगण्यावरून १९२८ साली सुशीला दीदी कलकत्त्याला एक छोटीशी नौकरी करण्यासाठी आल्या. साॅन्डर्स और स्काॅर्ट हांच्या हत्येनंतर क्रांतिकारी भगतसिंग आणि दुर्गा भाभी देघेही लाहोर सोडून कलकत्त्याला आले. सुशीला देवींनी तेव्हा त्यांच्या भूमिगत राहण्याची व्यवस्था केली. आपल्या कलकत्त्याच्या निवास काळात त्यांनी क्रांतिकारी महिलांकचे संघटन केले, ज्याचे नेतृत्व सुभाष चंद्र बोस करत होते. त्याअंतर्गत त्यांनी सायमन कमिशन ला जोरदार विरोध केला. भगतसिंग ह्यांच्या वरील खटल्यासाठी पैसे गोळा करायचे काम सुद्धा ह्या संघटनेने केले.

दिल्ली बॉम्ब हल्ल्या नंतर भगत सिंग आणि इतर मोठे क्रांतिकारी अटकेत होते, त्याचवेळी व्हाइसरॉय इर्विन ह्यांना मारण्याचा कट रचला गेला. त्यांच्या प्रवासाची संपूर्ण माहिती काढायचे काम सुशीला दीदींनी पार पाडले. त्या वेषांतर करू युरोपियन स्त्री झाल्या आणि इर्विन ह्यांच्या प्रवासाचा बारीक-सारीक तपशील गोळा केला. दुर्दैवाने ही योजना सफल होऊ शकली नाही. सुशीला देवी आपली नौकरी सोडून लाहोरला एक शीख मुलाच्या वेषात दाखल झाल्या. भगतसिंगांना जेल तोडून बाहेर काढायच्या कामत स्वतःला जुंपून दिले. हत्यारं गोळा करणं, पैसा जमा करणे, माहिती गोळा करणे, निरोप्याची कामे करणे अशी सगळी जय्यत तयारी केली. एका बॉम्ब परीक्षणाच्या वेळी दुर्दैवाने श्री भगवती चरण व्होरांना वीरमरण आले आणि ह्या योजनेला थांबवावे लागले.

भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव ह्याच्या फाशी नंतर तसेच चंद्रशेखर आजाद ह्यांच्या मृत्यूनंतर HSRA (Hindustani Socialist Rebuplican Association) ला मोठा झटका बसला, पण सुशीला देवींने नेतृत्व आपल्याकडे घेतले आणि अनेक क्रांतिकारी योजना करत राहिल्या. त्यांना अटक झाली, पण दिल्ली पोलिसांकडे कुठलेही ठोस कारण नसल्यामुळे त्यांना सोडावे लागले. नंतर त्यांचा विवाह वकील श्री श्याम मोहन ह्यांच्याशी झाला. १९४२ सालच्या भारत छोडो आंदोलनात सुद्धा त्यांनी आणि त्यांच्या पतीने सक्रिय सहभाग नोंदवला. त्यात त्यांना ६ महिन्याचा सश्रम कारावास झाला. १९४७ साली भारताला स्वातंत्र्य मिळाले आणि सुशीला देवींनी स्वतःला समाजकार्यात लोटून दिले. हस्तकला शाळा उघडून, महिलांना त्यात निपूण करणे, त्यांना रोजगार मिळवून देणे, दलित वस्त्यांमध्ये काम करणे असं त्या शेवटच्या श्वासापर्यंत करत राहिल्या. १३ जानेवारी १९६३ साली त्यांनी देशसेवेचे जे व्रत हाती घेतले होते त्याला पूर्णविराम मिळाला.

आपलं नाव इतिहासाच्या गडद रंगात लपून जाईल किव्हा उजागर होईल ह्याची पर्वा न करता शेवटच्या श्वासापर्यंत घेतलेला ‘वसा’ न उतता न मातता निभावणाऱ्या ह्या देवीला समस्त भारतीयांकडून मनाचा मुजरा.

— सोनाली तेलंग.

संदर्भ : amritmahotsav.nic.in, the wire.in, inuth.com

१०/०६/२०२२.

Avatar
About सौ. सोनाली अनिरुद्ध तेलंग 60 Articles
मी सोनाली अनिरुद्ध तेलंग, विज्ञान शाखेत स्नातक आहे. सध्या "conginitive science based brain and skill development for growing child " वर काम करते. मी गेली १०-१२ वर्ष वेगवेगळ्या विषयांवर लिखाण करते. लिखाणाचा रोख मुख्यत्वे मनुष्य स्वभाव, भारतीय संस्कृती ह्यावर असतो. आपले पदार्थ आपल्या पुढच्या पिढीला वारसा हक्कात देण्याची जवाबदारी आपली असते, त्यामुळे मराठी व इतर पाककृती स्वतः करते आणि सगळ्यांबरोबर शेअर करते.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..